‘सुडोकू’ःजगाला पडलेलं कोडं

गोपाळ कुलकर्णी 
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

नोंद    

मागील वर्षी एका बाजूला वाढत जाणारा कोरोनाचा संसर्ग आणि दुसरीकडं कडक निर्बंध यामुळं सामान्य ब्रिटिश माणसाची मोठी घुसमट झाली होती. अगदी देशाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनदेखील याला अपवाद नव्हते. कोरोना झाल्यानंतर जॉन्सन यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रोजच दिसणारे चेहरे झाकलेले डॉक्टर, यांत्रिक उपकरणांची अविरत टिकटिक आणि औषधांचा उग्र वास यामुळं जॉन्सन अक्षरशः वैतागले होते. या आणीबाणीच्या स्थितीमध्ये त्यांना मोठी साथ दिली ती ‘सुडोकू’ या अंक कोड्यानं. कंटाळा आला की जॉन्सन ही आकडेमोड करत बसायचे.

ज गात असा एकही माणूस शोधून सापडणार नाही ज्याचं डोकं ‘सुडोकू’ या अंक कोड्यानं खाजवलं नाही. नऊ रकान्यांचा हा खेळ त्यातील आकडेही एक ते नऊदरम्यानचे. फक्त उभ्या आडव्या रांगांमध्ये ते भरताना त्यांची पुनरावृत्ती होणार नाही ना, याची काळजी खेळणाऱ्याला घ्यावी लागते. माकी काजी या जपानी माणसानं ऐंशीच्या दशकात जगाला हे कोडं घातलं. काही वर्षांतच ते जगभर इतकं लोकप्रिय झालं, की त्याच्या विविध देशांत टुर्नामेंट व्हायला लागल्या. खास अंक कोड्यासाठीच प्रसिद्ध होणाऱ्या या काजींच्याच नियतकालिकानं अल्पावधीत लोकांची मनं जिंकली. ‘सुडोकू’चा मूळ निर्माता कोण? याबाबत बरेच मतप्रवाह आहेत. अनेकजण याचं श्रेय स्विस गणितज्ज्ञ युलेर यांना देतात. काहीजण त्याचा प्रवास आठव्या आणि नवव्या शतकात अरब देशांतून चीनमध्ये नंतर भारतात झाल्याचं सांगतात. पुढं या कोड्याला आधुनिक रूप दिलं ते अमेरिकी स्थापत्यविशारद हॉर्वड गार्न्स यांनी. या खेळाचा विस्तार केला तो काजी यांनी. ‘हे अंक कोडं सोडवणं म्हणजे एखाद्या खजिन्याचा शोध घेण्यासारखं आहे.’ असं काजी सांगायचे. त्यांच्याच ‘निकोली’ या छोट्याशा कंपनीनं जगभरातील दोनशेपेक्षाही अधिक माध्यमसंस्थांना ही कोडी पुरवली. अनेक वर्तमानपत्रांचा खप वाढविण्यात या कोड्यांचा मोठा वाटा होता. काजींची ‘निकोली’ ही कंपनी फक्त कोड्यांची पुस्तकं आणि अन्य कंटेट इतर संस्थांना देऊन तीस लाख डॉलर कमावते. कंपनीची एकूण उलाढाल दोन अब्ज डॉलरच्या घरात आहे.

पडेल ती कामे केली
माकी काजींचा जन्म ८ ऑक्टोबर १९५१ साली जपानमधील होक्काईदो बेटावरील साप्पोरो येथे झाला. केईओ विद्यापीठात साहित्याचं शिक्षण अर्ध्यावर सोडल्यानंतर ते सट्टा आणि टेनिसच्या खेळाकडे वळले. ‘निकोली’ कंपनीची स्थापना होईपर्यंत त्यांनी वेटर, कामगार अशी पडतील ती कामे केली. पण कोड्यानं त्यांचं जीवन आमूलाग्र बदललं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते प्रकाशनाच्या व्यवसायात होते. या खेळासाठी संगणकाचा आधार घेणं शक्य असतानाही त्यांनी तो टाळत हाताने काम करणं पसंत केलं. जगभर ‘सुडोकू’च्या लोकप्रियतेनं कळस गाठला तेव्हा अनेक बड्या कंपन्यांनी ‘निकोली’ला पडेल ती किंमत देऊन खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती पण काजी यांनी त्याला ठामपणे नकार दिला. 

देशोदेशी प्रवास
‘सुडोकू’चा प्रचार करण्यासाठी माकी यांनी जगातील ३० देशांत प्रवास केला. शंभरपेक्षाही अधिक देशांतील वीस कोटी लोकांना या अंककोड्यानं अक्षरशः वेडं केलं होतं. या पेन्सिल पझलचं डिजिटल रुपडंही वाचकांच्या भेटीला आलं आहे. काजींच्या ‘निकोली’ या कंपनीची धुरा आता योशिनाओ अनपुकू यांच्याकडं आहे. काजी यांची दूरदृष्टी आणि शक्यतांना प्रत्यक्षात आणणं हेच आमचं धोरण असल्याचं ते सांगतात. अंकांसारखं अमर्याद जटिल कोडं घालून आता काजी अनंताच्या प्रवासाला निघून गेलेत, वयाच्या ६९व्या वर्षी त्यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर थांबली. आता देवाघरी गेल्यावरही हा अवलिया माणूस त्या जगन्नियंत्यालाही कोड्यात टाकेल एवढं मात्र नक्की.

 

संबंधित बातम्या