खिचडी-पिठले 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
गुरुवार, 17 जानेवारी 2019

कुकिंग-बिकिंग
 

थंडीच्या दिवसांत संध्याकाळी बाहेरून थकून आल्यावर झटपट करण्याचा आवडता पदार्थ म्हणजे गरमागरम वाफेभरली खिचडी आणि पिठले! पंधरा मिनिटात पौष्टिक आणि रुचकर चारीठाव जेवण तय्यार! सोबतीला तळलेला पापड आणि टोमॅटोची कोशिंबीर असेल तर मग काय विचारता! आल्या आल्या एका बाजूला कुकरमधे खिचडी शिजायला लावली, दुसऱ्या गॅसवर पिठले करायला ठेवले की ते शिजेपर्यंत पटकन कोशिंबीर तयार होते. 

खिचडीसाठी साहित्य : एक वाटी तांदूळ, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धा चमचा हळद, पाऊण चमचा मीठ, चिमूटभर हिंग व तीन वाट्या पाणी. 
खिचडीची कृती : एका मोठ्या पातेल्यात डाळ व तांदूळ एकत्र करून पिण्याच्या पाण्याने दोन वेळा धुऊन घ्यावे. जास्त चोळून धुऊ नये, कारण तसे केल्यास आवश्‍यक जीवनसत्त्वे पाण्याबरोबर वाहून वाया जातील. आता त्यात डाळ व तांदुळाच्या दुप्पट म्हणजेच तीन वाट्या पाणी, हळद, मीठ व हिंग घालून नीट ढवळून कुकरमधे ठेवून कुकर बंद करावा व गॅस मोठ्या आंचेवर ठेवावा. कुकरची शिटी होत आली की आंच कमी करून मंद आचेवर दहा मिनिटे खिचडी होऊ द्यावी व मग गॅस बंद करावा. 
फोडणीसाठी साहित्य : अर्धी वाटी तेल, १ चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, १ चमचा तिखट, पाव चमचा हळद, ३-४ सांडगी मिरच्या, ३-४ लसणाच्या कळ्या, पाव चमचा मीठ. 
फोडणीची कृती : अर्धी वाटी तेल कढईत गरम करावे. त्यात आधी ३-४ पापड तळून घ्यावे. आता तेलात क्रमाने मोहोरी व ती फुटल्यावर हिंग घालून मग त्यात लसूण सालीसकटच जराशीच ठेचून घालावी. मग सांडगी मिरच्या घालाव्यात. त्या उलटसुलट करून खरपूस तळल्या गेल्या, की मग गॅस बंद करावा. एका वाटीत किंवा लहानशा वाडग्यात तिखट, हळद व मीठ घ्यावे. त्यावर ही फोडणी एखाद मिनीट थंड झाल्यावर घालावी म्हणजे तिखट हळद जळणार नाही. याच कढईत मग पिठले करावे. 

पिठल्यासाठी साहित्य : एक वाटी बेसन म्हणजेच हरभऱ्याच्या/चण्याच्या डाळीचे पीठ, १ डाव तेल, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मोहोरी, २-३ लसणाच्या कळ्या सालीसकट, एक टोमॅटो चिरून, १०-१२ कढीलिंबाची पाने, एक हिरवी मिरची, कोथिंबीर, पाऊण चमचा मीठ व दीड ते दोन वाट्या पाणी. 
पिठल्याची कृती : टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर स्वच्छ धुऊन चिरून घ्याव्या. पाण्यात बेसन कालवून घ्यावे. कढईत डावभर तेल गरम करून घ्यावे. मग त्यात मोहोरी घालावी व ती तडतडली की ठेचलेली लसूण व हिंग घालावा. लसूण लालसर होऊ लागली, की मग त्यात चिरलेला टोमॅटो, मिरची, हळद व तिखट घालून शिजवावे. सतत परतत राहावे. टोमॅटो शिजला की त्यात पाण्यात भिजवलेले बेसन व मीठ घालावे. तीन - चार मिनिटे शिजवावे. पिठले घट्ट अथवा पातळ हवे असल्यास पाणी कमी/जास्त घालावे. 
    या खिचडीवर साजूक तूप अथवा वर दिलेली फोडणी दोन्ही छान लागते. 

टोमॅटो कोशिंबीर साहित्य व कृती : पिठले शिजेपर्यंत दोन टोमॅटो, एक कांदा, एक मिरची व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. त्यात अर्धा चमचा साखर व पाव चमचा मीठ मिसळले की चविष्ट कोशिंबीर तयार. 
वरील प्रमाणात केलेले खिचडी पिठले दोन ते तीन जणांना पुरेल.

संबंधित बातम्या