काबुली चण्याची उसळ/छोले 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
गुरुवार, 3 मे 2018

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्‍न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्‍न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे सदर.
 

साहित्य ः एक वाटी काबुली चणे, एक मोठा कांदा, ५-६ लसणीच्या कळ्या, आल्याचा पाऊण इंचाचा तुकडा, दोन चमचे तेल, १ हिरवी मिरची, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, दीड चमचा गरम मसाला/छोले मसाला (घरात दोन्ही नसतील तर चिकन मसाला घातला तरी चालेल. यातील कोणताही मसाला घालून छोले मस्त लागतात), पाऊण ते १ चमचा मीठ, १ चमचा कसुरी मेथी, २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, ७-८ काजू (ऐच्छिक). 
कृती : रात्री एक वाटी काबुली चणे धुऊन अडीच ते तीन वाटी पिण्याच्या पाण्यात भिजत घालावेत. सकाळी त्यातील पाणी काढून टाकावे व दुसरे दोन वाट्या पाणी घालून कुकरमधे शिजवून घ्यावे. कुकरची शिटी झाली, की गॅस मंद करावा व १० मिनिटांनी गॅस बंद करावा. 
    मिक्‍सरच्या चटणीच्या लहान जारमध्ये कांद्याचे तुकडे, लसूण व आल्याचे तुकडे आणि मिरची बारीक वाटून घ्यावे. बाजूला काढून घ्यावे. त्याच जारमध्ये टोमॅटोचे तुकडेही बारीक वाटून घ्यावेत. 
    मग कढईत दोन - तीन चमचे तेल घेऊन गॅस सुरू करावा. तेल गरम झाले, की त्यात वाटलेला कांदा-लसूण-आले-मिरचीचा गोळा टाकावा व मध्यम आचेवर लाल होऊन तेल सुटेपर्यंत परतावा. परतताना हवे तर एक - दोन चमचे तेल आणखी घालावे. आता मिक्‍सरमध्ये वाटलेला टोमॅटोचा रस टाकावा व पुन्हा बरेच परतावे. तेल सुटू लागले, की त्यात हळद, तिखट, (गरम मसाला/छोले मसाला/चिकन मसाला यापैकी जो उपलब्ध असेल तो) मसाला व कसूरी मेथी घालून पुन्हा खरपूस परतावे. त्यानंतर त्यात उकडलेले काबुली चणे पाण्यासह घालावे. चवीप्रमाणे मीठ घालून ४-५ मिनिटे छान उकळावे. घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालावे. (थंड झाल्यावर रस थोडा घट्ट होतो.) वाढताना कोथिंबीर वरून घालावी. 
छोले थोडे सौम्य चवीचे करायचे असतील, तर ७-८ काजूची पाव वाटी पाण्यात मिक्‍सरमधून अगदी बारीक पेस्ट करून त्यात घालून एक उकळी आणावी.

फोटो फीचर

संबंधित बातम्या