वराह-हृदयाचे वरदान...

डॉ. अनिल लचके
सोमवार, 7 मार्च 2022

नोंद 

हृदयाच्या पेशी कमकुवत झाल्यामुळे डेव्हिड बेनेट मरणासन्न झालेला होता. डॉक्टरांनी या व्याधीचे निदान ‘अऱ्हिथमिया’ असे केले होते. डेव्हिडला व्याधीमुक्त करण्यासाठी कोणतीही प्रचलित उपचार पद्धती कुचकामी ठरली असती. अशावेळी अमेरिकेतील बाल्टिमोर शहरात युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडमधील डॉक्टरांच्या एका टीमने डेव्हिडसाठी डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण करण्याचे ठरवले आणि हा प्रयोग यशस्वीही झाला. 

जीवशास्त्रात सातत्याने अभिनव संशोधन होत असते. साहजिकच नवनवीन उपयुक्त माहिती पुढे येत असते. त्याला अनुसरून वैद्यकशास्त्रातील उपचार पद्धती कालानुरूप बदलत चालली आहे. रुग्णांचे काही अवयव किंवा इंद्रिये निकामी झाली, तर त्या जागी निदान कामचलावू यंत्रणा बसवता येणे शक्य झाले आहे. वाहनांचे किंवा एखाद्या उपकरणाचे बिघडलेले स्पेअर पार्ट बाजारात जसे विकत मिळतात, तसे भविष्यामध्ये शरीराच्या आतील इंद्रियेदेखील मिळू शकतील. तंत्रज्ञान इतपत सुधारले आहे. कृत्रिम हात-पाय, ऐकण्यासाठी ‘हिअरिंग एड’, कृत्रिम दात, रक्त, त्वचा, गुडघा, स्वादुपिंड, डोळ्यातील कृत्रिम भिंग (लेन्स), हृदयाचे ठोके सांभाळणारे पेस मेकर असे अनेक पर्याय आता मिळू शकतात. एवढेच नव्हे तर सतत संशोधन केल्यामुळे या कृत्रिम अवयवांमध्ये गुणात्मक बदलही होऊ लागलेले आहेत. हृदयाचे ठोके नियमित करणारा पेस मेकर पूर्वी जड आणि काडेपेटी एवढा असे. आता तो शेंगदाण्याएवढा लहान झाला आहे, कारण खास संशोधन केलेल्या मिश्रधातूंनी तो तयार करतात. कृत्रिम स्वादुपिंड म्हणजे एक पंप आहे. तो रक्तातील साखरेचे प्रमाण ओळखून आवश्यक तेवढेच इन्सुलिन थेट रक्तात मिसळतो. कृत्रिम हात आणि पाय आता खूप कार्यक्षम झाले आहेत. काही रुग्णांच्या हृदयातील झडपा कमकुवत झालेल्या असतात. त्या तयार करण्यासाठी उच्च दर्जाचे टिकाऊ मटेरियल शोधून काढलेले आहे आणि त्याची चाचणी सुरू आहे.          

कृत्रिम अवयव आणि इंद्रिये घडवताना काही बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. उदाहरणार्थ, त्याची जडणघडण करताना वापरलेली रसायने, किंवा मटेरियल हे जैव-अनुकूल, म्हणजे ‘बायो कॉम्पॅटेबल’ किंवा स्थिर असणे गरजेचे आहे. जैव-अनुकूल पदार्थाचा शरीरावर अनिष्ट परिणाम होत नाही. असे मटेरियल घडवणे हीच गोष्ट संशोधकांना आव्हान देणारी असते. कारण कृत्रिम इंद्रिय शरीराने स्वीकारले पाहिजे. 

शरीरात आलेल्या नवीन ‘मटेरियल’ला शरीर ‘अनोळखी पाहुणा’ किंवा ‘फॉरेन-बॉडी’ म्हणून ओळखत असते. त्यामुळे शरीर नवीन पाहुण्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करते. यावर उपाय म्हणजे योग्य त्या प्राण्याचा एखादा अवयव किंवा इंद्रिय गरजू रुग्णासाठी वापरता येईल का, याचा मागोवा घेणे. यामध्ये सर्वात अवघड आणि महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णाच्या शरीराने प्राण्याच्या पेशींना सामावून घ्यायला पाहिजे. विशिष्ट रक्तगटाचेच रक्त विशिष्ट रुग्णासाठी चालते, हे आपल्याला माहिती आहे. त्याच प्रमाणे कृत्रिम इंद्रिय किंवा एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे इंद्रिय, पेशी, द्रवपदार्थ गरजू व्यक्तीच्या शरीराने स्वीकारले पाहिजे किंवा ‘मॅच’ व्हायला पाहिजे. हे सहजासहजी जमत नाही. पण हे तंत्र साध्य झाले तर रुग्णांसाठी त्याचा लाभ घेता येईल. त्यादृष्टीनेदेखील प्रयोग सुरू असतात. माणसाचे एखादे इंद्रिय गरजू रुग्णांसाठी वापरता येणे शक्य असेल तर शस्त्रक्रिया करून ते योग्य जागी प्रत्यारोपित केले किंवा ‘बसवले’ जाते. प्राण्यांमधील पेशी, ऊती (टिश्यू), अवयव किंवा इंद्रियाचे प्रत्यारोपण मानव प्राण्यासाठी (गरजू रुग्णासाठी) प्रत्यारोपित केले जाते, तेव्हा त्या तंत्रज्ञानाला ‘झेनोट्रान्सप्लॅन्टेशन’ म्हणतात.                    

गरजूंसाठी यकृत किंवा मूत्रपिंडाचे दान करणाऱ्या व्यक्ती मिळू शकतात, पण त्यांची संख्या मागणीपेक्षा खूपच कमी आहे. या पार्श्वभूमीवर हृदय-दान करणारी व्यक्ती मिळवणे तर अशक्यप्रायच आहे! यासाठी प्राण्यांच्या अवयवांचे प्रत्यारोपण करता आले तर रुग्णाचा जीव वाचवता येईल, या संकल्पनेने मूळ धरले. अर्थात यामध्ये बरेच धोके आणि अडथळे आहेत. प्राण्यांमधील अवयवात विषाणू दडलेला असू शकतो. काही काळाने तो वाढू शकतो. त्या विषाणूचा संसर्ग रुग्णाला आणि आजूबाजूच्या निरोगी माणसांना धोकादायक ठरू शकतो. तथापि, नव्या संशोधन पद्धतीत ज्या प्राण्याचा अवयव मानवासाठी वापरायचा असेल तो प्राणी अत्यंत स्वच्छ जागेत आणि नियंत्रित जागी वाढवला जातो. याला ‘बायो-सील्ड एरिया’ म्हणतात. असा एक प्रयोग नुकताच करण्यात आला.    

डेव्हिड बेनेट नावाच्या एका ५७ वर्षांच्या रुग्णाच्या हृदयाचे ठोके  कमालीचे अनियमित होते. हृदयाच्या पेशी कमकुवत झाल्यामुळे डेव्हिड मरणासन्न झालेला होता. डॉक्टरांनी या व्याधीचे निदान ‘अऱ्हिथमिया’ असे केले होते. डेव्हिडला व्याधीमुक्त करण्यासाठी कोणतीही प्रचलित उपचार पद्धती कुचकामी ठरली असती. अशावेळी अमेरिकेतील बाल्टिमोर शहरात युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडमधील डॉक्टरांच्या एका  टीमने डेव्हिडसाठी डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण करण्याचे ठरवले. यासाठी अमेरिकेच्या एफडीए (फूड ॲण्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन) संस्थेची अनुमती लागते. एफडीए संस्थेने आपत्कालीन उपचार म्हणून तात्पुरती सवलत देऊन काही अटींवर डॉक्टरांना ३१ डिसेंबर २०२१ रोजी अनुमती दिली. त्यामुळे ७ जानेवारी २०२२ रोजी मानवासाठी प्रथमच प्राण्याच्या हृदयाचे प्रत्यारोपण करण्यात आले. 

एखाद्या मरणासन्न रुग्णासाठी हृदयासारख्या इंद्रियांची गरज पडली तर डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण चालू शकेल असे काही संशोधकांना वाटले. त्याचे कारण डुकराच्या आणि माणसाच्या हृदयाचा आकार आणि रचना साधारण सारखी असते. हे लक्षात घेऊन काही संस्थांमध्ये वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना हृदयासंबंधीचे शिक्षण देताना डुकराच्या हृदयाचा वापर केला जातो. डुकराच्या हृदयातील झडपा मानवासाठी योग्य प्रकारे कार्य करतात, असे आधी केलेल्या शस्त्रक्रियांच्या निरीक्षणातून लक्षात आले. डुकराच्या हृदयाचे गरजू रुग्णासाठी प्रत्यारोपण करण्यापूर्वी त्या हृदयात काही जनुकीय सुधारणा (जेनेटिक मॉडिफिकेशन) जरुरीचे वाटले. यासाठी क्रिस्पर कॅस-९ हे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले. याला ‘जीन एडिटिंग टेक्निक’ असे म्हटले जाते. हे तंत्र वापरून डुकराच्या हृदयातील चार जनुके निकामी करण्यात आली. तसेच त्या हृदयात सहा मानवी जनुके समाविष्ट केली गेली.  डेव्हिडचे शरीर ‘नव्या’ हृदयाला ‘फॉरेन-बॉडी’ समजणार नाही, अशा पद्धतीने हे बदल केले गेले. त्याची प्रतिकारशक्ती योग्य इतपतच ठेवली गेली. तसेच नियोजित हृदयातील आणखीन एक जनुक निष्क्रीय करण्यात आले. ते ग्रोथ हार्मोनशी संबंधित होते. यामुळे हृदय काहीसे मोठे होऊन आकारात होणारा संभाव्य बदल टळला. हे सर्व खूपच खर्चिक होते. हे सगळे सोपस्कार करण्यासाठी दीड कोटी डॉलरचा खर्च आला. पण हे संशोधन होते, हे लक्षात घ्यायला हवे. या शस्त्रक्रियेमुळे वैद्यकशास्त्रातील संशोधनात मोलाची भर पडणार आहे. तसेच कोणत्या चुका टाळता येतील, हेदेखील लक्षात येईल.  

डेव्हिड बेनेटसाठी जनुकीय बदल केलेल्या डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण करण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर चार दिवसातच रुग्ण स्वतःहून श्वसन करू लागला. प्राथमिक, पण आशादायी यश मिळाले होते. यापुढे मोठ्या संख्येने अशा शस्त्रक्रिया करून हृदयविकाराने मरणासन्न असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य होईल, असे मत टीमचे मुख्य शल्यविशारद डॉ. बार्टले ग्रिफिथ यांनी व्यक्त केले आहे. कारण ‘दिलदार’ लोक बरेच असले, तरी हृदय-दान करणारे दानशूर मिळवणे अशक्यच असते. हृदयाची गरज असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. 

मात्र, नीतिमत्तेला अनुसरून प्राण्यांच्या अवयवांचे मानवासाठी प्रत्यारोपण करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न काही प्राणीप्रिय लोकांनी विचारला आहे. कारण यानंतर डुकराच्या मूत्रपिंडाचे मानवासाठी प्रत्यारोपण करण्याचे प्रयोग केले जाणार आहेत. वैद्यकशास्त्राला तरी डुकराचे हृदय आशादायक वाटत आहे. सहाजिकच मरणासन्न रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी संशोधक आज डुकराकडे मोठ्या आशेने पाहत आहेत.

संबंधित बातम्या