भ्रमणमार्ग  जंगलांची जीवनवाहिनी...

अनुज सुरेश खरे
गुरुवार, 21 जुलै 2022

एखाद्या युवा वाघाला नवीन ‘घर’ शोधताना दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी सुरक्षित भ्रमणमार्गाची, कॉरिडॉरची गरज असते. हे सुरक्षित मार्ग संपत चालले आहेत हा वाघांपुढे असलेला अजून एक मोठा धोका. अनेक निसर्ग अभ्यासकांच्या मते वाघ वाचवण्याच्या आणि पर्यायाने जंगल वाचवण्याच्या क्रियेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाघांच्या पांगण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले भ्रमणमार्ग सुरक्षित करणे.

ताडोबातील कोळसा भागात असणाऱ्या जुन्या विश्रामगृहाच्या समोर असणाऱ्या तळ्याच्या काठावर बसून विचार करताना अनेकदा माझं भान हरपतं. तळ्याच्या काठावरून समोरच्या बाजूला असलेल्या पाण्यावर एक हरणांचा कळप आणि दहा गवे पाणी प्यायला आले होते. पाणी पितानाही कमालीची दक्षता बाळगणाऱ्या हरणांच्या चौकसपणाचं मला कौतुक वाटलं. गवे मात्र आपल्याच मस्तीत होते. इतर मंडळी आपल्याच गुर्मीत असली तरीही गव्यांच्या म्होरक्या चहूबाजूला लक्ष ठेऊन होता. अचानक चितळांच्या कळपाच्या म्होरक्या नराने कान टवकारले. टक लाऊन तो माझ्या समोर असलेल्या झुडपाकडे बघायला लागला. समोरच्या झुडपात काहीतरी हलल्यासारखं मला जाणवलं. पण याउपर कोणतीही हालचाल, मी अगदी डोळे फाडून बघत होतो, तरी मला दिसली नाही. एखादा आवाज येतो का हे टिपण्यासाठी मी कानात प्राण आणले होते. पण काहीही दिसत नव्हतं, ऐकू येत नव्हतं. आता गवेही सावध झाले होते. नक्की वाघ किंवा बिबट्या यांची उपस्थिती या दोघांनीही टिपली होती. बहुधा वाघच असावा असं गव्यांच्या एकंदर हालचालींवरून वाटत होतं. जितकं कौतुक मला चितळ आणि गव्यांचं वाटत होतं तितकंच किंबहुना काकणभर जास्त वाघाचं वाटत होतं. त्याचा सुगावा या दोघांनाही लागला होता पण अजूनही त्याची अचूक जागा त्यांना कळली नव्हती. त्याने ती कळूही दिली नव्हती. आणि याचंच मला कौतुक वाटलं. इतका अजस्त्र देह, चारएकशे पौंडाचं तरी वजन भरेल अशी देहयष्टी. पण तरीही आपलं अस्तित्व तो बऱ्याच प्रमाणात लपवून ठेऊन होता.

माझ्या विचारांचे रूळ सटासट बदलत होते. वाघ. आपल्या निसर्ग चक्रातला अत्यंत महत्त्वाचा प्राणी. निसर्गात अनन्यसाधारण स्थान असलेल्या या प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आल्यावर आपण ‘वाघ वाचावा’ मोहीम हाती घेतली. काही प्रमाणात त्यात यशस्वीही झालो असं वाघांच्या संख्येचे वाढलेले आकडे सांगतात. पण ही संख्या आज आपण टिकवून ठेऊ शकतो का? हा आपल्यापुढचा यक्षप्रश्न आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे निसर्गाचा होणारा ऱ्हास आणि जंगलभागाचं घटणारं प्रमाण. वाघच का वाचवायचे? असंही बऱ्याचदा विचारलं जातं. इतर प्राण्यांना जंगलाच्या  दृष्टीने महत्त्व आहे की नाही? याचं उत्तर खरंतर सोप्पं आहे. अन्नसाखळीत आणि निसर्गचक्रात अत्युच्च स्थानावर असलेल्या या प्राण्याला पुरेसं संरक्षण मिळालं की आपोआपच निसर्गातील इतर घटक वाचतात. वाघाचं अस्तित्वच मुळी जंगलातील आणि अन्नसाखळीतील इतर घटकांवर अवलंबून असल्यामुळे या घटकांना संरक्षण मिळाल्याशिवाय आपल्याला वाघ वाचवता येत नाहीत. त्यामुळे आपले सगळे प्रयत्न वाघ वाचवण्याच्या सभोवती फिरतात.

वाघांना असणारा सर्वात मोठा धोका म्हणजे नैसर्गिक अधिवास नष्ट होण्याचा. मुळात वाघ हा स्वतःची हद्द ठरवून एकट्याने राहणारा प्राणी आहे. सिंहांसारखा तो कळपाने राहत नाही. पिल्लं सुमारे दोन ते अडीच वर्षे आईबरोबर असतात. हा कालावधी त्यांचा ‘वाघ’ होण्याचा असतो. आईपासून अनेक गोष्टी शिकून पिल्लं आईपासून बाजूला होतात अथवा आई त्यांना बाजूला करते. असे युवा वाघ पांगले की अर्थातच त्यांना स्वतःची हद्द निर्माण करण्याची गरज आणि जिद्द असते. असे हे युवा वाघ अनुरूप जंगलाच्या शोधार्थ काहीशे किलोमीटरचा प्रवासही करतात. अशा एखाद्या युवा वाघाला आपले नवीन ‘घर’ शोधताना दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी सुरक्षित मार्गाची गरज असते. या सुरक्षित मार्गांना ‘कॉरिडॉर’ म्हणतात. हे मार्ग संपत चालले आहेत हा वाघांपुढे असलेला अजून एक मोठा धोका. भारत हा विकसनशील देश आहे. त्यामुळे साहजिकच पायाभूत सुविधांच्या विकासाकडे आपले जास्त लक्ष आहे. याचाच भाग म्हणून वेगवेगळे प्रकल्प,रस्ते, महामार्ग निर्मितीकडे आपण लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमीन. वनक्षेत्रांसाठी उपयुक्त अशी मोकळी जमीन कमी होणे हा वाघांना असलेला मोठा धोका आहे. ज्येष्ठ व्याघ्र अभ्यासक डॉ. राजेश गोपाल यांनी आपल्या ‘डायनॅमिक्स ऑफ टायगर मॅनेजमेंट’ ह्या पुस्तकात दिलेल्या आकडेवारीनुसार वेगवेगळ्या कारणांस्तव २०१३पर्यंत ११,५५९ चौ. किमीची जमीन जंगलांपासून आणि त्यातील असंख्य जीवांपासून आपण जणू हिरावूनच घेतलेली आहे. विकासाचा विचार करत असताना निसर्गाला धक्का न लावता केलेला विकास हाच खरा शाश्वत विकास आहे.

यावर शासन काही उपाय करत आहे की नाही? महाराष्ट्रातल्या अनेक निसर्ग अभ्यासकांच्या मते वाघ वाचवण्याच्या आणि पर्यायाने जंगल वाचवण्याच्या क्रियेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाघांच्या पांगण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले भ्रमणमार्ग सुरक्षित करणे. या दृष्टीने महाराष्ट्र राज्य वनविभागाने गेल्या काही वर्षात अतिशय महत्त्वाची पावलं उचलायला सुरुवात केली आहे. भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करणारे किंवा त्यांच्या सुरक्षेचा आराखडा आखून त्यावर मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. हे भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी घेतलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे नव्या संवर्धन राखीव क्षेत्रांची घोषणा. 

महाराष्ट्रात ५२ वन्यजीव अभयारण्ये आणि सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यापैकी ताडोबा-अंधारी, मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा आणि बोर हे व्याघ्र प्रकल्प विदर्भात आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील वाघांच्या एकूण संख्येचा विचार केला तर २०१० साली महाराष्ट्रात सुमारे १६८ वाघ होते, २०१४मध्ये ही संख्या सुमारे १९० वर पोहोचली. उत्तम उपाययोजना आणि संरक्षण यामुळे २०१८मध्ये संख्या आणखी वाढून सुमारे ३१२ वर पोहोचली. २०२०च्या अहवालानुसार महाराष्ट्रात सुमारे ३५० वाघ आहेत. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्राच्या एकूण व्याघ्र संख्येच्या ९५ टक्क्यांहून अधिक वाघ विदर्भात आहेत. इथेच आपल्यासमोर असणाऱ्या पुढील समस्येचे मूळ आहे. वाघ हा स्वतःची हद्द ठरवून एकट्याने राहणारा प्राणी असल्यामुळे कधीतरी विदर्भ आणि आसपासच्या प्रदेशातील जंगलांची वाघ सामावून घेण्याची क्षमता संपेल. आणि यातून मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होईल. यासाठी वाघांना एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुरक्षित भ्रमणमार्गांचे महत्त्व अधोरेखित होते.

याच दृष्टीने महाराष्ट्र वनविभागाने केलेली नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांची घोषणा महत्त्वाची आहे. २०२०-२१ साली आपण तिलारी, चंदगड, दोडामार्ग-आंबोली, आजरा-भुदरगड, गगनबावडा, पन्हाळगड, विशाळगड, जोर-जांभळी, मायनी, मुनिया, महेंद्री या नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांची घोषणा केली. तर आत्ता जून २०२२मध्ये चिवटीबारी, अलालदरी, कळवण, मुरागड, रायगड, रोहा, भोर, दरे खुर्द (महादरे), मसाई पठार, मोगरकसा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या संवर्धन राखीव क्षेत्रांची घोषणा केली. या संवर्धन राखीव क्षेत्रांच्या घोषणेमागे वाघांचे भ्रमणमार्ग संरक्षित करणे हे तर उद्दिष्ट आहेच, पण याशिवाय इतर छोट्या जिवांना संरक्षण देणे हेही उद्दिष्ट आहे. उदाहरणार्थ, तळकोकणातील तिलारी आणि दोडामार्ग-आंबोली या संवर्धन राखीव क्षेत्रांमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून गोवा मार्गे कर्नाटक असा वाघांचा भ्रमणमार्ग तर सुरक्षित झालाच. पण त्याबरोबर अंबोलीत आढळून येणाऱ्या सरपटणाऱ्या तसेच उभयचर प्राण्यांच्या अनेक प्रजातींनाही अधिक सुरक्षा मिळाली. याशिवाय आणखी १८ वनक्षेत्रांना संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा मिळणे प्रस्तावित आहे.

या सर्व वनक्षेत्रांना थेट वन्यजीव अभयारण्यांचा दर्जा देणे शक्य होते. पण संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देणे ही पहिली पायरी म्हणता येईल. त्यानंतर या क्षेत्रांचा अभ्यास करून, त्यात काही गावांचा समावेश असल्यास त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे पुनर्वसन करणे आणि मग त्याला अभयारण्याचा दर्जा देणे ही खूप मोठी प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई-भवानी या पूर्वी संवर्धन राखीव क्षेत्र असणाऱ्या वनक्षेत्राला आपण आत्ता जून २०२२मध्ये वन्यजीव अभयारण्याचा दर्जा दिला. या वन्यजीव अभयारण्यात असलेल्या वाघांच्या चांगल्या संख्येमुळे या अभयारण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण अगोदर संवर्धन राखीव क्षेत्र आणि आता अभयारण्य अशी मार्गक्रमणा केल्यामुळे या वनक्षेत्राचे व्यवस्थापन अधिक सुरळीत झाले.

वाघांचे आश्रयस्थान असण्याची क्षमता असलेली अनेक चांगली वनक्षेत्रे महाराष्ट्रात आहेत. ती ओळखून त्यांना संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा दिल्यामुळे वाघांचे भ्रमणमार्ग सुरक्षित झाले,  इतर वन्यजीवांच्या संरक्षणात वाढ झाली. हे भ्रमणमार्ग का वाचले पाहिजेत याचे आपण आणखी एक उदाहरण पाहूया. भ्रमणमार्गांचा अभ्यास करण्यासाठी २०१९मध्ये टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातील ‘टी-१-सी-१’ ऊर्फ ‘वॉकर’ या वाघाला रेडिओ कॉलर लावण्यात आली होती. त्याने आपली हद्द प्रस्थापित करण्यासाठी थेट बुलडाणा जिल्ह्यातील ‘ज्ञानगंगा अभयारण्य’ गाठले. यासाठी त्याने सुमारे १,४७५ किमीचा प्रवास केला होता. त्यानंतर त्याने पुन्हा टिपेश्वरच्या दिशेने प्रवास केला. त्याच्या गळ्यातील रेडिओ कॉलरची बॅटरी संपण्यापूर्वी त्याने एकूण सुमारे ३,०१७ किमीचा प्रवास केला होता. या वाघाच्या हालचालींचा अभ्यास करताना वनविभागाला आणखी एका वाघाने केलेला प्रवास शोधण्यात यश आले. या ‘वॉकर-१’च्या भ्रमणमार्गाने प्रवास करून पांढरकवडा प्रादेशिक जंगलातला एक वाघ औरंगाबादजवळील गौताळा अभयारण्यात येऊन पोहोचला. या ‘वॉकर-२’ने केलेल्या प्रवासावरून टिपेश्वर-पैनगंगा-ज्ञानगंगा-काटेपूर्णा-गौताळा या भ्रमणमार्गाचे अस्तित्व आणि महत्त्व अधोरेखित झाले आहे. या दोन्ही वाघांच्या प्रवासाच्या पद्धतीवरून असे लक्षात आले की त्यांनी मानवी वस्तीच्या जवळून प्रवास केला. पण मानवसंपर्कात येणे टाळले. म्हणजेच त्यांना अधिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी संवर्धन राखीव क्षेत्रांची संख्या वाढवायला हवी.

***

माझ्या उजव्या बाजूला तळ्याकाठी असलेल्या गवताचा थोडासा भाग हलला आणि माझ्या विचारांची तंद्री भंगली. एवढ्या वेळात नानाविध विचार माझ्या मनात येऊन गेले होते. इकडे चितळांच्या कळपाला सुगावा लागू न देता वाघाने आपली जागा बदलली आणि अचानक झेप घेऊन ठरवलेल्या लक्ष्याचा पाठलाग धरला. चितळांच्या कळपात हलकल्लोळ माजला. ती विखुरली. वाघाने ठरवलेल्या चितळाला कळपापासून वेगळं काढलंच. या अतिशय हुशार, डौलदार आणि राजबिंड्या जनावराला वाचवण्याचं महत्त्व माझ्या मनात अधिक ठळक झालं. पर्यायाने त्याचा नैसर्गिक अधिवास असणारी वनक्षेत्रे आणि या जंगलांची जीवनवाहिनी असणारे भ्रमणमार्ग वाचवणे का महत्त्वाचे हेही मनाला पुन्हा पटले आणि मी वाघाने केलेल्या शिकारीचे दृश्य नजरेने अधाशासारखं पिऊन घ्यायला लागलो.

(लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.)
(शब्दांकनः ओंकार पांडुरंग बापट)

 

संबंधित बातम्या