इट्स कॉफी टाइम...!

इरावती बारसोडे
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

कॉफी स्पेशल
 

पुण्यातले ‘कॉफी कल्चर’ दिवसेंदिवस वाढत आहे. दाक्षिणात्य फिल्टर कॉफीचे चाहते काही कमी नाहीत. पण त्याच वेळी, कॅपुचिनो, लाटे, फ्रापे, माकियाटो, फ्लेवर्ड कॅफे, फ्रापुचिनो अशा जरा अवघड आणि विचित्र नावांच्या कॉफीचे चाहतेही भरपूर आहेत. मोठे कॅफेज आणि कॉफी शॉप आउटलेट्समध्ये जाणारा एक मोठा वर्ग आहे. या कॉफी शॉप्समध्ये साधी कॉफी मिळत नाही आणि मिळाली तरी त्याची किंमत भरपूर असते. इतर कॉफींच्या किमतीही १०० रुपयांच्या खाली नसतातच, पण तरीही हौसेने लोक या कॉफी हाउसेसमध्ये जातात. काही नियमित जातात, तर काही असेच कधीतरी चैन म्हणूनही जातात. 
या कॉफी शॉप्समधील इंटिरियर, अँबियन्सदेखील उगाचच हायफाय वाटावा असा असतो. इथे गेले की कम्पलसरी इंग्रजीमध्ये बोलावे, असा अलिखित नियम असल्यासारखे लोक वागतात. पण खरे तर आता पुण्यामध्ये तरी बहुतांश कॉफी हाउसमध्ये काउंटरवरच्या लोकांना मराठी येते, अगदी गेलाबाजार हिंदी तर नक्कीच येते. आपण मराठी बोललो, की तेही बोलतात. त्यामुळे इंग्रजीची सवय नसेल, तरी बिनधास्त ऑर्डर करायची! या शॉप्समध्ये बराच वेळ बसता येते, हा इथला आणखी एक ‘प्लस पॉइंट’! एकटे असाल तरीही कोणी ढुंकून बघत नाही. त्यामुळे इथे फक्त निवांत बसायलाही अनेकजण येतात, सोबतीला कॉफी असतेच. 
पुण्यामध्येही अशी अनेक ‘हायफाय’ कॉफी शॉप्स आहेत. सीसीडी, बरिस्ता, स्टारबक्स ही माहीत असलेली नावे. पण, त्याहीपेक्षा वेगळे असे अनेक ‘स्टँड अलोन’ कॅफेज पुण्याच्या ‘कॉफी कल्चर’मध्ये भर टाकताना दिसत आहेत.

द ब्र्यू रूम, कोथरुड
सहा महिन्यांपूर्वीच सुरू झालेले ब्र्यू रूम अल्पावधीतच कॉफीप्रेमींचे आवडते कॉफी डेस्टिनेशन झाले आहे. पूर्ण आठवडा सकाळी नऊ ते रात्री १२ वाजेपर्यंत उघडे असते. यांची स्पेशालिटी म्हणजे कोल्ड ड्रिप, चेमेक्स, फ्रेंच प्रेस, व्हॅक्युम सायफन, एरोप्रेस, टर्किश कॉफी, द ब्र्यू रूम डबरा कॉफी. कोल्ड ड्रिप १८ तास ब्र्यू केलेली असते आणि थंड वाइन ग्लासमध्ये सर्व्ह केली जाते. लांबून बघणाऱ्याला रेड वाइन असल्याचा भास नक्की होईल, अशीच ती दिसते. चेमेक्स, फ्रेंच प्रेस, व्हॅक्युम सायफन, एरोप्रेस या कॉफी तयार करण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. या कॉफींव्यतिरिक्त एस्प्रेसो, रिस्ट्रेटो, डोपिओ, माकियाटो, आफोगाटो, अमेरिकानो, कॅपुचिनो - क्लासिक आणि फ्लेव्हर्ड, कॅफे कर्टोडो, मोकाचिनो, सॉल्टेड कॅरॅमल मोका, व्हाइट चॉकलेट मोका अशाही बऱ्याच प्रकारची कॉफी इथे मिळते. चिल्ड कॉफीमध्ये आईस्ड लाटे, थाय कोल्ड, आयरिश क्रीम कोल्ड, आईसबर्ग, हाउस ब्लेंड, शेकेराटो, आईस्ड अमेरिकानो, कॅफे फ्रापे या प्रकारच्या थंड कॉफींचे प्रकारही इथे टेस्ट करायला मिळतील. हा कॅफे असल्यामुळे इथे खाण्याच्या पदार्थांमध्येही बरीच व्हरायटी आहे. 


ल प्लेझीर, प्रभात रस्ता
ल प्लेझीर हे तसे नवीन, पण आता प्रसिद्ध असे पॅटिसरी आणि बिस्ट्रो. ल प्लेझीर हा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ ‘द प्लेजर’ असा होतो. हे रेस्टॉरंट अनेक काँटिनेंटल पदार्थांसाठी फेमस आहे. पदार्थांबरोबर कॉफीही तेवढ्याच आवडीने घेतली जाते. इथे ब्लॅक कॉफी, कॅपुचिनो, सिनमन कॅपुचिनो, कॅफे मोका, एस्प्रेसो शॉट्स हे कॉफीचे काही प्रमुख प्रकार. कॅफे मोकामध्ये कोको पावडर असते. एस्प्रेसो शॉट्स यामध्ये ५० एमएलचा कॉफी शॉट असतो. कॉफी शॉट म्हणजे प्युअर कॉफी, त्यामध्ये पाणी, दूध, साखर असे काहीही नसते. प्रत्येक कॉफीबरोबर बटरी फ्लेव्हर आणि कोकोनट असलेल्या दोन कुकीज दिल्या जातात. शुगर पाउचेस अर्थातच वेगळे दिले जातात, कारण विदाउट शुगर कॉफी पिणाऱ्यांची संख्या जास्त. एखाद्याला अगदी कॉफीमध्ये साखर घालूनच हवी असेल, तर तशी विथ शुगर कॉफीही मिळते. 
इथली कॉफी तयार करण्यासाठी ब्ल्यू टोकाई कॉफी रोस्टर्सच्या कॉफी बीन्स खास मागवल्या जातात. बीन्स अॅराबिका कॉफीचेच मागवले जातात आणि तेही अख्खे बीन्स असतात. या बीन्सचा फ्लेव्हर शुगर केन स्वीटनेस, बटरी माऊथ फील, थोडासा डार्क असा असतो. 
इथे येणारे सहसा पंचविशीच्या पुढचे असतात. ‘खास’ मित्रमैत्रिणींबरोबर येतात, दोस्तांबरोबर येतात, सहकुटुंबही येतात. फॉरेनरमंडळींची तर ही पंढरीच. गर्दीच्यावेळी, शनिवार-रविवार तुम्ही इथे गेलाय आणि परदेशीमंडळी नाहीत, असे सहसा होत नाही. कॅपुचिनो, ब्लॅक कॉफी विदाउट शुगर यांना जास्त मागणी. आपले लोक खाऊन झाल्यावर कॉफी पितात आणि फॉरेनरमंडळी खाण्याच्या आधी, हे तिथल्या कर्मचाऱ्याने नोंदवलेले निरीक्षण! आठवड्याचे सातही दिवस सकाळी नऊ ते रात्री ११ सुरू असते. 


कॅफे कॉफी डे (सीसीडी)
‘अ लॉट कॅन हॅपन ओव्हर कॉफी...,’ असे म्हणत सीसीडी बंगळूर येथे १९९६ मध्ये पहिल्यांदा सुरू झाले. आता ऑस्ट्रिया, चेक रिपब्लिक आणि मलेशियामध्येही सीसीडीचे आउटलेट्स आहेत. सीसीडी हे भारतभरामध्ये लोकप्रिय असलेले कॉफी शॉप आहे. महाराष्ट्रातल्या कित्येक शहरांमध्ये यांची कित्येक आउटलेट्स आहेत. पुण्यामध्ये जंगली महाराज रोड, टिळक रोड, नळ स्टॉप, चांदणी चौक, कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, वानवडी, एमजी रोड अशा बऱ्याच ठिकाणी आउटलेट्स आहेत. 
सीसीडीची चिकमंगळूर, बंगळूर येथे स्वतःचे कॉफी प्लांटेनशन्स आहेत. तिथेच कॉफीची लागवड आणि पुढचे प्रोसेसिंग होते. ॲराबिका आणि रोबस्टा या दोन्ही प्रकारच्या कॉफीची लागवड होते. तेथून सीसीडीच्या सगळ्या शॉप्समध्ये दोन्ही प्रकारच्या बीन्स पाठवल्या जातात. शॉप्समध्ये ग्राइंड करून कॉफी केली जाते. 
सीसीडी स्पेशलमध्ये अॅझटॅक, इथियोपियन, कॅफे मोका, माकियाटो, अमेरिकानो या कॉफींचा समावेश आहे. ॲझटॅक ही चॉकलेट फ्लेव्हरची कॉफी असते. कॉफीच्या झाडावर वेली सोडून हा फ्लेव्हर मिळवला जातो. कॅफे मोकामध्ये चॉकलेट सॉस असतो. माकियाटोमध्ये ३० एमएल कॉफी शॉट, मिल्क फोम असतो आणि बीन्स क्रश करून वापरल्या जातात. अमेरिकानो ही ब्लॅक कॉफी आहे. 
इथे येणाऱ्यांची कॅपुचिनो ही जास्त फेव्हरेट कॉफी. याशिवाय व्हॅनिला लाटे, व्हॅनिला कॅपुचिनो, कॅफे लाटे, क्लासिक कॅपुचिनो, इनव्हर्टेड कॅपुचिनो, इनव्हर्टेड कॅपुचिनो विथ जॅगरी, आय-ओपनर एस्प्रेसो, फिल्टर कॉफी, फिल्टर कॉफी विथ जॅगरी या कॉफीही इथे मिळतात. 


स्टारबक्स
कॅपुचिनो, लाटे यांसारख्या कॉफी प्रकारांच्या लोकप्रियतेमध्ये स्टारबक्स वरच्या क्रमांकावर आहे. १९७१ मध्ये अमेरिकेतल्या सिॲटल येथे सुरू झालेल्या स्टारबक्सचे आजमितीला जगात २२ हजारांहून अधिक आउटलेट्स आहेत. सर्व कोल्ड आणि हॉट बेव्हरेजेसमध्ये १०० टक्के प्युअर ॲराबिका कॉफी वापरली जाते. एस्प्रेसोमध्ये फ्लॅट व्हाइट, कॅरॅमल माकियाटो, कॅरॅमल मोका, कॅफे मोका, व्हाइट चॉकलेट मोका, व्हॅनिला लाटे, हेझलनट लाटे, कॅरॅमल प्रलाइन लाटे, कॅपुचिनो, चॉकलेट कॅपुचिनो, कॅफे लाटे, एस्प्रेसो, एस्प्रेसो माकियाटो, कॅफे अमेरिकानो कॉफी हॉट आणि कोल्ड दोन्ही प्रकारांमध्ये मिळते. फ्रापुचिनो या प्रकारात जावा चिप, कॅरॅमल यांसारखे कॉफी प्रकार मिळतात. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोड, कोरेगाव पार्क, कोथरुड, विमान नगरमधील फिनिक्स मार्केट सिटी, औंध, हडपसरमधील ॲमनोरा मॉल, बाणेर, खराडी, मगरपट्टा, पॅव्हेलियन मॉल येथे स्टारबक्सची आउटलेट्स आहेत.


कॅफे पीटर
कॅफे पीटरची सुरुवात २०१० मध्ये झाली. पुण्यामध्ये आपटे रोड, बावधन, औंध, खराडी, विमान नगर, बंड गार्डन रोड, बाणेर आणि पिंपळे निलख इथे कॅफे पीटरची आउटलेट्स आहेत. इथे एस्प्रेसो, कॅफे अमेरिकानो, कॅपुचिनो, कॅफे लाटे या नेहमीच्या कॉफींबरोबरच कॅफे मोका, कॅफे आयरिश, कॅरॅमल माकियाटो, टर्किश कॅपुचिनो, व्हॅनिला लाटे या हॉट डेझर्ट कॉफी; कॅफे फ्रापे, आइस्क्रीम आफोगाटो, हेझलनट फ्रापे, कॅरॅमल फ्रापे, मोका फ्रापे, कॉफी लश या कोल्ड डेझर्ट कॉफी; तसेच आईस्ड अमेरिकानो, आईस्ड कोक एस्प्रेसो, आईस्ड कॅफे मोका, आईस्ड कॅफे लाटे, आयरिश कॅरॅमल फ्रापे, पीटर कुकी क्रंच आणि पीटर ब्लास्ट हे कॉफी प्रकारही मिळतात. इथेही फॉरेनरमंडळींची नेहमी ये-जा असते. ब्रेकफास्टसाठी, ब्रंचसाठीही कॅफे पीटरला पसंती आहे, कारण हे सकाळी आठ वाजल्यापासून रात्री ११ पर्यंत सुरू असते. इथे कोरियन पदार्थही मिळतात.  


बरिस्ता
बरिस्ता हेदेखील नावाजलेल्या मोठ्या कॅफेजपैकी एक आहे. पुण्यामध्ये कॅम्पमधला एमजी रोड, लॉ कॉलेज रोड, कोरेगाव पार्क, सीझन्स मॉल आणि पिंपळे सौदागर येथे बरिस्ताचे आउटलेट्स आहेत. 
एस्प्रेसो, ॲफोगाटो, कोनपाना, कॅफे अमेरिकानो, कॅपुचिनो, अमेरिकानो यांसारखे नेहमीचे हॉट आणि कोल्ड कॉफी प्रकार इथे मिळतातच. पण त्याशिवाय बरिस्ता ब्लास्टा, ब्राउनी फ्रापे, इंडल्जंट कॉफीज् हेही मिळते. यामध्ये व्हीप्ड क्रीम, व्हॅनिला फ्लेव्हर, आयरिश क्रीम फ्लेव्हर, हेझलनट फ्लेवर, चॉकलेट फज, एस्प्रेसो शॉट, व्हॅनिला आइस्क्रीम आणि कॅरॅमल सॉस या गोष्टी आपल्या आवडीनुसार वेगळ्या ॲड करता येतात. इथे क्रुआसाँ, सँडविचेस, पास्ता, बिर्याणी, मफिन्स, कुकीज, केक्स, रोल्स अशा फूड व्हरायटीजदेखील पुष्कळ आहेत. 

या कॉफी शॉप्सव्यतिरिक्त मॅरियोट पुणे बेकिंग कंपनी, फॅट लॅब्रेडॉर कॅफे, झेन कॅफे, थर्ड वेव्ह कॉफी रोस्टर अशी अनेक कॉफी शॉप्स आहेत. कल्याणी नगर, मगरपट्टा, कोरेगाव पार्क यांसारख्या ठिकाणी असलेली छोटी-मोठी कॉफी शॉप्स कॉफी कल्चर रुजवण्यात हातभार लावत आहेत. 

संबंधित बातम्या