तुरीच्या दाण्यांचा भात 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

कुकिंग-बिकिंग
 

साहित्य : पाऊण वाटी वासाचे तांदूळ (आंबेमोहोर, लुचई, चिन्नोर वगैरे कोणताही चालेल), पाऊण ते एक वाटी तुरीचे ओले हिरवे दाणे, पाव वाटीपेक्षा थोडे जास्त तेल, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, १.५ चमचा धनेजिरेपूड, १ चमचा गोडा/काळा मसाला, पाव वाटी सुके खोबरे, पाऊण चमचा मीठ, एक चमचा साखर, दोन हिरव्या मिरच्या, एक टीस्पून किसलेले आलं, अर्धे लिंबू, १०-१२ कढीलिंबाची पाने, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. 

कृती : भात करायच्या अर्धा - एक तास आधी तांदूळ प्यायच्या पाण्याने दोनदा धुऊन चाळणीत निथळत ठेवावेत. कोथिंबीरसुद्धा प्यायच्या पाण्याने धुऊन कापडावर सुकत ठेवावी व सुकल्यावर बारीक चिरून घ्यावी. मिरच्या बारीक चिरून घ्याव्या अथवा वाटून घ्याव्या. आले धुऊन किसून घ्यावे. खोबरे किसून लालसर भाजून मिक्‍सरमधून थोडे बारीक करून घ्यावे.

वरील पूर्वतयारी झाल्यावर कढईत पाव वाटीपेक्षा थोडे जास्त तेल घ्यावे व तेल तापल्यावर त्यात अर्धा चमचा मोहोरी व अर्धा चमचा जिरे घालून ते तडतडू लागले की जरा मोठी चिमूटभर हिंग घालावा. कढीलिंबाची पाने घालावी व जरा परतून त्यात भिजवलेले तांदूळ घालून पुन्हा छान परतावे. परतत असतानाच त्यात हळद, तिखट, धनेजिरेपूड, काळा मसाला, तुरीचे दाणे, मिरचीचे तुकडे, भाजून मिक्‍सरमधून बारीक केलेले सुके खोबरे, आले घालावे. पाच-सहा मिनिटे परतले की मग त्यात दोन वाट्या उकळते पाणी घालावे व कुकरमधे जाईल अशा भांड्यात काढावे. कुकरमधे नेहमीप्रमाणे ३ वाट्या पाणी घालून जाळी ठेवावी व त्यावर हे भाताचे भांडे ठेवावे. झाकण लावून कुकर बंद करावा व गॅस चालू करावा. एक शिटी झाली की गॅस मंद करून साधारण ८ -१० मिनिटे शिजू द्यावा व मग गॅस बंद करावा. वाढताना त्यावर ओल्या नारळाचा चव व कोथिंबीर पेरावी. भातावर साजूक तूप वाढावे. बरोबर ताटात लिंबू वाढावे. 

टिपा : 
१.     गुजरातमध्ये तुरीच्या दाण्यांना लिलवा म्हणतात. 
२.     अमेरिकेत गेले असताना फ्रोझन लिलवा/तुरीचे दाणे आणून त्याच्या कचोऱ्या केल्या होत्या. भारतातही फ्रोझन तुरीचे दाणे बिग बझार किंवा मॉलमध्ये मिळत असतील तर सीझन नसतानाही हा भात करता येईल. स्वादिष्ट लागतो. 
३.     या शेंगा सोलताना हात जरा काळे होतात. कीडही बरीच असते. पण पदार्थ चविष्ट होत असल्याने कष्ट घ्यायला हरकत नाही. 
४.     भात शिजताना डावभर सायीचे दही घातले, की सुद्धा छान चव येते. 
५.     भात कढईतही छान होतो. उकळते पाणी टाकल्यावर भात सारखा करून पाच मिनिटे खळखळून उकळू द्यावे. मग गॅस मंद करून कढईवर झाकण ठेवून आठ - दहा मिनिटे भात शिजू द्यावा. गॅस मंद केल्यावर कढईखाली तवा ठेवावा म्हणजे भात करपणार नाही. मधे झाकण बाजूला करून नीट तळापासून परतून घ्यावे व दोन चमचे साजूक तूप घालावे. घरभर छान दरवळ सुटतो.

संबंधित बातम्या