‘नेतृत्वाची संधी हवीच!’

ज्योती बागल    
सोमवार, 23 डिसेंबर 2019

नोंद
 

ती  आली आणि तिनं जिंकलं... खरं तर एवढं सोप्प नाहीये ते. कसं असेल? कोणत्याही स्वप्नांना, इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपला भोवताल, तिथलं वातावरण आपल्यासाठी पोषक असावं लागतं, तेव्हा कुठं आपण आपल्या ध्येयाला गवसणी घालू शकतो. पण अशा काही व्यक्ती असतात, ज्या प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं सोडत नाहीत... आणि अशाच व्यक्ती इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरणं निर्माण करतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे नुकताच मिस युनिव्हर्स २०१९ चा किताब जिंकलेली झोझिबिनी टुन्झी (Zozibini Tunzi)!    

अमेरिकेतील अटलांटा येथे नुकताच ६८ वा मिस युनिव्हर्स २०१९ चा भव्यदिव्य असा सोहळा पार पडला. या वर्षीच्या स्पर्धेत साधारण ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मात्र, पहिल्या दहामध्ये कोलंबिया, फ्रान्स, आइसलँड, इंडोनेशिया, मेक्सिको, पेरू, पोर्टो रिको, दक्षिण आफ्रिका, थायलंड आणि युनायटेड स्टेट्सच्या सौंदर्यवतींनाच स्थान मिळविता आले. पण सर्वांवर मात करत स्पर्धेची खरी विजेता ठरली ती झोझिबिनी टुन्झी. पोर्टो रिकोची मॅडिसन अँडरसन ही फर्स्ट रनर अप राहिली. 

'मिस युनिव्हर्स २०१९'चा किताब पटकावणारी झोझिबिनी दक्षिण आफ्रिकेतील तिसरी सौंदर्यवती ठरली. याआधी १९७८ मध्ये 'मार्गारेट गार्डिनर' आणि २०१७ मध्ये 'डेमी-लेह नेल-पीटर्स' यांनी हा किताब मिळवला होता. परंतु, झोझिबिनी ही आफ्रिकेतील पहिलीच कृष्णवर्णीय सौंदर्यवती!

टोस्लो इथं राहणारी झोझिबिनी २६ वर्षांची आहे. ती तिच्या पालकांना तिचं प्रेरणास्थान मानते. ती लैंगिक भेदभावाविरुद्ध काम करणारी सक्रिय कार्यकर्ती आहे. गेल्या वर्षीच तिनं लैंगिक भेदभावाशी संबंधित हिंसाचाराविरोधात आवाज उठवून तिला असलेली सामाजिक जाण दाखवून दिली होती. तसंच तिनं सोशल मीडियावर लिंगभाव रूढींवर आधारित कॅम्पेनदेखील चालवले आहे. आज 'मिस युनिव्हर्स' म्हणून ओळखली जाणारी झोझिबिनी एक उत्तम गायिका आहे; शिवाय ती सूत्रसंचालक म्हणूनही प्रसिद्ध आहे.       

'मिस युनिव्हर्स'साठी तूच योग्य निवड का आहे? या प्रश्नावर उत्तर देताना ती म्हणाली, 'मी अशा ठिकाणी जन्मले आहे, जिथं महिलांची त्वचा आणि केस माझ्यासारखे आहेत. माझ्यासारख्या स्त्रियांना सुंदर समजले जात नाही. माझ्या रंगामुळं मला माझ्याच देशात सुंदर म्हटलं जात नाही. परंतु, आता हा भेदभाव संपला पाहिजे. सौंदर्याची व्याख्या बदलण्याची आता वेळ आली आहे. हा किताब जिंकून मी जेव्हा माझ्या मायदेशी परत जाईन, तेव्हा माझ्या देशातली मुलं माझ्याकडं बघतील, तेव्हा त्यांना माझ्यात त्यांचं प्रतिबिंब दिसेल. असं म्हणून तिनं सर्वांचे आभार मानले. 

आज समाजातील तरुण मुलींना काय शिकवलं पाहिजे? या प्रश्नावर उत्तर देताना ती म्हणाली, 'आज समाजातील तरुण मुलींना शिकवण्याची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेतृत्व. कारण अनेक वर्षांपासून तरुण मुली आणि स्त्रियांमध्ये नेतृत्वाची उणीव दिसते आहे, पण ती आम्हाला नकोय म्हणून नाही, तर समाजानंच स्त्रियांना तशी संधी दिली नाही. आपण जगातील सर्वांत शक्तिशाली जीव आहोत आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक संधी दिली जावी. आपण तरुण मुलींना त्यांची जागा घ्यायला शिकवले पाहिजे.' 'आमच्याकडं हवामानबदलासाठी मुलं निषेध करत आहेत. एक प्रौढ व्यक्ती म्हणून आपणदेखील त्यात सामील व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि सरकारनंही याकडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. कारण आपला ग्रह सुरक्षित ठेवणं हे आपल्यावरच अवलंबून आहे' असं उत्तर तिनं हवामान बदलापासून भविष्यातील पिढ्यांचं रक्षण करण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जात आहेत का या प्रश्नावर दिलं. आपल्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल सांगताना झोझोबिनी म्हणाली, 'मी अशा कणखर महिलांमधून आले आहे, ज्यांनी फक्त त्यांना माणूस म्हणून ओळख मिळावी म्हणूनच नाही, तर त्या बुद्धिमान आणि सक्षम नेता यासाठीदेखील ओळखल्या जाव्यात म्हणून संघर्ष केला आहे. त्या स्त्रियांमुळंच आज मी इथं असून आता नेतृत्व करण्याची, सर्वोत्कृष्ट होण्याची आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीतील  आत्मविश्वास वाढवण्याची जबाबदारी माझी आहे'. 

या स्पर्धेतील स्पर्धकांना सोशल मीडिया, हवामान बदल आणि भविष्यात काय आशा आहेत या विषयांवर आधारित प्रश्न विचारले गेले होते. प्रश्नोत्तराच्या फेरीमध्ये झोझिबिनीने खरी बाजी मारली. तिनं आपल्या उत्तरांनी उपस्थित सर्वांचीच मने जिंकली.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व समावेशकतेच्या दृष्टीने २०१९ हे वर्ष नक्कीच अधोरेखित होणारे आहे. ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे, जेव्हा मिस युनिव्हर्स झोझिबिनी टुन्झी, मिस अमेरिका निया फ्रँकलिन, मिस यूएसए चेस्ली क्रिस्ट आणि मिस टीन यूएसए कॅलिघ गॅरिस या सर्व विजेत्या कृष्णवर्णीय आहेत.

संबंधित बातम्या