शिल्पकलेत नवी दृष्टी देणाऱ्या विदुषी..!

प्रा. कल्पना रायरीकर
सोमवार, 19 एप्रिल 2021

दखल     

भारतीय शिल्पकला, मूर्तिशास्त्र, मंदिर-स्थापत्य, चित्रकला हे अतिशय समृद्ध असे क्षेत्र होय. प्राचीन भारतीय वाङ्‌मय म्हणजे संस्कृत महाकाव्ये, नाटके, वेद-वाङ्‌मय, बौद्ध-जैन धार्मिक साहित्य यांचा परिचय भारताच्या बाहेर झालेला होता; परंतु शिल्प, मूर्ती, स्थापत्य याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. ‘भारतीय शिल्प, स्थापत्य हे धार्मिक श्रद्धेने बद्ध’ अशी ओळख होती. दुर्लक्षित असे हे वैभव मोजक्‍याच संशोधकांच्या मोजक्‍या प्रयत्नाने हळूहळू दृगोच्चर होत होते. 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये (पहिले चतुर्थक) दोन अभारतीय विदुषींनी भारतीय शिल्पकलेचा, स्थापत्याचा, चित्रकलेचा अभ्यास केला, काही संशोधन केले आणि सिद्धांत मांडले. या कलावैभवाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कोण होत्या या विदुषी? स्टेला क्रॅमरिश आणि एलिस बोनेर या दोन विदुषींनी हे काम केले आहे. त्यासाठी त्यांनी भारतात वास्तव्य केले, भारतीय संस्कृती अभ्यासली, अनुसरली. 

मूळच्या ऑस्ट्रिया या देशातील स्टेला यांचे शिक्षण व्हिएन्ना आणि नंतर लंडन (ऑक्‍सफर्ड) येथे झाले. त्यावेळी अभ्यासक्रमासाठी ‘अर्ली बुद्धिस्ट स्कल्पचर्स ऑफ इंडिया’ हा प्रबंध (१९१९) लिहिला. नंतर तेथेच त्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. रवींद्रनाथ टागोर यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यांच्या निमंत्रणावरून डॉ. स्टेला क्रॅमरिश शांतिनिकेतन या टागोरांच्या संस्थेमध्ये प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर १९२४ मध्ये कलकत्ता विद्यापीठामध्ये ‘इंडियन आर्ट’ या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांचा भारतीय कला आणि स्थापत्य यांचा अभ्यास होताच, परंतु तो आणखी दृढ केला. त्यांनी अनेक नवे सिद्धांत मांडले. त्यांचे निष्कर्ष ग्रंथरूपात प्रकाशित झाले. ‘प्रिन्सिपल्स ऑफ इंडियन आर्ट’नंतर कालांतराने ‘इंडियन स्कल्पचर्स’ हेही पुस्तक आले. 

त्यांचे असे म्हणणे होते, की भारतीय शिल्पकला, मूर्तिशास्त्र, मंदिर स्थापत्य हे धार्मिक स्थापत्याच्या साहचर्यामध्ये निर्माण झाले असले, तरी त्यांचा कला आणि शास्त्र म्हणून स्वतंत्रपणे अभ्यास केला पाहिजे. त्यावेळी कलासमीक्षक, स्थापत्यशास्त्राचे समीक्षक हे युरोपियन सौंदर्य सिद्धांत आणि परिमाणे वापरत असत. डॉ. स्टेला यांनी प्रतिपादन केले, की भारतीय कलेसाठी हे युरोपियन निकष योग्य नाहीत. त्यासाठी भारतीय परिमाणे, निकष अधिक योग्य आहेत. या विषयाची परिभाषासुद्धा भारतीय असावी असेही त्यांचे म्हणणे होते. डॉ. स्टेला यांनी शिल्पकारांची भूमिका काय असावी, प्राचीन शिल्पकारांची मांडणी काय होती याविषयी काही चिंतन केल्याचे दिसते. प्राचीन भारतीय शिल्पकारांनी शिल्पनिर्मिती करताना, मूर्ती घडवताना कोणता विचार केला असावा, त्यांच्याकडे कोणती साधने होती यासंबंधी डॉ. स्टेला यांच्या मते प्राचीन शिल्पकारांनी काही योजना आखून कलानिर्मिती केली आणि त्यामध्ये सातत्य राखले. या त्यांच्या मतांमुळे कलासमीक्षकांचा दृष्टिकोन विस्तारला, असे म्हणता येईल. 

शिल्पकला आणि मूर्ती यांच्याबरोबरच डॉ. स्टेला यांचे लक्ष मंदिर स्थापत्याकडे गेले. यासाठी त्यांनी ‘अग्निपुराण’, ‘विष्णूधर्मोत्तर पुराण’, ‘कामिका आगम’, ‘ईशानदेव गुरू पद्धती’ इत्यादी प्राचीन भारतीय ग्रंथ अभ्यासले. मंदिर स्थापत्य म्हणजे वेदांमधील तत्त्वज्ञान, मोक्ष संकल्पना, यज्ञ संकल्पना यांचे मूर्तरूप होय, असे त्यांना जाणवले. हा अभ्यासही ‘हिंदू टेम्पल’ या ग्रंथ रूपामध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथाला जवळजवळ ७५ वर्षे पूर्ण झाली असून आजही तो मंदिर स्थापत्यासाठी अभ्यासला जातो. या ग्रंथामुळे मंदिर स्थापत्य या विषयाला जागतिक ओळख मिळाली. डॉ. स्टेला यांनी या अभ्यासाबरोबरच भारतातील केरळ त्रावणकोर भागातील कलेविषयी अभ्यास केला होता. त्याचेही पुस्तक प्रसिद्ध झाले, ‘आर्ट अँड क्राफ्ट ऑफ त्रावणकोर.’ 

डॉ. स्टेला १९५०मध्ये अमेरिकेत पेनसिल्व्हानिया विद्यापीठात रुजू झाल्या. त्यांचा विषय होता ‘साऊथ एशियन आर्ट!’ भारतातील वास्तव्य संपले असले तरी भारतीय संस्कृती, कला, स्थापत्य यांचा अभ्यास संपला नव्हता. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील  वस्तुसंग्रहालयाचेही काम त्या पाहत होत्या. तिथे भारतीय कलावस्तूंची मांडणी, जतन, संवर्धन त्यांनी केले. त्याची प्रदर्शने भरवली आणि भारतीय कलांचा प्रसार केला. या काळातही त्यांचा शिव दैवताविषयी अभ्यास सुरू होता. त्यांचे १९८१मध्ये शिव दैवतावरचे ‘प्रेझेन्स ऑफ शिव’ आणि पाठोपाठ दुसरेही पुस्तक प्रसिद्ध झाले, ‘मॅनिफेस्टेशन ऑफ शिव’. भारतीय शिल्प, स्थापत्य, मूर्तिशास्त्र, चित्रकला इत्यादी विषयांवर १५ पुस्तके लिहिली. त्यामध्ये ‘हिमालयन आर्ट’, ‘रिच्युअल आर्ट इन ट्राइब्ज ऑफ व्हिलेजेस’ यांचा समावेश आहे. त्यांच्या कर्तृत्वाची दखल भारत सरकारने घेतली आणि त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

एलिस बोनेर

याच कालखंडामध्ये एलिस बोनेर याही भारतीय कला आणि स्थापत्य या विषयांमध्ये कार्यरत होत्या. कलावती, कलाप्रेमी अशा एलिस या इटलीच्या. चित्र आणि शिल्प निर्मितीमध्ये विविध प्रयोग केले. कलाकृतीचे माध्यम, तंत्र, विविध रंग-पोत यांचे प्रयोग केले. भारतीय कलाप्रवाहाकडे त्यांचे लक्ष गेले ते प्रख्यात नर्तक उदयशंकर यांच्यामुळे. पंडित उदयशंकर यांचे १९२५-२६च्या सुमारास नृत्यप्रयोग युरोपमध्ये सादर होत होते. त्यापैकी झुरीक, पॅरिस येथील प्रयोग एलिस यांनी पाहिले. त्यांना तो नृत्यप्रकार खूप आवडला. त्यांनी उदयशंकर यांची भेट घेतली. त्या उदयशंकर यांच्याबरोबर भारतात आल्या. त्यांनी भारतीय शिल्पांची चित्रे काढण्यास सुरुवात केली. त्या वेळी धार्मिक गोष्टी आणि शिल्पे यांचा अभ्यास उपयोगी पडला. त्यातही त्यांचे कुतूहल वाढले ते भारतीय शिल्पकारांविषयी! शिल्पनिर्मितीच्या वेळी शिल्पकारांच्या मनात काय विचार असावा, हा त्यांना प्रश्‍न पडला. 

या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी त्या १९४० मध्ये वेरूळला गेल्या. तेथील सर्व मूर्ती, कथनशिल्प यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे या अभ्यासाच्यावेळी काय जाणवत होते, काय अनुभूती येत होती, काय प्रश्‍न पडत होते आणि उत्तरे कशी मिळत गेली यांची नोंद केली. या अनुभूतींची दैनंदिनीच तयार झाली. ती अभ्यासकांच्या दृष्टीने मौलिक संदर्भच आहे. ‘ही शिल्पं जणू माझ्या आत्म्यालाच स्पर्श करून गेली आहेत. मी त्रयस्थपणे शिल्प निरखत होते तरी मला त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटत होती. वेरूळ लेण्यातील शिव, विष्णू या दैवतांची विविध भव्य शिल्पे मला काही सांगत होती, असे वाटते. ही शिल्पं घडवताना शिल्पकारांनी निश्‍चितच विचार केला आहे. शिल्पांचे स्थान, आकारमान, शिल्पपट्टांचा समन्वय हे सर्व जाणीवपूर्वक केले आहे. त्या शिल्पांचे सौंदर्य माझ्या अंतर्मनामध्ये हळूहळू झिरपत आहे आणि मी आनंदाने ते सौंदर्य आत्मसात करू लागले आहे,’ असे त्यांनी नोंदवले आहे. 

अशा अनुभूतीनंतर त्यांच्या कुंचल्यामधून या शिल्पांची चित्रे पूर्णत्वाला गेली. त्यांचा भर रेखाटनांमध्ये होता. ही चित्रे खूप वाखाणली गेली. त्यांनी असे मत मांडले, की शिल्पकारांनी स्वतंत्र दृष्टिकोनातून आणि प्रेरणेतून ही शिल्पं निर्मिलेली आहेत. त्या शिल्पांमधील विषय, त्या-त्या व्यक्तिरेखांमधील एक समन्वय त्यांनी अधोरेखित केले आहे. एलिस यांचे भारतीय शिल्पकलेचे रसग्रहण सर्वांनाच नवीन वाटले आणि ते सर्वमान्यही झाले आहे. विदुषी डॉ. स्टेला यांनी प्रतिपादन केले होते, की भारतीय शिल्प हे स्वतंत्र कलाकृती म्हणून पाहिली पाहिजे. तोच विचार एलिस यांनी मांडलेला दिसतो. 

एलिस यांनी अशी शिल्पे घडवणारे शिल्पी कुठे आहेत का, याचा शोध सुरू झाला. त्यांना १९५६च्या सुमारास ओडिशा राज्यामध्ये असे शिल्पी मिळाले. त्या पारंपरिक शिल्पींच्या घराण्यातील एक होते पंडित सदाशिव रथ! विदुषी एलिस आणि पं. सदाशिव यांच्यात चर्चा, बैठका होत राहिल्या. पंडितजींनी त्यांच्या घराण्यातील पारंपरिक हस्तलिखिते दाखवली. त्या दोघांनी मिळून ‘शिल्पप्रकाश’ हा ग्रंथ लिहिला.  

याच काळात एलिस यांचा हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास सुरू होता. हिंदू धर्मातील बह्मा, विष्णू महेश ही संकल्पना, पर्यायाने उत्पत्ती, स्थिती, लय ही संकल्पना खूपच पटलेली आणि भावलेली होती. याविषयी चित्रे त्यांनी काढली, तसेच कृष्णाचे विश्‍वरूप दर्शन, काली देवतेचे चित्रही त्यांनी काढले. ते खूप गाजले. 

एलिस या नृत्याच्याही अभ्यासक होत्या. त्यामुळे त्यांना शिल्पांमध्येही ताल, लय दिसत असावी; ती त्यांनी चित्रांतही उतरवली आहे. त्यामुळे शिल्पांची चित्रे म्हणजे केवळ शिल्पांची हुबेहूब प्रतिमा न राहता वेगळे परिमाण चित्रांना लाभले आहे. नृत्याच्या आवडीमुळेच त्यांना केरळमधील कथकली या नृत्यप्रकाराचे आकर्षण वाटले. हे नृत्य राष्ट्रीय स्तरावर पोचवण्याचे श्रेय विदुषी एलिस यांनाच जाते. कोणार्क मंदिरावरचे पुस्तक -‘न्यू लाइट ऑन सन टेम्पल ऑफ कोणार्क’, ‘जिऑमेट्री ऑफ टेम्पल’, ‘प्रिन्सिपल्स ऑफ कॉम्पोझिशन्स ऑफ हिंदू स्कल्पचर्स’, ‘वास्तुउपनिषद’, ‘शिल्पप्रकाश’ या एलिस यांच्या ग्रंथांचे अनन्यसाधारण महत्त्व अभ्यासकांना आहे.  विदुषी एलिस १९७८मध्ये स्वित्झर्लंडला गेल्या; पण भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला होता. अशा या दोन विदुषी जन्माने अभारतीय पण कृतीने अस्सल भारतीय! त्यांच्या संशोधनामुळे नवे वळण मिळाले, अभ्यासकांना नवीन दृष्टी मिळाली. भारतीय कलांना जागतिक प्रतिष्ठा त्यांनी मिळवून दिली!

संबंधित बातम्या