माउंट अथॉस: पुरुषांचे गाव

प्रा. शैलजा सांगळे
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

नोंद  

जगाच्या पाठीवर असा एक प्रदेश आहे, जेथे महिलांना प्रवेश नाही. म्हणजेच येथे फक्त आणि फक्त पुरूषच राहतात व त्यांनीच महिलांना तिथे येण्यास मनाई केली आहे. गेल्या १२०० वर्षांपासून येथे फक्त पुरूषच राहत आहेत हे विशेष. 

ग्रीस देशाच्या उत्तरेकडील एजिअन समुद्राच्या कडेला असलेला ३३ हजार हेक्टर जागा व्यापलेला मोठा खडक म्हणजे माउंट अथॉस. हा मोठा खडक समुद्रसपाटीपासून सहा हजार मीटर उंच आहे, म्हणून त्याला म्हणतात ‘माउंट अथॉस’. पृथ्वीतलावरचा हा विश्वास न बसणारा असा अजब प्रदेश आहे. येथे जवळजवळ सहा हजारपेक्षा जास्त संन्यासी (मठवासी साधू ) व एक ते दीड हजार इतर लोक आहेत, जे येथे सेवा देतात. असा हा एकूण सात ते साडेसात हजार पुरुषांचा प्रदेश म्हणजे माउंट अथॉस. सर्वात पहिला संन्यासी येथे नवव्या शतकात आला होता. तेव्हापासून आजतागायत येथे फक्त संन्यासीच राहतात, महिलांना प्रवेश दिलेला नाही. अगदी प्राणिजगतातील माद्यांनासुद्धा येथे बंदी आहे.

जसे एखाद्या लहान मुलाला एखाद्या ठिकाणी जाऊ नको म्हटले तर त्याला तेथे जायचेच असते, त्याचप्रमाणे काही महिलांनी कुतुहूल म्हणून किंवा एक आव्हान म्हणून वेषांतर करून माउंट अथॉसमध्ये प्रवेश केला पण त्या पकडल्या गेल्याच.

असे सांगतात की चौदाव्या शतकात सर्बियाचा महाराज डुसान त्याची मूळची बल्गेरिया देशातील पत्नी हेलेन हिला घेऊन माउंट अथॉसला आला होता, कारण महाराजाला तिला प्लेगच्या साथीपासून वाचवायचे होते. परंतु अथॉसच्या भूमीवर महिलांना प्रवेश नसल्याने त्याने हेलेनाचा पाय अथॉसच्या भूमीला लागणार नाही याची काळजी घेतली. तिला एका घोडागाडीत बसवून ती घोडागाडी जमिनीपासून वर उचलून इकडून तिकडे नेण्यात आली होती.

फ्रेंच लेखिका मारिसे चॉईसी १९२० साली येथे आली होती. तिने खलाशाचा वेष परिधान केला होता, तरी ती पकडली गेलीच. १९३० साली सौंदर्य स्पर्धेत ‘मिस युरोप’ हा बहुमान प्राप्त केलेली ग्रीस देशाची सौंदर्यवती अलिकी दिपालाराकोन पुरुषाच्या वेषात तेथे येऊन गेली, ते कोणालाच कळलेसुद्धा  नाही. अमेरिकेतील अत्यंत हुशार शिक्षिका कोरा मिलर १९५३ साली तिच्या दोन मैत्रिणींसमवेत तेथे आली होती, तेव्हा सर्व संन्यासी भयंकर चिडले होते. २००८ साली टर्कीमार्गे पाच प्रवासी अनधिकृतपणे अथॉसमध्ये आले होते, त्यात चार महिला होत्या. त्यांना तेथील नियम अजिबात माहित नव्हते, असे त्यांनी संन्याशांना पटवून दिल्यावर संन्याशांनी त्यांना माफ करून तेथून जायला सांगितले. अथॉसला आर्थिक विकास नाही. रस्ते, वीज, मोटारी, बसेस, मोबाईल, टिव्ही इ. काहीच नाही. मात्र एक पोलीस स्टेशन आहे, तेथील पोलिसांना गुन्हेगारांना पकडायचे काम नाही, तर पुरुष वेषात या देशात प्रवेश करू पाहणाऱ्या महिलांवर लक्ष ठेवणे हे महत्त्वाचे काम आहे. येथे प्रवेश करण्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागते. ग्रीक सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सकडून ही परवानगी दिली जाते.

माउंट अथॉस हे ग्रीसमधील एक महत्त्वाचे पवित्र केंद्र मानले जाते. येथे ५०पेक्षा जास्त देवळे, मठ व भिक्षुकांची निवास स्थाने आहेत. देवीचे मात्र एकही मंदिर नाही. येथील मंदिराच्या भिंती उत्तमोतम  भिंतीचित्रांनी  सजल्या आहेत. त्यावर कलात्मकतेचाही प्रत्यय येतो. तेथील संन्याशांनी खूप कलाकुसर करून सजवलेली रंगीबेरंगी भिक्षुकांची निवास स्थाने आहेत. येथील संन्यासी सतत ध्यान, धार्मिक कार्य व धर्माचा अभ्यास यात गुंग असतात. त्यांची सेवा सहा तास चालते. सर्व संन्याशांना दिवसभराचे सेवेचे काम नेमून दिलेले असते. काही संन्यासी पाहुण्यांसाठी राखीव ठेवलेल्या गेस्ट हाउसची निगराणी करतात. तर काही जण वाईन तयार करतात, काहीजण भिक्षुकांच्या निवासस्थानांची डागडुजी करत असतात. त्यांना कोणतेही काम मिळाले तरी ते आनंदानेच करतात, कारण त्याच्या मते प्रत्येक काम त्यांना देवानेच दिलेले असते. प्रत्यक्षात काम करत असतानासुद्धा ते देवाचीच प्रार्थना म्हणत असतात. ते सामूहिक भोजनगृहात साधे जेवण घेतात. भाज्या, मासे व भोजनाबरोबर वाईन ही हवीच. समुद्र जवळच असल्याने मासे मिळत असतील; रोज लागणाऱ्या भाज्या, धान्य सर्व काही भिक्षुकांच्या निवासस्थानाच्या जवळच्या बागेतच पिकवले जाते. वाईन करण्यासाठी त्यांनी द्राक्षांचे खूप मळे विकसित केले आहेत. त्यांना जे काही लागते त्याबाबत ते स्वयंपूर्ण आहेत. त्यांचा कोणाशीच व्यापार नाही. ते अत्यंत शांतताप्रिय आहेत. गडबड, गोंधळ, त्यांना चालत नाही. दर आठवड्यातून एक दिवस हे सर्व संन्यासी मूक मिरवणूक काढतात, काही संन्यासी हातात पेटत्या मशाली घेतात तर काही जण फलक घेतात. त्या फलकावर लिहलेले असते ‘महिलांना या प्रदेशापासूनदूर ठेवा, त्यामुळे आपल्याला शांतीने जगता येईल’.

अथॉसला सर्वत्र म्हणजे धार्मिक स्थळी तसेच भिक्षुकांच्या निवासस्थानीसुद्धा खूप शांतता असते, तरीसुद्धा काही भिक्षुकांना काही दिवस एकांतात राहायचे असेल तर तशी सोयपण आहे. त्याला ते कारुलिया (karuilia) म्हणतात. अथॉसचा समुद्राच्या बाजूला असलेल्या उभ्या कड्याला दोरीने टोक बांधून हवेत झुलणाऱ्या झुल्यात संन्यासी एकांतात राहतो. खाली समुद्राच्या आदळणाऱ्या लाटा व जोराचा वारा असल्याने झोपाळा हिंदकाळत असतो. काही संन्याशांना हा संपूर्ण एकांत फारच आवडतो, त्यामुळे आपण देवाच्या फार जवळ जातो व आपल्या प्रार्थनेत कोणाचाही अडथळा येत नाही याचे त्यांना समाधान वाटते.  येथील नैसर्गिक खडकांचे रूपांतर एका अत्यंत कलात्मक व धार्मिक स्थळात करण्याचे सर्व श्रेय येथील संन्याशांचेच आहे. येथे निसर्गसौंदर्याची देणगी आहे. समुद्राच्या पाण्याची पार्श्वभूमी आहे, सर्वत्र खूप झाडे, पशुपक्षी आहेत. भौतिक विकास नसल्याने शुद्ध हवा आहे व सर्व पशुपक्षी नैसर्गिक वातावरणात मुक्तपणे वावरतात. निसर्गाची जोपासना संन्यासी उत्तम प्रकारे काळजी घेऊन करत आहेत. येथील मठ तर बघण्यासारखे आहेत, त्यात पेंटिगज, एम्ब्रॉयडरी, सोन्याच्या वस्तू इ.नी. सजावट केली आहे. त्याची देखभाल ते उत्तम प्रकारे करतात. त्यासाठी ते पारंपरिक व पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करतात. येथील कलात्मकतेने सजलेली देवळे, मठ, भिक्षुकांची निवासस्थाने व निसर्ग बघण्यासाठी दरवर्षी ६० हजारपेक्षा जास्त पर्यटक येथे येतात. काही पर्यटक मन:शांतीसाठी येतात, तर काही धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी येतात.

संपूर्ण जगाला इंटरनेट, मोबाईल, टॅब, लॅपटॉप इ. चे अक्षरश: वेड लागलेले 

असताना, येथील संन्यासी मात्र या भौतिक गोष्टीपासून दूर आपल्या वेगळ्याच जगात रममाण आहेत.

संबंधित बातम्या