इन्स्टंट कॉफी मेकर्स

ज्योती बागल
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

कॉफी स्पेशल
आजचे युग स्पर्धेचे आहे. आपल्याला सतत अपडेट आणि आपल्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे राहावे लागते. त्यामुळे फ्रेश माइंडने हातातले काम पूर्ण करण्यासाठी अधूनमधून कॉफी ही घ्यावीच लागते. त्यासाठी कमी वेळात इन्स्टंट कॉफी तयार करण्यासाठी अनेक कंपन्यांचे कॉफी मेकर्स बाजारात उपलब्ध झाले आहेत... 

कॉफीझा लॅटिसो कॉफी मेकिंग मशिन
हा एक भारतीय ब्रँड आहे. याचा वापर करणे अतिशय सोपे आहे. हे लॅटिसो मॉडेल आकर्षक असून त्याला मॉडर्न लुक दिलेला दिसतो. यामध्ये एकावेळी एकच कप कॉफी करता येते, त्यामुळे बॅचलर लोकांसाठी हे खास उपयुक्त आहे. तसेच दिवसभरात या मशीनच्या साहाय्याने २० ते २५ कप कॉफी सहज करता येते. हे साधारण ४५ सेकंदात गरम होऊन कॉफीसाठी रेडी होते. यामध्ये एस्प्रेसो, कॅपुचिनो, रिस्ट्रेटो, लुन्गो इत्यादी प्रकारच्या कॉफी करता येतात. हे मशीन एक हजार वॅट ऊर्जा वापरत असून यावर एक वर्षाची वॉरंटी आहे. विशेष म्हणजे हे मशीन खूप कमी ऊर्जा वापरते. यामध्ये ऑन-ऑफची ऑटोमॅटिक सुविधा उपलब्ध आहे.

3D क्रिएशन्स कॉफी मशिन
हादेखील भारतीय ब्रँड आहे. याची किंमत फक्त एक हजारच्या दरम्यान असून कमी बजेट असणाऱ्यांना हे नक्कीच परवडू शकते. या मशीनची एकावेळी सहा कप कॉफी तयार करण्याची क्षमता आहे. ज्या लोकांना दक्षिणेकडील कॉफी आवडते, त्यांच्यासाठी हे मशीन उत्तम पर्याय आहे. याला बाहेरच्या बाजूने मॅट फिनिश लुक दिला असल्याने हे जास्त आकर्षक आणि मोहक दिसते. या मशिनच्या साहाय्याने फिल्टर कॉफीव्यतिरिक्त इटालियन एस्प्रेसो, डेकॉक्शन कॉफी, मोका आणि इतर प्रकारदेखील करता येतात. याला एक वर्षाची वॉरंटी देण्यात आलेली आहे.

टेकनोरा क्लासिको टीसीएम 107 एम कॉफी मेकर
हे मशिन एक ते सहा कप कॉफी तयार करू शकते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कॉफी मेकर्समध्ये हे उत्तम दर्जाचे मानले जात असून याला मागणीही चांगली आहे. हे दिसायला अगदी छान, काँपॅक्ट असून याचे वजनही कमी आहे. यामध्ये स्मार्ट ऑटो-स्विचऑफ फीचर उपलब्ध असून २५ मिनिटांनंतर ते आपोआप बंद होते. शिवाय यात स्टीमर स्पॉट इनबिल्ट आहे. हे मशीन १०५० वॅट ऊर्जा वापरते. यावर एक वर्षाची वॉरंटी आहे. मात्र, कॉफी तयार करताना याचा थोडा मोठा आवाज होतो. तसेच नव्या लोकांसाठी हे वापरायला थोडे अवघड असल्याचे बोलले जाते.  

इंस्टाकुपा फ्रेंच प्रेस कॉफी मेकर
हा भारतीय ब्रॅंड आहे. हे कॉफी मेकर इतर मशीन्सपेक्षा स्वस्त दरात मिळते. याची दोन कप कॉफी तयार करण्याची क्षमता असून यावर एक वर्षाची वॉरंटी आहे. हे साधारण ३०० वॅट ऊर्जा वापरते. हे मशीन वापरण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. हे मशीन पोर्टेबलही आहे आणि वजनाने हलकेही आहे. शिवाय यासाठी अतिशय कमी जागा लागते. यामध्ये फिल्टरेशनसाठी चार भाग दिले असून कॉफी तयार व्हायला साधारण पाच मिनिटांचा वेळ लागतो.

मॉर्फी रिचर्डस् फ्रेस्को एस्प्रेसो कॉफी मेकर
हा जगभरात नावाजलेला ब्रॅंड आहे. या कॉफी मेकरच्या साहाय्याने वेगवेगळ्या पद्धतीने कॉफी तयार करता येते. हे स्टेनलेस स्टील कपासह उपलब्ध आहे. याची चार कपांची कपॅसिटी असून हे ८०० वॅट ऊर्जा वापरते. यामध्ये स्टेनस्टीलचा वापर केला आहे. यात वापरलेला कॉफी कंटेनर काचेचा असल्याने पारदर्शक आहे. हे मशीन वजनाने कमी आणि काँपॅक्ट असल्याने सहजपणे हाताळता येते. शिवाय यावर दोन वर्षांची वॉरंटीही आहे. 

वरील कॉफी मशीन्सव्यतिरिक्त प्रीती कॅफे झेस्ट सीएम, कॅफे जेईआय फ्रेंच प्रेस कॉफी मशिन, नेसकॅफे ई स्मार्ट कॉफी मेकर, फिलिप्स एचडी 7431/20 कॉफी मेकर यांसारखे अनेक प्रकारचे इझी कॉफी मेकर्स, मशीन्स ऑनलाइन उपलब्ध आहेत. 
 

संबंधित बातम्या