बटाट्याच्या काचऱ्या 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
गुरुवार, 31 जानेवारी 2019

कुकिंग-बिकिंग
 

बटाटे न आवडणारा माणूस अजूनतरी माझ्या पाहण्यात आलेला नाही. मला स्वतःला बटाटा, त्याच्या सगळ्या फॉर्म्समध्ये (फक्त कच्चा सोडून) आवडतो. नुसता उकडलेला, नुसता भाजलेला, नुसता तळलेला, भाजीतला, वड्यातला, पोह्यातला, रश्‍शातला, वडीतला, पोळीतला, भरतातला कश्‍शाकश्‍शातही घातला तरी बटाटा छानच लागतो. नुसत्या बटाट्याच्या पदार्थांवर लिहायचे म्हटले तरी मला वाटते दोन-चारशे रेसिपीज सहज सांगता येतील. 
किलोभर बटाटे घरी आणून ठेवलेले असावेत. पटकन हाताशी उपयोगी येतात. समजा बटाट्यातून अंकुर फुटायला लागले तर ते अंकुर मोडून टाकावेत. 
लहानपणी ट्रिपला जाताना आणि प्रवासाला जाताना साजूक तुपातल्या घडीच्या पोळीबरोबर बटाट्याच्या काचऱ्या व लिंबाचे लोणचे हाच ठरलेला मेन्यू असायचा. बदल म्हणून कधी कांद्याचा झुणका. पण या दोनशिवाय तिसरी कुठली भाजी नसायची. आज बटाट्याच्या काचऱ्याच करू.

साहित्य : तीन मध्यम आकाराचे बटाटे, १ कांदा, १-२ हिरव्या मिरच्या, २-३ टेबलस्पून तेल, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, पाऊण चमचा मीठ, १ चमचा साखर, थोडीशी कोथिंबीर. 
कृती : एक मोठा कांदा सोलून त्याचा देठाजवळचा जाडसर भाग व टोकाचा भाग काढून त्याचे पातळ, लांब काप करावेत. एक मिरची धुऊन चिरून घ्यावी. बटाटे स्वच्छ धुऊन घ्यावेत. शक्‍यतो सालासकट त्यांचे पातळ काप चिरून घ्यावे. छायाचित्रामध्ये बटाट्याची साले काढलेली आहेत. पण, सालीसकट बटाटे घेतले तर चवही छान लागते, फोडीही मोडत नाहीत व सालीजवळ असलेली जीवनसत्त्वेही वाया जात नाहीत. कोथिंबीर धुऊन निथळून कोरडी झाल्यावर चिरून घ्यावी. 
एका कढईत २-३ मोठे चमचे तेल घ्यावे. तेल तापले की आच मध्यम करून त्यात क्रमाने मोहोरी, मोहोरी फुटल्यावर जिरे, जिरे फुटल्यावर हिंग, मिरच्या व कांदा घालावा आणि कांदा लालसर होईपर्यंत परतावे. मग त्यात बटाट्याचे काप घालून जरा परतावे व मग कढईवर मोठे झाकण ठेवून त्या झाकणावर एक वाटी पाणी घालावे व गॅस मंद करून शिजू द्यावे. दोन-तीन मिनिटांनी, भाजीत पाणी सांडू न देता झाकण काढावे व भाजी परतून त्यात हळद, तिखट, मीठ, साखर घालावी व पुन्हा सगळे मिसळून झाकण ठेवावे. दोन मिनिटांनी सराट्याने एखादी फोड टोचून पाहावी. शिजली असेल तर बटाट्याची भाजी/काचऱ्या भांड्यात काढून घ्याव्या. वाढतेवेळी चिरलेली कोथिंबीर घालावी. 

टीपा : 

  • बटाटे आधी चिरून ठेवायचे असल्यास चिरल्यावर फोडी पाण्यात बुडवून ठेवाव्यात, नाहीतर त्यातील आयोडीनचा हवेशी संपर्क झाल्यास बटाटे काळे पडतील. भाजी करायच्या आधी व्यवस्थित पाणी काढून टाकावे. 
  • भाजी शिजवताना पाणी घालू नये. तेलावरच शिजवावी. 
  • अशी भाजी घडीच्या पोळीबरोबरच छान लागते. भाकरीबरोबर नाही.
     

संबंधित बातम्या