फ्रेंचबीन्सची भाजी

साहित्यलक्ष्मी देशपांडे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्‍न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्‍न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे नवीन सदर.
 

मुलाच्या लग्नाच्या वेळची गोष्ट! सून उच्चशिक्षित तेलगू ब्राह्मण! जेमतेम चहा करता येत होता. माझ्या मुलाला मात्र कामचलाऊ सगळा स्वयंपाक येत होता. सुनेच्या आईला म्हटलं, की बेसिक स्वयंपाक शिकवून द्या म्हणजे लग्नानंतर दोघं मिळून करतील. तर त्या  म्हणाल्या, ‘आमचा स्वयंपाक थोडा वेगळा असतो. तुम्हीच तुमच्या पद्धतीचा शिकवा म्हणजे कन्फ्युजन होणार नाही.’ सुनेच्या वडिलांची ती अतिशय लाडकी असल्याने त्यांनी तिला गॅसजवळ कधी जाऊच दिलं नव्हतं. 
कठीण काम अंगावर आलं होतं. पहिल्या दिवशीच तिला सांगितलं, की स्वयंपाक अगदी सोप्पा असतो. काम म्हणून केला तर त्रासदायक; पण मजेनं केला, की आनंददायक! वरण किंवा भाजी करताना फोडणी करशील तेव्हा कधी तूप घ्यायचं तर कधी तेल! त्यात कधी मोहोरी तर कधी जिरं तर कधी दोन्ही तर कधी ओवा, कधी मेथीपण; कधी हिंग, हळद, तर कधी हिरवी तर कधी लाल मिरची; कधी लसूण, तर कधी कांदा, कधी दोन्ही तर कधी दोन्ही नाही! सवयीनं लक्षात राहातं काय कशात घालायचं ते; मग प्रयोगही करता येतात. २-३ दिवसांतच पटकन शिकली ती! आणि आता मस्त स्वयंपाक करते. यूट्यूबनं तर आणखीन सोपं झालंय आता. 
आज आपण एक सोपी, वेगळी व चविष्ट भाजी करूया. 

फ्रेंचबीन्सची भाजी 
साहित्य ः दोन वाट्या धुऊन बारीक चिरलेल्या फ्रेंचबीन्स, १ हिरवी मिरची, १ चमचा जिरं, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा मीठ, अर्धा-पाऊण चमचा साखर, दोन-तीन चहाचे चमचे साजूक तूप व एक दीड वाटी दूध. आवडत/चालत असल्यास थोडी साय व मिरेपूड. 
कृती : कोवळ्या फ्रेंच बीन्स धुऊन, दोन्ही बाजूची टोकं म्हणजे देठ व टोकं काढून टाकून बारीक चिरून घ्याव्या. मिरचीचे मोठे तुकडे करावेत. कढईत तूप घेऊन गरम करावं. आंच अगदी मंद /मध्यम ठेवावी, तूप जळू देऊ नये. तूप गरम झालं, की त्यात जिरं घालावं. जिरं तडतडलं, की लगेच त्यात हिंग, हिरव्या मिरचीचे तुकडे व चिरलेली फ्रेंच बीन्सची भाजी घालावी. एक-दोन मिनिटं परतून घेतली, की त्यात वाटी - दीड वाटी दूध घालावं व झाकण ठेवावं. दोन मिनिटांनी झाकण उघडून साखर, मीठ घालून दूध आटेपर्यंत भाजी परतावी व भांड्यात काढून मग त्यात हवी असल्यास साय व मिरपूड घालून मिसळून घ्यावी. ही भाजी जेवताना पोळीबरोबरच नव्हे, तर नुसतीच बोलमधे घेऊन एरवीही खायला छान लागते. 
टिप्स :    डाएटवर असल्यास तूप अजिबात न घालता नुसती कढई गरम करून त्यात जिरे टाकावेत व पुढील कृती वरच्याप्रमाणे करावी. साय व साखरही वगळावी. 
 डाएटवर नसल्यास तुपाऐवजी बटरही घातले, तरी मस्त लागते.
 भाजी फार जास्त शिजवू नये.

फोटो फीचर

संबंधित बातम्या