कोरोनामुक्तीचा सुरगाणा पॅटर्न!

महेंद्र महाजन, नाशिक
सोमवार, 21 जून 2021

दखल      

कोरोनाची दुसरी लाट कमी होत असताना आता महाराष्ट्र अनलॉक होत आहे. पण दुसऱ्या लाटेमध्ये सगळीकडेच जशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती, तशीच ती नाशिक जिल्ह्यातला सुरगाणा तालुक्यातही वाढली. आदिवासी बहुल असलेल्या या तालुक्यात गैरसमज आणि भीती या दोन्ही गोष्टींमुळे लोक उपचार घेण्यात मागे राहू लागले आणि हा तालुका कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ झाला. पण कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘प्रोटोकॉल’ कायम ठेवून आयूष मान्य आयुर्वेदिक इलाजाची जोड देण्यावर जिल्हा परिषदेने शिक्कामोर्तब केले... आणि बघता बघता तालुका कोरोनामुक्त झाला! 

सुरगाणा एकेकाळचे संस्थान. शेवटचे राजे श्रीमंत धैर्यशीलराव पवार. सुरगाणा तालुक्यातील सातमाळाच्या रांगांमध्ये हातगड किल्ला आहे. आदिवासी बहुल असलेला सुरगाणा तालुका दऱ्याखोऱ्यांनी आणि सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगांनी वेढलेला आहे. निसर्गरम्य तालुक्यातील आदिवासी बांधवांची जीवनशैली निसर्गाशी तादाम्य पावलेली. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या झळा या भागाला बसल्या फारशा नव्हत्या. पण दुसऱ्या लाटेने आदिवासी बांधवांच्या तोंडचे पाणी पळवले. ८३ हजार ७४६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या दोन लाखापर्यंतच्या लोकवस्तीत मृतांची संख्या वीसच्या पुढे पोचली. अकराशेहून अधिक बाधित झाले. पण कोरोनावरील उपचाराबद्दल आदिवासी ‘बांधवांमध्ये एकीकडे गैरसमज पसरलेला असताना दुसरीकडे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठलेला होता. डॉक्टर ‘पॉझिटिव्ह’ काढतात’ असा गैरसमज आणि त्या गैरसमजाला दवाखान्यात माणसे मरतात या भीतीची जोड. त्याचा परिणाम म्हणजे, जिल्हा परिषदेच्या सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांकडे इलाजासाठी येणाऱ्या आदिवासी बांधवांची संख्या रोडावत गेली. दवाखान्यात जाण्यापेक्षा अंथरुणाला खिळून राहणे अनेकांनी पसंत केले. अशा विचित्र परिस्थितीत भगत, बोगस डॉक्टरांनी आदिवासींच्या भाबडेपणा, साधेपणाचा फायदा उठवण्यास सुरुवात केली. तालुक्याच्या काही भागात काविळीचा इलाज सुरू झाला. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून सुरगाणा तालुका ‘हॉटस्पॉट’ झाला.

लोकप्रतिनिधींनी बोगस डॉक्टरांविषयीच्या तक्रारी केल्याने त्यांच्याविरुद्ध आरोग्य यंत्रणेने गुन्हे दाखल केले. एका भगताला कोरोना झाल्याने इतरांनी पळ काढला. आता काय करायचे? असा गंभीर प्रश्‍न तयार झाला असताना सुरगाणा-कळवणचे आमदार नितीन पवार यांनी गृहविलगीकरणात आपल्या बांधवांना आयुर्वेदिक इलाज उपलब्ध करून देण्यासाठी नाशिकमधील वैद्य विक्रांत जाधव यांच्याशी संवाद साधला. मग दोघांनी आयुर्वेदीय उपचार पद्धतीविषयीची माहिती नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपील आहेर यांच्यापुढे मांडली. 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘प्रोटोकॉल’ कायम ठेवून आयूष मान्य आयुर्वेदिक इलाजाची जोड देण्यावर जिल्हा परिषदेने शिक्कामोर्तब केले. सारे जण तालुक्यातील आदिवासी बांधवांशी संवाद साधण्यासाठी तिथे पोचले. त्यावेळी आयुर्वेदिक औषधांची ओळख आदिवासी बांधवांना असून त्यांचा त्यावर विश्‍वास असल्याचे लक्षात आले. शिंदे, मोहपाडा, काठीपाडा इथल्या संवादानंतर आयुर्वेदिक उपचाराला तातडीने सुरुवात करण्याचा निर्णय जाधव यांनी घेतला. या प्रवासात जाधव यांना माजी आमदार जे. पी. गावीत आणि स्थानिक कार्यकर्ते एन. डी. गावीत यांच्याशी झालेल्या चर्चेतून आदिवासींच्या नैसर्गिक जीवनपद्धतीविषयीची माहिती मिळाली होती. डॉ. आहेरांनी तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, फिरते पथक, बैठे पथक, सुरगाणा कोरोना केअर सेंटरमधील डॉक्टरांशी जाधव यांचा ऑनलाइन संवाद घडवला. विशेष म्हणजे, तालुक्यातील सरकारी दवाखान्यात असलेल्या डॉक्टरांपैकी बहुतांश जण आयुर्वेदाचे स्नातक असल्याचे संवादातून पुढे आले. डॉक्टरांनी आदिवासी बांधवांचा आयुर्वेदावर असलेला विश्‍वास स्पष्ट करत कोरोनामुक्तीसाठी आयुर्वेद मदतीचा ठरेल, यावर शिक्कामोर्तब केले. संवादावेळी आयुर्वेदिक उपचाराची नेमकी पद्धत आणि निश्‍चित औषधांचा उपयोग यासाठी ‘टेलीमेडीसीन’ पद्धतीचा अवलंब करण्यास सगळ्याच डॉक्टरांनी अनुकूलता दर्शवली.

दिवस पहिला, १७ मे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातत्याने ‘माझा डॉक्टर’ ही संकल्पना मांडत होते. त्यामुळे हीच संकल्पना वैद्य जाधव यांनी पुढे नेण्याचे ठरवले. ऑनलाइन बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार सरकारी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांप्रमाणे, दवाखान्यात न आलेल्या रुग्णांची डॉक्टरांनी घरी जाऊन चिकित्सा करण्यास सुरुवात केली. नाडी-छाती परीक्षण, आरोग्य तपासणी करून डॉक्टरांनी रुग्णनिहाय आजाराची लक्षणे नोंदवून ठेवण्यास सुरुवात केली. रुग्णांची तपासणी झाल्यावर ऑनलाइन पद्धतीने डॉक्टरांनी वैद्य जाधव यांच्याशी थेट संवाद घडवून आणला. 

सतरा मे २०२१ हा उपक्रमाचा पहिला दिवस होता. डॉक्टरांकडून मिळालेल्या आजाराच्या माहितीनंतर वैद्य जाधव यांनी रुग्णांकडून पुन्हा भूक लागते का? खोकला कसा येतो? शौचाला साफ होते का? ताप कधी आला होता? आता ताप आहे का? काय त्रास होतो? आजाराच्या सुरुवातीला काय समस्या जाणवली? थकवा जाणवतो म्हणजे काय होते? अंघोळ केल्यावर काय त्रास जाणवतो? चालल्यावर कसे वाटते? अशा विविध प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेण्यास सुरुवात केली. ही पद्धत वरवर सोपी वाटत असली, तरीही त्यातून मिळालेले फायदे अनेक आहेत. डॉक्टरांच्या आयुर्वेदीय चिकित्सेचे प्रशिक्षण होत असताना आदिवासी बांधवांमध्ये आत्मविश्‍वास उंचावण्यास झालेल्या मदतीचा त्यात समावेश आहे. संवादानंतर त्याच दिवशी वैद्य जाधव यांच्याकडून सुरगाण्यात उपलब्ध होणारी मोफत आयुर्वेदिक औषधे सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णापर्यंत पोचवली व संध्याकाळपासून इलाजाला सुरुवात होऊ शकली. 

दरम्यान, आदिवासी बांधवांच्या थेट संवादाच्या दिवशी गुजरातमधील रुग्णालयातून एका कोरोनाबाधित ज्येष्ठांना घेऊन त्यांचे नातेवाईक सुरगाणा कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी चालले होते. त्यावेळी त्यांची चिकित्सा उंबराठाण प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्टरांनी आणि वैद्य जाधव यांनी केली. वैद्य जाधव यांनी सोबत आणलेली आयुर्वेदिक औषधे रुग्णाला मोफत दिली. तत्पूर्वी शिंदे गावातील रुग्ण उपचारासाठी दवाखान्यात येत नसल्याची माहिती बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्टरांनी दिल्यावर वैद्य जाधव यांनी त्या डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत आढळलेल्या शारीरिक समस्या आणि त्या रुग्णाची सद्यःस्थिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. त्यानंतर लक्षणांच्या आधारे वैद्य जाधव यांनी मोफत आयुर्वेदिक औषधे डॉक्टरांकडे सोपवली. डॉक्टरांनी ती औषधे रुग्णापर्यंत पोचवली. 

उपक्रमाच्या चौथ्या दिवशी घरात राहिलेल्या आणि दवाखान्यात दाखल असलेल्या दोन्ही रुग्णांची ऑक्सिजनची पातळी वाढू लागल्याची ‘माऊथ पब्लिसिटी’ तालुकाभर झाली. सोशल मीडियातून त्याची माहिती तालुकाभर पोचवण्यात आली. त्याचा परिणाम असा झाला, की आदिवासी बांधवांची पावले उपचारासाठी सरकारी दवाखान्याकडे वळू लागली. रुग्ण आणि डॉक्टरांमधील विश्‍वास वृद्धींगत होण्यास मदत झाली. उपक्रमांतर्गत असलेली ‘टेलीमेडीसीन’ची ‘ओपीडी’ दिवसाला पन्नास रुग्णांपर्यंत पोचली. यात आणखी एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, कोरोनाग्रस्त कुटुंबातील एका सदस्याने आयुर्वेदिक औषधे घेतल्यावर त्याला बरे वाटू लागल्याने कुटुंबातील सारे जण सरकारी दवाखान्यापर्यंत पोचले. डॉक्टरांनी खेड्यापाड्याबरोबरच सुरगाण्यातील सरकारी कोरोना केअर सेंटर आणि डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटरमधील रुग्णांना वैद्य जाधव यांची चिकित्सापद्धत आणि आयुर्वेदीय इलाज पोचवले. 

ऑक्सिजनची पातळी उंचावण्यासोबत रुग्ण ठणठणीत बरे होऊ लागल्याने आता मधुमेह, मणक्यांचे आजार, कुपोषण इत्यादी विषयक इलाज घेण्यास आदिवासी बांधवांचा ओढा वाढत चालला आहे. आयुर्वेदिक उपचार वेळ खाणारे, अधिक काळ चालणारे या समजाला सुरगाणा पॅटर्नमधून एकप्रकारचे उत्तर मिळत आहे. त्याचवेळी लक्षणाच्या आधारे विविध औषधांच्या ‘कॉम्बीनेशन’मधून आदिवासी बांधवांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकल्याचे वैद्य जाधव सांगतात. पावसाच्या तोंडावर सुरगाणा तालुका अशा पद्धतीने कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर पोचला आहे. येत्या काही दिवसांमध्ये आरोग्य यंत्रणेकडून त्यासंबंधीची अधिकृत घोषणा होईल.

यामुळे झाला उद्रेक
पावसाळ्यात खरीप हंगामासाठी आदिवासी बांधव घरी असतात. खरीप आटोपताच आदिवासी बांधव पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्ह्यातील द्राक्षबागांच्या पट्ट्यात आणि गुजरातकडे वळतात. कोरोनाची दुसरी लाट उसळली असताना द्राक्षबागांमध्ये काम आटोपून घरी परतणारे काही आदिवासी बांधव येताना आजार घेऊन आले. त्याचवेळी गुजरातच्या सीमेलगतच्या सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये गुजरातमधून कोरोना पोचला. कोरोना पाय पसरत असताना गुजरातमधील माणसे मरतात ही हाकाटी या आदिवासी बांधवांपर्यंत पोचल्याने त्यांच्यामध्ये भीती बळावली. शिवाय ‘डॉक्टर पॉझिटिव्ह काढतात’ हा गैरसमज झाल्याने वाड्या-पाड्यावर तपासणीसाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना हाकलून लावण्यापासून ते सरकारी दवाखान्यात जायचे नाही अशी खूणगाठ मनाशी बांधत ते घरी थांबले. त्यातून कोरोनाचा उद्रेक झाला.

संबंधित बातम्या