पुनर्मिलन..!

अनिल खैरे
सोमवार, 21 जून 2021

नोंद    

आई बिबट्या आणि तिच्या पिल्लांची पुनर्भेट घडवून आणण्याचा अनुभव वेगळाच होता, तोही एकाच महिन्यात दोनदा!

३ मार्च २०२०. अगदी भल्या सकाळीच माझा मोबाईल खणखणला. अशा वेळी फोन म्हणजे इमर्जन्सीच असणार. मावळचे वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले फोनवर होते. त्यांनी जे सांगितले त्याचा साधारण सारांश असा, देहू रोड जवळच्या सांगवडे गावातल्या एका उसाच्या शेतात तोडणी सुरू असताना एका ठिकाणी कामगारांना कसलातरी आवाज आल्यासारखा वाटला. आधी कधीच न ऐकलेल्या त्या आवाजाचा मागोवा घेताना आडव्या पडलेल्या उसाच्या कांड्याच्या मधोमध एका आडोशात त्यांना दोन पिल्ले दिसली. ती पिल्ले रान मांजरांची किंवा बिबट्याची असावी असा कयास बांधून शेताच्या मालकाने ताबडतोब सरपंचांशी संपर्क साधला; सरपंचांनी वनविभागाच्या अधिका‌‍ऱ्यांना कळवले. ही कथा सांगितल्यावर ताकवले यांनी त्या पिल्लांचे फोटोही मला व्हॉट्‌सॲपवर पाठवले. 

अशी इमर्जन्सी समोर आल्यावर तिला रिस्पॉन्स देण्यासाठी आम्ही वनविभागाच्या मदतीने स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम -एसओपी -तयार केली आहे. अशा वेळी प्रत्येकाने एक विशिष्ट प्रोटोकॉल पाळणे आवश्यक असते. त्यानुसार आमची टीम लगेच कामाला लागते. भूल देण्याची यंत्रणा, औषधे, संपर्कासाठी वॉकीटॉकी सेट्स, दिवसा आणि रात्रीही वापरता येतील अशा दुर्बिणी, ट्रॅप कॅमेरा, गोप्रो कॅमेरा आणि झूम लेन्सचा कॅमेरा असे महत्त्वाचे साहित्य केवळ तीन चार मिनिटांमध्ये रेस्क्यू व्हॅनमध्ये लोड करून  आमची गाडी सायरन चालू करून झेपावते, कारण कुठल्याही रेस्क्यू ऑपरेशनसाठी ‘गोल्डन अवर’ मधला रिस्पॉन्स महत्त्वाचा ठरतो.

त्या दिवशी सूर्योदयाच्या सुमारास सांगवड्याला पोहोचलो. सहायक वनसंरक्षक संजय मारणेही तिथे पोचले होते. वेळ न घालवता आम्ही त्या पिल्लांची तपासणी केली. पिल्लं साधारण तीन आठवड्यांपेक्षा थोडी मोठी असावीत. दोघांचेही वजन अर्धा किलोच्या आसपास होते. एकंदर परिस्थिती पाहता पिल्लांचे संगोपन कृत्रिम वातावरणात करण्याऐवजी त्यांची आईच त्यांना घेऊन जाते का त्याची चाचपणी करावी असे आम्हाला सगळ्यांनाच मनापासून वाटले. अशा प्रसंगांमध्ये वनअधिका‌‍ऱ्यांचेही पहिले प्रयत्न असेच असतात.

दरम्यानच्या काळात आम्ही त्या पिल्लांना शेतमालक सचिन राक्षे यांच्या घराजवळच्या सुरक्षित जागेत हलवलं होतं. तिथे एका खोलीत थोडा अंधार करून, पंखेबिंखे लावून एका बॉक्समध्ये त्या दोघींनाही -त्या दोन्ही माद्या होत्या -ठेवून आम्ही त्यांच्या फिडींगच्या तयारीला लागलो. कोमट पाण्यात मिसळलेलं शेळीचं दूध त्यांनी फारसा वेळ न दवडता पिऊन घेतलं आणि त्या अंधाऱ्या खोलीतल्या बॉक्समध्ये दोघीही शांतपणे झोपून गेल्या. त्यांनी दूध घेतल्यावरच खरंतर आमच्या जिवात जीव आला होता. दिवसभरात एकूण चार वेळा आम्ही त्यांचे फीडिंग करून घेतले.

सूर्यास्ताच्या वेळेला आमचं ‘ऑपरेशन रियुनियन’ सुरू झालं. सकाळी ही पिल्लं जिथे सापडली होती तिथेच आम्ही पुन्हा त्यांना घेऊन गेलो. एका बास्केटमध्ये व्यवस्थित अंथरूण पसरवून पिल्लांना त्यामध्ये अलगद ठेवून दिले. तिथेच एका उसाच्या कांडावर कॅमेरा ट्रॅप सेट केला. आमची ही तयारी सुरू असतानाच आमच्याच एका सहकाऱ्याला बाजूला थोड्या अंतरावर उसाची हालचाल जाणवली. त्यानी आम्हाला सावध केले. कदाचित पिलांची आई दाट उसाआडून आमची कसरत न्याहाळत होती की काय कोण जाणे... मग मात्र अवघ्या एक दीड मिनिटात सगळ्या तयारीवर नजर टाकून आम्ही तिथून बाहेर पडलो. मायलेकांची पुनर्भेट घडवणाऱ्या ‘ऑपरेशन रियुनियन’साठी ते आवश्यक होतं. तोपर्यंत अंधारही पडायला सुरुवात झाली होती. मारणे साहेबांनी शेताच्या मालकाला आणि कामगारांनाही तिथून बाहेर पडण्यास सांगितले, पाण्याच्या मोटारी बंद केल्या, वाहनं बाहेर काढली, जेणेकरून त्या आईला आपल्या पिल्लांपर्यंत पोचताना आणि त्यांना घेऊन जाताना असुरक्षित वाटू नये. एका अर्थाने आम्ही तिच्यासाठी सेफ कॉरिडॉर तयार करून दिला होता. 

दुसऱ्या दिवशी सकाळी मारणे 

साहेबांनी आम्हाला अपेक्षित गुड न्यूज दिली. बिबट्याची मादी तिच्या दोन्ही पिल्लांना रात्रीतून अन्य कुठेतरी घेऊन गेली होती.

त्यानंतर २६ मार्च २०२०. देहू रोड जवळच्याच दारुंब्रे नावाच्या गावात अशाच उसाच्या शेतात बिबट्यांच्या पिल्लांची आणखी एक जोडगोळी सापडली. पुन्हा इमर्जन्सी, सायरन, रेस्क्यू व्हॅन सर्व काही आधीसारखेच! वन्यप्रेमी स्वयंसेवक आणि वनअधिका‌‍ऱ्यांच्या मदतीने पिल्लांचा शोध घेतला. दूध पाजायचा कार्यक्रम उरकून सूर्यास्तापर्यंत वाट पाहिली. सूर्यास्तानंतर कामाला सुरुवात केली. जवळच्या शेतातील मादीचे गुरगुरणे ऐकू आल्यावर आम्ही चिडीचूप होऊन पिल्लांना व्यवस्थित ठेवून तेथून बाहेर पडलो आणि मध्यरात्रीपूर्वीच त्या मातेने तिच्या पिल्लांचा ताबा घेतला आणि गायब झाली. या वेळी सापडलेल्या पिल्लांमध्ये एक नर होता आणि दुसरी मादी! 

एकाच महिन्यात या दोन पुनर्भेटींचा अनुभव आमच्यासाठीही वेगळा होता. खरं म्हणजे वन्यजीवक्षेत्रातला प्रत्येक अनुभव हा आधीच्या कोणत्याही अनुभवापेक्षा वेगळा आणि नवाच असतो आणि काहीतरी नवे शिकवून जात असतो.

 

संबंधित बातम्या