दुधीची कोफ्ता करी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 8 जुलै 2019

कुकिंग-बिकिंग
 

बरीच मुले भाज्या खात नाहीत. काही मोठी माणसेपण बटाटे सोडून दुसऱ्या भाज्या खात नाहीत. अशा खोड्याळ लोकांच्या पोटात येनकेनप्रकारेण वेगवेगळ्या भाज्या जाव्या, म्हणून अनंत काळापासून त्यांच्या आया प्रयत्नशील राहिल्या आहेत. दुधी हाही असा बहुतेकांना न आवडणारा पदार्थ! माहेरची मंडळी पहिल्यांदाच घरी आल्यावर सासूने दुधीची (अनग्लॅमरस) भाजी (स्वस्त म्हणून?) केल्यामुळे सासूबद्दल कायमची अढी बसलेली मुलगीही माझ्या पाहण्यात आहे. 
दुधी आवडतो, पण मला ढेमशीही आवडतात, कार्लेही आवडते आणि गिलकीही आवडतात! त्यामुळे या आवडण्याला अर्थ नाही असे दुधीच्या वाट्याला न जाणारे लोक म्हणतील. पण दुधीपासून खीर, दुधी हलवा, दुधीच्या वड्या असे अफलातून पदार्थ करणाऱ्या सुगरणी आपल्याला घराघरांमधे आढळतातच. अशाच एखाद्या सुगरणीच्या मनात शिजलेली दुधीची मस्त कोफ्ताकरी आपण आज करू आणि दुधीबद्दलची तुच्छता/नावड मनातून काढून टाकू.

साहित्य : अर्धा लहान कोवळा दुधी, १ गाजर (१ वाटी दुधीचा कीस व १ वाटी गाजराचा कीस घ्यावा), २ लहान कांदे, २ लहान टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, ४-५ लसणीच्या कळ्या, दीड इंच आले, २ चमचे धनेपूड, १ चमचा जिरेपूड, १ चमचा काश्‍मिरी तिखट, अर्धा चमचा गरम मसाला/चिकन मसाला, १ चमचा मीठ, १ चमचा साखर, पाऊण वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटी खवा अथवा एक वाटी दूधपावडर, चिमूटभर (पाव चमचा) सोडा, कोथिंबीर. 

कृती : दुधी, गाजर, मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर, आले स्वच्छ धुऊन घ्यावे. साले न काढता दुधी व गाजर किसून घ्यावे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. आले किसून घ्यावे, लसूण सोलून घ्यावा. चण्याची डाळ दोन तास भिजवून घ्यावी. कांदे सोलून त्यांचे चार तुकडे करून घ्यावे. 
    मिक्‍सरच्या भांड्यात लसूण, आल्याच्या किसापैकी एक चमचा कीस, कांद्याचे तुकडे, हिरवी मिरची, टोमॅटोचे तुकडे छान बारीक वाटून घ्यावे. कढईत चार टेबलस्पून तेल तापत ठेवावे व त्यात हे वाटलेले जिन्नस घालून मध्यम आचेवर सतत परतत चांगले खरपूस लाल होऊ द्यावे. मग त्या खरपूस गोळ्यात १ चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद, १ चमचा काश्‍मिरी तिखट, अर्धा चमचा गरम मसाला घालून परतावे व मग त्यात ४ वाट्या पाणी, १ चमचा साखर व चवीनुसार पाऊण ते १ चमचा मीठ घालून छान ४-५ मिनिटे उकळावे. गॅस बंद करावा. 
    मिक्‍सरच्या भांड्यात किसलेल्या दुधी व गाजरापैकी अर्धी वाटी दुधीचा व अर्धी वाटी गाजराचा कीस, भिजवलेली चण्याची डाळ, १ चमचा आल्याचा कीस, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा साखर, १ हिरवी मिरची, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, १ चमचा धनेपूड घालून बारीक करून घ्यावे. 
    एका मोठ्या भांड्यात मिक्‍सरमध्ये वाटलेले हे साहित्य काढून त्यात उरलेला दुधीचा कीस व गाजराचा कीस, चिरलेली कोथिंबीर, पाऊण वाटी दूध पावडर (किंवा अर्धी वाटी खवा), पाव चमचा सोडा व अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालून एकत्र गोळा करावा. कढईत तेल तापवून मध्यम आचेवर गॅस ठेवून या गोळ्याचे लहान लहान गोळे/कोफ्ते करून लालसर तळून घ्यावे. 
    जेवायच्या वेळी रस्सा उकळेपर्यंत गरम करावा व त्यात हे गोळे घालावे. गॅस बंद करावा आणि वरून कोथिंबिरीने सजवावे.

टीपा  :

  • कोफ्ता रश्‍श्‍यात घातल्यावर फुलतो म्हणून तळताना लहानच गोळे करावे. 
  • कोफ्त्याचा गोळा खूप घट्ट झाला तर रस्सा आतपर्यंत मुरत नाही. म्हणून थोडा सैलसरच ठेवावा. 
  • कोफ्त्याचे गोळे तळता-तळताच त्यापैकी अर्धे ‘चव बघू, चव बघू’ म्हणत संपतात. त्यामुळे अंदाज थोडा जास्तच ठेवावा. 
  • वरील साहित्याची भाजी ४-५ जणांना पुरेल.

संबंधित बातम्या