नारळाची चटणी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे, मुंबई
गुरुवार, 15 मार्च 2018

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्‍न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्‍न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा’ हे सांगणारे हे नवीन सदर.

मागील अंकात गाजराच्या तिखटामीठाच्या पुऱ्या कशा करायच्या ते आपण बघितले. त्या पुऱ्यांबरोबर चटणी हवीच. ती कशी करायची ते आपण आता बघू... 

साहित्य ः अर्धी वाटी खवलेला नारळ, अर्धी वाटी कोथिंबीर (किंवा कोथिंबिरीच्या कोवळ्या असलेल्या काड्या), अर्धा चमचा जिरे, १ हिरवी मिरची, अर्धा चमचा मीठ, १ चमचा साखर, लसणाच्या ४-५ कळ्या, अर्धे लिंबू. 

कृती ः मिक्‍सरच्या चटणीच्या जारमध्ये लिंबाचा रस काढून त्यात वरील सर्व साहित्य व २ चमचे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. चविष्ट चटणी दोन मिनिटात तयार होते. 

टीप : १. काही पदार्थांत कोथिंबिरीच्या काड्या घेत नाहीत. पण त्यांचा स्वाद छान असतो व पचनाकरताही चोथ्याची आवश्‍यकता असतेच. त्यामुळे अशा काड्या घेऊन चटणी करावी. हवे तर हिरवागार रंग येण्यासाठी एखादे पालकाचे पान (देठासकटच) घालावे.

पुदिन्याची चटणी 
साहित्य ः अर्धी वाटी खवलेला नारळ, एक वाटी पुदिन्याची पाने, कैरीच्या दोन फोडी, थोडी कोथिंबीर (किंवा कोथिंबिरीच्या कोवळ्या असलेल्या काड्या), अर्धा चमचा जिरे, २-३ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा मीठ, २ चमचे साखर/गूळ, ४-५ लसणाच्या कळ्या. 

कृती ः मिक्‍सरच्या चटणीच्या जारमध्ये वरील सर्व साहित्य व २ चमचे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. चविष्ट आंबटगोड व झणझणीत चटणी तयार. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या