काकडीची कोशिंबीर 

साहित्यलक्ष्मी देशपांडे    
गुरुवार, 5 एप्रिल 2018

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्‍न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्‍न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे नवीन सदर.

ती शाळेत असतानाची गोष्ट आई सांगायची. आमच्या आजोबांना पानाची डावी - उजवी बाजू व्यवस्थित लागायची. मीठ, लिंबू, लोणचे, चटणी, कोशिंबीर, वरण, भात, पोळी, तूप, ताक हे पदार्थ लागायचेच. आजीही सुगरण होती. सगळे पदार्थ आवडीने, मनापासून करायची. एक दिवस आजी चटणी करायला विसरली. पाने घेतली होती व आजोबा हात धुवायला गेले होते. आईने पटकन अर्ध्या मिनिटात दुधीची तयार भाजी पाट्यावर वाटली व लिंबू पिळून चटणीच्या जागी वाढली. आजोबांना जेवताना बहुधा लक्षातही आले नसावे. त्यांचे जेवण झाल्यावर दोघींनी हुश्‍श केले. मजेचा भाग सोडला, तरी जेवणातला हा काटेकोरपणा पूर्वी लोक पाळत व त्यांना ऊठसूट डॉक्‍टरकडे जाण्याची वेळ येत नसे. 

आपल्या पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक पदार्थ निवडले व चौरस आहारातून सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घेतली जाईल हे पाहिले. त्याबरोबरच, प्रत्येक जेवण हे पंचेंद्रियांना सुखावणारे असावे याकडेही लक्ष दिले. या सगळ्या गोष्टींकडे आपण ‘वेळ’ नाही, आधुनिकता या सारख्या खऱ्याखोट्या पळवाटांपायी दुर्लक्ष करून स्वास्थ्याचे प्रश्‍न निर्माण करून ठेवले आहेत. चव, पदार्थांचे रंगरूप, गंध, स्पर्श, पदार्थांची मांडणी व प्रमाण या सगळ्या गोष्टींचा विचार मनात ठेवून स्वयंपाक केला, तर तो रुचकर होतोच पण शरीराला पोषक व मनाला समाधानकारक, रोचक, आनंददायकही होतो. पानाच्या मांडणीत डाव्या बाजूला वाढल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये कोशिंबीर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. आज करूया काकडीची कोशिंबीर दोन - तीन प्रकारे... 

साहित्य ः वाटीभर कोचवलेली अथवा अगदी बारीक चिरलेली काकडी, एक मिरची, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, चिमूटभर मीठ, अर्धा चमचा साखर, चमचाभर साजूक तूप, भाजलेल्या शेंगदाण्यांचे अर्धी वाटी जाडेभरडे कूट, अर्धी वाटी घट्ट दही, लिंबाची फोड, कोथिंबीर. 
कृती :  काकडी, कोथिंबीर, मिरची, लिंबू प्यायच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे. काकडीच्या एका टोकाकडील भाग छायाचित्र क्र. १ मध्ये दाखवल्याप्रमाणे कापावा. त्याचा बारीक तुकडा खाऊन पाहावा. कडू असेल तर उरलेला तुकडा घेऊन काकडीच्या कापलेल्या तुकड्यावर गोलगोल घासावा. वीसएक वेळा घासल्यावर छायाचित्र क्र.  २ मध्ये दाखवल्याप्रमाणे पांढरट कडू चीक कडेला गोळा होईल. तो धुऊन टाकावा. काकडीची पुन्हा चव बघावी. कडूपणा गेला असेल तर ठीक, नाहीतर आणखी मोठा तुकडा कापून चव बघावी. तरी कडू असल्यास काकडी टाकून द्यावी व दुसरी काकडी घ्यावी. 

काकडी याप्रमाणे पाहून घेतल्यावर साले काढून अथवा न काढता अगदी बारीक चिरून घ्यावी अथवा किसून घ्यावी. काही लोक पाणी सुटते म्हणून किसल्यावर पिळून घेतात, पण मी सालेही काढत नाही व पिळतही नाही. कारण त्यात महत्त्वाची व्हिटॅमिन्स वाया जातात.
स्वयंपाक झाल्यावर जेवणाच्या थोडाच वेळ आधी कोशिंबीर केली/मिसळली तर हा प्रश्‍न येत नाही. 

फोडणी : कढल्यात एक चहाचा चमचा तूप घेऊन ते तापल्यावर लगेच त्यात जिरे व हिंग टाकावे. जिरे फुटल्यावर लगेच गॅसवरून काढून मिरची टाकावी. जळू देऊ नये. थंड झाल्यावर काकडीवर टाकावी. 
प्रकार एक : चिरलेली काकडी, मिरची, दाण्याचे कूट, मीठ, साखर, कोथिंबीर, जिरेपूड (ऐच्छिक), लिंबाचा रस हे या क्रमाने वाढायच्या बोलमध्ये भरून फ्रीजमधे ठेवावे. वेळेवर एकत्र करावे म्हणजे पाणी सुटणार नाही. 
प्रकार दोन : चिरलेली काकडी, फोडणी, दाण्याचे कूट, मीठ, साखर, कोथिंबीर, लिंबाचा रस हे याच क्रमाने वाढायच्या बोलमध्ये भरून फ्रीजमधे ठेवावे. 
प्रकार तीन : चिरलेली काकडी, फोडणी (ऐच्छिक), दाण्याचे कूट, मीठ, साखर, कोथिंबीर, दही हे याच क्रमाने वाढायच्या बोलमध्ये भरून फ्रीजमधे ठेवावे. वेळेवर मिसळावे. 
पहिल्या दोन्ही प्रकारात हवा असल्यास दाणेकुटाबरोबरच खवलेला नारळ घातला तरी छान लागतो.

फोटो फीचर

संबंधित बातम्या