पुरणपोळी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 18 मार्च 2019

कुकिंग-बिकिंग
 

‘होळी आणि पुरणाची पोळी’ हे समीकरण प्रत्येकाच्या मनात अगदी पक्के बसलेले असते. आमच्या लहानपणी आम्ही होळी, धुळवड, रंगपंचमी यांचा मनमुराद आनंद लुटलेला आहे. चंद्रपूर, औरंगाबादला चार-पाच दिवस आधीपासून होळीची तयारी सुरू व्हायची. मोठ्या भावंडांबरोबर रानात जाऊन तिथल्या काटक्‍या, फांद्या वगैरे आम्ही गोळा करून आणायचो. धुळीतून त्या काटक्‍या ओढत आणताना खूप मजा यायची. मग मोकळी जागा पाहून होळी रचली जायची. संध्याकाळी होळीचे पूजन होऊन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जायचा आणि सगळेजण होळीभोवती प्रदक्षिणा घालत गाणी गायचे/बोंबा (हे काम पुरुषांचे असे) ठोकायचे. ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या ×× ला, बंदुकीची गोळी’ असे इंग्रज जाऊन बरीच वर्षे झाली असली तरी वीरश्रीपूर्ण, इंग्रजविरोधी नारे लावले जायचे. होळीत प्रसादासाठी नारळही टाकले जात. प्रसाद म्हणून ते भाजले गेलेले नारळ काड्यांनी बाहेर काढून त्यातील खोबरे वाटले जाई. त्यातील मस्त खरपूस भाजल्या गेलेल्या खोबऱ्याचा गंध अजूनही मनात आहे. जेवताना मग भरपूर साजूक तुपाबरोबर पुरणपोळी असे. पुरणपोळी हा असा सटीसहामाशी होणारा किंवा विशेष पाहुणे आले की होणारा पदार्थ असे. 
सासरी मात्र सणवार भरपूर. त्यामुळे पुरणपोळ्या वारंवार व्हायच्या. पायलीचे पुरण कमीतकमी घातले जायचेच. वाटीचे माप नसायचेच. ‘पुरणावरणाचा स्वयंपाक’ असे तेव्हा म्हणत. म्हणजे दोन भाज्या, दोन कोशिंबिरी, चटण्या, पापड, लिंबू, कटाची आमटी, साधे वरण, भात, मसालेभात आणि भजी किंवा वडे हे पदार्थ त्यात असलेच पाहिजे. तसेच पुरणपोळीबरोबर खायला वरणाच्या वाटीच्या अर्ध्या आकाराच्या वाटीत साजूक तूपही असे. 
आपण आज त्यातली पुरणपोळी सोप्या रीतीने कशी करायची ते पाहू, म्हणजे येत्या होळीला करता येईल. 

पुरणाकरिता साहित्य : दोन वाट्या चण्याची डाळ, अडीच वाट्या साखर (किंवा तेवढाच गूळ किंवा गूळ आणि साखर सव्वा सव्वा वाटी), चिमूटभर मीठ, एक चमचा जायफळ पूड, आवडत असल्यास अर्धा चमचा वेलदोड्याची पूड. 
(आवरणाकरता) दीड वाटी कणीक, १ वाटी मैदा, अर्धा चमचा मीठ, १ वाटी तेल, लाटण्यासाठी पिठी किंवा मैदा, अर्धी वाटी साजूक तूप. 

कृती : एका पातेल्यात दोन वाट्या चण्याची डाळ स्वच्छ धुऊन घ्यावी व त्यात चार वाट्या पाणी घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्यावी. त्याकरता कुकरची एक शिटी झाल्यावर गॅस मंद करून १५ मिनिटे डाळ शिजू द्यावी. कुकर थंड झाल्यावर डाळ बाहेर काढून त्यातील पाणी मोठ्या गाळणीने गाळून कटाची आमटी करण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे. 
कुकर होईपर्यंत कणीक व मैदा चाळून एका परातीत घ्यावा. त्यात मीठ व साधारण सव्वा ते दीड वाटी पाणी घालून पीठ चांगले पाच - सहा मिनिटे मळून घ्यावे. नंतर त्यात अर्धी वाटी तेल घालून पुन्हा चांगले मळून झाकून ठेवून द्यावे. 
कुकरची वाफ गेल्यावर गाळून घेतलेली शिजलेली डाळ मिक्‍सरच्या लहान भांड्यात घालून छान बारीक वाटून एका कढईत (असल्यास नॉनस्टिक कढईत) काढून घ्यावी. त्यात साखर किंवा गूळ बारीक करून घालावा व मध्यम आचेवर मिश्रण ढवळत राहावे. सुरुवातीला मिश्रण पातळ होईल पण जसजसे शिजवत जाऊ तसतसे ते घट्ट होत जाईल. घट्ट होत आले, की त्यात सराटा उभा ठेवून पाहावा. सराटा जर पडला तर मिश्रण आणखी शिजवावे. जर सराटा व्यवस्थित उभा राहिला तर गॅस बंद करावा. या मिश्रणात पाव चमचा मीठ व जायफळाची पूड घालावी व छान मिसळून घेऊन मिश्रण थंड होऊ द्यावे. या मिश्रणाचे मध्यम आकाराच्या लाडवाइतके गोळे करून ठेवावे. साधारण ८ ते ९ गोळे होतील. 

पुरणपोळी
कृती : भिजवून तेलात मुरलेली कणीक पुन्हा थोडी मळून घ्यावी. आता कणकेचे पुरणाच्या गोळ्याच्या अर्ध्या आकाराचे गोळे करून घ्यावे.   हाताला किंचित कोरडी पिठी लावून कणकेच्या गोळ्याची खोलगट वाटी करून पुरणाचा गोळा त्यात भरावा व नीट बंद करावा. हा गोळा किंचित चपटा करून थोडी पिठी लावून हलक्‍या हाताने पोळी लाटून घ्यावी. पुरण कडेपर्यंत छान पसरले गेले म्हणजे पोळी जमली! आता ही पोळी तव्यावर टाकून मध्यम आचेवर भाजावी. एक-दीड मिनिटांनी सराट्याने उलटावी व पोळीवर एक चमचा साजूक तूप घालावे. पोळी पुन्हा उलटावी व या बाजूवरही एक चमचा साजूक तूप घालावे. दोन्ही बाजूंनी बदामी रंग आला व पोळी फुगली, की समजावे पोळी जमली! 

टीप : 

  • पोळी जरी तुपात परतलेली असली तरी जेवताना पोळीवर पातळ केलेले साजूक तूप चमचा - दोन चमचे वाढावे किंवा लहान वाटीत तूप वाढावे. 
  • वरील साहित्याच्या आठ ते नऊ पुरणपोळ्या होतील. 
  • आपण वाटीस, सव्वा वाटी असे प्रमाण घेतले आहे. यामुळे पोळी छान गोड होते. पण कमी गोड आवडत असल्यास एक वाटी डाळीस, एक वाटी साखर घ्यावी. 
  • साखरेची पुरणपोळी अतिशय चविष्ट लागते व कोरडी भगराळ होत नाही. मऊ पण खुसखुशीत व ओलसर असते. 
  • गुळाची पुरणपोळी थोडी कोरडी असते. ती दुधाबरोबर, नारळाच्या दुधाबरोबर किंवा तुपाबरोबर खातात.
     

संबंधित बातम्या