ऐतिहासिक मोडी झाली डिजिटल

अमित आवारी
सोमवार, 5 जुलै 2021

दखल       

संगणक वापरायला शिकत असताना डॉ. संतोष यादव यांचा वेगवेगळ्या फॉन्टशी परिचय झाला आणि संगणकीय अक्षरलेखनातल्या या करामतीने त्यांना जणू भुरळच घातली. यातून जन्माला आली एक नवी कल्पना. इतिहासाचा अभ्यास करताना, ऐतिहासिक साधनांकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देणाऱ्या देखण्या, वळणदार मोडी लिपीला संगणकीय फॉन्टच्या दुनियेत नेण्याची. डॉ. यादव यांचा मोडी फॉन्ट आता आणखी एका नव्या वळणावर आला आहे.

संगणकाचे प्राथमिक धडे गिरवताना संतोष यादव या इतिहासप्रेमी तरुणाला एक कल्पना सुचली. या कल्पनेने ऐतिहासिक आणि आता किचकट भासणाऱ्या मोडी लिपीला ऐतिहासिक कागदपत्रांच्या दप्तरांतून बाहेर काढत डिजिटल करण्याची किमया साकारली.  

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून इतिहास विषयात एमएची पदवी घेतल्यानंतर, इतिहास हा विषय आणखी खोलात जाऊन समजावून घेण्यासाठी संतोष यांनी नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात जाऊन इतिहास अभ्यास सुरेश जोशी आणि मिलिंद जोशी यांच्याकडून ऐतिहासिक साधने जाणून घेण्यास सुरुवात केली. ही गोष्ट २००७ची. 

सध्या अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात अभिरक्षक म्हणून काम करतानाच नगर शहरातील एका उच्च माध्यमिक विद्यालयात इतिहास शिकवणारे संतोष ऐतिहासिक साधनांच्या सान्निध्यात आल्यानंतर आणखी एक गोष्ट घडली. अगदी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत महाराष्ट्राच्या राज्य कारभाराची अधिकृत लिपी असणाऱ्या मोडीबद्दल त्यांच्या मनात असणाऱ्या आकर्षणाने पुन्हा उचल खाल्ली. मोडी लिपीचा सरकारी अभ्यासक्रम त्यांनी या आधीच पूर्ण केला होता. पण, ऐतिहासिक साधनं पाहताना वळणदार मोडीने त्यांनी जी भुरळ घातली ती कायमचीच. या मोडी आकर्षणाला आणखी एक वळण मिळाले ते संगणक शिकताना.

संगणकाबरोबरच त्यांचा परिचय झाला फॉन्टच्या एका अद्‌्भुत वाटणाऱ्या दुनियेशी. रोमन आणि देवनागरी लिपीतल्या वेगवेगळ्या फॉन्टनी त्यांचे लक्ष वेधून घेतले आणि  त्यातूनच कल्पना सुचली मोडी लिपीचाही फॉन्ट तयार करण्याची.  

मग सुरू झाला एका फॉन्टचा प्रवास. मोडी लिपीचा संगणकीय फॉन्ट तयार करण्यासाठी त्यांनी नगर शहरातल्या संगणक जाणकारांकडे चौकशा सुरू केल्या. पण एक संपूर्णपणे नवीनच फॉन्ट तयार करण्याची त्यांची कल्पना ऐकायला आकर्षक वाटत असली तरी त्यासाठी आवश्यक असणारे तांत्रिक सहकार्य त्यावेळी स्थानिक पातळीवर उपलब्ध नव्हते. मग नगरमधलेच संगणक अभ्यासक प्रकाश सोनार यांनी यादवांना पुण्यातील दिवाणजी सॉफ्टवेअर सोल्यूशनचे नाव सुचविले. मोडी फॉन्टच्या वेडाने झपाटलेल्या यादवांनी ‘दिवाणजी’च्या उदय फडके यांच्याशी संपर्क केला, आपली कल्पना त्यांना सांगितली.

फडकेंबरोबर झालेल्या प्रत्यक्ष भेटीत यादवांनी त्यांना पारंपरिक बोरू वापरून मोडी लिपीतील अक्षरे काढून दाखविली. या अक्षरांचा फॉन्ट तयार झाल्यास काय फायदे होतील, याविषयी त्यांनी जो काही विचार केला होता, तो फडकेंच्यासमोर सविस्तर मांडला. यादवांची जिद्द, चिकाटी व सातत्य पाहून फडके यांनी फॉन्ट तयार करण्यास सहमती दर्शविली आणि २०१२मध्ये ‘संतोष फॉन्ट’ तयार झाला. तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या फॉन्टचे अनावरण करण्यात आले. 

संगणक क्षेत्रातल्या ‘इंटेल’ कंपनीच्या सहकार्याने ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या एका लेखमालेत ‘संतोष फॉन्ट’बद्दल एक लेख प्रसिद्ध झाला होता. नंतर ‘इंटेल’ने त्यांच्या ‘द बेटर इंडिया’ या संगणक यशकथांच्या मालिकेत संतोष यादव यांच्यावर एक चित्रफीत करून त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. या चित्रफीतीमुळे संतोष फॉन्ट भारतभरातल्या अभ्यासकांपर्यंत पोचला. 

‘सकाळ’मधला लेख आणि ‘द बेटर इंडिया’ची चित्रफीत पाहून मोडी लिपीचे अभ्यासक तसेच मोडी लिपी शिकण्यास इच्छुक असणाऱ्या अनेकांनी यादवांना विविध सूचना केल्या. मोडी लिपी शिकण्यास बराच वेळ लागतो, हा वेळ कमी होईल; मोडीची अक्षर ओळख लवकर होण्यास मदत होईल, असा काहीतरी प्रोग्रॅम करता येईल का, असा बऱ्याच सूचनांचा सूर होता. मोडी वाचणे सोपे होईल असे काहीतरी करण्याची सूचना अनेक शासकीय अधिकाऱ्यांनीही केली. देवनागरी लिपीत मजकूर टाइप केला की त्याचे मोडी लिपीत रूपांतरण करणाऱ्या संगणकीय प्रोगॅमच्या दिशेने प्रयत्न करता येतील का, अशी एक कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी दिवाणजी सॉफ्टवेअरच्या तज्ज्ञांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांतून आकाराला आले ‘सुंदर मोडीपॅड’. 

मोडी साक्षर होऊ इच्छिणाऱ्यांसाठी ‘सुंदर मोडीपॅड’ हे सॉफ्टवेअर अत्यंत उपयोगी ठरेल असा विश्वास डॉ. यादव व्यक्त करतात. बहुतांश मोडी दस्त अतिशय जुने असल्यामुळे जीर्णावस्थेत आहेत, त्यामुळे त्यांचे स्कॅनिंग करणेही जिकिरीचे ठरते. या पार्श्वभूमीवर या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने मोडी लिपीतील विविध हस्तलिखितांचे वळण, त्यातील बारकावे लक्षात येऊन मोडी लिपीतील कागदपत्रे जलद गतीने वाचण्यास मदत होऊ शकेल. मोडी वाचणाऱ्यांच्या संख्येत जशी भर पडेल तशी अजूनही न वाचल्या गेलेल्या लाखो ऐतिहासिक कागदपत्रांचा अर्थ उलगडण्यास मदत होणार आहे. भारत सरकारच्या कॉपीराइट ऑफिसने डॉ. यादव यांना ‘सुंदर मोडीपॅड’चे स्वामित्वहक्कही (कॉपीराइट) मंजूर केले आहेत. मोडी लिपीसाठी कॉपीराइट घेणारे डॉ. यादव हे पहिले भारतीय अभ्यासक ठरले आहेत. 

मोडी लिपीतील दस्तावेजांमधील लिखाण हात न उचलता, शब्द न तोडता केलेले असतात. जुन्या कागदपत्रांमधील या लिखाणाचे ओसीआरसारखे तंत्र वापरून तंतोतंत लिप्यंतर करू शकणारे सॉफ्टवेअर बनवण्याचे आव्हान पेलण्याच्या दिशेने सध्या डॉ. यादव यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

मोडीचा इतिहास 
मोडी लिपी सर्वप्रथम कोणी वापरली या बाबत इतिहास अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. काही अभ्यासक मोडी लिपीला थेट मौर्य काळापर्यंत मागे नेतात तर कोणी यादवांचे पंतप्रधान हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी ती प्रथम शोधली असे सांगतात. संपूर्णपणे मोडी लिपीतील शिलालेख कोठेही नाही, मात्र काही शिलालेखांत मोडीतील काही अक्षरे आढळून येतात, असे डॉ. यादव सांगतात. देशभरात देवगिरीच्या यादवांपासून ते अगदी १९५०पर्यंतचे मोडी लिपीतील दस्तावेज आढळतात. यातील कित्येक लाख दस्तावेज आजही वाचले गेलेले नाहीत. तुलनेने मोडी लिपी वाचता येणारे वाचक बोटावर मोजण्या एवढेच आहेत. पेशवे दप्तराबरोबरच इंदूर, बडोदा, ग्वाल्हेर, तंजावर आदी राजघराण्यांचेही दस्त मोडीतच आढळतात. स्वातंत्र्यानंतरही काही काळ मोडी लिपी पहिलीपासून ते चौथ्या इयत्तेपर्यंत पाठ्यपुस्तकात असल्याने सत्तर ते ऐंशीच्या दशकापर्यंत मोडी लिपी वाचू शकणारी जाणकार मंडळी उपलब्ध होत असत. मात्र त्यानंतर मोडी अभ्यासकांची, वाचकांची कमतरता भासू लागली. 

मोडी लिपी वाचनाच्या अडचणी 
मोडी लिपीतील कागदपत्रे मुख्यतः हस्तलिखित असल्याने लिहिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हाताच्या वळणानुसार लिखित अक्षरांच्या वळणात थोडे थोडे बदल दिसून येतात. जोपर्यंत मोडी लिपीच्या अक्षरवळणांचा अभ्यासकाच्या डोळ्यांना चांगल्या प्रकारे सवय होत नाही तोपर्यंत ती मोडी लिपी चांगल्या प्रकारे वाचता येत नाही. अनेकांची हस्ताक्षरे असल्याने मोडी लिपीत एकसारखेपणा असतोच असे नाही, त्यामुळे कागदपत्रे वाचून त्याचा अर्थ लावताना वाचकाची कसोटी लागते. ऐतिहासिक संदर्भांची माहिती नसेल तर मोडी अक्षरांमागील अर्थ काहीवेळा पूर्णांशाने उलगडत नाही, असा यादव यांचा अनुभव आहे. त्यामुळे मोडीतील कागदपत्रे वाचताना तत्कालीन इतिहास, चालीरीती, कालगणना, महिने, महसुल पद्धती, चलन पद्धती आदींचाही अभ्यास आवश्‍यक असतो. 

मोडी लिपीचा वर्तमान उपयोग 
मोडी लिपीच्या अभ्यासाचा जात पडताळणीसाठी आणि अन्य शासकीय कामांमध्ये सर्वात जास्त उपयोग होतो. कारण अनेक ठिकाणी १९५० पूर्वीचे वारसांचे पुरावे मागितले जातात आणि हे दस्तावेज मोडी लिपीत आढळतात. न्यायालयीन कामकाजात जर जमिनीचा, जागेचा वाद असेल तर १९२० पूर्वीचे पुरावे मोडी लिपीत आढळतात. महाराष्ट्रात १९३० पूर्वीचे न्यायालयीन निकाल मोडी लिपीत आहेत. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना जमिनीचे, जातीचे दाखले द्यावे लागतात ते दाखले अनेक वेळा मोडी लिपीत असतात. भूमी अभिलेख कार्यालयात जमिनीचे टिपण, प्रती बुक उतारे हे मोडी लिपीत आहेत. त्यामुळे त्यांना अनेकदा मोडी जाणकारांची आवश्यकता भासते. अनेक नोंदणी रजिस्टार कार्यालयामधल्या १९२० पूर्वीच्या खरेदी विक्रीच्या नोंदी किंवा अनेक पोलिस ठाण्यांची १९२० पूर्वीची रेकॉर्ड मोडी लिपीतील आहेत. त्याशिवाय आधी म्हटल्याप्रमाणे इतिहास अभ्यासक, संशोधकांनाही मोडी लिपीची आवश्यकता भासते.

काय आहे सुंदर मोडीपॅड सॉफ्टवेअर 
सुंदर मोडीपॅड संगणकाशी जोडताच एक टूल ओपन होते. त्या टूलमध्ये सदतीस भारतीय कीबोर्ड देण्यात आले आहेत. यातला कोणताही कीबोर्ड वापरून तुम्ही मजकूर टाइप केला की त्याचे मोडी लिपीत लिप्यंतर होते. मोडीची बाराखडी शिकण्यासाठी, मोडी लिपीतील अक्षरांच्या वळणांची अभ्यास करण्यासाठी या सॉफ्टवेअरचा उपयोग होईल. हे सॉफ्टवेअर C#Net या भाषेत तयार करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या