हांडवो 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कुकिंग-बिकिंग

गुजराती खाद्यपदार्थ महाराष्ट्रात अत्यंत आवडीने सर्वदूर खाल्ले जातात. खमण, ढोकळा, डाळढोकळी, खाकरा, मुठिया इत्यादी. गुजराती थाळी पण आवडीने खाल्ली जाते. आज आपण त्यातील आपल्याकडे फारसा न केला जाणारा, पण अत्यंत चविष्ट व पौष्टिक असा मधल्या वेळचा खाण्याचा पदार्थ ‘हांडवो’.. त्यात थोडे बदल करून करणार आहोत. 

साहित्य ः अर्धी वाटी मोड आलेले मूग, अर्धी वाटी मोड आलेली मटकी, अर्धी वाटी गाजराचा कीस, एक मिरची, अर्धी वाटी रवा, पाव वाटी बेसन, पाऊण चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, दोन मोठे चमचे तीळ, ३-४ टेबल स्पून तेल, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, एक छोटे पाकीट इनो फ्रूटसॉल्ट किंवा अर्धा चमचा सोडा, दोन टेबल स्पून कोथिंबीर व थोडा कढीलिंब. 

कृती ः गाजर धुऊन किसून घ्यावे. मोड आलेले मूग, मटकी व मिरची मिक्‍सरमधून जाडसर वाटून घ्यावे. मग गाजराचा कीस, वाटलेले मूग मटकी मिरची, रवा, बेसन, मीठ, हळद, तिखट, कोथिंबीर, अर्धा-पाऊण वाटी पाणी घालून भज्याच्या पिठासारखे कालवून घ्यावे. आता त्यात फ्रूटसॉल्ट मिसळून घ्यावे. लगेच ते मिश्रण फुगायला लागेल. लगेच एकीकडे नॉनस्टिक कढईत/पॅनमध्ये दीड-दोन चमचे तेल घ्यावे. त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करावी व गॅस अगदी कमी करून पॅनमध्ये एक टेबल स्पून तीळ पसरून घालावे. आता तयार केलेले मिश्रण त्यात घालावे. झाकण ठेवावे व मंद आचेवर साधारण दहा मिनिटे शिजू द्यावे. हे मिश्रण कढईत घालताना साधारण एक सव्वा इंचाचा थर होईल व फ्रूटसॉल्ट/सोड्याने फुगून शिजताना थोडा मोठा होईल हे लक्षात घ्यावे. खालची बाजू खरपूस झाली, की पॅनवर ताट ठेवून पॅन उलटावे म्हणजे ताटात हांडवोचा तीळ व फोडणीचा खरपूस झालेला भाग वरच्या बाजूला येईल. आता पॅनमध्ये पुन्हा आधीच्यासारखीच तीळ घालून फोडणी करावी व गॅस अगदी मंद करून त्यात ताटातला हांडवो तिळाची खरपूस बाजू वर राहील अशा पद्धतीने ठेवावा/सरकवावा. आता झाकण ठेवून पुन्हा हांडवो सात-आठ मिनिटे खरपूस होईपर्यंत शिजवावा. हांडवोवरचे झाकण काढून त्यात सुरी घालून पाहावे. सुरी स्वच्छ बाहेर आली, की हांडवो शिजला असे समजावे. दोन्ही बाजूने लालसर कुरकुरीत व आत थोडा मऊसर असलेल्या हांडवोचे सुरीने चौकोनी तुकडे करून चिंचेच्या आंबट गोड चटणीबरोबर खायला द्यावेत.

टीप 

  •     यात बेसनाव्यतिरिक्त ज्वारीसारखी वेगवेगळी पिठेही घालता येतील. 
  •     गाजराऐवजी वेगवेगळ्या भाज्या किसून घालता येतील. 
  •     कांदा किंवा कांदेपात, आले, ओवा इत्यादी आलटून पालटून घातले तरी छान चव येते. 
  •     पिठे जाडसर घेतल्यास हांडवो जास्त चांगला होतो.

फोटो फीचर

संबंधित बातम्या