कॉफीचे हटके प्रकार

सुजाता नेरूरकर
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

कॉफी स्पेशल
गरमागरम कॉफीचा एक कप आपला सगळा थकवा, मानसिक ताण दूर करायला मदत करतो.. आपल्याला रिफ्रेश करतो... थंडी असो वा उकाडा, कॉफी प्यायल्याने एकदम ताजेतवाने वाटायला लागते... कॉफीचे तसे अनेक प्रकारे आहेत... त्याच्याच काही हटके रेसिपीज.

कॅपुचिनो (Cappuccino) इटालियन स्टाइल कॉफी 
साहित्य : एक ते दीड कप दूध, २ टीस्पून कॉफी पावडर, ४ टीस्पून साखर, १ टीस्पून चॉकलेट सिरप, अर्धा कप पाणी, १ टीस्पून चॉकलेट पावडर, अर्धा टीस्पून चॉकलेट सिरप (सजावटी साठी) 
कृती : कॅपुचिनो कॉफी करण्यासाठी प्रथम एका भांड्यात अर्धा कप पाणी व दूध घेऊन मध्यम विस्तवावर गरम (उकळून) करून घ्यावे. मग एका कॉफीच्या मगमध्ये साखर व कॉफी पावडर घेऊन १ चमचा गरम पाणी घालून हॅंड बीटर किंवा चमच्याने एकसारखे बीट करून घ्यावे. चांगले फेटून घेतल्यावर फ्लफी होईल. हे मिश्रण कॉफीच्या दोन मगांमध्ये एकसारखे ओतून घ्यावे. नंतर गरम केलेले दूध व पाणी त्या मगांमध्ये हळूहळू ओतत राहावे व सारखे चमच्याने हालवत राहावे. जेवढे आपण चमच्याने हालवत राहू तेवढी कॉफी फुलून वर येईल. मग गरमगरम कॉफीवर चॉकलेट सिरप व चॉकलेट पावडर घालून सजवून सर्व्ह करावी. 


गरमागरम मोका कॉफी 
साहित्य : तीन-चार टीस्पून कडक कॉफी, अर्धा टीस्पून कोको पावडर, ३-४ कप दूध, १ टीस्पून मिल्क पावडर, १ टेबलस्पून फ्रेश क्रीम, २ टीस्पून साखर.
कृती : चिल्ड कॉफी : दूध, साखर, मिल्क पावडर, कोको पावडर, फ्रेश क्रीम घालून मिक्स करून ज्यूसरमध्ये ३-४ वेळा फिरवून घ्यावे. नंतर फ्रीजमध्ये थंड करून वरून फ्रेश क्रीम व चॉकलेटने सजवून सर्व्ह करावी.
गरम कॉफी : गरम कॉफी करायची असेल, तर सर्व घटक एकत्र करावेत व गरम करून वरून व्हीप्ड क्रीम घालून चॉकलेटने सजवावे.


साउथ इंडियन फिल्टर कॉफी 
साहित्य : एक ते दीड टेबलस्पून किंवा ३ टीस्पून फिल्टर कॉफी पावडर, अर्धा कप उकळते पाणी, १ कप दूध, ३ टीस्पून साखर
कृती : प्रथम पाणी गरम करायला ठेवावे. मग स्टीलचे फिल्टर घेऊन वरच्या भागामध्ये कॉफी पावडर घालून चकती ठेवून कॉफी थोडी दाबून त्यावर उकळते पाणी घालून झाकण लावून ठेवावे. मग हळूहळू कॉफीचे पाणी खालील भागात साठून येईल. एका स्टीलच्या भांड्यात दूध गरम करून त्यामध्ये साखर घालून एक उकळी आणावी. यामध्ये फिल्टरमधील कॉफीचे मिश्रण मिक्स करून एका भांड्यात कॉफी ओतून घ्यावी. एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात कॉफी वर-खाली केली की आपोआप फेस येतो. गरमगरम कॉफी सर्व्ह करावी.


आईस कोल्ड चॉकलेट कॉफी
साहित्य : दोन कप दूध, १ टेबलस्पून इन्स्टंट कॉफी पावडर, १ टेबलस्पून कोको पावडर, २ टेबलस्पून गरम पाणी, १ स्कूप व्हॅनिला आइस्क्रीम, २ टेबलस्पून चॉकलेट सॉस, १ टेबलस्पून साखर, ६ आईस क्युब.
सजावटीसाठी : एक टेबलस्पून व्हीप्ड क्रीम, पाव टीस्पून कॉफी पावडर, १ टेबलस्पून डार्क चॉकलेट (तुकडे). 
कृती : प्रथम दूध गरम करून थंड करून घ्यावे. मग एका छोट्या आकाराच्या बोलमध्ये इन्स्टंट कॉफी पावडर, कोकाे पावडर व २ टेबलस्पून गरम पाणी मिक्स करून ब्लेंडरमध्ये ब्लेंड करून घ्यावे. त्यामध्ये दूध, व्हॅनिला आइस्क्रीम, चॉकलेट सॉस, साखर व आईस क्यूब घालून चांगले ब्लेंड करावे. काचेचा एक डेकोरेटिव्ह ग्लास घेऊन त्यामध्ये मिश्रण ओतून वरून व्हीप्ड क्रीम व कॉफी पावडरने सजावट करून थंडगार आईस कोल्ड चॉकलेट कॉफी सर्व्ह करावी. शिवाय वरून चॉकलेटचे तुकडेही घालावेत.


चिल्ड कॉफी लेमोनेड 
साहित्य : एक कप चिल्ड तयार कॉफी (ब्रू), १ टेबलस्पून लेमन ज्यूस (अथवा जरुरीप्रमाणे), अर्धा कप आईस क्युब, २ टेबलस्पून साखर.  
सजावटीसाठी : लेमन स्लाइस, पुदिना पाने. 
कृती : प्रथम ब्रू कॉफी तयार करून थंड करून घ्यावी (म्हणजे १ कप पाणी व १ टीस्पून कॉफी पावडर घालून उकळून घेऊन थंड करून घ्यावी). त्यामध्ये लेमन ज्यूस व साखर घालून चांगले मिस्क करून घ्यावे. तयार झालेले मिश्रण एका डेकोरेटिव्ह काचेच्या ग्लासमध्ये ओतून त्यामध्ये निम्मा बर्फ घालावा. लेमनच्या गोल स्लाइस व पुदिना पाने वरून घालून सजवून थंड थंड सर्व्ह करावी. वाढलेले वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी गरमगरम लेमन ब्लॅक कॉफी घेतली, तर शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. 


ओरिओ कोल्ड कॉफी  
साहित्य : दीड कप दूध, १ ओरिओ क्रीम बिस्कीट (चुरा) , १ टीस्पून कॉफी, २ टेबलस्पून साखर, १ टेबलस्पून चॉकलेट सॉस, आईस क्युब, १ व्हॅनिला आइस्क्रीम स्कूप 
सजावटीसाठी : एक व्हॅनिला आइस्क्रीम स्कूप, १ ओरिओ बिस्कीट (चुरा), १ ओरिओ बिस्कीट (तुकडे) 
कृती : प्रथम दूध गरम करून थंड करून घ्यावे. एमजी मिक्सरच्या भांड्यात दूध, बिस्किटाचा चुरा, कॉफी, साखर घालून ब्लेंड करून घ्यावे. काचेच्या एका उभ्या ग्लासमध्ये ब्लेंड केलेले निम्मे दूध ओतावे. त्यावर एक व्हॅनिला आइस्क्रीम स्कूप घालून आईस क्युब घालावे व परत राहिलेले ब्लेंड केलेले दूध घालावे. ग्लास फक्त तीन चतुर्थांश भरावा. त्यावर एक व्हॅनिला आइस्क्रीम स्कूप घालून वरून ओरिओ बिस्कीट (चुरा) व तुकडे घालून सजवून थंडगार ओरिओ कोल्ड कॉफी सर्व्ह करावी.


चिल्ड कॉफी क्रीम सोडा 
साहित्य : दोन टीस्पून साखर, १ टीस्पून ब्रू कॉफी, पाव कप पाणी, १ ग्लास सोडा वॉटर, १ स्कूप व्हॅनिला आइस्क्रीम, आईस क्युब. 
कृती : एका भांड्यात पाणी, साखर व ब्रू कॉफी घालून चांगली उकळी आणावी व कॉफी सिरप थंड करायला ठेवावे. एका काचेच्या ग्लासमध्ये तयार केलेले कॉफी सिरप घ्यावे. त्यामध्ये आईस क्युब घालून सोडा वॉटर घालावे व वरती व्हॅनिला आइस्क्रीम घालून सजवावे व चिल्ड कॉफी सर्व्ह करावी.


झटपट आईस कोल्ड कॉफी  
साहित्य : एक टेबलस्पून इन्स्टंट कॉफी पावडर, दीड कप दूध (क्रीम मिल्क), १ टेबलस्पून साखर, ५-६ आईस क्युब
सजावटीसाठी : व्हीप्ड क्रीम, कॉफी पावडर
कृती : प्रथम दूध गरम करून थंड करून घ्यावे. एका मिक्सरच्या जारमध्ये कॉफी पावडर, साखर, दूध व आईस क्युब घालून चांगले ब्लेंड करून घ्यावे. म्हणजे मिक्सर सुरू करून लगेच १० सेकंदांमध्ये बंद करावा. असे ५-६ वेळा करावे, म्हणजे त्याला छान फेस येईल. कॉफी ब्लेंड करून झाल्यावर एका छान डेकोरेटिव्ह ग्लासमध्ये ओतून घ्यावी. त्यावर व्हीप्ड क्रीमने व कॉफी पावडरने सजावट करावी. तयार थंडगार आईस कोल्ड कॉफी सर्व्ह करावी.

एस्प्रेसो हनी | कॅरॅमल | सिनेमन कॉफी
मशिनशिवाय - एस्प्रेसो कॉफी आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. या रेसिपीमध्ये तीन प्रकारचे फ्लेवर आहेत. एस्प्रेसो कॉफी करताना प्रथम एका बोलमध्ये कॉफी व साखर मिक्स करून घ्यावी. त्यामध्ये दोन टेबलस्पून गरम पाणी किंवा गरम दूध घेऊन चमच्याने चांगले फेटून घ्यावे किंवा हँड मिक्सर वापरला तरी चालेल, म्हणजे त्याला चांगला फेस येईल. हे मिश्रण ग्लासमध्ये घालून वरून गरम दूध (मलईयुक्त) ओतावे. म्हणजे आपोआप वरती छान फेस येईल. जर आपल्याला थंड कॉफी करायची असेल, तर दूध (मलईयुक्त) मिक्सरच्या जारमध्ये ब्लेंड करून घ्यावे आणि वरून आपल्याला हवा तो फ्लेवर द्यावा. मलईयुक्त दूध घेऊन ब्लेंड केल्याने छान फेस येतो. व्हीप्ड क्रीम नसले तरी चालते.


एस्प्रेसो हनी कोल्ड कॉफी 
साहित्य : दोन कप दूध (मलईयुक्त), २ टेबलस्पून हनी (मध), २ टीस्पून साखर, १ टेबलस्पून ब्रू कॉफी पावडर, १-२ थेंब व्हॅनिला इसेन्स, ८- १० आईस क्युब. 
कृती : दूध गरम करून गार करून घ्यावे. कॉफी पावडर, साखर व २ टेबलस्पून गरम पाणी किंवा दूध चांगले फेटून घ्यावे. दूध व व्हॅनिला इसेन्स ब्लेंड करून घ्यावा. ब्लेंड करताना मिक्सर १० सेकंदच सुरू करून बंद करावा. असे ५-६ वेळा करावे, म्हणजे छान फेस येईल. दोन मग किंवा ग्लास घेऊन त्यामध्ये ब्रू कॉफीचे मिश्रण घालून वरून थोडे दूध, आईस क्युब व परत दूध घालून हनी व कॉफी किंवा कोको पावडर घालून सजवून थंड सर्व्ह करावी.


एस्प्रेसो कॅरॅमल हॉट कॉफी
साहित्य : दोन कप दूध, १ टेबलस्पून ब्रू कॉफी पावडर, २ टीस्पून साखर, २ टेबलस्पून कॅरॅमल (आधी तयार करून घ्यावे. पण फार घट्ट नसावे).
कृती : दूध चांगले गरम करून घ्यावे. दूध, साखर व कॉफी फेटून घ्यावी (वरीलप्रमाणे). दोन मग किंवा ग्लास घेऊन ग्लासच्या आतील बाजूस वरून चमच्याने थोडे थोडे कॅरॅमल सोडावे, म्हणजे ते आतील बाजूस हळूहळू खाली येईल. नंतर त्यामध्ये गरमगरम दूध हळूहळू वरून ओतावे. वरच्या बाजूस चांगला फेस येईल. बाकीचे राहिलेले कॅरॅमल घालून सजवावे. गरमगरम एस्प्रेसो कॅरॅमल हॉट कॉफी तयार.


एस्प्रेसो हॉट/कोल्ड सिनेमन कॉफी
साहित्य : २ कप दूध, १ टेबलस्पून ब्रू कॉफी पावडर, २ टीस्पून साखर, २ टीस्पून दालचिनी पावडर. 
कृती : सर्व कृती वरीलप्रमाणे करावी. फक्त ब्लेंड करताना दालचिनी पावडर टाकावी. तसेच दालचिनी पावडरने गार्निश करावे. ही कॉफी थंडीमध्ये हॉट कॉफी म्हणून करता येते व गरमीमध्ये कोल्ड कॉफी म्हणून करता येते. तसेच दुधाऐवजी पाणी घेऊनसुद्धा करता येते. 
टीप : अशा प्रकारच्या कॉफीज बरिस्तामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये करतात.  

संबंधित बातम्या