थोडासा इश्क

प्राजक्ता काणेगावकर
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

कॉफी स्पेशल
कॉफी अजूनही त्या लांबच्या मैत्रिणीसारखीच आहे माझ्यासाठी. एखादा क्षण मैत्रीची जाणीव करून देणारा असतो पण एरवी सगळा अलिप्त मामला. छान मैत्र जुळू शकते असे वाटत असतानाच समोरच्याने नाव पत्ता न देता गाव सोडून जावे असे काहीसे.

मी खरे तर कॉफी पीत नाही. फारशी आवडत नाही असेही नाही. कदाचित माझी आणि कॉफीची नीट ओळख झालेली नसावी. वलयांकित असल्याने तिच्यापासून जरा लांबच बरे असाही मी विचार केला असेल. तशी अगदीच ओळख नाही असेही नाही. थोडीफार तोंडओळख आहे, पण मैत्री नाही. कॉफीबद्दल विचार करताना मला नेहमी कॉलेजमधली एखादी छान टीपटाप सुंदर दिसणारी मैत्रीण आठवते. वर्गातच असते आपल्या, पण हाय हॅलोपलीकडे बोलणे होत नाही तिच्याशी. म्हणजे हरकत नसते बोलायला, पण तिच्या एकंदर छान व्यक्तिमत्त्वामुळे, सौंदर्यामुळे, थोडे श्रीमंती राहण्यामुळे आपण बुजतोच बोलायला. नंतर कधीतरी बाहेर कुठे भेटल्यावर तिच्याशी चार वाक्य बोलल्यावर कळते अरे छान गप्पिष्ट आहे की ही. जमू शकले असते आपले हिच्याशी. पण आता वेळ निसटून गेली. कॉफीबद्दल मला नेहमी का कोण जाणे असेच वाटत आलेले आहे. 

दुसरे असे की मी मुळात चहाबाज. कट्टेगिरी, धबडगा, दंगा या सगळ्याला चहाची जास्त साथ शोभते. शिवाय डोंगर गड चढता-उतरताना, एसटी महामंडळाच्या कृपेने थांबणाऱ्या अनाकलनीय हॉटेलांमध्ये, अमृततुल्य, टपरी इत्यादी ठिकाणी पटकन काय मिळू शकतो तर चहा. मी चहाबाज असण्याचे आणखी एक कारण म्हणजे सुरुवातीची मार्केटिंगची नोकरी. गाडी साईडला घेतली कटिंग मारला आणि चाललो पुढे. त्यामुळे चहा एकदम जीव की प्राण. त्यातून वडापाव आणि चहा हे मार्केटिंगवाल्यांचे स्टेपल डाएट. कॉफीशी रीतसर ओळख होणार तरी कधी? 

जेव्हा सीसीडी आणि बरिस्ता वगैरे पुण्यात सुरू झाले तेव्हा तर त्यांना लांबून बघण्यातच आनंद असायचा. पंचावन्न ते पंचाहत्तर रुपये देऊन कॉफी पिणे हे खिशाच्या आणि मेंदूच्याही बाहेर होते. फार क्लास वगैरे वाटायचे या दोन्ही जागांकडे बघून. त्यातल्या त्यात बरिस्ताकडे बघून तर जास्तच. कारण सीसीडीला मिळणारी कॅपुचिनो ही बरिस्ताला दहा पंधरा रुपयांनी आणखी महाग मिळायची. त्यातून तिथे मॉडर्न दिसणारे लोक येणार. मॉडर्न म्हणजे जीन्स, शॉर्ट स्कर्ट्स, शॉर्ट टॉप्स, केसांना स्पामध्ये जाऊन ट्रीटमेंट देणाऱ्या, सदैव लिपग्लॉस लावलेल्या मुली, त्यांच्याबरोबर लेदर जॅकेट कॅज्युअली हातावर टाकलेले, कारमधून येणारे, मार्लबोरो ओढणारे मुलगे वगैरे फारच हिप वाटायचे. त्यातून इडली डोसा वडापाववर वाढलेला आपला पिंड असल्याने उगाच स्पिनॅच अँड कॉर्न सँडविच, ब्राउनिज वगैरे फारच महागाचे आणि पोट न भरणारे खाणे यापासून लांबच बरे असा विचार जोमात असायचा. तिथे आमचा लाडका ‘च्या’सुद्धा मसाला चाय, दार्जिलिंग टी, अर्ल ग्रे वगैरे विंग्रजी हायफाय नावे लावून शंभर दीडशे रुपयाला समोर यायचा. हे म्हणजे रोज शेजारी बसणाऱ्या आंद्या किंवा पक्या नावाच्या मित्राने एकदम ‘हाय आय एम प्रकाश, ग्लॅड टू सी यू डार्लिंग गर्ल. यू कॅन कॉल मी प्रॉकी डूड’ वगैरे करण्यासारखे होते. यथावकाश यात मॉडर्न दिसणे असले, तरी मॉडर्न असणे असेलच असे नाही हे कळले. त्यातला अ-वाक फॅक्टर कमी झाला, तरी तिथे येणे जाणे नाही तर नाहीच जमले. 

कॉफीशी पहिली ओळख घरातूनच झालेली. तेव्हाच कळले मॅडमचे तंत्रच वेगळे आहे. चहा सोपा. सगळे मटेरियल एकत्र करा, उकळा, गाळा, कपात ओता आणि बशीतून फुर्रर फुर्रर करत प्या. सिम्पल. कॉफी म्हणजे घरी पाहुणे येणार. मग आई त्यांना म्हणणार ‘चहा करते’ मग ते ‘वहिनी मी चहा घेत नाही’ म्हणणार. मग वहिनी कॉफी घेता का विचारणार. ते हो म्हणणार. मग आई फ्रिजमधून एक ब्राऊन दिसणारी झाकण घट्ट बसलेली एक ऑड आकाराची बरणी काढणार. ती स्वच्छ पुसून घेणार. एकीकडे दूध आणि पाणी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून उकळायला ठेवणार. कोरडा चमचा परत एकदा पुसून कोरडा करणार. त्यातून थोडी चमचाभर कॉफी मगमध्ये घेणार. त्यात साखर घालणार. मग चमच्याने दूधपाण्याचे मिश्रण त्यात घालणार आणि कॉफी हलकी होईपर्यंत फेटणार. मग ती हलके हलके त्यात दुधात घालणार. या सगळ्यात मला दुधाचा हळूहळू बदलत जाणारा रंग बघत किती कॉफी घालायची आहे याचा अंदाज घेणे हा प्रकार फार आवडायचा. मनासारखा रंग आला की ते मिश्रण थोडे अजून उकळायचे. त्यात किंचित वेलदोडा छोट्याशा खलात कुटून घालणार. कॉफीचे सटीसामाशी वापरले जाणारे वेगळे गाळणे काढणार. हिचे मग वेगळे. त्यात थोड्या उंचावरून कॉफी ओतून थोडा फेस आणणे मष्ट आहे. ते मग बाहेरून पुसून घ्यायचे परत एकदा. छान ट्रेमध्ये सजवून बाहेर आणायचे. मग त्याच्याबरोबर एका प्लेटमध्ये बिस्कीट वगैरे. जामनिमाच वेगळा हो सगळा. गटागटा प्यायची गोष्टच नव्हे ही. आम्ही मारी नाहीतर गुड्डे बिस्कीट चहात बुडवून खाणारे. मग तो कप बसका असेल नाहीतर बोन चायना असेल. मारी बिस्किटांची चवड बशीत ठेवायची, त्यात चहा शिरावा म्हणू ती बिस्कीट पुढच्या दातांनी अलगद कुरतडायची आणि मग त्यावर चहा ओतायचा. ती भिजेपर्यंत कपाने चहा प्यायचा. नंतर एक चमचा घेऊन ती केकसारखी खायची. असले अतरंगी उद्योग करणारे लोक आम्ही. ते शर्मिली पिक्चरमधल्या राखीसारखे दोन्ही हातांनी नाजूक मगाच्या कानात अंगठे अडकवून पेय पीत पीत असे डेंजर मादक अदाकारीने शशी कापूरकडे बघणे बिघणे चित्रपटातच ठीक आहे. ते आपल्याला जमणे नाही. 

काळ वेळ स्थळ यांचा पेयाशी घनिष्ठ संबंध आहे. कॉफी आवडायच्या दोन वेळा म्हणजे सवाई गंधर्वची संध्याकाळ आणि गप्पांचा आणि पत्त्यांचा फड लागला की मध्यरात्री. सवाईला कॉफी साजून जाते अगदी. गारवा असतो हवेत. त्या अतिभव्य मंडपात गर्दी असली तरी मस्त प्रसन्न वातावरण असते. नुकतेच दीड तास विजेसारखे कडकडणारे तळपते गाणे ऐकलेले असावे. पुढच्या गायकाचे तंबोरे जुळायच्या आत पटकन जाऊन कॉफी घ्यावी बाहेर जाऊन. मसाला दूध वगैरे ठीक आहे, पण कॉफी जमून जाते तेव्हा. किंचित उग्र भासणारा तरतरी आणणारा सुगंध, गोऱ्यापान व्यक्तीला डिसेंबरच्या उन्हात बाहेर उभे केल्यावर येतो तसा कॉपर ब्राऊन रंग, फेसाळपणा  बेताचाच. शाल अंगावर परत ओढून घ्यावी, एक कमी गर्दीचा कोपरा पकडावा आणि शांतपणे आतल्या बैठकीचा अंदाज घेत घेत कॉफी घ्यावी. मंडपात घेऊन जायची नाही कारण ती मधल्या प्रवासात गार होते. तिथेच पटकन पिऊन आत पळण्यात मजा आहे तिची.

कॉलेज संपवून आम्ही सगळेच नोकऱ्या शोधत होतो. काहींना मिळाल्या होत्या. काही कागद फिरवत होते. तेव्हा रात्री पत्ते आणि गप्पा यांचा कट्टा असायचा. त्यात जजमेंट हा गेम प्रमुख मग मेंढीकोट आणि शेवट बदाम साताने करायचा. शेवटच्या बदाम सातला मग लोळणारे, पुस्तकात डोके घातलेले, काठावरचे, बाहेरून सूचना आणि पाठिंबावाले असे सगळेच मैदानात उतरायचे. साधारण दोन कॅट घेऊन वगैरे चालायचे. या बदाम सातच्या आधी कॉफी व्हायची. ती ज्याला कुणाला मूड लागेल करायचा, त्या माणसाने करायची. चहाच्या कपातून प्यायची. कुणी स्टीलच्या ग्लासात ओतून घ्यायचे. ती कधी अगोड, कधी मिट्ट, कधी उगाच लाजल्यासारखा रंग आलेली, कधी विषुववृत्तावरून आल्यासारखी तापलेली, अशी कशीही व्हायची. मंडळी चालवून घेत. पुढेमागे मग ग्रुपमधल्या एकदोन जणांना चांगली कॉफी करता येते असा शोध लागला. मग ते काम हक्काने त्यांच्या गळ्यात बांधण्यात आले. दुसऱ्याच्या घरात हक्काने फ्रिज उघडून दूध वगैरे बाहेर काढून कॉफी करण्यात काही गैर वाटत नसे. आईबाबा लोकांची फुल्ल परवानगी असायची. तेही कधीमधी पत्त्यांमध्ये हजेरी लावीत. कधीतरी अधूनमधून वर्षातून एकदा दोनदा हा कार्यक्रम होतो अजूनही. मंडळींनी आपापल्या बायका नवरे लोकांनाही यात ओढलेले आहे. आता त्यांच्यातल्या बऱ्याच जणांना उत्तम कॉफी करता येते हा शोध लागलेला असल्याने त्यांच्यावर जबाबदारीचे हस्तांतरण करून मंडळी आणखीच निवांत झाली आहेत. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रात्री बारा वाजता सदर व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला झोपेतून उठवून शुभेच्छा देणे आणि साडेबाराला कॉफी पिऊन घरी परतणे असा एक फार मोठा सोहळा मुलांच्या शाळा आणि हापिस यात गुदमरून बंद पडला. चालायचेच म्हणा.

कॉफी प्यायचे आमंत्रण म्हणजे रोमँटिक गेटवे वगैरे वाटायचे दिवस मावळले नाहीयेत अजून तरी, हे बघून बरे वाटते. अ लॉट कॅन हॅपन ओव्हर कॉफी याला बराच अर्थ आहे. आणि तसेच छान आहे खरेच. चहाच्या टपरीवर,आसपासची वाहने, माणसे, कुत्र्याचे पिल्लू (हे प्रत्येक टपरीवर असणे गरजेचे आहे कारण पारले जी वाले लोक याला अधून मधून बिस्किटे खायला घालतात), भोंगे, हॉर्न यात भावी जोडीदाराशी बोलणार काय आणि कसे? प्रपोज वगैरे करणे तर लांबच राहिले. मी फर्ग्युसनला असताना अँब्रोशिया, गार्डन कोर्ट, बुनिंदा आणि नंतर मानस इकडे दोघेजण जेवायला वा फिरायला गेले म्हणजे त्यांच्या कपल असण्यावर शिक्कामोर्तब होत असे. कारण तेव्हा ही सगळी ठिकाणे गावाच्या बाहेर होती. तिथे सर्व्हिस स्लो आणि शांत वातावरण असायचे. डोळ्यात डोळे घालून बघणे, हातात हात घालून बसणे आणि मग लग्नाची मागणी घालणे वगैरे कार्यक्रमांना उत्तम जागा होत्या या सगळ्या. तिकडे जाऊन कॉफी आणि एखादे स्नॅक्स खाऊन परत येणे हे फारच भव्यदिव्य होते. हळूहळू ही सगळीच ठिकाणे गावाच्या हद्दीत आली. नव्हे आता गावाची हद्दच मुळी यांना ओलांडून कैक मैल पुढे गेली आहे. सीसीडी, बरिस्ताच्या उदयाने पेट्रोल आणि वेळेची महाबचतच झाली. अगदी हातात हात नसले तरी डोळ्यात डोळे घालून बघणे वगैरे गावाच्या हद्दीच्या आत जमायला लागले. कॉफीचे निमित्त मात्र अजून टिकून आहे. शेवटी काय प्रेमाला आणि प्रेमभंगाला कॉफीनेच उत्तम साथ दिली आहे हे पटतेच. 

आता गल्लोगल्ली कॅफे झाले आहेत. चकाचक इंटिरियर, चारदोन सँडविचेस आणि चिप्स, मोठे मोठे मग, एक फुस्स फुस्स आवाज करणारे अगडबंब कॉफी मशीन, युनिफॉर्मचे टी शर्ट घातलेला स्टाफ, सेल्फ सर्व्हिस वगैरे मामला असतो. गेला बाजार भिंतीवर ग्राफिटी हवी, शनिवारवाडा, महात्मा फुले मंडई इत्यादी सांस्कृतिक वारसे यांची रेखाचित्रे हवीत. या सगळ्यात कॉफी पिणाऱ्याने यावे, टिश्यू पेपरवर अलगद मग ठेवावा, मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये डोके घालावे आणि थोड्या वेळाने कॉफी गार करत प्यावी. बोलण्यात हरवून गेल्याने आपसूक गार होणारी कॉफी काही वेगळीच लागते हे ध्यानी न येणे यापरता कॉफीचा दुसरा अपमान नाही. 

कॉफी मिळते सगळीकडेच, पण मनाला पटेल अशी कॉफी बहुतेक घराच्या चार भिंतीतच मिळते. म्हणूनही असेल कदाचित, आवर्जून कॉफी प्यायला बाहेर जाणे होत नाही माझेही आणि गेले तरी कॉफीची चव बदलली आहे असेच राहून राहून वाटत राहते. यापेक्षा गोंगाटातला चहाच बरा वाटतो आणि भावतोही. 

कॉफी अजूनही त्या लांबच्या मैत्रिणीसारखीच आहे माझ्यासाठी. एखादा क्षण मैत्रीची जाणीव करून देणारा असतो पण एरवी सगळा अलिप्त मामला. छान मैत्र जुळू शकते असे वाटत असतानाच समोरच्याने नाव पत्ता न देता गाव सोडून जावे असे काहीसे. एखादा फोन, एखादे पत्र इतपतच संबंध. हातात चहाचा कप घेऊन मी कॉफीचा विचार करते तेव्हा लक्षात येते चहा मला प्रिय आहे, तो माझ्या अनेक क्षणांचा सोबती आहे पण कॉफी मात्र हाती येता येता निसटलेली गोष्ट आहे, त्या दूर राहून जवळ येण्यातच तिची ओढ शिल्लक आहे बहुतेक.

संबंधित बातम्या