स्थलांतरित पक्षीवैभव

इरावती बारसोडे
मंगळवार, 5 जानेवारी 2021

नोंद 

पक्ष्यांचे स्थलांतर हा फारच उत्कंठावर्धक विषय आहे. जगातील वेगवेगळ्या थंड प्रदेशांतील लाखो-करोडो पक्षी वर्षातून दोनदा हजारो मैलांचा प्रवास करून स्थलांतर करत असतात. वाटेत त्यांना नैसर्गिक आव्हानांबरोबर आता मानवनिर्मित आव्हानांनाही सामोरे जावे लागत आहे. जागतिक तापमानवाढ, हवामानाच्या तीव्र घटना, हवामान बदलासारख्या गोष्टींचा त्यांच्यावर दुष्परिणाम होतोय का, या प्रश्‍नाचे नेमके उत्तर दीर्घकाळ अभ्यास केल्यानंतरच मिळेल. पण सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार एकंदरीत संख्या कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पक्षी हा स्वैर स्वच्छंद भ्रमण करणारा जीव. त्यांना ना सीमांचे बंधन, ना भौगोलिक अडथळे. भारतामध्येही दरवर्षी असंख्य परदेशी पाहुणे स्थलांतर करून येतात. ऑक्टोबर ते फेब्रुवारी-मार्च हा पक्ष्यांच्या स्थलांतराचा काळ. आता जानेवारी महिना उजाडलाय आणि मैलोनमैल प्रवास करून आलेले बरेचसे परदेशी पाहुणे त्यांच्या-त्यांच्या अधिवासामध्ये स्थिरावले आहेत. 

भारतामध्ये स्थलांतर करणाऱ्या एकूण प्रजातींपैकी ७० टक्के पाणपक्षी असतात आणि ३० टक्के जंगलांमधील पक्षी असतात. महाराष्ट्रामध्ये पक्ष्यांच्या एकूण ५६० प्रजाती आहेत. तर, स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या १८४ आहे. त्यातील ९४ प्रजाती पाणपक्ष्यांच्या आहेत आणि ९० प्रजाती जमिनीवरील पक्ष्यांच्या आहेत. 

फक्त महाराष्ट्रामध्येच १,११८ ठिकाणी स्थलांतरित पाहुण्यांचे पक्षीवैभव पाहायला मिळते. भिगवण, वीर धरण (जि. पुणे), नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्य (नाशिक), नकाणे तलाव (धुळे), हातनूर धरण (जळगाव), भांडूप पंपिंग स्टेशन (ठाणे), आक्षी समुद्रकिनारा (रायगड), बोरगाव मंजू (अकोला), नवेगाव, जायकवाडी ही पाणपक्षी आढळणारी काही प्रमुख ठिकाणे आहेत. तर, तानसा, ताडोबा, मेळघाट, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पेंच, माथेरान, तुंगारेश्वर, लोणावळा, फणसाड, तोरणमळा इथे इतर पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. 

महाराष्ट्रामध्ये स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांचा अनेक प्रजाती असुरक्षित आणि धोक्यात आहेत. इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आयूसीएन)च्या रेड लिस्टमध्ये महाराष्ट्रातील काही प्रजातींचा असुरक्षित पक्ष्यांच्या यादीमध्ये समावेश आहे. छोटी लालसरी (Common Pochard), वूड स्नाइप, मोठ्या ठिपक्यांचा गरुड (Greater Spotted Eagle), शाही गरुड (Eastern Imperial Eagle), पांढुरक्या भोवत्या (Pallid Harrier), ब्रिस्टल्ड ग्रासबर्ड, छोटा क्षेत्रबलाक (Lesser Adjutant), नयनसरी बदक (Ferruginous Pochard), ठिपक्याच्या चोचीचा झोळीवाला (Spot-billed Pelican), कालव फोड्या (Eurasian Oystercatcher), तुरेवाली टिटवी (Northern Lapwing), युरेशियन कोरल (Eurasian Curlew), बार-टेल्ड गॉडविट, ब्लॅक-टेल्ड गॉडविट, लाल जलरंक (Red Knot), बाकचोच तुतारी (Curlew Sandpiper), लाल मानेचा टिलवा (Red-necked Stint), हिमालयन ग्रिफॉन, काळे गिधाड (Cinereous Vulture), टायलरचा पर्णवटवट्या (Tytler''s Leaf-warbler), संघचारी टिटवी या प्रजाती असुरक्षित आहेत. 

तर, संकटात असलेल्या (एनडेंजर्ड) प्रजातींमध्ये तणमोर (Lesser Florican), मोठा क्षेत्रबलाक (Greater Adjutant), मोठा जलरंक (Great Knot), पाणचिरा (Indian Skimmer), नेपाळी गरुड (Steppe Eagle), पलासचा मत्स्य गरुड (Pallas''s Fish-eagle) या प्रजातींचा समावेश होतो.  

भारतामध्ये स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येमध्ये एकूणच घट होत असल्याचे २०२० चा ‘भारतीय पक्ष्यांची सद्यःस्थिती’ हा अहवाल सांगतो. या अहवालामधील माहितीनुसार, भारतीय उपखंडाअंतर्गत आणि लांब प्रवास करणाऱ्या अशा दोन्ही पक्ष्यांच्या संख्येमध्ये घट झालेली आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रजातींमध्ये फॉरेस्ट वॅगटेल, पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर, कॉमन ग्रीनशँक इत्यादी पक्ष्यांच्या संख्येत प्रचंड घट पाहायला मिळाली आहे. दक्षिणेकडे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांसाठी भारत प्रमुख ‘विंटरिंग ग्राउंड’ आहे. गुलाबी मैना, हिरवा पर्णवटवट्या, राजहंस यांसारख्या अनेक प्रजाती हिवाळ्यामध्ये भारतीय उपखंडात स्थलांतर करतात. या पक्ष्यांच्या संपूर्ण जीवनचक्रामध्ये भारतातील अधिवास महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे या अधिवासांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. तसेच स्थलांतरित पक्ष्यांच्या अनेक प्रजातींची प्रजनन स्थळे विस्तीर्ण, निर्मनुष्य प्रदेशांमध्ये असल्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे कठीण जाते. त्यामुळे हे पक्षी जेव्हा स्थलांतर करून भारतात येतात, तेव्हाच त्यांचे निरीक्षण करता येते. 

या वर्षी भारतामध्ये काही स्थलांतरित पक्ष्यांची पहिल्यांदाच नोंद झाली आहे. केरळमध्ये विलो वॉर्बलर  पक्षी डिसेंबरमध्ये आढळला होता. हा पक्षी युरोप आणि वायव्य आशियामध्ये प्रजनन करतो आणि हिवाळ्यात आफ्रिकेमध्ये स्थलांतर करतो. याआधी हा भारतामध्ये कधीच दिसलेला नाही किंवा त्याची नोंद झालेली नाही. 

स्थलांतरातील आव्हाने

पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून येतात. एवढा लांबचा हा प्रवास सोपा नसतो. हवामानाची साथ असेल तरच पक्षी त्यांच्या नियोजित मुक्कामाला पोचू शकतात. प्रवासामध्ये त्यांना अनेक आव्हाने पेलावी लागतात. अति गारठा आणि वेगाने वाहणारे वारे त्यांच्या प्रवासामध्ये अडथळे आणू शकतात. प्रवासातील स्टॉप ओव्हर साइट्स म्हणजेच पक्ष्यांच्या मुक्कामाची ठिकाणेदेखील पक्ष्यांच्या अधिवासासाठी योग्य असावी लागतात. या अधिवासांचाच दर्जा खालावला तर पक्ष्यांच्या स्थलांतरामध्ये अडचणी येतात, अशी माहिती पक्षितज्ज्ञ डॉ. गिरीष जठार यांनी दिली. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी या पक्ष्यांची शिकार होते. काही वर्षांपूर्वी सैबेरिया आणि चीनमधून दक्षिण आफ्रिकेमध्ये जाणाऱ्या अमूर ससाण्याची नागालँडमध्ये प्रचंड शिकार होत होती. त्यामुळे ही प्रजाती संकटात सापडली होती. परंतु जनजागृतीच्या माध्यमातून आता तिथली परिस्थिती पूर्णतः पालटली आहे. हे झाले नागालँडचे; पण आजही पाकिस्तान, उझबेगिस्तान यांसारख्या देशांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांची शिकार होतेच आहे. 

स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बहुतांश पक्षी पाणपक्षी असतात. त्यांच्यासमोर वेगळेच आव्हान असते. त्यांचा अधिवास असलेले पाणवठे प्रदूषित होतात. त्यामुळे त्यातील त्यातील मासे, वनस्पतीदेखील विषारी होतात. पक्षी हेच मासे आणि वनस्पती खातात आणि त्यांना विषबाधा होते. अशा प्रकारे विषबाधा होऊन हजारो पक्षी मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राजस्थानातील सांभर तलावामध्ये विषबाधा होऊन सुमारे १८ हजार पक्षी मृत्युमुखी पडले होते. सांभर तलावावर पाणपक्ष्यांच्या ८३ प्रजातींची नोंद झाली आहे. 

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मुबलक अन्न पुरवठा. स्थलांतर करणाऱ्या प्रत्येक पक्ष्याचा अधिवास सारखाच नसतो. ज्या पक्ष्यासाठी जो अधिवास योग्य आहे, तिथे अन्न मुबलक प्रमाणात मिळणे आवश्यक असते. अन्नाची उपलब्धता नसेल तर पक्षी पुढचा प्रवास करू शकणार नाहीत. 

प्रजनन स्थळी अडचणी आल्या तर पक्ष्यांच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो.

प्रवासमार्ग

पक्षी साधारण उत्तर-दक्षिण असा प्रवास करतात. अनेक प्रजाती ठराविक मार्गानेच प्रवास करतात. या मार्गांना ‘फ्लायवे’ (Flyway) म्हटले जाते. सध्या जगभरात अशाप्रकारचे आठ फ्लायवे आहेत – पूर्व अटलांटिक, भूमध्य/काळा समुद्र, पूर्व आशिया/पूर्व आफ्रिका, मध्य आशिया, पूर्व आशिया/ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका आणि निओट्रॉपिक्समधील तीन मार्ग. 

भारत मध्य आशिया फ्लायवेमध्ये मोडतो. मध्य आशिया फ्लायवे जगातला सर्वात लहान फ्लायवे असून फक्त उत्तर गोलार्धात आढळतो. मध्य आशिया फ्लायवे हिमालयाच्या उत्तरेकडील युरेशिया (युरोप, रशिया), उत्तर आफ्रिका आणि अरेबियन पेनस्युएलाचा समशीतोष्ण प्रदेश यांचा समावेश असलेला पॅलेआर्टिक प्रदेश आणि भारतीय उपखंडाचा प्रदेश यांना व्यापतो. हिमालय पर्वतरांगांमुळे भारतीय उपखंड आणि तिबेट पठाराची विभागणी होते. त्यामुळे मध्य पॅलेआर्टिक प्रदेशात प्रजनन करणाऱ्या अनेक प्रजाती पर्वतरांगा टाळून लांबचा रस्ता निवडून नैऋत्य आफ्रिकेकडे जातात. पण तरी अशाही अनेक प्रजाती आहेत, ज्या दक्षिण आशियामध्ये स्थलांतर करतात. मध्य आशियात येणाऱ्या बऱ्याचशा प्रजाती तिबेटी डोंगरसमूहांमधील दोन वाटांमधून येतात. तर काही थेट हिमालय पर्वतरांगांवरून येतात. बार हेडेड गूज अर्थात राजहंस हा असाच एक पक्षी. हा सर्वात उंचीवरून प्रवास करणारा पक्षी आहे. दुर्दैवाने मध्य आशिया फ्लायवेचा अभ्यास खूप कमी झाला आहे. या फ्लायवेने स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही.

हवामान बदल, जागतिक तापमानवाढ यांसारख्या गोष्टी स्थलांतरित पक्ष्यांवर, त्यांच्या संख्येवर परिणाम करतात का, करत असतील काय परिणाम होतात, हे पाहण्यासाठी किमान १५-२० वर्षांची माहिती हाताशी असणे आवश्‍यक आहे. त्या माहितीचा अभ्यास होणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या