थंडाई 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 8 एप्रिल 2019

कुकिंग-बिकिंग
 

थंडाई हा पदार्थ महाराष्ट्रातला नसावा. तसाही महाराष्ट्र गरीबगुरीब! काजू, पिस्ता, बदाम कधीकाळी सणावारालाच आणले गेले तर; अशी बहुतेक घरांमधली परिस्थिती असायची. उन्हाळ्यात थंडाव्यासाठी भाजलेल्या कैरीच्या, उकडलेल्या कैरीच्या व कच्च्या कैरीच्या पन्ह्याचे प्रकार, लिंबू, आवळा, खस, कोकम अशी स्वस्त आणि मस्त सरबते, ताक, मठ्ठा, लस्सी असे पेयप्रकारच मुख्यत्वे केले जायचे व जातात. पण उत्तर भारत, गुजरात वगैरे राज्यांमध्ये सुबत्ता असल्याने सुक्‍यामेव्याचा सढळ हाताने उपयोग केला जातो. 
आमच्या लहानपणी थंडाई/भांगेबद्दलच्या कथा ऐकल्या होत्या. ‘थंडाई म्हणजेच भांग’ हे समीकरण डोक्‍यात पक्के बसले होते व भांग प्यायलेल्या माणसांच्या सुरस आणि रम्य कथा ऐकून थंडाईबद्दल एक भीती मनात होती व कुतूहलपण होते. आमच्या लहानपणी राजेश खन्ना - मुमताजचे ‘जयजय शिवशंकर’ हे भांगगीत फारच लोकप्रिय होते. त्यानंतर अमिताभ बच्चन - संजीवकुमार - रेखाचे भांगेच्या अंमलाखालचे ‘रंग बरसे’ खूप हिट झाले. पण थंडाईबद्दलची शंका मनातून गेली नव्हती. 
पुढे घरी सहजपणे सुकामेवा भरपूर प्रमाणात आणला जाऊ लागला. अनुभवाच्या कक्षा विस्तारल्या आणि एका मैत्रिणीने आग्रहाने माझ्या डोळ्यासमोर थंडाई तयार केली व प्यायला दिली तेव्हा लक्षात आले की काय अप्रतिम पेयाला आपण मुकलो होतो. आता नेहमी थंडाईचा आस्वाद घेतला जातो. 
यावर्षीची होळी तर झाली, पण या उन्हाळ्यात इतर पेयांबरोबर थंडाईपण जरूर प्या. 

साहित्य : पंधरा-वीस काजू, १५-२० बदाम, १ टेबलस्पून पिस्ते, १ टेबलस्पून खरबुजाच्या बिया (मगज), १ टेबलस्पून खसखस, २ टेबलस्पून बडीशेप, १ टीस्पून मिरी, ५-६ वेलदोड्यांची पूड, केशराचे १५-२० पराग (काड्या), २ टेबलस्पून गुलाबजल, २ वाट्या साखर, १ गुलाबाचे फूल, १ टेबलस्पून बदाम व पिस्त्याचे पातळ काप. 
कृती : रात्री  १०-१५ काजू, १५-२० बदाम, एक टेबलस्पून पिस्ते, एक टेबलस्पून खरबुजाच्या बिया (मगज), १ टेबलस्पून खसखस, दोन टेबलस्पून बडीशेप, एक टीस्पून मिरी एका भांड्यात घ्यावे. त्यात सर्व जिन्नस बुडतील व वर थोडे राहील एवढे प्यायचे पाणी घालून भिजत घालावे. बदामही असेच वेगळे भिजत घालावे. सकाळी बदामाची साले काढून टाकावी व बदाम आणि इतर भिजवलेले पदार्थ मिक्‍सरच्या लहान भांड्यात घालून अगदी बारीक वाटून घ्यावे. वाटताना त्यात साखरही घालावी. 
आता हे बारीक केलेले मिश्रण नॉनस्टिक कढईत गाळून घ्यावे व साधारण पंधरा मिनिटे सतत हलवत मंद आचेवर उकळावे/शिजवावे. मिश्रणाचा रंग बदलेल व त्यातील साखरेचा पाक घट्ट होऊ लागेल. आता गॅस बंद करून त्यात गुलाबजल, केशर, वेलदोडेपूड घालून मिसळावे व मिश्रण थंड झाल्यावर स्वच्छ मोठ्या तोंडाच्या बरणीत/बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. महिना-दोन महिने सहज टिकते. 
थंडाई करतेवेळी दोन ग्लास थंड दूध एका मिक्‍सरच्या भांड्यात घेऊन त्यात वरील मिश्रणातील सहा-सात टेबलस्पून मिश्रण घालावे. बर्फाचे चार-सहा तुकडे घालावे व मिश्रण एखाद-दोन मिनिटे मिक्‍सरमधून फिरवून घ्यावे. जास्त गोड हवे असल्यास एका ग्लासला तीन चमच्यांऐवजी जास्त चमचे मिश्रण त्यात घालावे. 
आता ही तयार झालेली थंडाई ग्लासमध्ये ओतावी. त्यावर गुलाब पाकळ्या, केशराच्या एक-दोन काड्या आणि पिस्ता व बदामाचे काप घालून सजवावी. 

टीपा :
 दूध न घातलेली थंडाई फ्रीजमध्ये महिनाभर व फ्रीजरमध्ये सहा महिने टिकेल. 
 दूध मिसळून तयार केलेली थंडाई मात्र चार-पाच तासाच्या आत संपवावी. 
 काही ठिकाणी वाटताना थंडाईत एखाद चमचा धणेसुद्धा घालतात. 
 काहीजण यात वाटताना थोडी दालचिनीची पूडही घालतात. 
 यातील पदार्थांचे प्रमाण आवडीप्रमाणे कमीजास्त करायला हरकत नाही.
 

संबंधित बातम्या