गिलक्याची भाजी
कुकिंग-बिकिंग
आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात किती विविध प्रकार असतात. वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, चटणी, ताक, सार, तूप, लिंबू, पापड पापड्या, भजी, वडे... अन् गोडाचे तर विचारायलाच नको. भाजी हा त्यातला पोटभरू प्रकार. आरोग्य चांगले राहाण्यासाठी पोटाचे आरोग्य चांगले हवे व पोटाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर भरपूर प्रमाणात कच्च्या व शिजवलेल्या पालेभाज्या व फळभाज्या आपल्या प्रत्येक जेवणात खाल्ल्याच पाहिजेत. भाज्या व पालेभाज्यांमधून विविध व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स तर मिळतातच; पण मुख्यत्वे फायबर मिळते, जे पोट साफ ठेवण्यासाठी मदत करते.
मुलांना सर्वसाधारणपणे आवडणाऱ्या भाज्या फार थोड्या असतात. बटाटा, फुलकोबी, पत्ताकोबी, भेंडी आणि फार तर फरसबी किंवा फ्रेंच बीन्स. मग काय होतं, मुलांनी खाल्ल्या पाहिजेत म्हणून त्याचत्याच भाज्या आणल्या जातात. काही वेळा भाज्या पोटात जाव्या म्हणून भाज्या घालून पोहे किंवा उपमाच कर, चायनीज पदार्थ कर, तर कुठे थालीपिठात घालून मुलांना त्यांच्या नकळत भाज्या खाऊ घालणाऱ्या सुगृहिणी आपल्याकडे खूप आहेत आणि त्यांनी वेगवेगळे पदार्थ शोधून काढले आहेत. सगळ्या प्रकारच्या भाज्या आलटून पालटून पोटात गेल्या तर त्यापासून आपल्या शरीराला आवश्यक ते विविध रस पोटात जातात.
आता गिलक्याची (घोसाळे) भाजी बऱ्याच लोकांना आवडत नाही. पण गिलक्याची भजीपण छान होतात आणि भाजीपण! आणि गिलक्याची थालीपिठे तर अप्रतिम! पण आज आपण गिलक्याची साधीशी भाजीच करणार आहोत.
साहित्य ः एक पाव गिलकी, अर्धी वाटी चण्याची भिजवलेली डाळ, २-३ चमचे तेल, अर्धा चमचा मोहोरी, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, अर्धा-एक चमचा गोडा मसाला, २-३ चमचे गूळ, अर्धा चमचा मीठ व थोडीशी कोथिंबीर.
कृती : गिलकी स्वच्छ धुऊन ती फोटोतल्याप्रमाणे तुकडे होतील अशा रीतीने चिरून घ्यावीत. चिरण्याआधी देठाकडच्या व दुसऱ्या टोकाचे काप कापून चव घेऊन पाहावी. कडू लागल्यास गिलके चक्क टाकून द्यावे. चण्याची डाळ अर्धा तास आधी धुऊन भिजत घालावी. आता कढई तापत ठेवावी व त्यात दोन-तीन चमचे तेल गरम करत ठेवावे. तेल गरम झाल्यावर मोहोरी टाकावी. मोहोरी फुटायला लागल्यावर हिंग घालून गॅस कमी करावा व मग नेहमीप्रमाणे हळद, तिखट फोडणीत टाकून लगेचच भिजवलेली डाळ व डाळीबरोबर असलेले चमचा - दोन चमचे पाणी त्यात घालावे. थोडे परतावे व मग गिलक्याचे चिरलेले तुकडे, मीठ, गूळ, गोडा मसाला घालून नीट मिसळून झाकण ठेवावे. चार - पाच मिनिटे वाफ आली, की भाजीचा एखादा तुकडा कढईतच झाऱ्याने कापून पाहावा. शिजला असेल तर सहज तुटतो. भाजीला थोडा अंगाबरोबर रस असू द्यावा (चमचा दोन चमचे). भाजीत कोथिंबीर मिसळून भाजी भांड्यात काढून घ्यावी. तिखट गोड चवीची ही भाजी खूप छान लागते.
टीप्स :
- गिलकी, दोडकी, काकडी, दुधी या वर्गातील भाज्या वापरताना नेहमी दोन्ही टोकाकडले तुकडे कापून चाखून पाहावेत. एखादवेळेस कडू निघतात व अशी कडू असणारी भाजी टाकून द्यावी. अजिबात खाऊ नये.
- गिलकी शिजताना भाजी शिजून थोडी कमी होते. एक पाव गिलक्याची भाजी दोघांना पुरेल.
- गिलकी शिजवताना थोडे पाणी सुटते त्यामुळे भाजी शिजवताना फार पाणी घालू नये.
- गिलक्याचा उग्रपणा चण्याची डाळ घातल्याने व गूळ घातल्याने कमी होतो. गूळ व तिखट जरा जास्त घातले, की भाजी मस्तच लागते.