साबुदाण्याची खिचडी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 13 मे 2019

कुकिंग-बिकिंग
 

बहुतेक सगळ्या घरांमध्ये साबुदाण्याची खिचडी हा अत्यंत आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. पूर्वी साबुदाण्याची खिचडी फक्त उपासाच्या दिवशीच व उपास असलेल्या लोकांसाठीच केली जायची. इतरांना चवीपुरतीच मिळायची. त्यामुळे अधिकच खाविशी वाटायची. आता मात्र नाश्‍त्यासाठीचा एक चांगला पर्याय म्हणून केव्हाही केली जाते. 

साहित्य : दोन वाट्या साबुदाणा, दीड वाटी शेंगदाण्याचे कूट, १ बटाटा, २ हिरव्या मिरच्या, पाव वाटीपेक्षा थोडे जास्त तूप, १ चमचा जिरे, दीड चमचा साखर, १ चमचा मीठ, आवडत असल्यास १ चमचा काश्‍मिरी मिरचीची पूड, कोथिंबीर, लिंबू.
 
कृती : सकाळी साबुदाण्याची खिचडी करायची झाल्यास रात्री एका मोठ्या पातेल्यात दोन वाट्या साबुदाणा धुऊन त्यात पाच-सहा वाट्या पाणी घालून ठेवावे. घड्याळ लावून बरोब्बर दहा मिनिटांनी पातेले तिरपे करून निघेल तितके सर्व पाणी काढून टाकावे. जास्त वेळ पाण्यात राहिला, तर खिचडीचा गच्च गोळा होईल. पातेल्यावर झाकण ठेवून साबुदाणा रात्रभर फुलू द्यावा, म्हणजे हमखास छान फुलतो. तसा साबुदाणा दोन तासात फुलतो. पण तरी एखादेवेळी व्यवस्थित फुलला नाही, तर खिचडी बिघडते. त्याकरता खिचडी करायच्या आधी साबुदाणा दोन बोटांनी दाबावा. पूर्ण छान दबला, की समजायचे-व्यवस्थित भिजला. पण जर साबुदाणा दोन तास भिजवल्यावरही कडकच असेल, एक पाण्याचा शिपका मारून किंवा एक-दोन चमचे दही घालून नीट हलवून एखादतास आणखी झाकून ठेवावा. 
    बटाटा, मिरच्या व कोथिंबीर स्वच्छ धुऊन घेऊन बटाट्याचे पातळ काप करून घ्यावेत. बटाटे सोलायची आवश्‍यकता नाही. मिरच्या व कोथिंबीर बारीक चिरून घ्याव्या. 
    
कढईत पाववाटीपेक्षा थोडे जास्त साजूक तूप तापत ठेवावे. तूप तापले, की त्यात लगेच चमचाभर जिरे घालावे. जिरे तडतडले, की बटाट्याचे काप व हिरव्या मिरचीचे तुकडे घालून हलवून झाकण ठेवावे. दोन-तीन मिनिटांनी झाकण काढून परतावे व बटाट्याची फोड सराट्याने दाबून शिजली की नाही ते पाहावे. शिजली असेल तर लगेच तुकडा पडेल. बटाटा शिजला नसेल, तर झाकण ठेवून आणखी दोन-तीन मिनिटे शिजवावा. आता त्यात साबुदाणा, शेंगदाण्याचे दीड वाटी जाडसर खमंग कूट, एक चमचा मीठ, दीड चमचा साखर घालून परतावे. (चालत असल्यास वा हवे असल्यास अर्धा पाऊण चमचा तिखट घालावे.) झाकण ठेवून आच मंद करून शिजू द्यावे. पाच मिनिटांनी झाकण काढून परतावे. शिजला, की साबुदाण्याचा रंग बदलतो. तो पांढऱ्याऐवजी पारदर्शकतेकडे झुकू लागतो. मग गॅस बंद करावा. 
    खाताना साबुदाण्याच्या खिचडीवर खवलेले खोबरे व कोथिंबीर पेरावी. बरोबर लिंबाचे आंबटगोड लोणचे व दही वाढावे.

टीपा : 

  • दोन वाट्या साबुदाणा फुलून चार वाट्या होईल. त्यात दीड ते दोन वाट्या शेंगदाण्याचे कूट हवेच. 
  • काही लोकांना साबुदाण्याची खिचडी पांढरीच आवडते. अशांनी शेंगदाणे फार लालसर भाजू नयेत व साले काढूनच कूट करावा. तिखटही घालू नये. 
  • ज्यांना साबुदाण्याची खिचडी जरा खमंग लालसर आवडते, त्यांनी शेंगदाणे भाजताना जरा जास्त लालसर खमंग होईपर्यंत भाजावे. खिचडीत तिखट घालावे. 
  • साबुदाण्याची खिचडी उपास नसेल तर तेलात केलेलीही चालते. पण साजूक तुपातली जास्त छान लागते. (वनस्पती तूप आपण तब्येतीच्या कारणाने टाळतो, पण वनस्पती तुपातली खिचडी सगळ्यात जास्त छान लागते.) 
  • उपासाला काही ठिकाणी तेल, तिखट व कोथिंबीर चालत नाही. अशावेळी त्याऐवजी तूप व हिरव्या मिरच्याच वापराव्यात. 
  • कच्च्या बटाट्याऐवजी उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालूनही खिचडी छान होते. 
  • वरील साहित्यात साधारण सहा वाट्या खिचडी होईल. चार जणांना व्यवस्थित पुरेल.

संबंधित बातम्या