प्रेमाच्या निरागस रंगछटा

अदिती पटवर्धन
सोमवार, 28 जून 2021

नोंद    

ऑटिस्टिक व्यक्तीला जिथं साधा संवाद साधणं, समाजात मिसळणंच अवघड जातं; तिथं ‘खरं प्रेम’ शोधणं किंवा ‘डेटिंग’ करणं ही खूपच पुढची गोष्ट आहे. पण एका रियालिटी शोच्या माध्यमातून हे शक्य होतंय... 

कॅमेऱ्यासमोर रुथ नावाची बावीस वर्षांची ऑस्ट्रेलियन मुलगी बसलीय. तिला कॅमेऱ्यामागून प्रश्न विचारण्यात येतो, “तुझ्या हातात काय आहे?” ती खुदकन हसून तिचा तळहात कॅमेऱ्यासमोर आणते, त्यावर एक अगदी लहानसा साप आहे. “तिचं नाव क्लिओपात्रा आहे!..” उत्साहानं सांगता सांगता ती त्या सापाला कुरवाळायला लागते. कॅमेऱ्यामागून पुढचा प्रश्न येतो, “तुझ्यासाठी आदर्श जोडीदाराची व्याख्या काय?” क्षणभर विचार करून ती म्हणते, “सोनेरी केसांचा असा एक ‘ब्लॉन्डी’, जो माझ्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गुणांसकट मला स्वीकारेल... आणि तो इथे समोरच आहे!” ती पटकन थॉमसला खूण करते आणि कॅमेऱ्यासमोर बोलावून घेते. साधारण २५ वर्षांचा थॉमस त्यांच्या चार वर्षं जुन्या नात्याबद्दल सांगायला लागतो. “रुथची विनोदबुद्धी आणि हुशारी मला खूपच आवडते. आम्ही एकमेकांसाठी पूरक आहोत. ती मसालेदार चिकन टिक्का मसाला आहे आणि मी मात्र आंबटगोड मँगो चिकन आहे.” बोलता बोलता रुथला हळूच डोळा मारतो आणि ते दोघं हसायला लागतात.

गेल्या काही वर्षांपासून प्रेमात असणारे आणि नुकतंच एकत्र राहायला सुरुवात केलेले रुथ आणि थॉमस इतर प्रेमी युगुलांपेक्षा जरासे वेगळे आहेत. फरक एवढाच, की रुथ आणि थॉमस दोघांनाही ‘ऑटिझम स्पेक्ट्रम’ आहे. ऑटिझमचं निदान झालेली एक व्यक्ती कधीच दुसऱ्या ऑटिस्टिक व्यक्तीसारखी नसते. प्रत्येकाची लक्षणं, क्षमता, प्रत्येकासमोरचे प्रश्न-आव्हानं कमालीची वेगवेगळी असतात, म्हणूनच ऑटिझमकडे एक स्पेक्ट्रम म्हणून पाहिलं जातं. वर्णपटावर जशा अनेक रंगछटा उमटतात, तशाच ऑटिझमच्यासुद्धा अनेक छटा!

‘नेटफ्लिक्स’वर उपलब्ध असलेला मूळचा ऑस्ट्रेलियन रियालिटी शो ‘लव्ह ऑन द स्पेक्ट्रम’ अशाच ऑटिझम स्पेक्ट्रमवर असलेल्या काही तरुण-तरुणींचा डेटिंगच्या जगातला प्रवास आपल्याला उलगडून दाखवतो. हल्ली लोकप्रिय असलेल्या डेटिंगविषयीच्या रियालिटी शो प्रकारातला हा शो असला, तरी तो ‘मस्ट वॉच’ ठरतो तो यात भाग घेणाऱ्या तरुण-तरुणींच्या कॅमेऱ्यासमोरच्या निरागस, खऱ्याखुऱ्या आणि निखळ वावरामुळे!

या शोमध्ये सहभागी होणारे सगळे आता वयानं मोठे आहेत, त्यांच्या त्यांच्या सुरक्षित जगात आहेत; तरी स्वतंत्र आहेत, शिकलेले आहेत. आता एका अर्थी प्रत्येकाला शक्य तितकं स्थैर्य मिळाल्यानंतर त्यांना शोध आहे त्या कुणातरी ‘खास’ व्यक्तीचा. यातले सगळेजण अर्थातच रुथ आणि थॉमसइतके सुदैवी नाहीत; त्यांना खरं प्रेम शोधण्यासाठी ‘डेटिंग’ नावाच्या एका अनोळखी, अवघड आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे.

सामान्यतः या देशामध्ये मुलं-मुली १६ ते १८ या वयात डेटिंग सुरू करतात. पण ऑटिझम स्पेक्ट्रम असल्यामुळे ही मुलं आत्तापर्यंत आपापल्या कोशात, एका सुरक्षित वातावरणात राहिलेली आहेत, त्यांना डेटिंगचा अनुभव नाही आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे, ऑटिझममुळे सर्व प्रकारच्या सामाजिक देवाणघेवाणी या मुलांसाठी इतरांच्या तुलनेत जास्त अवघड आहेत. समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर देणं, चेहऱ्यावरचे हावभाव, हातवारे, शारीरभाषा यावरून त्याला काय म्हणायचं आहे, काय वाटतं आहे, याचा अंदाज लावणं, सहजपणे समोरच्या व्यक्तीचा हात हातात घेणं, मिठी मारणं... हे सगळं त्यांना सहजी जमेलच असं नाही. अशा प्रसंगी ती क्वचित गडबडून जातात, कधीकधी त्यांना पुढे काय बोलावं उमगत नाही... डेटिंगमध्ये पाळावे लागणारे बरेच अलिखित नियम त्यांना माहीत नाहीत. उदाहरणार्थ, एखादी नकारात्मक प्रतिक्रिया उत्स्फूर्तपणे पहिल्याच भेटीत समोरच्याला देऊ नये, किंवा पहिल्याच भेटीत “तुला किती मुलं हवी आहेत?” यासारखे वैयक्तिक प्रश्न विचारू नयेत. डेटिंगमध्ये याच सगळ्या गोष्टींना सर्वात जास्त महत्त्व असतं! त्यामुळे या बाबतीत या तरुण तरुणींना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. हा प्रवास त्यांच्यासाठी काहीसा सोपा व्हावा, यासाठी एक डेटिंग कोच त्यांना संभाषण कौशल्य, डेटिंगचे नियम आणि शारीरभाषा कशी वाचावी हे शिकवते.

 केविन, मायकल, क्लोई, मार्क, ऑलिविया, शार्ने, अँड्रयू... प्रत्येकजण वेगळा आहे, कुणाला वाचन आवडतं, कुणाला ओरिगामीचं वेड आहे तर कुणी पियानो उत्तम वाजवतं. कुणाला गप्पा सहज मारता येतात, कुणाला मात्र नजरेला नजरही देता येत नाही. या सगळ्यांच्या ‘खरं प्रेम’ शोधण्यासाठीच्या या प्रवासात आपण आपल्याही नकळत अडकून पडतो. या खऱ्याखुऱ्या शंभर नंबरी व्यक्तींना त्यांचे जोडीदार लवकर मिळावेत म्हणून आपणही घडणारी प्रत्येक डेट उत्सुकतेनं पाहत राहतो.

डेटिंगचं जग तुमच्या-माझ्यासारख्या ‘न्यूरोटिपिकल’ माणसांसाठीच इतकं अवघड आणि अनाकलनीय असतं; तर ते एखाद्या ऑटिझम स्पेक्ट्रमवरच्या व्यक्तीसाठी किती अवघड असेल, याची थोडी का होईना कल्पना आपल्याला ‘लव्ह ऑन द स्पेक्ट्रम’ पाहून येते. खरं प्रेम शोधण्याचे, कुणासोबत तरी आयुष्य वाटून घेण्याचे त्यांचे खरे, निखळ आणि निरागस प्रयत्न पाहिले की वाटून जातं, खरंतर हे सगळेच त्यासाठी अगदी १०० टक्के, कदाचित अधिकच, पात्र आहेत. त्यांच्यातला खरेपणा, निरागसपणा, सहजपणे मनात आहे ते सांगून टाकता येणं हे प्रेमाच्या आणि डेटिंगच्या जगात किती दुर्मीळ आहे!

या कार्यक्रमात या मुला-मुलींसमोरची डेटिंगच्या विश्वातली आव्हानं दाखवलेली असली, तरी हा कार्यक्रम बघताना प्रामुख्यानं जाणवत राहतो तो या मुला-मुलींच्या चेहेऱ्यावरचा आनंद आणि उत्साह! कितीही आव्हानं असली, तरी त्यांना सामोरं जायला ही पोरं तयार आहेत आणि तेही हसत हसत. या मुलांच्या घरातले, त्यांच्या कुटुंबांसोबतचे हलकेफुलके क्षणसुद्धा त्यामुळेच लक्षात राहतात. ऑटिझम असलेल्या व्यक्ती, त्यांची कुटुंबंसुद्धा आनंदानं राहू शकतात, कितीही प्रश्न असले तरी ते एकत्र येऊन सोडवायला ते कायम तयार असतात, याची जाणीव होत राहते. रियालिटी शोची घिसीपिटी चौकट मोडीत काढत आणि वठवल्या जाणाऱ्या ‘स्क्रिप्टेड’ प्रसंगांना फाटा देत या मुलांच्या मनात डोकावण्याची संधी आपल्याला हा कार्यक्रम देतो. या मुलांपुढे असलेल्या आव्हानांमध्ये सगळ्यात मोठं आव्हान काय असेल, तर ते इतर ‘न्यूरोटिपिकल’ माणसांनी त्यांच्याकडे सतत ते कुणीतरी ‘वेगळे’ आहेत म्हणून पाहणं, जाणूनबुजून त्यांना दूर ठेवणं आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्नच न करणं. अशावेळी या कार्यक्रमामध्ये ऑटिझम असलेल्या व्यक्तींची आयुष्य ‘ऑटिस्टिक माणूस’ म्हणून न दाखवता फक्त ‘माणूस’ म्हणून उलगडून दाखवण्याचा केलेला प्रयत्न पाहून खरंच चांगलं वाटतं. दृकश्राव्य माध्यमातून ते अतिशय प्रभावीपणे साधता येतं, हे त्या माध्यमाचं वैशिष्ट्य. 

आज ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे जगभरात तयार होणारे वेगवेगळे चित्रपट, सीरिज, कॉमेडी शो आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. अशा प्रकारच्या वेगळे विषय हाताळणाऱ्या कथांमुळे आपलं समाजमन अधिक प्रगल्भ होण्यात थोडा का होईना हातभार लागू शकेल, असं वाटतं!

संबंधित बातम्या