व्हेज पुलाव 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

कुकिंग-बिकिंग
 

सणासुदीचे दिवस आहेत. मित्रमंडळींना जमवून एकत्र जेवावे, गप्पाटप्पांची मैफील करावी असे वाटते. पण एवढा स्वयंपाक करायची हिंमत होत नाही. हॉटेलमध्ये जाऊन जेवणे किंवा मागवणे महाग पडते व तितकीशी मजाही येत नाही. छोटाच मेन्यू ठेवला तर मोठी पार्टी एकट्याने आयोजित करणे शक्‍य आहे. व्हेज पुलाव, छोले, नारळाची चटणी व कढी असा छोटासाच मेन्यू ठेवला तरी एकट्याने करणे सहज शक्‍य आहे. प्रत्येकाने एकेक पदार्थ करून आणला तर आणखीनच छान! 

आता प्रश्‍न येतो अंदाजाचा. तर वरील मेन्यू असेल तर साधारण एका वाटी तांदुळाचा पुलाव ४ जणांना पुरेल. सगळीच फक्त तरुण मुले (मुलगे) असतील तर १ वाटी तांदुळाचा पुलाव दोन किंवा तीन जणांना पुरेल. पोळ्या आणि एखादे स्टार्टर असेल तर एक वाटी तांदुळाचा पुलाव ४-५ जणांना पुरेल. 

साहित्य : चार वाट्या बासमती तांदूळ, एक वाटी गाजराचे तुकडे, २ वाट्या फ्लॉवरचे तुरे, एक वाटी हिरवा वाटाणा, १ वाटी बटाट्याचे तुकडे, १ वाटी फरसबीचे तुकडे, २ वाट्या कांद्याचे काप, अर्धे लिंबू, सव्वा वाटी साजूक तूप, अर्धी वाटी काजू, १ चमचा जिरे, १ चमचा मिरे, ५-६ तेजपाने, ८-१० लवंगा, ४-५ वेलदोडे, २ इंच होईल इतके दालचिनीचे तुकडे, २ चमचे साखर, २ चमचे मीठ. 

कृती : पुलाव करण्याच्या एखाद तास आधी ४ वाट्या बासमती तांदूळ स्वच्छ करून धुऊन घ्यावेत. गाजर, फ्लॉवर, फरसबी, बटाटा यांचे फोटोतल्याप्रमाणे तुकडे करून घ्यावेत. २-३ कांद्यांचे उभे काप करून घ्यावेत. वाटाणे धुऊन घ्यावेत. एक मोठा गंज घेऊन त्यात १०-१२ वाट्या प्यायचे पाणी घालावे व एक चमचा मीठ घालून उकळू द्यावे. पाणी खळखळून उकळू लागले, की त्यात धुतलेले तांदूळ चमचाचमचा घालावे. सगळे तांदूळ घालून झाले की घड्याळ लावून बरोबर पाच मिनिटांनी गॅस बंद करावा व मग दुसऱ्या मोठ्या पातेल्यावर एक चाळणी ठेवून त्यात ओतून सगळे पाणी काढून लगेच तो भात पातेल्यात काढावा व त्यावर झाकण ठेवावे; म्हणजे ते अर्धवट शिजलेले तांदूळ वाफेवर पूर्ण शिजतील. 

आता एका मोठ्या कढईत एक वाटी साजूक तूप गरम करत ठेवावे. त्या तुपात काजू, फ्लॉवरचे तुकडे, बटाटे, कांद्याचे काप वेगवेगळे तळून/परतून पातेल्यातील भातावर टाकावे. उरलेल्या तुपात जिरे, मिरे, तेजपान, लवंगा, वेलदोडे आणि दालचिनीचे तुकडे घालावेत. जिरे तडतडले, की मग गाजराचे तुकडे व हिरवे वाटाणे घालून जरा परतावे व झाकण ठेवून दोन मिनिटे शिजवावे. त्यानंतर झाकण काढून परतावे व मग त्यात शिजलेला भात, तळलेले बटाटे, फ्लॉवर, कांद्याचे काप, काजू इत्यादी घालावे. दोन चमचे मीठ व आवडत असल्यास साखर घालावी. लिंबू पिळून पुन्हा परतावे आणि झाकण ठेवून गॅस मंद करून ४-५ मिनिटे वाफ येऊ द्यावी. नंतर गॅस बंद करावा व झाकण काढून पाव वाटी तूप त्यात घालून, नीट मिसळून पुलाव वाढायच्या पातेल्यात/बोलमध्ये काढून घ्यावा.  हा पुलाव नुसताही छान लागतो किंवा छोले, दालफ्राय इत्यादी गोष्टींबरोबरही अप्रतिम लागतो.

टीप 
    तुपाचा धूर होऊ देऊ नये. आच मध्यम ठेवावी. 
    तळताना बटाटे व फ्लॉवर नीट शिजतील असे पाहावे. पण फ्लॉवर खूप जास्तही शिजवू नये. 
    तांदूळ शिजवताना वेळेचे गणित पाळले तरच भात छान मोकळा फुलतो. 
    गाळलेले भाताचे पाणी/पेज नुसती अथवा जिरेपूड - मिरेपूड घालून प्यायलाही छान लागते किंवा हे पाणी सूप, वरण इत्यादी पदार्थ करताना वापरावे. 
    भाज्यांचे प्रमाण बदलले तरी चालेल. फक्त, एक वाटी तांदुळाला २ वाट्या भाज्या घालाव्यात.

फोटो फीचर

संबंधित बातम्या