गाजर पत्ताकोबीचे पराठे 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 1 जुलै 2019

कुकिंग-बिकिंग
 

सारणाकरता साहित्य : एक वाटी गाजराचा कीस, १ वाटी पत्ताकोबीचा कीस, २ तिखट हिरव्या मिरच्या, २-३ लसणाच्या पाकळ्या, २ टेबलस्पून तेल, १ वाटी बेसन, पाऊण चमचा मीठ, १ चमचा साखर, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरेपूड, १ चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंगाची पूड. 

स्टफिंग करण्याची कृती : गाजर, पत्ताकोबी, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या स्वच्छ धुऊन घ्याव्या. गाजर व पत्ताकोबी किसून घ्यावे व मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. लसणाच्या पाकळ्या सोलून बारीक करून घ्याव्या. अथवा गाजर, पत्ताकोबी, मिरच्या, कोथिंबीर व लसूण पाणी न घालता प्रोसेसरमधून बारीक करून घ्यावे. पेस्ट करू नये. 
नॉनस्टिक कढईत दोन टेबलस्पून तेल गरम करावे. त्यात जिरे घालून तडतडू द्यावे. लगेच त्यात हिंग घालून बारीक केलेला लसूण, हिरवी मिरची, पत्ताकोबी, गाजर, कोथिंबीर घालून परतावे व झाकण ठेवावे. दोन मिनिटांनी झाकण काढून त्यात एक वाटी बेसन, हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड, मीठ, साखर घालून परतावे व पुन्हा झाकण ठेवून दोन मिनिटांनी गॅस बंद करावा. छान गोळा झाला पाहिजे. थंड झाल्यावर वरील साहित्याचे सात ते आठ लहान गोळे करून घ्यावे. 

पारीकरता साहित्य : तीन वाट्या कणीक, पाऊण चमचा मीठ, दीड चमचा पिठीसाखर, ३ टेबलस्पून तेल, दीड वाटी पाणी. 
वरील सगळे साहित्य एकत्र करून कणकेचा छान गोळा करून घ्यावा. फार घट्ट वाटल्यास एखाद-दोन चमचे पाणी आणखी घालावे. गोळ्याला तेलाचा हात लावून गोळा १५-२० मिनिटे झाकून ठेवून द्यावा. त्यानंतर गोळा थोडा मळून त्याचे सात - आठ लहान गोळे करून घ्यावे. 

पराठ्यांची कृती : कणकेचे आठ - नऊ व सारणाचे तितकेच गोळे तयार करावे. त्यातील कणकेचा एक गोळा घेऊन हातावर दाबून चपटा करावा. मग दोन्ही हाताच्या अंगठा व बोटांनी कडेने दाबत खोलगट करावा. हा खोलगट भाग डाव्या तळहातावर ठेवून त्यात सारणाचा गोळा ठेवून कणकेचा गोळा नीट बंद करावा. हाताने हलकेच गोळा गोल करून मग कोरडे पीठ किंवा तांदळाची पिठी घेऊन त्याचा जरा जाडसर पराठा लाटावा. तव्यावर टाकल्यावर अर्ध्या मिनिटाने चमचाभर तेल पराठ्यावर टाकून पसरावे व पराठा उलटावा. पराठा उलटल्यावर दुसऱ्या बाजूवरही एक चमचा तेल पसरावे. साधारण एक-दीड मिनिटांनी खालच्या बाजूवर बदामी/लालसर रंग आला, की पराठा पुन्हा उलटावा. दुसऱ्या बाजूने लालसर झाला, की तव्यावरून काढावा. पराठे मध्यम आचेवर भाजावे. वरील साहित्यात साधारण आठ-नऊ पराठे होतील.  

टीप : दह्याच्या रायत्याबरोबर, सॉसबरोबर, कैरीच्या लोणच्याबरोबर किंवा लिंबाच्या गोड लोणच्याबरोबर हे पराठे छान लागतात.

संबंधित बातम्या