टरबुजाच्या पाठीचे आप्पे 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 27 मे 2019

कुकिंग-बिकिंग

साहित्य : दोन वाट्या रवा अथवा १ वाटी रवा व १ वाटी तांदुळाचे पीठ, एका टरबुजाच्या साली (पांढऱ्या भागासह), २ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, १ चमचा मीठ, १ पाकीट इनो, ४ चमचे तेल, हवे असल्यास अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा तिखट, २ चमचे तीळ व मोहोरी. 

कृती : टरबूज चिरायच्या आधी स्वच्छ धुऊन घ्यावे. चिरून टरबुजातला लाल भाग खाण्यासाठी काढून घेतल्यावर जी साले राहातील त्यातली काही किसून त्यांचा साधारण दोन वाट्या कीस घ्यावा. मिरच्या व जिरे मिक्‍सरमधून भरड वाटून घ्यावे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. रवा अथवा तांदुळाचे पीठ चाळून निवडून घ्यावे. एका भांड्यात टरबुजाचा २ वाट्या कीस, २ वाट्या रवा, वाटलेली मिरची व जिरे, मीठ, चिरलेली कोथिंबीर एकत्र करावे व १५ मिनिटे झाकून ठेवून द्यावे. आप्पेपात्राला आतून तेल लावून घ्यावे, आप्पेपात्र गरम करायला गॅसवर ठेवावे. 

वरील मिश्रणाला थोडे पाणी सुटले असेल व रवाही त्यात भिजून फुगला असेल. हे मिश्रण नीट मिसळून त्यात आवश्‍यकता वाटल्यास अर्धा ते एक वाटी पाणी घालून भज्याच्या पिठासारखे कालवावे व त्या पिठाचे दोन भाग करावेत. एक भाग घेऊन त्यात पाकिटातले एक चमचा इनो घालून मिक्‍स करावे म्हणजे मिश्रण फुगून हलके होईल व त्यात बुडबुडे येतील. आप्पेपात्राच्या प्रत्येक खळग्यात पहिल्यांदा मोहोरी व तीळ थोडेथोडे घालून मोहोरी फुटू लागताच हे मिश्रण लगेच अर्ध्या पाऊण उंचीपर्यंत भरावे व झाकण ठेवावे. गॅस मध्यम किंवा मंदच ठेवावा. दोन-तीन मिनिटांनी झाकण काढून पाहावे. आप्पे फुगून मोठे झाले असतील. आप्पे कडेने लालसर होऊन सुटले असतील, तर आप्पेपात्राबरोबर येणाऱ्या काडीने फिरवून आप्पे उलटावे. कडेने थोडे तेल सोडावे. दुसऱ्याही बाजूने लालसर होईपर्यंत शिजू द्यावे व मग काढावे. हिरव्या चटणीबरोबर छान लागतात. याचप्रमाणे उरलेल्या मिश्रणाचेही आप्पे करून घ्यावे.

टीपा : 
     वरील मिश्रणात हवे असल्यास बारीक चिरलेला कांदाही घालायला हरकत नाही. छान लागतो. 
     कधी हळद, तिखट, तीळ वगैरे बदल म्हणून घालायला हरकत नाही. 
     वरील मिश्रणात २४ आप्पे होतील. ३-४ जणांना नाश्‍त्याला पुरतील. 
     कलिंगडाचे उरलेले साल चिरून त्याची भाजी करावी. तीही छान लागते. 

संबंधित बातम्या