पुनर्जन्म झालेला गुन्हेगार

इरावती बारसोडे 
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

दखल
 

एखादा जन्मठेपेची शिक्षा झालेला गुन्हेगार तुरुंगात मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला तर? आणि मग म्हणू लागला, की मी मेल्यामुळं माझी शिक्षा चार वर्षांपूर्वीच संपली! आता मला सोडून द्या, अशी मागणी तो करू लागला तर? ही काल्पनिक घटना नाही, हे खरंच घडलंय. अमेरिकेतल्या आयोवामध्ये. या मरून पुन्हा जिवंत झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे बेंजामिन श्रायबर. आत्ता बेंजामिन ६६ वर्षांचा आहे आणि गेल्या २० वर्षांहून अधिक काळ तो आयोवा स्टेट पेनिटेंशिअरी तुरुंगात आहे. खून केल्याप्रकरणी त्याला आयोवा न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यानं आत्तापर्यंत सुटकेसाठी अनेक अयशस्वी याचिका दाखल केल्या आहेत, ज्यांचा काहीही उपयोग झालेला नाही. पण २०१८ मध्ये मात्र त्यानं वेगळीच शक्कल लढवली.

बेंजामिननं दाखल केलेल्या याचिकेनुसार, मार्च २०१५ मध्ये त्याला सिझर्स म्हणजेच फेफरं आली आणि खूप ताप चढला. परिणामी, त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं. मूत्रपिंडामध्ये मोठाले मूतखडे झाले होते. त्यामुळं अंतर्गत मूत्रविसर्जन होऊ लागलं. या सगळ्यामुळं त्याला विषबाधा झाली आणि तो कोठडीत फेफरं येऊन पडला. मूतखड्यांमुळंच ही लक्षणं उद्‍भवली होती, असं वैद्यकीय अहवाल सांगतो. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि डॉक्टरांनी त्याला पुन्हा जिवंत केलं, असं त्याचं म्हणणं आहे. 

‘जन्मठेपेची शिक्षा म्हणजे मरेपर्यंत(च) तुरुंगवास. मी मेल्यामुळं खरं तर ही जन्मठेपेची शिक्षा मी पूर्ण केली आहे. शिवाय चार वर्षं जास्त तुरुंगात राहिलो आहे. त्यामुळं मला आता सोडून द्या,’ अशी याचिका बेंजामिननं जिल्हा न्यायालयात दाखल केली होती. जिल्हा न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर तो आयोवा न्यायालयामध्ये गेला. त्यानं याचिकेत पुढं असंही म्हटलं होतं, की मला पुनरुज्जीवित करू नये ही सूचना मी दिलेली असताना डॉक्टरांनी त्याचं पालन केलं नाही. त्यामुळं त्याच्या अधिकारांचं उल्लंघन झालं असल्याचं त्यानं म्हटलं होतं. डॉक्टरांनी बेंजामिनचं दुखणं कमी व्हावं यासाठी औषधं दिली होती, तीही त्याच्या भावाला विचारूनच. उपचारांदरम्यान त्याचं हृदय बंद पडलं होतं आणि डॉक्टरांनी ते सुरूही केलं, ही बाब खरीच. 

डॉक्टरांनी खरंच त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला जीवदान दिलं का, यावर कोर्टाकडून काहीही स्पष्टीकरण आलेलं नाही आणि डॉक्टरांनीही यावर भाष्य केलेलं नाही. पण, माझ्या शिक्षेची मुदत संपल्यामुळं मला सोडून द्या, हा बेंजामिनचा युक्तिवाद कोर्टाला काही पटला नाही. न्यायाधीश अमँडा पॉटरफिल्ड यांनी म्हटलं आहे, ‘श्रायबर हा एकतर जिवंत आहे किंवा मेलेला आहे. तो जिवंत असेल, तर तुरुंगातच राहील आणि मेलेला असेल तर ही याचिकाच वादग्रस्त आहे.’ 

बेंजामिननं याचिकेमध्ये जेरी रोझनबर्ग याचं उदाहरण दिलं होतं. रोझनबर्गवर १९६२ मध्ये दोन न्यूयॉर्क पोलिस अधिकाऱ्यांचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यानं १९८८ मध्ये शस्त्रक्रियेदरम्यान हृदय बंद पडल्यामुळं माझा मृत्यू झाला, त्यामुळं मला सोडून द्या अशी याचिका दाखल केली होती. अर्थातच कोर्टानं त्याचीही याचिका फेटाळली होती. कालांतरानं त्याचा तुरुंगातच मृत्यू झाला, खराखुरा! 

न्यायालयानं बेंजामिनला असं सहजासहजी सोडून द्यावं, असा त्याचा गुन्हा साधासुधा नाही. १९९६ मध्ये तो ४३ वर्षांचा 
असताना त्यानं ३९ वर्षीय डॉन डेल टेरी या इसमाचा कुऱ्हाडीच्या लाकडी मुठीनं खून केला होता. विशेष म्हणजे टेरीच्या गर्लफ्रेंडच्या मदतीनंच त्यानं हा कट रचला होता. त्याचा गुन्हा सिद्ध झाला आणि १९९७ मध्ये त्याला पॅरोलशिवाय जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 

बेंजामिन ही याचिका करू शकतो, म्हणजेच तो जिवंत आहे आणि तो जिवंत आहे म्हणजेच त्याला शिक्षाही भोगावीच लागेल, हे न्यायालयामध्ये सिद्ध करण्यात आलं. त्यामुळं, बेंजामिन अर्थातच अजूनही तुरुंगात आहे. जोपर्यंत तो खराखुरा मरत नाही आणि डॉक्टर तसं जाहीर करत नाहीत, तोपर्यंत त्याचा मुक्काम तुरुंगातच असेल हे नक्की!   

संबंधित बातम्या