फेसाळलेली, वाफाळलेली कॉफी

इरावती बारसोडे
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

कॉफी स्पेशल
कॉफी आवडणारे कधीही कुठेही कॉफी पिऊ शकतात, अगदी रस्त्यावर उभे राहूनसुद्धा! त्यांचे कॉफी अड्डेही ठरलेले असतात. (पुणेकरांच्या मते आणि त्यांच्याच शब्दांत सांगायचे, तर तिथे ‘जगात भारी’ कॉफी मिळते) फक्त तरुणमंडळीच नाही, तर मध्यमवयीन आणि रिटायर्ड लोकांचेही ठराविक अड्डे असतात. रोज नाही, पण आठवड्यातल्या किमान एखाद्या वारी नेहमीच्या अड्ड्यावर भेटायचेच हे ठरलेले असते. पुण्यामध्ये हा ट्रेंड चांगलाच मुरलेला आहे. अशाच काही कॉफी अड्ड्यांना भेट देऊ... 

साउथ इंडियन मेस, रास्ता पेठ
केईएम रुग्णालयाजवळ असलेले हे हॉटेल टिपिकल साउथ इंडियन हॉटेल आहे. साउथ इंडियन अर्बन को-ऑपरेटिव्ह हॉस्टेल सोसायटीने १९२८ मध्ये हे सुरू केले. सध्या वेमाबन अय्यर यांनी हे सोसायटीकडून चालवायला घेतले आहे. इथे मिळणारे पदार्थ ऑथेंटिक साउथ इंडियन. त्यामुळे अर्थातच कॉफीही तशीच, स्टीलच्या पेला-वाटीमध्ये मिळणारी. 
इथली तामिळनाडूची फिल्टर कॉफी आणि घी रोस्ट फेमस आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच इथे कॉफी पिण्यासाठी गर्दी सुरू होते. सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत हे हॉटेल सुरू असते. 
अस्सल साउथ इंडियन पदार्थांची चव चाखायला लोक इथे येतातच, पण त्याचबरोबर फक्त कॉफी पिणारेही इथे येतात. इतकी वर्षे हॉटेल इथेच असल्यामुळे अनेक जुनी गिऱ्हाइके जोडली गेली आहेत. त्यांना हवी तशी, म्हणजे बिनसाखरेची किंवा स्ट्राँग, लाइट अशी मागणीनुसार कॉफी तयार करून दिली जाते. मुळात जुन्या गिऱ्हाइकांना सांगावेही लागत नाही, कशी कॉफी हवी आहे ते. हॉटेलमधल्या लोकांना माहीत झाले आहे. तिथे काम करणारा शंकरही तेच सांगतो, ‘मशीनमध्ये कॉफी पावडर टाकतो. त्यावर गरम पाणी घालून फिल्टर करतो. मग त्यामध्ये गरम दूध, साखर घालतो आणि एकत्र करून ज्याला हवी तशी कॉफी करून देतो.’
इथे इडली, वडा, डोसा, उत्तपा, पोंगल असे सर्व पदार्थ मिळतात. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी दुपारी १२.३० ते ३ या वेळात फिस्ट असते. 


रुपाली, फर्ग्युसन कॉलेज रस्ता
रुपाली हे पुण्यातील कॉफीप्रेमींचे अति आवडीचे ठिकाण. इथे येऊन खाऊन झाल्यावर इथली फिल्टर कॉफी न पिता बाहेर पडणारे खूपच कमी असतील. नुसती कॉफीच प्यायला येणारा चाहता वर्गही वेगळा आहे. अगदी रात्री उशिरासुद्धा फक्त कॉफी प्यायला येणारे खूप आहेत. पूर्ण कॉफी खूप जास्त होते म्हणून वन बाय टू करून पिणारेही रोजचे गिऱ्हाईक आहे. पुण्यात जी काही अस्सल कॉफीप्रेमी मंडळी असतील, त्यांनी ही ४० रुपयांची कॉफी हमखास चाखलेली असते. इथली कॉफी काचेच्या ग्लासमध्ये मिळते. इथे मिळणारी कॉफी दोन प्रकारच्या कॉफी पावडर एकत्र करून केलेली असते, अशी माहिती रुपालीचे के. एन. शेट्टी यांनी दिली. कोल्ड कॉफी आवडत असेल, तर तीही इथे मिळते. आठवड्याचे सातही दिवस सकाळी ७ ते रात्री ११ सुरू असणाऱ्या रुपालीमधली कॉफी सगळ्यांनाच प्रिय आहे. त्यामुळेच रुपालीच्या बाहेर रस्त्यावर उभे राहून कॉफी पिणारेही दिसतातच.


मालगुडी टिफिन्स, कोथरुड
करिश्मा सोसायटीच्या शेजारीच असलेले मालगुडी टिफिन्स (तसे या हॉटेलला नुसत्या मालगुडी नावानेच जास्त ओळखतात.) साउथ इंडियन स्पेशल असले, तरी इथे सगळे पदार्थ मिळतात. इथली स्टीलच्या पेला-वाटीमधील कॉफी विशेष फेमस, कारण कॉफीच्या निमित्ताने इथे गप्पा रंगतात. तशी इथे कोल्ड कॉफीही मिळते, पण फिल्टर कॉफीला मागणी जास्त. फिल्टर कॉफीचा सुगंध कायमच दरवळत असतो, कारण सारखी कोणाची ना कोणाची तरी फिल्टर कॉफीची ऑर्डर सुरूच असते. मस्त फेसाळलेली गरमागरम वाफाळलेली कॉफी आपल्यासमोरून जेव्हा वेटर घेऊन जातो, तेव्हा आपल्यालाही कॉफी पिण्याचा मोह आवरता येत नाही. इथे स्टीलच्या पेला-वाटीमध्ये कॉफी देत असले, तरी तुम्हाला काचेच्या ग्लासमध्ये हवी असेल तर तशी तुम्ही मागू शकता. इथे मित्रांचे ग्रुप्स येतात आणि कुटुंबही येतात. कधीकधी लहानगेसुद्धा आईबाबांच्या कपामधील कॉफी टेस्ट करताना दिसतात.


वैशाली, फर्ग्युसन कॉलेज रस्ता
वैशाली आणि खवय्या पुणेकर यांचे एक वेगळेच नाते आहे. पुणेकरांना वैशाली फार फार प्रिय आहे... आणि अर्थातच तिथली कॉफीही. भर दुपारी एक वाजतासुद्धा वैशालीच्या बाहेर हातात ग्लास घेऊन कॉफी पिणारी मंडळी तुम्हाला दिसतील. ज्यांना बसायचे नाहीये किंवा वेटिंग असताना थांबायला वेळ नाही, असे लोक सरळ काउंटरवर पैसे देऊन वैशालीच्या स्वयंपाकघरातून कॉफी घेऊन बाहेर जाऊन उभे राहतात. त्यातही एक वेगळीच मजा!
वैशालीच्या कॉफीचे वैशिष्ट्य असे, की सुरुवातीला मालक स्वत: कॉफी करायचे आणि आत्ताही करतात. इथे अगदी मोजून प्रमाणामध्ये कॉफी केली जाते. डिकॉक्शनमधून एकदाच कॉफी काढली जाते. त्यामध्ये पुन्हा पाणी घालत नाही, त्यामुळे आमची कॉफी टेस्टी होते, असे इथले कर्मचारी सांगतात. दूधसुद्धा एकदम प्रमाणात असते. त्यामुळे कॉफी फार घट्ट किंवा फार पातळ होत नाही. लोकांची स्ट्राँग, माइल्ड अशी वेगवेगळी मागणी असते आणि त्यांच्या मागणीनुसार कॉफी करून दिली जाते. इथेही बऱ्यापैकी मोठ्या काचेच्या ग्लासमध्येच कॉफी मिळते. रात्री १० नंतर मात्र पेपर ग्लासमध्ये कॉफी मिळते. २०० मिली कॉफी ५० रुपयांत मिळते. 


कॉफी हाउस, कॅम्प
आता कॉफी सरसकट सगळीकडे मिळत असली, तरी पूर्वी अस्सल दाक्षिणात्य कॉफी मिळणारी काही मोजकीच ठिकाणे होती आणि कॉफी हाउस त्या जुन्या प्रसिद्ध ठिकाणांपैकीच एक आहे. कॅम्पमधील मोलेदिना रस्त्यावरचे कॉफी हाउस १९३८ पासून तिथे आहे. इथे मोठा कप भरून फिल्टर कॉफी मिळते. तसेच इन्स्टंट कॉफी आणि कोल्ड कॉफीसुद्धा मिळते. इथे मिळणाऱ्या कॉफीची पावडर खास बंगळूरहून मागवली जाते. ५२ रुपयांची कॉफी छानशा पांढऱ्या कप-बशीतून दिली जाते, पण ती बिनसाखरेची. बिनसाखरेची कॉफी पिणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. ज्यांना गोड आवडते, त्यांच्यासाठी अर्थातच साखर वेगळी दिली जाते. आठवड्यातील सातही दिवस सकाळी ८ ते रात्री ११ सुरू असते.


कॅफे दुर्गा
दुर्गा हे तरुणाईला आकर्षित करणारे ठिकाण. बहुतांश मंडळी इथे खास कोल्ड कॉफीच प्यायला येतात. इथे साधी कॉफीसुद्धा मिळते, पण कोल्ड कॉफी पिणाऱ्यांचे प्रमाण अधिक. तीन राज्यांतील ११ शहरांमध्ये दुर्गाच्या ब्रांचेस आहेत, तर एकट्या पुण्यामध्ये ३१ ब्रांचेस आहेत. टिळक रोड, मॉडेल कॉलनी, डहाणूकर कॉलनी, जंगली महाराज रोड याबरोबरच सुस गाव, बाणेर, बालेवाडी, धायरी, भोसरी इथेही दुर्गा कॅफेच्या ब्रांचेस आहेत. कोल्ड कॉफी प्यायची, तर दुर्गालाच जायचे! आता शहरात अनेक ठिकाणी कोल्ड कॉफी मिळत असली, तरी दुर्गाची लोकप्रियताही तेवढीच आहे. कारण इथली कॉफी कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना सहज परवडणारी आहे. 

इथे मिळेल कॉफी पावडर आणि बीन्ससुद्धा

पिढीजात कॉफी विक्रेते
रास्ता पेठेतल्या ओपोलो टॉकिज चौकातून केईएम रुग्णालयाकडे निघालात, की मधेच कॉफीचा खूप सुंदर सुंगंध आपली वाट आडवतो. या सुगंधाच्या मागावर गेलात, तर पोचाल परशुराम ब्रदर्स कॉफी स्टोअरमध्ये! १९५२ मध्ये सुरू झालेले हे दुकान आता तिसरी पिढी चालवते आहे. इथे उत्तम कॉफी पावडर आणि कॉफी बीन्सही मिळतात.
कर्नाटक, केरळ, तामिळनाडू इथे कॉफी प्लांटेशन्स आहेत. जेवढी ॲल्टिट्यूड जास्त तेवढा कॉफीचा दर्जा उत्तम. परशुराममध्ये येणारी कॉफी कर्नाटकातील चिकमंगळूर आणि कुर्ग भागातून येते. खास ग्रीन कॉफी बीन्स आणल्या जातात. त्यामध्ये ॲराबिका आणि रोबस्टा या दोन्ही प्रकारांचा समावेश असतो. इथे आणल्यानंतर त्या रोस्ट केल्या जातात. परशुराममधील प्रत्येक कर्मचारी कॉफी विकत घेण्याआधी कॉफी कप तयार करतो. कॉफी कप करणे, म्हणजे कॉफीची ॲसिडिटी, क्रीमा, अरोमा, आफ्टरटेस्ट, बिटरनेस किती आहे, माउथ फील कसा आहे या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. त्यावरून कॉफीची प्रोफाईल आणि कॅरॅक्टर ठरते. मगच कॉफी मागवली जाते. एक-दोन टन मागवली की दोन-तीन महिने पुरते, अशी माहिती परशुराम ब्रदर्सचे पंकजा सूर्यनारायण यांनी दिली.  
एखादा फिल्टर कॉफीचा किंवा एस्प्रेसोचा विशिष्ट ब्लेंड असेल, तर त्यातही सात-आठ वेगवेळ्या भागांमधील वेगवेगळ्या बीन्सचे प्रकार वापरलेले असू शकतात. बीन्स भाजण्यापासून पावडर करण्यापर्यंत सगळे इथेच केले जाते.
पुण्यातल्या अनेक नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये इथून फिल्टर कॉफी पुरवली जाते. ग्राहकाच्या मागणीनुसार, प्युअर किंवा ब्लेंड कॉफी दिली जाते. इथे प्युअर कॉफी ५०० रुपये प्रति किलोने मिळते. यांचे वैयक्तिक ग्राहकही मोठ्या संख्येने आहेत. खडकी, खराडीसारख्या लांबच्या ठिकाणांहूनही एक-दोन किलो कॉफीसाठी ग्राहक इथे येतात. स्वतः घरी बीन्स ग्राइंड करून कॉफी करायची असेल, तर बीन्ससुद्धा इथे मिळतात.
परशुराम स्टोअर लवकरच ऑनलाइन येणार आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट येथेही लवकरच परशुरामची कॉफी मिळू शकेल. त्याशिवाय नेहमीच्या ग्राहकांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून घरपोच फ्रेश कॉफी मिळणार आहे. 


फ्रेशली रोस्टेड बीन्स...
ईमाद खत्री यांनी ताज्या भाजलेल्या आणि उत्तम दर्जाच्या कॉफी बीन्स कॉफीप्रेमी लोकांना मिळाव्यात या कल्पनेतून २०१७ मध्ये कॉफी केमिस्ट्री सुरू केले. कॉफी केमिस्ट्री हा सीड आणि लीफ कंपनीचा रजिस्टर केलेला ब्रँड आहे. 
चिकमंगळूर येथून कॉफीच्या रोस्टेड (भाजलेल्या) बीन्स मागवल्या जातात. ॲराबिका आणि रोबस्टा या दोन्ही प्रकारांचा त्यामध्ये समावेश आहे. येथे फक्त बीन्सच पुरविल्या जातात. अनेक कॅफेज, मल्टी नॅशनल कंपन्यांकडून इथल्या बीन्सना मागणी असते. तसेच मागणीनुसार रिटेल ग्राहकांनाही बीन्स पुरविल्या जातात. जर्मन तंत्रज्ञान असलेल्या ५ किलोच्या प्रोबॅट रोस्टरमुळे कॉफी भाजण्याच्या प्रक्रियेत सातत्य राहते. 
कॉफी करण्यासाठी फक्त कॉफी पावडर किंवा बीन्स पुरेशा नसतात. त्यासाठी खास इक्विपमेंट्स लागतात. ही इक्विपमेंट्स, कॉफी मशीन्सही कमी किमतीमध्ये कॉफी केमिस्ट्रीमध्ये मिळू शकतात. 

याखेरीज पुण्यामध्ये कॉफीचे अनेक अड्डे आहेत. सांबार, अपसाउथ, कॉफी नेशन, इडोस, अण्णा इडली, वाडेश्‍वर... अशी किती तरी नावे सांगता येतील. आता पुण्यामध्ये कॉफी संस्कृती रुजते आहे. त्यामुळे कॉफी पिणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. 

संबंधित बातम्या