बदलती कॉफी शॉप्स

ज्योती बागल
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

कॉफी स्पेशल
 

लेक्चर्स, मीटिंग्ज, सेमिनार, प्रॅक्टिकल, प्रेझेंटेशन किंवा घरातली रोजची कामं करून दिवसभर झालेल्या दगदग, धावपळीतून आलेला थकवा घालवण्यासाठी एकट्यानं किंवा आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर घेतलेली एक कप कॉफी आपल्याला कितीतरी ताजंतवानं करून जाते. अर्थात एवढा थकवा, कंटाळा किंवा आळस आला असताना कॉफी घेण्यासाठी एखादा कॅफे किंवा हॉटेलच गाठावं लागतं.

सर्व सोयीसुविधांनी समृद्ध असलेलं पुणं 'कॅफे कल्चर'मध्येदेखील मागं राहिलेलं नाही. जशी चहाच्या टपरीवर गर्दी पाहायला मिळते, तशीच कॉफी शॉप्समध्येही गर्दी वाढू लागली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे सर्वच वयोगटातील लोकांनी स्वीकारलेलं कॅफे कल्चर. यामध्ये नक्कीच तरुणांचा वाटा मोठा आहे. 

प्रामुख्यानं प्रसिद्ध असलेले कॅफे बघायचे झाले तर सीसीडी, बरिस्ता, स्टारबक्स यांसारखे अनेक चेन स्टोअर्स कॅफे आहेत. परंतु, यांच्या व्यतिरिक्त अनेक प्रस्थापित हॉटेल्समध्ये इतर पदार्थांबरोबर कॉफीची अशी खासियत आहे. पूर्वी ठराविक ठिकाणी मिळणाऱ्या कॉफीचे आता मात्र चौकाचौकांत दिसणाऱ्या चहाच्या टपऱ्यांप्रमाणे छोटे मोठे कॉफी शॉप्स दिसू लागले आहेत. पुण्यातल्या एफसी रोड, टिळक रोड, सदाशिव पेठ, जेएम रोड, सेनापती बापट रोड या रस्त्यांवरून सहज एक चक्कर मारली तर असंख्य लहान मोठे कॅफेज बघायला मिळतात. कॅफे कल्चरच्या वाढत्या पसंतीमुळं कॉफी शॉप्स हे स्टार्टअप व्यवसाय म्हणूनही नावारूपाला येऊ लागले आहेत. आवड आणि गरज ओळखून तरुण आपली कल्पनाशक्ती वापरून वेगळेपण जपत कॅफे सुरू करत आहेत. यातून अनेक छोट्या मोठ्या हातांना रोजगारही मिळत आहेत.

कॅफे/कॉफी शॉप्समध्ये महत्त्वाची मानली जाणारी एक गोष्ट म्हणजे कॅफेमध्ये केलं जाणारं इंटिरिअर डेकोरेश, वॉल पेंटिंग्ज, ग्राफिटी, आतील सेटअप इत्यादी. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण इथं येणारा ग्राहक एकदा अनुभव घेऊनच दुसऱ्यावेळी पुन्हा येणार असतो. कॉलेज कॅंपस, क्लासेसच्या आजूबाजूचे कॉफी शॉप्स बघितले, तर तिकडं केलं जाणारं इंटेरिअर डेकोरेशन आणि इतर सजावट बऱ्यापैकी उठावदार असते. ज्यामध्ये रंगीबेरंगी बलून्स, भिंतींवर केलेलं पेंटिंग हे खूप उठावदार, झॅंकी पॅंकी असतात. जे कॉलेज तरुणांना आवडतात. पण एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसेस असणाऱ्या भागातील कॅफे बघितले, तर तिथं केलं जाणारं इंटिरिअर डेकोरेशन किंवा इतर सजावट अतिशय डिसेंट असते, जी अजिबात अंगावर येत नाही. टेबल, खुर्च्या, रंगरंगोटी हे अतिशय सोबर असतं. शिवाय हल्ली सर्वांच्या लक्षात येणारी किंवा सर्वांना हवी असणारी स्पेस इथंही महत्त्वाची असते. त्यामुळं कॉफीप्रेमींना किमान स्पेस मिळेल, याचाही कॅफे चालकांनी विचार केलेला दिसतो. 

कॉफी शॉप्समध्ये येणाऱ्या कॉफीप्रेमींचा मानसिक ताण कमी करण्यासाठी, त्यांचा मूड फ्रेश करण्यासाठी शॉप्समध्ये म्युझिकही लावलं जातं. यामध्ये सायलेंट म्युझिकला जास्त पसंती आहे. तसंच खास कॉफी म्युझिकही असतं, ज्यामुळं वातावरण प्रसन्न राहतं. अलीकडं, मागणी वाढवण्यासाठी ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देणं हे प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतं. तेच कॉफी शॉप्समध्येही चालतं. एखादा सण किंवा विशेष दिवस असेल, तर बऱ्याच ऑफर ठेवल्या जातात. त्यामुळं मागणी नक्कीच वाढताना दिसते.

कॉफीबद्दल तरुणांमध्ये असलेली क्रेझ आणि आवड प्रचंड असल्यामुळं अनेक ठिकाणच्या खाऊ गल्ली प्रसिद्ध आहेत. अशा खाऊ गल्ल्यांमध्ये कोल्ड कॉफीला विशेष मागणी असून कॉलेज तरुणांना परवडतील अशा माफक किमतीत कॉफी मिळून जाते.  

अलीकडच्या काही वर्षांमध्ये 'बुक कॅफें'ची संकल्पना मुळ धरू लागली आहे. नेहमीच्या व्यावसायिक कॉफी शॉप्सपेक्षा वेगळ्यापद्धतीचे बुक कॉफी शॉप्स नावारूपाला येत आहेत. पुणं हे शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं. इथं महाराष्ट्रातून, देशातून आणि जगभरातून विद्यार्थी शिकायला येत असतात. कॉफीचा आस्वाद घेत वाचनाचा आनंद घेण्यात तरुणाई नक्कीच पुढं आहे. 

अनेकदा असं म्हटलं जातं, की आजची तरुणपिढी वाचन करत नाही. मात्र, नव्यानं वाढणाऱ्या 'बुक कॅफे'च्या संस्कृतीला ही तरुण पिढीच चालना देत असून साहित्यप्रेमी असल्याचंच दाखवून देत आहेत. या विद्यार्थ्यांना आपली वाचनाची आवड जपता यावी. त्यांना कमी वेळात त्यांची आवडती किंवा गरजेची पुस्तकं वाचता यावीत, यासाठी असे बुक कॅफे नक्कीच उपयुक्त ठरत आहेत. या प्रकारच्या कॉफी शॉप्समुळं वाचकांना त्यांच्या मूडनुसार पुस्तकं वाचता येतात. कॉलेज, ऑफिसमधून थोडावेळ ब्रेक म्हणून इथं पुस्तकांच्या सहवासात काही वेळ घालवता येऊ शकतो.. आणि तेही त्यांच्या आवडत्या कॉफीबरोबर... इथं बरेच लोक ऑफिसचं कामही करायला येतात. कारण एक तर आजूबाजूला अभ्यासू वातावरण तयार झालेलं असतं; शिवाय आवडती कॉफी, मोफत इंटरनेट सेवा आणि ऐसपैस बसता येईल अशी बैठक व्यवस्था... याहून वेगळं काय हवं असतं.


वेगळेपण जपणारा 'वर्ड््‌स अँड सिप्स बुक कॅफे' : एजाज शेख 
पुण्यात माझे काही रिडर्स क्लब आहेत. जिथं विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला येतात. तेव्हा बरेच जण अशी चौकशी करायचे की इथं पुस्तकंपण उपलब्ध असतात का? काही फोन करून विचारायचे. तेव्हा मला जाणवलं की लोकांचा असा समज होतोय की इथं वाचकांसाठी पुस्तकं वैगेरे आहेत आणि वाचकांचे गट इथं एकत्र येतात, त्यांच्यात संवाद, चर्चा वगैरे होतात. तेव्हा मी अशा स्वरूपाचे कॅफे पुण्यात आहेत का ते बघितलं. दरम्यान मी दिल्लीला भेट दिली. तिथं मला दिल्लीतल्या 'चहा बार'बद्दल माहिती मिळाली. तसंच पुण्यातदेखील 'पगदंडी' आणि 'वारी बुक कॅफे' असल्याची माहिती मिळाली. यावरूनच आपण पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असं एखाद कॅफे सुरू करावं असं वाटलं. पण माझ्याकडं जी चौकशी व्हायची यात मराठी पुस्तकं हवी असणारा एक वर्ग होता. तर एका वर्गाला मराठी, इंग्रजी अशी दोन्ही पुस्तकं हवी होती. तेव्हा मी आणि माझे पार्टनर देविदास गव्हाने यांनी मिळून २०१८ मध्ये 'वर्ड्‌्‌स अँड सिप्स बुक कॅफे' एफसी रोड, वैशाली हॉटेलजवळ सुरू केला. इथं आजूबाजूला फर्ग्युसन, सिम्बायोसिस, गरवारे अशी महाविद्यालये आणि अनेक ऑफिसेस असल्यानं तसा मोठा क्राउड आहे. आपल्या बुक कॅफेत मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमधील नामांकित लेखकांची कथा, कादंबऱ्या अशी सर्व प्रकारची पुस्तकं आहेत. काही वेळा वाचकही पुस्तकं सुचवतात. रेग्युलर वाचक असेल तर आपण त्यांना हवी ती पुस्तकं उपलब्ध करून देतो. शिवाय नेहमीच्या विद्यार्थ्यांना दोनतीन दिवसांसाठी पुस्तक घरी न्यायलाही परवानगी देतो. 
  आपल्या बुक कॅफेत एकावेळी साधारण ६०-७० जण तरी आरामात बसू शकतात. येणाऱ्यांना प्रत्येकी ५० रुपये दोन तास असे शुल्क आकारले जाते. त्यामध्ये एक कॉफी आणि हवं ते पुस्तक वाचायला मिळतं. शिवाय त्यांना फ्री वायफायही उपलब्ध करून दिलं जातं. वाचकांना बसण्यासाठी भारतीय बैठक व्यवस्था आणि खुर्च्या टेबलदेखील आहेत. अलीकडंच आपल्या बुक कॅफेमध्ये पुस्तकांसंबधित वेगवेगळे इव्हेंट होऊ लागले आहेत. उदा. एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन, एखाद्या पुस्तकाचं अभिवाचन आणि स्टॅंडअप कॉमेडी इत्यादी. आपल्या बुक कॅफेचा सर्वच वाचकांना नक्कीच फायदा होतो.


छोटेखानी कॅफे लिक्विड लाउंज : श्रीनिवास मडीवाल
 कॅफेमध्ये येणारा तरुणगट नक्कीच खूप जास्त आहे. पण हल्ली १० ते १२ वर्षांची मुलंसुद्धा कॉफी शॉप्समध्ये येऊ लागली आहेत. त्यांनाही थिक कोल्ड कॉफी, कॅड एम असे प्रकार आवडतात. तरुणांमध्ये नेसकॅफेला जास्त पसंती आहे. आपल्याकडं कॉफीतले नेसकॅफे, ब्रु रोस्टेड कॉफी, ब्रु क्लासिक कॉफी, ब्रु इन्स्टंट असे प्रकार आहेत. कॉलेज तरुण तरुणी कॉफी प्यायला येतात. तसंच नोकरी करणारेही बऱ्यापैकी कॉफी प्यायला येतात. दिवसभरात आलेला ताण त्यामुळं कमी होतो. ग्राहकांना अॅट्रॅक्ट करण्यासाठी खाद्यपदार्थांवर दिल्या जाणाऱ्या ऑफरचा नक्कीच फायदा होतो.


'नेहाज यम्मी कॅफे'ची स्टार्टअप स्टोरी : चेतन पाटील
कॉलेज संपल्यानंतर करिअरचं काय करायचं हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. तसाच प्रश्न माझ्या आणि नेहाच्या मनात होता. नेहाला पाककलेची आवड होती. नेहाची आवड आमच्या व्यवसायाचं निमित्त झाली. २०१७ मध्ये आम्ही शनिवारवाड्याजवळ 'नेहाज यम्मी कॅफे' हा स्टार्टअप व्यवसाय सुरू केला. नेहानं 'आयसीआयसीआय इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट' या संस्थेतून रिटेल कॅफे ऑपरेशन्स हा कोर्स केल्यानं कॅफेच्या मॅनेजमेंटसाठी खूप फायदा झाला. कॉफी आणि इतर खाद्य पदार्थांना असलेली मागणी लक्षात घेऊन आम्ही हा व्यवसाय सुरू केला. 
 आमच्या कॅफेमध्ये कोल्ड कॉफी, पिझ्झा, बर्गर, सॅंडविच यांचे विविध प्रकार मिळतात. पण यात सगळ्या स्तरातील ग्राहकांना परवडणारं व आवडणारं पेय म्हणजे कोल्ड कॉफी. आपल्याकडं थिक कोल्ड कॉफी विथ क्रश, थिक कॉफी विथ आइस्क्रीम, थिक कॉफी विथ क्रीम, व्हाईट कॉफी विथ क्रश, व्हाईट कॉफी विथ क्रीम, व्हाईट कॉफी विथ आइस्क्रीम या सात प्रकारच्या कोल्ड कॉफीज मिळतात. 
 कोल्ड कॉफी पिणाऱ्यांमध्ये सर्वच वयोगटातील ग्राहक येतात, पण यामध्ये कॉलेज तरुण म्हणजेच १५ ते ३० वयोगटातील तरुणांचं प्रमाण जास्त आहे. कॉलेजमधून येणारे विद्यार्थ्यांचे ग्रुप, कपल्स हे जास्तकरून कोल्ड कॉफीला प्राधान्य देतात. त्यामुळं सर्वप्रकारच्या कॉफीज मिळून दिवसभरात किमान १२५ ते १५० कॉफीजची तरी विक्री होते. 
 कॉफी शॉपमध्ये आम्ही बऱ्याचदा कॉलेज तरुणांना काय आवडेल हे लक्षात घेऊन डेकोरेशन करतो. यामध्ये भिंतींवर कार्टून्सचे वेगवेगळे चित्र काढले आहेत. रंगीबेरंगी बलून्स लावून सजावट केली आहे. शिवाय पदार्थांचे आकर्षक पोस्टर्सही लावले आहेत. त्यामुळं कॉफीप्रेमींना गप्पा मारत मारत मस्त कॉफीचा आस्वाद घेता येतो आहे.


स्टार्टअप कॅफे 'एचडी' : धीरज जाधव
कॅफे एचडी या नावानं मी काही महिन्यांपूर्वीच कॉफी शॉप सुरू केला आहे. खास हॉट आणि कोल्ड कॉफीसाठी फेमस असलेला 'एचडी कॅफे' एक स्टार्टअप व्यवसाय म्हणून जम बसवत आहे. इथं येणारा क्राउड हा १२ ते २६ या वयोगटातील आहे. तसं बघायला गेलं तर या वयोगटातील तरुणांना कॉफीचे सर्वच प्रकार आवडतात, पण जास्त पसंती ही थिक कोल्ड कॉफीला आहे. तसंच रेग्युलर कॉफीलाही चांगली मागणी आहे. आपल्या कॅफेमध्ये रेग्युलर हॉट आणि कोल्ड कॉफी मिळते. 'कॅफे एचडी'ची खासियत बघायला गेलं, तर आपण 'एचडी स्पेशल कॉफी' आणि 'एचडी स्पेशल मॅगी' हे दोन पदार्थ जास्त ठेवतो. यामध्ये मॅगीसाठी वापरले जाणारे मसाले थोडे युनिक आहेत. जे आम्ही स्वत: तयार केले आहेत. त्यासाठी लागणारे सॉसेस स्वत: तयार केले आहेत. कॉफीदेखील ग्राहकाच्या आवडीनुसार त्यांना पाहिजे तशी करून दिली जाते. कॉफीची किंमतही जास्त नसल्यानं ती सर्वांना परवडते. 
  सध्या वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळत आहेत, तसाच कॉफी पिण्याचा ट्रेंडदेखील वाढतो आहे... आणि कॉफी पिण्यात अगदी बारा वर्षं वयाची मुलंसुद्धा आघाडीवर आहेत. एका दिवसात आपल्या कॅफेत ३०० ते ४०० हॉट कॉफीज जातात, तर १५० पर्यंत कोल्ड कॉफी जातात. सध्या थंडी आहे म्हणून हॉट कॉफीला जास्त मागणी आहे. म्हणजे फक्त कॉफीसाठी म्हणाल, तर ४०० ते ५०० लोक रोजचे येतात. जास्तकरून यामध्ये शाळा, महाविद्यालयीन तरुण तरुणी जास्त असतात. कोल्ड कॉफी पिणारे ज्येष्ठ नागरिकही आहेत, पण प्रमाण खूप कमी आहे. कारण आजही सर्वसामान्य लोक चहालाच प्राधन्य देतात. 
आपल्या कॅफेतही काही ऑफर्स ठेवल्या जातात. म्हणजे आता व्हॅलेंटाइन्स डे आहे, तेव्हादेखील आम्ही एखादी ऑफर ठेवणार आहोत, जे हल्ली सगळीकडंच केलं जातं. म्हणजे कपल्ससाठी आणि इतरांसाठी वेगळ्या ऑफर्स असतात. तसंच त्या इव्हेंटनुसार कॅफेत डेकोरेशनही केलं जातं. 

अशाप्रकारे कॉफीप्रेमींची आवड, मागणी, गरज लक्षात घेऊन कॉफी शॉप्सचं स्वरूप बदलताना दिसतं आहे... आणि 'कॅफे कल्चर' सर्वंच लहानमोठ्या शहरांत स्वीकारलं जातं आहे...
 

संबंधित बातम्या