बिटकॉइनसिटी

गोपाळ कुलकर्णी
सोमवार, 6 डिसेंबर 2021

नोंद  

भारतात आभासी चलनावर बंदी घालण्याविषयी चर्चा सुरू असतानाच ‘क्रिप्टोकरन्सी’ला कायदेशीर अधिष्ठान देणाऱ्या एल- साल्वाडोर या देशाने ‘बिटकॉईनसिटी’ उभारण्याचा निर्धार केला आहे. या आभासी नगरीबाबत सगळ्या जगालाच मोठी उत्सुकता आहे.

एल- साल्वाडोर मध्य अमेरिकेतील एक छोटासा देश. ईशान्येला त्याची सीमा होंडारूसला भिडते तर वायव्येला ग्वाटेमालाचा शेजार, आणि दक्षिणेला विस्तीर्ण असा प्रशांत महासागर. ‘रिंग ऑफ फायर’वर वसलेल्या या देशाला ज्वालामुखीच्या उद्रेकानं नेहमीच हादरवलं.  या देशात जवळपास वीसपेक्षाही अधिक ज्वालामुखी आहेत, त्यापैकी सॅन मिग्युएल आणि इझालको हे मागील काही वर्षांत सक्रिय झाल्याचं दिसून येतं. यामुळं साल्वाडोरची क्षितीजं नेहमीच काळवंडलेली दिसतात. या देशाचं राजकारण तसं स्थिर, त्यामुळं युद्ध आणि अंतर्गत यादवीला त्याला कधी सामोरं जावं लागलं नाही. पर्यटन आणि उद्योगक्षेत्रातून बऱ्यापैकी कमाई होत असल्यानं  तेच इथले राष्ट्रीय उद्योग आहेत. आता याच छोट्याशा देशात नवं डिजिटल अर्थकारण उदयाला येऊ पाहतंय. ‘क्रिप्टोकरन्सी’ला कायदेशीर अधिष्ठान देणाऱ्या या देशाचे अध्यक्ष नयीब बुकेले यांनी नवी ‘बिटकॉईनसिटी’ उभारण्याचा निर्धार केला आहे.  या आभासी नगरीचं स्वरूप नेमकं कसं असेल? याची सगळ्या जगालाच मोठी उत्सुकता आहे.
***
ब्लॉकचेन तंत्रज्ञानातून जन्माला आलेल्या आभासी जगतातील क्रिप्टोकरन्सीनं जगभरातील नवश्रीमंतांना अक्षरशः वेड लावलंय. शेअर मार्केटप्रमाणे बिटकॉइननं त्यांच्या विचारविश्वाचा ताबा घेतल्याचं दिसतं. जागतिक अर्थकारणाला कवेत घेऊ पाहणाऱ्या या ‘डार्क नेट’बद्दल जगभरात एक संमिश्र भावना दिसून येते. बदल म्हटलं की समर्थनार्थ आणि विरुद्ध अशा दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटणं साहजिक आहे. अनेकांसाठी ‘कोल्ह्याला द्राक्षं आंबट’ अशी स्थिती असली तरीसुद्धा याच द्राक्षाची वाइन करून दामदुप्पट वसूल करू पाहणारे चतुर कोल्हेही काही कमी नाहीत. साल्वाडोरचे तरुण अध्यक्ष बुकेले नेमकं तेच करू पाहत आहेत. जागतिक पातळीवर डिजिटल करन्सीची सर्वांत मोठी बाजारपेठ त्यांना त्यांच्या देशात तयार करायची आहे. जगभरातील धनकुबेरांनी त्यांच्या तिजोऱ्या आपल्या देशात रित्या कराव्यात म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
***
परकीय गुंतवणुकीवर डोळा
बिटकॉइनसिटीच्या निर्मितीसाठी एक अब्ज डॉलरचे बिटकॉइन बाँड जारी केले जाणार असून येत्या साठ दिवसांमध्ये म्हणजे पुढील वर्षीच्या आरंभापर्यंत ते बाजारात येऊ शकतात. यातील अर्ध्या रकमेचं रूपांतर बिटकॉइनमध्ये करण्यात येईल. अर्धी रक्कम पायाभूत सेवांची निर्मिती आणि  बिटकॉइन मायनिंगसाठी खर्च करण्यात येईल. आतापर्यंत ज्या ज्वालामुखीनं या देशाला धक्के दिले त्याचाच वापर आता भूऔष्णिक विद्युत प्रकल्पांसाठी होईल. त्यातून तयार होणाऱ्या ऊर्जेने ही ‘बिटकॉइनसिटी’ उजळून निघेल. अर्थकारणाचा विचार केला तर सध्या अमेरिकी सरकारपेक्षाही साल्वाडोरच्या बाँडची अधिक चर्चा आहे, कारण हेच बाँड सर्वाधिक परतावा देतील असा दावा त्या देशाकडून केला जात आहे. ‘आमच्याकडं पैसे गुंतवा अन् भरभक्कम कमाई करा’, असं थेट आवाहनच बुकेले यांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना केलं आहे. या ‘बिटकॉइनसिटी’त राहणाऱ्या लोकांना त्यांच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. स्थावर आणि जंगम मालमत्ता, भांडवली उत्पन्न सगळं कसं करमुक्त असेल. केवळ परकी गुंतवणूक हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून या शहराची उभारणी करण्यात येईल.
***
सगळ्या स्मार्ट सुविधा

या ‘बिटकॉइनसिटी’त लोकांना राहण्यायोग्य निवासी संकुले, मॉल, 
रेस्टॉरंट आणि जलवाहतुकीसाठीची बंदरे आदींचा समावेश आहे. मुलांना पूर्णपणे डिजिटल शिक्षण दिलं जाईल. तंत्रज्ञानाच्या वापरातून प्रदूषणमुक्त आणि इको फ्रेंडली अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येईल. या शहरामध्ये मूल्यवर्धित करच गोळा करण्यात येतील. विशेष म्हणजे हे सगळं शहर, बुकेले दावा करतात त्याप्रमाणे, पूर्णपणे कार्बनमुक्त असेल; म्हणजे येथील कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण हे शून्याच्या जवळपास आणून ठेवण्याचा त्यांचा मनोदय आहे. त्यांच्या या सगळ्या घोषणा स्वप्नवत वाटाव्यात अशाच आहेत. त्यामुळंच हे सगळं कधी प्रत्यक्षात येईल? याची निश्चित अशी कालमर्यादा बुकेले यांना जाहीर केलेली नाही. 

मोठ्या परताव्याचं आमिष
एक अब्ज डॉलरच्या बिटकॉइन बाँडमधील अर्धे ऊर्जा नेटवर्क आणि मायनिंगसाठीच्या पायाभूत सेवांसाठी वापरण्यात येतील, तर उरलेल्या अर्ध्या बाँडच्या माध्यमातून एल -साल्वाडोर स्वतःच्या तिजोरीत आणखी बिटकॉइनची गंगाजळी ओतेल. या सगळ्या प्रक्रियेचं व्यवस्थापन ‘ब्लॉकस्ट्रीम’ नावाची कंपनी करेल. टोकनच्या रूपात असलेले बाँड जगभरातील गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्यात येतील, त्यातील गुंतवणुकीची किमान मर्यादा शंभर डॉलरपर्यंत निर्धारित करण्यात आली आहे. ‘लिक्विड नेटवर्क’मुळं जगभरातील गुंतवणुकीचा ओघ आपल्याला सहज आकर्षित करता येईल, असं या कंपनीला वाटतं. ‘बिटकॉइन बाँड’ हे भांडवली बाजाराची सगळी गणितेच बदलून टाकतील. विनाव्यत्यय जगभरातील गुंतवणुकीचा प्रवाह आपल्या देशात यावा हा यामागचा मुख्य उद्देश. यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणुकीतील परतावा ताबडतोब गुंतकवणूकदारांना देणं शक्य होणार आहे. पाच वर्षांसाठी हे बाँड लॉक झाल्यानंतर एल -साल्वाडोरचे प्रशासन काही बिटकॉइनची विक्री करून गुंतवणूकदारांना अतिरिक्त कुपन देण्याचा प्रयत्न करेल. बिटकॉइनच्या किमती वाढतच राहणार असल्यानं त्याच्याबळावरच हा देश जागतिक वित्तीय केंद्र बनेल, असा दावा स्थानिक अधिकारी करतात. पाच वर्षे गुंतवणूक साठवून ठेवल्यानंतर एल -साल्वाडोरकडून क्रिप्टोकरन्सीची विक्री करण्यात येईल तसेच बाँडधारकांना अतिरिक्त लाभांश उपलब्ध करून दिला जाईल. 
***
येणारा काळ देईल उत्तर
एल- साल्वाडोर डिजिटल क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून एका महाकाय अशा आभासी अर्थव्यवस्थेला जन्म देऊ पाहत आहे. हे कितपत सत्यात येईल हे जरी आताच सांगता येणार नसलं, तरीसुद्धा त्यामुळं आर्थिक गणितं बऱ्याचअंशी बदलतील एवढं मात्र नक्की. आज जगातील बहुतांश देश आणि आर्थिक घडामोडींचे अभ्यासक बिटकॉइनबद्दल साशंक आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अभ्यासकांनीही एल- साल्वाडोरला तोच इशारा दिला आहे. यामुळं एकूणच आर्थिक स्थैर्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाच धोका लक्षात घेऊन भारत सरकारनंदेखील या क्रिप्टो व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एल- साल्वाडोरच्या या नवअर्थकारणाचं यश पूर्णांशानं आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवर अवलंबून असेल, एवढं मात्र नक्की. शेवटी आपला पैसा नेमका कुठं गुंतवायचा याचा निर्णय भांडवलदारच घेतात. जे हातात येतं तेच खरं, असा रोकडा व्यवहार करणाऱ्या या मंडळींना ही नवी बिटकॉइनसिटी कितपत आकर्षित करेल याचं उत्तर येणारा काळच देईल.

संबंधित बातम्या