कॉफी आणि काही बाही!

प्रवीण टोकेकर
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

कॉफी स्पेशल
 

माणसाने काय प्यावे आणि काय पिऊ नये, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. माणसे काय, काहीही पितात. काही माणसे पीत नाहीत, पण प्यायल्यासारखी वागतात. काही माणसे ताडाच्या झाडाखाली बसून बुंध्याशी ताक पितात, तर काही लोक ताकाला जाऊन भांडे लपवतात. जगरहाटी आहे, हे चालायचेच! व्यक्‍ती तितक्‍या प्रकृती आणि तितकीच पेये या विश्‍वामाजी आहेत. कोणा कोणाचे तोंड धरावे आणि का? 

माणसाच्या या जगात शेकडो प्रकारची पेये आहेत. काही सकाळी पिण्याची, काही दुपारी तर काही सायंकाळी सातनंतर सामोरी येणारी. आपापल्या मगदुराप्रमाणे माणूस वेळेप्रमाणे पेये पीत असतो. काही लोक सकाळी उठून कोरफडीचा रस किंवा कडू कार्ल्याचा रस पितात. काही अधिक गोड प्रकृतीची माणसे जांभळाचा ज्यूस घेतात. काहींचे घसे संध्याकाळी कोरडे पडू लागतात. बर्फाच्या खड्यांबरोबर गिलासात सुवर्णरंगी मद्य पुढ्यात घेऊन बसले, की त्यांचा दिवस सत्कारणी लागतो. लागू द्या, लागू द्या. आमच्या परिचयातील एक महाभाग सध्या दीक्षित डायटवर असल्याने दोन भरभक्‍कम जेवणांच्या मधल्या काळात दिवसभर बाटलीभर ताक पितात. दिवसभर ताक पिणाऱ्या माणसाबद्दल काय बोलावे? प्या बापडे! आणखी एक सत्पुरुष सकाळी उठून बारीकसा गिलास घेऊनच स्वच्छतागृहात शिरतात. तेही एक वेगळेच पेय! एकंदरीत शिवांबूपासून शिवास रिगलपर्यंत असंख्य पेयांनी आपल्या आयुष्याचा चषक कायम भरलेला असतो. असू द्या, असू द्या. 

आपला देश प्रामुख्याने दोन पेयपंथांमध्ये वाटला गेला आहे. एक, चहावादी आणि दुसरा कॉफीवादी. अर्थात यातदेखील पोटपंथ आहेतच. कोरा चहावाले वेगळे, बिनसाखरवाले, उभा चमचावाले, मलईयुक्‍तवाले, उकाळावाले, कटिंगवाले, पेशलवाले, डस्टवाले, जबरडस्टवाले... असे कितीतरी चहावादी आपल्या भोवताली वावरत असतात. उच्चभ्रू दार्जिलिंगायत आणखी वेगळे! ते देखणे चहाचे नक्षीदार कप, ती चिमुकली लाजरी बशी. कपाच्या मागोमाग मान खाली घालून चालणाऱ्या अबोल गृहिणीसारखीच! त्यांच्या जोडीला ढालगज सासूसारखी उपस्थित असलेली किटली. किटली हे प्रकरण प्रायः चायसे गरम असते. तिच्या नादाला उच्चभ्रू ‘चहाढ्य’ सोडले तर कोणी लागत नाही. त्या किटलीला झाकणारी स्वच्छ, उच्चकुलीन टीकोझी... या साऱ्या जाम्यानिम्यात तो बिचारा चहाच आपले अस्तित्व कसाबसा टिकवून असतो. परंतु, चहा आणि चहाचे प्रकार हा आजचा आपला विषय नसल्याने आपण आता कॉफीचा विषय उचलावा हे उत्तम. 

कॉफी हे स्वतंत्र प्रकरण आहे. नाही म्हटले, तरी कॉफीवादी मंडळी चहावाल्यांपुढे काहीसे अल्पसंख्यच ठरतात. कारण भारतात कॉफीचा प्रचार आणि प्रसार बऱ्यापैकी असला, तरी तिजला चहासारखी समाजमान्यता नाही. चहा हे मजूरवर्गात प्रिय असले, तर कॉफी हे शहाण्यासुरत्यांचे पेय मानले जाते. पूर्वीच्या काळी पूर्वेकडे बंगालात आणि इकडे दक्षिणेकडे कॉफीहाऊसेस तुडुंब भरून राहिलेली असत. या कॉफीहौसमध्ये कॉफीचे घुटके घेत घेत अनेकांनी समाजसुधारणांचे बेत आखले. क्रांत्या केल्या. यथावकाश देशाला स्वातंत्र्य मिळाले. ते गांधीजींच्या चरख्यामुळे मिळाले, असा काही लोकांचा गैरसमज आहे. आपल्या स्वातंत्र्यलढ्यात कॉफीचा घुटकाभर वाटा आहे, हे आपण विसरता कामा नये. पण दुर्दैव! चहाच्या नादाला लागून बराचसा देश वाया गेला!... 

अर्थात चहा हे काही वाईट पेय नाही. कॉफीची रेघ मोठी करण्यासाठी चहाची उत्कर्षरेषा काटून छोटी करणे बरे नाही. चहा हा कॉलरमध्ये रुमालाची घडी ठेवून चौकात किंवा नाक्‍यावर उभे राहून मोठ्यामोठ्यांदा मोबाइलवर बोलणाऱ्या इसमासारखा आहे. त्याच्या चेहऱ्यावर उगीचच ताणतणाव नाहीत. असलेच तर खळखळून हसणे आहे. बोलघेवडेपणा अंगात मुरलेला आहे. ओळखीचा भेटल्यानंतर स्वतःहून पहिल्यांदा हसणाऱ्यांपैकी चहा एक गृहस्थ आहे. एका हातात कटिंग आणि दुज्या हाताच्या बोटात सिगारेट असली, की आणखी कोणी बोलायला नसले तरीदेखील चालते. सहज कुठेही उपलब्ध होणारा चहा प्लास्टिकच्या चिमुकल्या कपापासून मातीच्या दुक्‍कडपर्यंत अनेक मापात चपखल बहतो. अगदी दार्जिलिंगचा साग्रसंगीत चहा असला तरी त्याच्या समृद्ध व्यक्‍तिमत्त्वात एक दिलखुलासपणा आहेच. साहजिकच चहाची लोकप्रियता अधिक आहे. चहामुळे चहावालेही आपापतः लोकप्रिय होऊन जातात. गुण चहाचा, पण मार्क चहावाल्याला! असो. चहा आणि चहावाल्याचे महात्म्य आपल्या देशात सांगण्यात काय हशील आहे? 

चहाबाबतीत आपले काहीसे ‘अतिपरिचयादवज्ञा’टाइप काहीतरी घडले आहे. कॉफीचे मात्र तसे नाही. कॉफी अशी कुठल्याही तिठ्यावर मिळत नाही. मिळालीच तरी काहीशी अंग चोरूनच उभी असते आणि कशीही असली तरी ती नेहमी ‘स्पेशल’च असते. आजमितीस अवघी अमेरिका आणि युरोप कॉफीच्या वाफाळ ऊबेत जगते आहे. या दोन खंडात जेवढी कॉफी संपते, तेवढी ब्राझिलमध्ये पिकते तरी का? शंकाच आहे. कॉफीचे बलंदड मगच्या मग रिते करणाऱ्या अमेरिका-युरोपमध्ये हे पेय गरज बनून गेली आहे. चूष नव्हे! थंडीच्या कडाक्‍यात वाफाळ कॉफीच्या टंपराभोवती दोन्ही तळहाताची खेंव घालून थोडावेळ बसले तरी हुडहुडी सुसह्य होते. कॉफीचे भलभलते लाडकोड तिथे झाले, यात काही नवल नाही. 

कॉफी हे उत्तेजक आणि वातहारक पेय असून त्यात कॅफिन नावाचा घटक असतो. त्या कॅफिनमुळे माणसाला उत्साही व उद्दिपित वाटते, असे शास्त्र सांगते. कॉफी हा जागरण करण्यासाठी उत्तम उपाय आहे, असे अनेक लोक सांगतात. अभ्यासू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना परीक्षेच्या काळात रात्री उशिरा कॉफी करून देण्यासाठी जाग्या राहणाऱ्या माऊल्या आपल्या विश्‍वात आहेत. परंतु, जाग्रणे घडवणारे पेय ही कॉफीची इमेज काही तितकीशी बरी नाही, हे मात्र खरे. चहानेसुद्धा झोप उडते, पण चहाच्या क्‍यारेक्‍टरला हा कलंक लागला नाही कधी. कॉफी उगीचच बदनाम झाली. 

...चहाची पाने वाऱ्याने उडून उकळत्या पाण्यात पडली आणि एका चिन्याला चहाचा शोध लागला, असे म्हणतात. कॉफीचा शोधही असाच अपघाताने लागला म्हणे. ख्रिस्तपूर्व ८५० मध्ये इथिओपियात काल्दी (खलिद?) नामक मेंढपाळाला असे लक्षात आले, की रानातली काही बोरे खाऊन त्याच्या बकऱ्या एकदम टुणटुणीत झाल्या आहेत. त्यांच्यात उत्साह आला आहे. त्या बिया घेऊन काल्दी आपल्या मुखियाकडे गेला. त्याने, म्हणजे मुखियाने त्या बियांचा काढा करून पिऊन बघितला. परिणाम? मुखियाजी उत्साहाच्या भरात रात्रभर झोपले नाहीत! तिथून पुढे या बियांचा प्रसार अरबस्तानात झाला. अर्थात ही एक दंतकथा आहे. खरी खोटी देव जाणे. थोडक्‍यात जन्मकथेपासूनच कॉफी जाग्रणांसाठी बदनाम आहे. हा कॉफीवर सरासर अन्याय आहे. 

जगातल्या कॉफीचे सोडा, आपल्या भारतात हे पेय भलतेच भाव खाऊन आहे. दक्षिण भारत किंवा कोलकात्याच्या भागात कॉफीचे महात्म्य अधिक असते. तिथे आपला नेहमीचा चहा वाईट तोंड करून काहीसा बाजूला उभा असतो. चहाला तेथे आलेले दुय्यमत्त्व हे कॉफीमुळे आलेले नसून दाक्षिणात्यांना चहा नीट करता येत नाही, हे त्याचे कारण असावे! गोव्यातल्या मंडळींनाही चहा नीट करता येत नाही, असे मत जाणकार नोंदवतात. पूर्वापार दक्षिण दिशा दर्वळते आहे ती कॉफीच्या गंधाने... 

दाक्षिणात्य कॉफीचा महिमा काय वर्णावा? दक्षिणेतल्या उडप्याच्या हाटेलात गोल बसक्‍या वाटीत चिमुकल्या गिलासाखाली झाकून आलेली कॉफी हा खरे तर एक काव्यविषय आहे. त्या कॉफीबरोबर दोस्तदारांच्या गप्पा रंगतात. हास्यविनोद साधले जातात. मैत्रिणीची साथ असेल तर त्या कॉफीची लज्जत अशक्‍य वाढते. इथे कॉफीचे व्यक्‍तिमत्त्वच बदलून जाते. 

... तो स्टीलचा गरमागरम छोटुकला गिलास तर्जनी आणि अंगठ्याच्या मदतीने चटकन उचलायचा आणि तीन फुटांवरून ओताओत करत ती कॉफी ‘चढवायची’ हा सगळा प्रयोगच प्रेक्षणीय असतो. कॉफीपानाच्या प्रक्रियेचा तो एक अविभाज्य भागदेखील आहे. हे ज्याला जमले, त्याला कॉफी पटली! एखादा बावळट चहावाला त्या अवगुंठित कॉफीची छेडछाड करू पाहील, तर एकतर हात भाजून घेईल किंवा तिची हेळसांडच करेल. तेथे पाहिजे जातीचे! 

सोबत असलेल्या प्रियेने उगीच त्या उपड्या ग्लासाला हात लावावा, ‘हुस्स’ करावे. मग मंद हांसत आपण तर्जनी-अंगुष्ठ प्रयोगानिशी लीलया त्या कॉफीचे अवगुंठन दूर करावे. कॉफीची मज्जेदार ओताओत करून किंचित गार झालेला तो उत्साहार्क पसरट बशी-कम-भांड्यात ओतून प्रियेच्या समोर ठेवावा. या साऱ्या क्षणालाच मल्लिगेच्या मादक फुलांचा गंध असतो. 

...कॉफी ही किंचित हसणारी, केस मोकळे सोडून त्यात भाराभर ‘मल्लिगे’ची फुले माळणारी शालीन दाक्षिणात्य पुरंध्रीसारखीच वाटते. एखाद्या छोट्याशा चटकदार प्रतिक्रियेवर भिवया उंचावत ‘अय्योऽऽ’ असे उद्‌गारवाचक काढून पुढ्यातील माणसाला आणखीनच बोलायला उद्युक्‍त करणारी. 

कांदेपोह्यांच्या कार्यक्रमात, सोबत येणारी कॉफी थोडीशी संकोची स्वभावाची असते, तर मंगल कार्यालयात मिळणाऱ्या कॉफीचा कैफ काही न्याराच. त्यात कॉफीच्या बियांचा अर्क असायलाच हवा असे नाही, पण जायफळ मात्र हवेच. तिथली पाणीदार, फिक्‍या रंगाची कॉफी वऱ्हाडाचा उत्साह द्विगुणित करते. गाण्याच्या मैफलीत मध्यंतराला मिळणारी कॉफी मोठी सुरेल असते. पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवाच्या वेळी अपरात्री हातात आलेला कॉफीचा ग्लास गाणे आणखी खुलवते. तिला कजरी किंवा ठुमरीचा बाज असतो. 

रेल्वेच्या प्रवासातली कॉफी आणखी वेगळी. तिला चक्‍क प्रवासाची चव असते. दक्षिणेकडे जाणाऱ्या एक्‍सप्रेस गाड्या अपरात्री कुठल्याशा स्टेशनात थांबल्या, की अंधारलेल्या बोगीत स्टेशनावरचा मंद प्रकाश झिरपतो. पाठोपाठ ‘काऽऽपीऽऽ’चे सूर कानी येतात. कागदी कपात चुळचुळत कॉफी ओतली गेल्याचे आवाज येतात. बर्थवर झोपलेल्या माणसालाही कॉफी पिण्याची सुरसुरी येते... त्या कॉफीत नेमके काय असते, हे फक्‍त रेल्वेवाल्यांनाच ठाऊक असावे. 

मुंबईत हल्ली नाइट लाइफ नावाची भानगड सुरू झाली आहे. रात्रभर काही दुकाने उघडी राहतात, एवढेच. त्यात काही कॉफीची महागडी दुकानेदेखील आहेत. याच मध्यरात्रीच्या मुंबईत एखादा तंबी किंवा अण्णा सायकलीच्या दुतर्फा कॉफीचे थर्मास अडकवून रस्त्यांवर निघतो. बंदी असलेल्या प्लास्टिकच्या कपात कॉफी ओतून देतो. त्या कॉफीच्या घुटक्‍याने मुंबईतली रात्र अधिकच गहिरी होते. 

हल्ली हल्ली आपल्याकडे कॉफी बरीच बोकाळू लागली आहे. ‘अ लॉट कॅन हॅपन ओव्हर अ कप ऑफ कॉफी...’ असे इशारेवजा सूचन करणारे ‘सीसीडी’ किंवा ‘बरिस्ता’, ‘स्टारबक्स’, ‘कॉफी बाय दी बेला’ अशा कितीतरी कॉफीकेंद्रांवर हल्ली तरुणाई गर्दी करून असते. सीसीडीत किंवा स्टारबक्‍सच्या झक्‍क दुकानी कोपऱ्यातले टेबल पकडून लॅपटॉप उघडावा किंवा छानसे पुस्तक उघडून बसावे! एकटेच!.. पुढ्यात एखादा लात्ते किंवा कॅपुचिनोचा फेसाळ मग घ्यावा. तास-दोन तास कसे जातात कळतदेखील नाही. एक कॉफी मागवून तासंतास टेबल अडवल्याबद्‌दल कोणी हटकत नाही की पायाखालची फरशी पुसायला कुणी पोरगा येत नाही. डोईवरचा पंखा बंद होत नाही की काही नाही. अर्थात अशा कॉफीला शंभर-दीडशे रुपये मोजावे लागतात. हे प्रकरण रोमॅंटिक आणि रसरशीत असले तरी त्याला थोडी किंमत जास्त पडते, हे खरेच. 

कॉफीचा कैफ असाच असतो. ती जितकी घरगुती आहे, तितकीच उच्चभ्रू आणि सुसंस्कृतदेखील आहे. गरीबीचा माहौल तिला मानवत नाही. संपन्न घरातच ती रमते. चहासारखे सडकछापपण तिच्या ठायी नाही. कॉफी हा चॉइसचा भाग आहे. नव्हे, ते तिचे लक्षणच आहे. 

सारी दुनिया चहाला ‘हो’ म्हणत असताना एखादी आढ्यतेखोर कॉलेजकन्यका ‘कॉफी नाही का?’ असे अपरे नाक किंचित मुरडत विचारते, तेव्हा कार्टी आगाऊ असल्याची पावती मिळते. पण दोष त्या कन्यकेचा नसतो. तो कॉफीचा स्वभाव आहे. म्हणूनच तर कबीराने लिहून ठेवले आहे - 
कबीर लहरि समंद की 
मोती बिखरे आई 
बगुला भेद न जानई, 
हंसा चुनी-चुनी खाई 

...उपरोक्‍त दोह्याचा अर्थ सोपा आहे. त्याचा मराठी तर्जुमा येणेप्रमाणे - 
कबीरा, लहरी जलधिच्या, 
मोती विखरुनि जाय 
बकास त्याची जाणीव नाही, 
हंस टिपुनिया खाय!

संबंधित बातम्या