भरल्या मिरच्या

साहित्यलक्ष्मी देशपांडे
मंगळवार, 29 जानेवारी 2019

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे सदर.

सध्या बाजारात मस्त हिरव्या मिरच्या आल्या आहेत. गडद रंगाच्या फार तिखट असतात. भरल्या मिरच्या करायला जरा ठेंगण्याठुसक्‍या जाडजूड फिक्‍या हिरव्या रंगाच्या मिरच्या घेतल्या तर उत्तम. मात्र ढोबळी मिरच्या नाही. साध्याच. त्या तिखटही कमी असतील व स्वादही छान असेल. 

साहित्य - पाच-सहा जाड मिरच्या, अर्धी पाऊण वाटी बेसन, १ चमचा दही, १ चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, एक डाव तेल, अर्धा चमचा मोहोरी, चिमूटभर हिंग, कोथिंबीर. 

कृती - मिरच्या धुऊन घ्याव्यात व देठापासून टोकापर्यंत सुरीने त्याला उभा छेद द्यावा. देठ तसेच ठेवावेत. एका वाडग्यात पाऊण वाटी बेसन (हरभरा डाळीचे पीठ) घ्यावे. त्यात मीठ, तिखट, हळद, अर्धा डाव तेल, कोथिंबीर, दही व लागल्यास एक-दोन चमचे पाणी घालून कालवून गोळा करावा. आता प्रत्येक मिरचीत हे सारण भरावे. सगळ्या मिरच्या भरून झाल्या, की उरलेले अर्धा डाव तेल कढईत गरम करावे. त्यात मोहोरी व हिंग घालून मोहोरी तडतडली की भरलेल्या मिरच्या व उरलेले बेसन घालावे व सराट्याने थोडे परतावे. आता गॅस कमी करून झाकण ठेवावे. दोन मिनिटांनी झाकण काढून पुन्हा थोडे परतावे. मिरच्यांचा रंग बदलला की त्या तयार झाल्या असतील. या मिरच्या दहीभाताबरोबर, भाकरीबरोबर अथवा पोळीबरोबर तोंडीलावणे म्हणून फारच छान लागतात. आवडत असेल तर तिखट मिरच्या घ्याव्या. देठ खायचे नसतात पण मिरची उचलून खायला बरे पडते. बेसन थोडे लालसर कुरकुरीत होईपर्यंत परतले तर जास्त छान लागते.   

टीपा  :

  • दही आंबट असेल तर जास्त चांगले. 
  • दह्याऐवजी लिंबू पिळले तरी चालेल. 
  • बेसन शक्‍यतो जाडसर घ्यावे. बारीक घेतले तरी चालेल. 
  • मोहन/तेल पुरेसे नसेल तर मिरच्या पाणचट लागतात व आतले बेसन खुसखुशीत न लागता बेसनाचा गोळा खाल्ल्यासारखे वाटते. त्यामुळे तेल व्यवस्थित घालावे.

संबंधित बातम्या