कचोरी

साहित्यलक्ष्मी देशपांडे, मुंबई
गुरुवार, 5 जुलै 2018

कुकिंग-बिकिंग
 

पावसाळ्यात जसं वाफाळत्या गरम चहा, कॉफीबरोबर गरमागरम कांद्याची भजी हवीच असतात, तसंच गरमागरम कचोऱ्याही चहाची लज्जत वाढवतात. या दिवसात बाहेरचे खाणे प्रकृतीला अपायकारक असते; शिवाय बाहेरच्या कचोऱ्या अतिशय तेलकट असतात. पण खायची तर इच्छा होतेच. पावसाळाही ऐनभरात आहेच तर आज आपण चहाबरोबर गरमागरम मुगाच्या कचोऱ्याच करू. 

साहित्य : पारीसाठी - चार वाट्या मैदा, १ वाटी मोहनासाठी तेल, अर्धा चमचा मीठ, २ वाट्या पाणी. 
सारणासाठी - एक वाटी मुगाची डाळ, २ टेबल स्पून तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, २ चमचे तिखट, २ हिरव्या मिरच्या, एक टेबलस्पून बडीशेप व एक टी स्पून धणे (भाजून जाडसर बारीक केलेले), २ टेबलस्पून कोथिंबीर, एक टीस्पून किसलेले आले, ४ लसूण पाकळ्या (आवडत असल्यास), मीठ एक चमचा, २ चमचे साखर किंवा गूळ, एक टेबलस्पून आमचूर किंवा चिंचेचा कोळ. 
 

कृती : मैद्याच्या चाळणीने ४ वाट्या मैदा नीट चाळून घ्यावा. त्यात २ सपाट चहाचे चमचे मीठ व १ वाटी कडकडीत गरम तेलाचे मोहन घालावे. प्रथम चमच्याने व नंतर हाताने छान मिसळून घ्यावे व मुठीत पीठ घेऊन मूठ बंद करून पाहावे. मुठीसारखा गोळा हातात बांधला गेला म्हणजे मोहन योग्य प्रमाणात पडले. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालत मैदा घट्टसर मळून घ्यावा. फारही घट्ट नको नाहीतर कचोरी तळताना उकलते व फार सैलही नको नाहीतर कचोरी मऊ पडते. साधारण २ वाट्या पाणी पुरेल. हा गोळा तेलाचा हात लावून झाकून ठेवावा. एका बाजूला मुगाची सालं काढलेली एक वाटी डाळ निदान अर्धा तास आधी धुऊन त्यात वाटीभर पाणी घालून भिजवून ठेवावी. ही डाळ मिक्‍सरमधून कमीत कमी पाणी घालून जाडसर वाटून घ्यावी. 

आता कढईत दोन टेबल स्पून तेल घ्यावे. चांगले तापले, की त्यात मोहरी घालावी ती फुटल्यावर त्यात वाटलेल्या हिरव्या मिरच्या, हवं असल्यास वाटलेला आल्याचा व लसणीचा गोळा घालून चांगले परतावे व मग भाजलेल्या बडीशेपेची जाडसर पूड, धण्याची जाडसर पूड, हळद व तिखट घालून जरासे परतून लगेच जाडसर वाटलेली मुगाची डाळ, मीठ, साखर, आमचूर व कोथिंबीर घालून परतावे. झाकण ठेवून मंद आचेवर वाफ आणावी व परतून परतून मोकळी होईल असे पाहावे. आता ही डाळ थंड होत आली/झाली, की तिचे लहान लिंबाएवढे गोळे करून झाकून ठेवावे. आता भिजवलेल्या मैद्याचे डाळीच्या साधारण दीडपट आकाराचे गोळे करावेत व हातावर वाटीसारखी खोलगट गोल पारी करून त्यात डाळीचा गोळा ठेवावा. पारीच्या कडांना पाणी लावून, कडा मोदकासारख्या एकत्र धरून किंचित पीळ द्यावा व कचोरी नीट बंद करावी. आता पिळलेला भाग वर येईल असा तो गोळा पोळपाटावर ठेवून लाटावा अथवा तळव्याने दाबावा म्हणजे बांगडीपेक्षा जरा मोठी कचोरी तयार होईल. 

आता कढईत तेल छान गरम करावे व आच अगदी मंद ठेवावी. कचोरीचा बंद केलेला भाग तळाकडे राहील अशा बेताने तळायला सोडावी. थोड्या वेळाने उलटून तळावी. साधारण ब्राऊन रंग आला, की काढून किचन टॉवेलवर ठेवावी. वरील साहित्यात १२ कचोऱ्या होतील.

टीप :

  • कचोरी लाटताना फुटली तर डाळ बाहेर दिसत असलेल्या भागावर थोडे पाणी लावून त्यावर मैदा लावून तव्यावर थोडे भाजून मग तळावी, म्हणजे सारण तेलात मिसळणार नाही. 
  • कचोरी अगदी मंद आचेवरच तळावी नाहीतर मऊ पडते. 
  • खूप लोक येणार असतील तर कचोऱ्या ब्राऊन रंगावर न तळता जरा पांढरट गुलाबी तळून ठेवाव्यात. मग वेळेवर पुन्हा छान खुसखुशीत तळून घ्याव्यात. 
  • तळताना कचोरी फुटलीच तर मोठ्या गाळण्यात एक पातळ कपडा घालून तेल लगेच दुसऱ्या कढईत गाळून घ्यावे, म्हणजे सारण जळून तेलाला वास येऊ शकतो तो येणार नाही. 
  • कचोरी नरम पडण्याची कारणे - अ. मोहन कमी घातले ब. आच जास्त ठेवून घाईने कचोऱ्या तळल्या क. मैदा सैल भिजवला ड. सारण पुरेसे कोरडे झाले नाही इ. मूग डाळ भिजवली नसेल, तर एक वाटी डाळ एक वाटी पाण्यात घालून कुकरमध्ये शिजवावी. एका शिटीनंतर गॅस बंद करावा. पुढील कृती वरीलप्रमाणे करावी.

फोटो फीचर

संबंधित बातम्या