मोर इनक्युबेटरमधून जन्माला येतो तेव्हा...!

डॉ. सतीश पांडे 
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022

 दखल     

शेताच्या बांधावर सापडलेली मोराची अंडी आम्ही काळजीपूर्वक कापडात गुंडाळून वन्यप्राणी दवाखान्यात इला हॅबिटॅट येथे आणली व इनक्युबेटरमध्ये ठेवली. इनक्युबेटरमध्ये अंडी लागलीच दाखल झाल्याने आमचे प्रयत्न यशस्वी होतील असे वाटले... अन्‌ एका रात्री अंडी चक्क हलू लागली. आतून चिव चिव आवाज येऊ लागला आणि चार सुंदर धष्टपुष्ट पिल्ले जन्माला आली. भारतात प्रथमच राष्ट्रीय पक्षी मयुराची पिल्ले इनक्युबेटरमधून कृत्रिम मदतीने जन्माला आली! 

मोराने आपला पिसारा फुलवला, की त्याच्या सुंदर पिसांना जणू सहस्र डोळ्यांचा साज चढवला आहे असा भास पाहणाऱ्यास सहजच होतो. म्हणूनच मोराला ‘अनंतचक्षू’ आणि ‘सहस्र लोचन’ अशी भुरळ पाडणारी नावे भारतीय संस्कृतीत आढळतात. जगातील अत्यंत सुंदर पक्ष्यांमध्ये मोराची गणना होते. अशा या मोराला प्राचीन संस्कृतीतही स्थान दिलेले दिसते. चित्रकला, मूर्तिकला, लेख, कविता, लोककथा, नृत्य, योगासने, अलंकार व आभूषणे, भित्तिचित्रे अशा व इतर अनेक ठिकाणी मोर दिसून येतो. गंजिफावर मोर चितारलेला मी पाहिला आहे. पूर्वी राजेरजवाडे आपल्या आलिशान बागांची शान वाढवण्यासाठी मोरांना पाळत असत. आज भारतीय वन्यजीव कायद्यान्वये मोराला भारत सरकारने अभय दिले आहे. मोर पाळण्यास व हाताळण्यास मनाई आहे. मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून सन्मानित केले आहे. 

अनेक ठिकाणी मोर पूजनीय मानला जातो, कारण त्याला सरस्वती, गजानन (मयुरेश्‍वरा) व कार्तिकेयाचे वाहन म्हणून भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान दिलेले आहे. मोरपिसांची उंच टोपी घालून सकाळी भजने म्हणत येणारा वासुदेव अनेकांनी पाहिला असेल. जगासाठी दुवा मागणाऱ्या फकीराच्या हातात धूपदाणीबरोबर मोरपिसांचा पंखाही असतो. श्रीकृष्णाच्या केशसंभारात मोरपीस खोचलेले असते. अशी अनेक उदाहरणे मोराचे भारतीय जनमानसातील स्थान दर्शवतात; पण एका बाजूला मोराबद्दलचा अभिमान जसा पाहायला मिळतो, तसाच दुसऱ्या बाजूला काही मोराची शिकार करतानादेखील दिसतात. मोरांची निर्घृणपणे हत्या करून त्यांचे मांस फस्त करणे, एवढेच अशा गुन्हेगारांना कळते. 

पक्षिशास्त्रात मोराची गणना ‘फॅसियानिडे’ कुळात केली जाते. रानकोंबडे, तित्तर, साळोत्री, लावे व कुक्कुट प्रजातीचे पक्षी फेजंट या कुळात समाविष्ट आहेत. भारतात या कुळातील पक्षी सर्वत्र आढळतात. हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत, पश्‍चिम घाट, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रेचे सुपीक प्रदेश, वने, डोंगरदऱ्या, पाणतळे अशा सर्व ठिकाणी हे पक्षी राहतात. वैराण वाळवंट हा एक अपवाद आहे; पण त्यांच्या आसपासदेखील या पक्ष्यांचा वावर दिसतो. गुजरात व राजस्थान येथे लोक मोरांना त्रास देत नाहीत, तसेच महाराष्ट्रातदेखील खेडोपाडी शेतकरी त्यांना अभय देतात. म्हणून मोर अशा ठिकाणी माणसांच्या जवळपास येतात. 

 मोर आकाराने मोठा असतो व विणीच्या काळात नराला लांब पिसारा येतो. हा पिसारा म्हणजेच मोराची शेपटी असा गैरसमज जनमानसात दिसतो. प्रत्यक्षात मात्र मोराची शेपटीची पिसे छोटी व तांबूस रंगाची असतात व शेपटीच्या वरच्या बाजूस असणारी पिसे, म्हणजेच ‘टेल कव्हर्ट’, हा असतो त्याचा पिसारा! मादी म्हणजेच लांडोरीला पिसारा नसतो, कारण तिला अंड्यांना उबवायचे असते व अशा महत्त्वाच्या कामात पिसारा नसणे उपयुक्त ठरते. मोराच्या पिसाऱ्याच्या आकारावरून, रंगावरून, जाडीवरून, नाचण्याच्या लकबीवरून मादी नराला निवडते. विणीचा काळ संपला, की मोराचा पिसारा गळून पडतो. ‘फॅसियानिडे’ कुळातील पक्षी जमिनीवर अंडी घालतात. त्यांना उडता येते; पण ते झाडांवर घरटी करत नाहीत. मोरांप्रमाणेच माळढोक, तणमोर, टिटव्या, धावीक, रातवे, काही घुबडे, चंडोल, चरचरी असे अनेक प्रकारचे पक्षी जमिनीवरच अंडी घालतात. अशी अंडी उघड्यावर घातली तर त्यांना शिकारीला बळी पडण्याचा धोका असतो. म्हणूनच मोर आपली अंडी झुडपांमध्ये, दाट गवतात, काटेरी बोरी, करवंदे, टणटणीत घालतात.  सरपणासाठी झुडपांची मोठ्या प्रमाणात तोड होत असते. गॅस सिलिंडरच्या भडकलेल्या किमतींमुळे परत वृक्षतोड होताना दिसू लागली आहे. शेतांच्या बांधांवर भरपूर गवत वाढते व अशा गवतात, बांधांवर अनेक ठिकाणी मोर अंडी घालतात. चार ते सात अंडी एकावेळी घातली जातात. उंच गवतात दबून बसलेली अंडी उबवणारी निश्‍चल लांडोर अंतर्धानच पावते जणू. एवढे असले तरी मोराच्या अंड्यांना कुत्री, मांजरी, कोल्हे, खोकडे, मुंगूस, उदमांजर, रानमांजर, भारद्वाज, कावळे व शिकारी पक्षी यांपासून धोके उद्‌भवतात. माणूस हा दुसरा धोकादायक प्राणी जो सर्वत्रच वावरत असतो. मोराची अंडी पळवून त्यावर ताव मारण्याचे प्रकार अजूनही घडत असतात. अशा गुन्हेगारांना जरब बसायला हवी.  
खूप वेळा बाजरी, ज्वारी, मका, गहू यांची कापणी झाल्यावर शेतकरी जेव्हा बांधावरील गचपण साफ करतात, तेव्हा अचानक मोराची अंडी जमिनीवर दिसतात. घाबरलेल्या लांडोरीने कधीच पोबारा केलेला असतो. उघडी पडलेली अंडी लांडोर सोडून देते कारण तिलाच जिवाला धोका जाणवतो. अशा वेळी दयाळू शेतकरी अंडी घेऊन कोंबडीखाली ठेवून उबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यात दयाबुद्धी असते. त्यांना मोर पाळण्याची संधी दिसते; पण वन्यजीव कायद्यानुसार याला परवानगी नाही. मोराची अंडी आकाराने मोठी असतात आणि पाच-सहा अंडी एकाच कोंबडीखाली ठेवली तर त्यांना नीट ऊब मिळत नाही. ती खराबच होतात. एखाददुसरे अंडे उबतेदेखील. कोंबडी हा पक्षीदेखील मनस्वी असल्याने लहर बदलली तर ती अंडी सोडून देतो. उबवण्यास चक्क नकार देतो. थोडक्‍यात काय, अशा प्रकारे मोराची अंडी उबवणे हा गुन्हा आहे. 
‘इला फाऊंडेशन’ या आमच्या संस्थेला महाराष्ट्रात शासनाने ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ उभारण्याची परवानगी दिली आहे. पिंगोरी गावात, जेजुरीच्या खंडोबारायाच्या कडेपठारामागे ‘इला हॅबिटॅट’ या आमच्या जागेत हा वन्यप्राण्यांचा दवाखाना इला फाऊंडेशन व महाराष्ट्र वनविभाग यांच्या साहाय्याने चालविला जातो. आत्तापर्यंत नव्वदपेक्षा जास्त आजारी वन्य पशू-पक्षी इथून बरे होऊन गेलेत व परत मुक्त जीवन जगू लागले आहेत. आजूबाजूचे शेतकरी, गुराखी व वनविभागाचे अधिकारी अधूनमधून आमच्याकडे मोराची अंडी आणून देत असतात. आमच्या दवाखान्याला रीतसर शासकीय परवानगी असल्यामुळे आम्हीदेखील पूर्वी अशी अंडी कोंबडीखाली ठेवून उबवण्याचा प्रयत्न केला होता; पण ही आणून दिलेली अंडी सापडल्यानंतर काही दिवसांनी आणून दिलेली असल्याने अर्थातच त्यातून पिल्ले जन्माला आली नाहीत. आमच्या तांत्रिक समितीने याचा आढावा घेऊन, अशी अंडी उबवण्यासाठी योग्य उपाय व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. 
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली इला फाऊंडेशनतर्फे राजकुमार पवार, राहुल लोणकर व आविष्कार भुजबळ यांनी स्थानिक उपलब्ध साहित्याचा वापर करून अद्ययावत इनक्युबेटर तयार केला. या अंडी उबवण उपकरणात योग्य तापमान व आर्द्रता नियंत्रित करण्यात आली. दर काही तासांनी आतील अंडी हलवावी लागतात, अन्यथा आतील गर्भ कवचाला आतून चिकटू शकतो व खराब होतो. 

काहीच दिवसांनी शिंदेवाडीच्या सुरेश शिंदे यांना बाजरी काढल्यावर बांधाचे गवत काढताना मोराची अंडी सापडली. ती उघडी पडली. हात लावून पाहिल्यावर उबदार होती. त्यांनी आमच्या दवाखान्यात वर्दी दिली. आम्ही ती अंडी काळजीपूर्वक कापडात गुंडाळून वन्यप्राणी दवाखान्यात इला हॅबिटॅट येथे आणली व इनक्युबेटरमध्ये ठेवली. त्या आधी किती दिवस लांडोरीने ती उबवली होती हे कळणे शक्‍य नव्हते. इनक्युबेटरमध्ये अंडी लागलीच दाखल झाल्याने आमचे प्रयत्न यशस्वी होतील असे वाटले... अन्‌ एका रात्री अंडी चक्क हलू लागली. आतून चिव चिव आवाज येऊ लागला. अंड्यातील पिल्ले बाहेर येण्याआधी जो आवाज करतात, त्याला ‘पाइपिंग’ असे म्हणतात. बघता-बघता एका अंड्याच्या कवचाला तडा गेला. त्यातून एक पिलू बाहेर आले अन्‌ सकाळपर्यंत सगळी अंडी फुटली व चार सुंदर धष्टपुष्ट पिल्ले जन्माला आली. भारतात प्रथमच राष्ट्रीय पक्षी मयुराची पिल्ले इनक्युबेटरमधून कृत्रिम मदतीने जन्माला आली! 

भारतीय पक्षिशास्त्रात एक इतिहास साकारला तो इला फाऊंडेशन व महाराष्ट्र वनविभागाच्या वन्यप्राणी दवाखान्यात. मोराची पिल्ले जन्माला आली, की इकडे-तिकडे पळू लागतात. समोर भरड धान्य टाकले आणि बोटाने टकटक करत ते त्यांना दाखवले की कण वेचू लागतात. बाजरी, ज्वारी, मका, गहू, तांदूळ, तूर, मूग यांची जात्यात भरड काढून त्यांना आम्ही दिली. पण एवढेच अन्न त्यांच्या पिसांची, स्नायूंची व हाडांची वाढ होण्यास सकस ठरत नाही. म्हणून खास तयार केलेले, पक्ष्यांच्या पिलांची सर्वंकष वाढ होण्यास परिपूर्ण असलेले ‘फॉर्टीफाइड’ अन्नाचे पीठ आयात करून ते पिल्लांना दिले. हे अन्न खूप महाग असते व दर आठवड्याला आठ-दहा हजार रुपये खर्च होतो. हा खर्च पिल्ले वाढू लागली की वाढतो. म्हणूनच इला फाऊंडेशनच्यावतीने आम्ही पक्षीप्रेमी देणगीदारांना मोरांना मदत करण्याचे आवाहन करतो. दयाळू व परोपकारी पक्षिप्रेमी भारतात प्रथमच इनक्युबेटरमधून जन्माला आलेल्या राष्ट्रीय पक्ष्याला मदत करू शकतात. 

पिल्ले थोडी मोठी झाली, आत्मसंरक्षणास सक्षम झाली, झाडांच्या फांद्यांवर उडून जाऊन बसू लागली, की त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल. इनक्युबेटरच्या उबेत जन्माला आलेली मोराची पिल्ले मुक्त व स्वतंत्र होतील. आपल्या भावंडांना, मित्रांना भेटतील व परिसरात वर्षाऋतूचे काळे ढग आकाशात गर्दी करायला लागले, की केकावली ऐकवून माणसाच्या प्रेमाचा स्वीकार करतील! 

(लेखक पिंगोरी येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर, इला हॅबिटॅटचे संचालक आहेत.) 

संबंधित बातम्या