पुलाव व बिर्याणीसाठी भात 

साहित्यलक्ष्मी देशपांडे 
गुरुवार, 22 मार्च 2018

कुकिंग-बिकिंग       फूड    

शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्‍न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्‍न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे नवीन सदर.

साधा भात आणि गुरगुट्या भात आपल्याला आता जमत असेल तर भाताचे आणखी काही प्राथमिक प्रकार पाहू. 

आयुर्वेदात भात कसा शिजवावा हे सांगितले आहे. मंड म्हणजे निवळ, पेया म्हणजे पेज, विलेपी म्हणजे आटवल व ओदन म्हणजे भात. तांदुळाच्या अनुक्रमे सोळा पट, आठ पट, चौपट व दुप्पट पाणी घालून साध्या पातेल्यात, चुलीवर किंवा गॅसवर तांदूळ शिजवून त्यातले पाणी काढून टाकले (पाणी वेगळे काढून प्यावे वा इतर स्वयंपाकात वापरावे), की हे प्रकार करता येतात. याचे फायदे दोन - वजन वाढत नाही व रक्तातील साखर नियंत्रित राहाते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

आज आपण पुलावसाठी कुकरशिवाय भात कसा करायचा ते पाहू... 
साहित्य ः एक वाटी जुना बासमती तांदूळ, ७-८ वाट्या पाणी, अर्धा चमचा मीठ. 
कृती ः तांदूळ निवडून प्यायच्या पाण्याने दोनदा धुऊन घ्यावेत व बाजूला ठेवावेत. अर्ध्या तासाने एका स्टीलच्या जाड बुडाच्या पातेल्यात सात - आठ वाट्या पाणी उकळायला 
ठेवावे. त्यात अर्धा चमचा मीठ घालावे. पाण्याला उकळी फुटली, की त्यात धुतलेले तांदूळ 
चमचा चमचा टाकत जावे म्हणजे पाणी एकदम गार होणार नाही. सगळे तांदूळ पाण्यात उकळायला लागले, की आंच किंचित कमी करावी व तसेच उकळत राहू द्यावे. घड्याळ लावून ५ मिनिटांनी गॅस बंद करून मोठ्या गाळणीने पाणी दुसऱ्या पातेल्यात गाळून घ्यावे व अर्धवट शिजलेले तांदूळ पुन्हा पहिल्या पातेल्यात घेऊन वाफा येत असतानाच लगेच त्यावर झाकण ठेवावे. १० ते १५ मिनिटांनी झाकण काढले, की भाताची शिते पातेल्यात वाफेवरच शिजून उभी झालेली दिसतील. 
हा भात नुसताही वापरता येतो वा भाताचे जिरा राइस, बिर्याणी, पुलाव, फ्राइड राइस इत्यादी अन्य प्रकार करण्यासाठी उपयोगी पडतो. भाताची गाळलेली पेज, जिरेपूड व मीठ घालून प्यावी किंवा सूप, वरण व भाज्यांमध्ये पाण्याऐवजी वापरावी.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या