पोमोसे

साहित्यलक्ष्मी देशपांडे
गुरुवार, 19 जुलै 2018

सगळ्या गृहिणींना सतावणारा प्रश्‍न म्हणजे उरलेल्या अन्नाचे करायचे काय? 
अनेकजणी शिळे खायला नको म्हणून चक्क कचऱ्याच्या टोपलीत टाकतात. काहीजणी उरलेले अन्न कामवाल्या बायकांना देऊन अन्न वाया जाणार नाही असे बघतात. काहीजणी मात्र त्यातून काहीतरी चविष्ट असा पदार्थ घडवतात जो मूळ पदार्थांपेक्षा कितीतरी पटीने रुचकर लागतो. 
पोळीचा कुस्करा, गूळ-तूप-पोळीचा लाडू, दूधसाखरपोळी, भाज्यांची थालिपीठे इत्यादी इत्यादी. आज आपण करणार आहोत शिळ्या पोळ्यांचे सामोसे अर्थात पोमोसे! 

साहित्य ः उरलेली कोणतीही कोरडी भाजी (अगदी गवार, फरसबी, दुधी, पडवळ किंवा पीठ पेरून केलेली पालेभाजीही चालेल), शिळ्या किंवा ताज्या पोळ्या, २-३ टेबलस्पून मैदा, मीठ व तळण्यासाठी तेल. 
कृती ः पोळ्या मधून कापून त्यांचे पहिल्या फोटोतल्याप्रमाणे दोन भाग करावेत. एका वाटीत २-३ चमचे मैदा घेऊन त्यात किंचित मीठ व चमचा - दीड चमचा पाणी घालून घट्ट पेस्ट करून घ्यावी. आता कापलेल्या पोळीला दुसऱ्या फोटोप्रमाणे एका कडेला मैद्याची घट्ट पेस्ट लावून, गुंडाळून, कोनाचा आकार देऊन चिकटवून घ्यावे. आता या तयार कोनात जी भाजी उरली असेल ती भरावी व चौथ्या व पाचव्या फोटोप्रमाणे मैद्याची पेस्ट लावून कोन चिकटवून बंद करून घ्यावा. आता हा कोन व्यवस्थित दोन्ही बाजूंनी उलटसुलट करून मंद आचेवर कुरकुरीत तळून घ्यावा. वरच्या कुरकुरीत आवरणामुळे कुठल्याही न आवडणाऱ्या भाजीचा; अगदी गवारीच्या भाजीचासुद्धा पोमोसा अप्रतिम लागतो. 

टीपा ः 

  •      एका पोळीचे व पाऊण ते एक वाटी भाजीचे दोन पोमोसे होतात. 
  •      कोन करताना पोळी फाटल्यास त्याजागी मैद्याची पेस्ट लावून बंद करावे म्हणजे भाजी तेलात पसरणार नाही व पोमोसा तेलकट होणार नाही.
     
फोटो फीचर

संबंधित बातम्या