‘हायजिन’चा घेतला वसा...

वैशाली गांधी, नगर
सोमवार, 20 डिसेंबर 2021

दखल    

स्वच्छता-शुद्धतेचा मुद्दा घेऊन अहमदनगरमध्ये काम सुरू केलं - ‘हायजिन फर्स्ट!’ खाद्यपदार्थ शुद्धरीतीने तयार केले जावेत, ते तयार करताना आणि खाण्यासाठी देताना पूर्ण स्वच्छता पाळली जावी, असा आग्रह धरणारा हा उपक्रम. त्यानं आता बाळसं धरलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमधील नगरकर त्यात सहभागी झालेले दिसतात.

‘कोरोना’ महासाथीनं एक महत्त्वाचा धडा आपल्याला शिकवला - स्वच्छता महत्त्वाची. व्यक्तिगत, कौटुंबिक, सार्वजनिक... सगळ्या पातळ्यांवर स्वच्छता पाळलीच पाहिजे. 

आपण एरवी नीटनेटके राहतो. कपडे स्वच्छ, इस्त्री केलेले असतील, केस विंचरलेले आणि चेहरा प्रसन्न असावा ह्याची काळजी घेतो. मग अन्नपदार्थांबाबतच एवढे बेफिकीर का? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. त्यातूनच २०१५मध्ये ‘हायजिन फर्स्ट’चा जन्म झाला. खाद्यपदार्थ तयार करताना-विकताना स्वच्छता हवी, हे पटवून देणं हाच संस्थेचा उद्देश. हातगाडीपासून हॉटेलांपर्यंत स्वच्छता पाळण्याचा आग्रह, त्यासाठी जागृती आणि प्रबोधन. अशा मुद्द्यांवर काम करणारी ही नगरमधील पहिली व एकमेव संस्था. माझ्यासारख्या गृहिणीला हे कसं जमेल, त्यासाठी वेळ देता येईल का, एकदा सुरू केलेलं काम मधेच सोडणार नाही ना? मी हे प्रश्न मलाच विचारले. ‘हेच काम करायचं,’ असा मनाचा कौल मिळाला. पती डॉ. रोहित गांधी, सासूबाई आणि मुलांनी प्रोत्साहन दिलं. पाहता पाहता अनेक जण कामाशी जोडले गेले आणि एक टीमच तयार झाली. विश्वस्त संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली.

‘हायजिन फर्स्ट’नं नेमकं काय केलं? 
अन्नपदार्थ तयार करण्याच्या जागा निर्जंतुक असाव्यात, स्वयंपाकघर, कोठीघरामध्ये (स्टोअर रूम) पाली, झुरळं, उंदीर असणार नाहीत, सडलेल्या अन्नपदार्थांचा, खराब भाजीपाल्याचा वापर पदार्थ तयार करताना होणार नाही, स्वच्छतागृह आणि स्वयंपाकगृह यामध्ये योग्य अंतर असेल, अशा एरवी छोट्या छोट्या वाटणाऱ्या आणि मोठ्या अस्वच्छतेला जन्म देणाऱ्या बाबींकडे आमच्या टीमने लक्ष वेधलं. आपण जे अन्नपदार्थ खातो ते तयार होतात. ह्याबाबत नगरकरांना विचार करायला लावण्याचा प्रयत्न केला.

‘हायजिन फर्स्ट’चा पहिला कार्यक्रम होता मिठाई व्यावसायिकांसाठी एक दिवसाची कार्यशाळा. कार्यशाळेनंतर पाठपुरावा ठेवला. नगरमध्ये गल्लोगल्ली, हरेक चौकात चहाच्या टपऱ्या, वडा-चाटच्या हातगाड्या दिसतात. मिठाईविक्रेते, उपाहारगृहांची संख्याही मोठी आहे. प्रत्येक प्रकारासाठी ‘रोल मॉडेल’ तयार करण्याचं संस्थेनं ठरवलं. आरोग्याचे-स्वच्छतेचे सगळे निकष पूर्ण करतील, अशा निवडक  व्यावसायिकांना प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते ‘हायजिन फर्स्ट अॅप्रिसिएशन अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आलं.

हॉटेलांना स्टार रेटिंग
जनजागृती सातत्याने व्हावी यासाठी कायमस्वरूपी काही करावं असं आम्ही ठरवलं. स्वच्छता पाळणं, आरोग्यपूर्ण सेवा पुरविणं हे व्यावसायिकांना मनापासून वाटलं पाहिजे. हा उपक्रम आमचा न राहता, त्यांना आपलाही वाटला पाहिजे, ह्यासाठी ‘स्टार रेटिंग’ची कल्पना पुढे आली. उपाहारगृहांना ‘हायजिन फर्स्ट - फाइव्ह स्टार’ मानांकन देण्यात आलं. टीमच्या सदस्यांनी वेळोवेळी पाहणी करून हे मानांकन निश्चित केलं. खाद्यपदार्थांच्या व्यवहारात हातगाड्या-स्टॉल हा मोठा घटक आहे. त्यामुळेच ह्या व्यावसायिकांसाठी ‘हायजिन फर्स्ट’ने वेगळी स्पर्धा घेतली - ‘स्वच्छ अन्नपदार्थ पुरवा आणि हमखास बक्षीस मिळवा!’ पंचावन्न व्यावसायिकांनी या स्पर्धेत भाग घेतला. ह्या व्यावसायिकांना कचराकुंड्या; तिथं काम करणाऱ्यांना एप्रन, टोपी असं साहित्य पुरविण्यात आलं. स्वच्छतेचं पालन होतं की नाही, हे ग्राहकांनी कळवावं म्हणून ‘मिस्ड कॉल’ देण्याची सोयही करण्यात आली. ह्या उपक्रमानंतर असं लक्षात आलं की, प्रोफेसर कॉलनी चौकातील व्यावसायिकांनी स्वच्छतेचा वसा कायमचा म्हणून स्वीकारला!

दीर्घ काळ चालणाऱ्या ह्या कामात जागृती करण्यालाही महत्त्व आहे. केवळ व्यावसायिकांना स्वच्छतेचं महत्त्व सांगून चालणार नाही, तर ग्राहकांनाही ते पटलं पाहिजे. त्यासाठी प्रबोधन आवश्यक होतं. त्यामुळे आमच्या टीममधील काही सदस्यांनी शाळांमध्ये, सामाजिक संस्थांमध्ये जाऊन आमच्या कामाची, त्याच्या आवश्यकतेची माहिती पटवून दिली. ह्या उपक्रमात डॉक्टर सहभागी झाले, तर स्वच्छतेचा आग्रह परिणामकारक होईल, हे जाणून आम्ही नगरमधील डॉक्टरांना आवाहन केलं. जवळपास शंभर डॉक्टरांनी ‘हायजिन फर्स्ट’ची प्रबोधनात्मक भित्तीपत्रकं दवाखान्यात लावली.

खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांनीच फक्त स्वच्छता पाळावी, असं आमचं म्हणणं कधीच नव्हतं. स्वच्छता सगळीकडेच हवी. उद्याचे नागरिक, अर्थात छोटी मुलं जिथे जातात, त्या अंगणवाड्यांकडेही म्हणून आम्ही लक्ष केंद्रित केलं. कारण तिथे पोषणआहार दिला जातो. लहान मुलांसाठी तो असल्याने स्वच्छता अधिक कटाक्षानं सांभाळली पाहिजे, हे लक्षात घेऊन नगर तालुक्यातील ५३ अंगणवाड्यांमध्ये काम सुरू केलं.

काम सुरू झालं आणि समाजातील विविध घटकांना त्याचं महत्त्व पटत गेलं. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे ‘हायजिन फर्स्ट’च्या कामाकडे आपणहून वळले. अध्यापनाच्या क्षेत्रात काम करणारे प्रा. गिरीश कुकरेजा त्यात आहेत, तसंच ‘स्वच्छ भारत’ मोहिमेत सक्रियपणे काम करणाऱ्या आश्लेषा भांडारकर आहेत. डॉ. रोहित गांधी, निर्मल गांधी असे व्यावसायिक आपणहून काम करताना दिसतात. सरकारी नोकरी करणारे आदिनाथ बाचकर यांच्यासारखे अन्न-औषध प्रशासनातील अधिकारीही बरोबर आहेत. मनीष बोरा, दीपाली चुत्तर, अनुराधा रेखी, वैशाली मुनोत, मयूर राहिंज, सौरभ सावज बोरा, स्वाती गुंदेचा, सागर शर्मा, वैशाली झंवर, रूपाली बिहाणी, गायत्री रेणावीकर, सिमरन बजाज, सविता कटारिया, ईश्वर कटारिया, मेहेरप्रकाश तिवारी, पीयूष शिंगवी, प्रसाद बेडेकर हेही ‘हायजिन फॅमिली’चे सदस्य आहेत. ह्याशिवाय वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये मदत करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

असे नानाविध क्षेत्रांत काम करणारे आम्ही  लोक स्वच्छतेच्या ध्यासापोटी एकत्र आलो. २०१५पासून हॉटेलं, बेकऱ्या, अनाथाश्रम, अपंग शाळा, अंगणवाड्या, चौकाचौकातील हातगाड्या, वसतिगृहांची स्वयंपाकघरं, घरगुती स्वयंपाकघरांना भेटी दिल्या. खाद्यपदार्थ, अन्न जिथे, जिथे तयार होते अशा सर्व ठिकाणी तिथल्या तिथल्या लोकांना आम्ही भेटलो, त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पुन्हा सांगितलं.

नागरिकांसाठी उपक्रम
आपण स्वच्छ, आरोग्याची काळजी घेऊन तयार केलेले पदार्थ खात आहोत, खाणार आहोत, ह्याबद्दल ग्राहकांनीही जागरूक असावं, असं आम्हाला वाटतं. त्यामुळेच सर्वसामान्यांसाठी हायजिन चित्रकला स्पर्धा, हायजिन लंच बॉक्स, हायजिन दिवाळी फराळ, स्वच्छ अन्नपदार्थ पुरवा हमखास बक्षीस मिळवा, हायजिन निबंध स्पर्धा, महिलांसाठी हायजिन किट, ‘माय लाइफ-माय हायजिन’ लेखन, ‘स्वच्छतेचे दूत बना’, हायजिन लंच-ब्रेक स्पर्धा असे किती तरी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. डॉक्टर, लोकप्रतिनिधी ह्यांच्याशी संवाद साधणारे ‘ग्रेट भेट’सारखे कार्यक्रमही झाले. शालेय विद्यार्थ्यांनी हायजिन संकल्प शपथ घेऊन स्वच्छतेशी आपलं नातं दृढ करण्याचा निर्धार केला.

अधिकाधिक लोकांचा मनापासून सहभाग नसेल, तर ह्या मोहिमेला मर्यादित यश मिळेल, हे लक्षात घेऊन आमचा उपक्रम ‘आपला बनवू’ म्हणून आम्ही नागरिकांना वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन वेळोवेळी करतो. त्याला चांगला प्रतिसादही मिळतो. फेसबुकवर आमचं 'हायजिन फर्स्ट' असं पेज आहे. त्यावर सगळ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली जातेच; शिवाय वेगवेगळ्या पद्धतीने काळजी कशी घ्यावी, ह्याबद्दलही मार्गदर्शन केलं जातं. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मोलाची मदत झाली उद्योजक नरेंद्र फिरोदिया ह्यांची. त्यांच्याच पुढाकाराने ‘वन व्हॉईस’ने सोशल मीडियातून आमचं काम दूरवर पोहोचविलं. डिजिटल माध्यमात स्वतःचा ठसा उमटविलेल्या ‘आय लव्ह नगर’चंही पाठबळ आमच्या टीमला सतत मिळत आलं. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांपर्यंत ह्या उपक्रमाची माहिती गेली, हे मान्यच केलं पाहिजे.

‘हायजिन फर्स्ट’चं काम पाच वर्षं असं निश्चित गतीनं चाललं होतं. पण वर म्हटल्याप्रमाणे कोरोना आला आणि आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात मोठी उलथापालथ झाली. प्रदीर्घ लॉकडाउनमुळे सारेच व्यवहार थंडावले. स्वाभाविकच संस्थेच्या कामावरही परिणाम झाला. लॉकडाउनचे निर्बंध काही काळानंतर शिथिल झाल्यावर पार्सलने खाद्यपदार्थ देणाऱ्या व्यावसायिकांशी आम्ही फेसबुक पेजच्या माध्यमातून संवाद साधत होतोच. स्वच्छतेची काळजी घेणं आता किती अपरिहार्य झालं आहे, हे आम्ही त्यांना पटवून देत होतो.

काही अडचणी
कोणत्याही संस्थेच्या आयुष्यात पाच-सहा वर्षांचा काळ म्हणजे फार मोठा नाही. तथापि, एवढ्या दिवसांत झालेलं कामही लक्षणीय आहे. त्याचा आढावा घेताना अनेक गोष्टी लक्षात आल्या. ‘हायजिन फर्स्ट’चं काम करताना काही अडचणी जाणवतात -
    प्रत्यक्ष काम करताना वेगवेगळ्या ठिकाणी अस्वच्छतेबाबत जे वास्तव समोर येतं, जे पाहायला मिळतं, त्यामुळे काही काळ तरी निराशेची भावना दाटून येते. ह्याबाबत काही व्यावसायिक म्हणतात, की आमच्याकडे खाणारा ग्राहक स्वच्छतेबाबत विचारणा करत नाही; मग तुम्हीच आग्रही का? हा प्रश्न निरुत्तर करतो. त्यामुळे व्यावसायिकांशी बोलल्यावरही प्रत्यक्ष काम सुरू होणं काहीसं कठीण जातं.
    आपण बहुतेक जण मौजमजा करताना, मोठ्या वस्तू घेताना त्याच्या ब्रँडची चौकशी करतो. तो नामांकित आहे का, हे पाहतो. काही ब्रँडबद्दल आपण आग्रही असतो. मग आम्हाला असा प्रश्न पडतो की, पैसे देऊनही आमचा ग्राहकराजा आजार का विकत घेतो? किंवा जेथे जेथे अन्नपदार्थांचा आस्वाद घेतला जातो तेथे स्वच्छतेबाबत विचारणा केली का जात नाही?

अर्थात काम करताना अडचणी येत असतातच. त्यामुळे मी निराश नाही किंवा आमच्या टीमच्या सदस्यांचाही उत्साह कमी झालेला नाही. आपलं नगर ‘हायजिन सिटी’ म्हणून ओळखलं जावं एवढीच इच्छा आहे. नगरचं अनुकरण पूर्ण महाराष्ट्रात व्हावं, असं वाटतं. त्यासाठी एकच विनंती, ‘साथी हाथ बढाना...’

(लेखिका ‘हायजिन फर्स्ट’च्या संस्थापक आहेत.)

शब्दांकन : सतीश स. कुलकर्ण

संबंधित बातम्या