नटरंगी ग्रीष्म

प्रिया भिडे
रविवार, 7 जून 2020

कव्हर स्टोरी
उन्हाळ्यातले दिवस आणि उन्हाळ्यातल्या रात्री, दोन्ही सुंदर. दोन्ही आपापले वेगळे रूप घेऊन येतात. विविधतेने नटलेला हा ग्रीष्म ऋतू नटरंगी आहे. जेमतेम दोन महिन्यात अनेक रंग दाखवतो. एखादा दिवस, सगळीकडे कुंद उष्मा दाटतो, झाडाचे पानही हलत नाही. एखाद्या दिवशी अचानक कधीतरी वावटळ येते. दूर पश्चिमेकडे काळे ढग जमतात, त्यांच्या मागून विजेचा लपंडाव सुरू होतो आणि मग एक दिवस ढग बरसतात. वळिवाचा हा पाऊस तृषार्त, भेगाळलेल्या जमिनीला, ग्रीष्माच्या दाहाने पोळलेल्या तनामनाला चिंब भिजवतो.

महाकवी कालिदासाच्या ऋतुसंहार काव्याची सुरुवात ग्रीष्म ऋतूने होते.
प्रचंड सूर्य: स्पृहणीय चंद्रमा:
सदावगाहक्षमवारीसश्चय:
दिनांतरम्योSभ्युपशान्त मन्मथ:
निदाघकालोS यमुपागत: प्रिये  

म्हणजे ग्रीष्म ऋतू आला आहे, या ऋतूत प्रखर सूर्य व सुंदर चंद्र असतो, स्नानास पुरेसे पाणी असते, रम्य सायंकाळ असते, मदन शांत झालेला असतो. या ओळींनी ग्रीष्म ऋतूतला तेजस्वी सूर्य आणि शीतल चंद्र किरणांचा दोन्हीचा अनुभव आपल्याला येतो. ऋतूसंहारात तप्त धरणी, म्लान सृष्टी, जंगलातले मोर, सर्प, वराह, हरणे, अगदी हत्तीसुद्धा पाण्याच्या शोधात वणवण भटकताना दिसतात. 

ग्रीष्म ऋतूमध्ये उत्तरायण असते, सूर्य हळूहळू उत्तरेकडे चालत असतो, उन्हाचा ताव वाढत असतो. निसर्गाच्या नियमित चक्राला आपण ऋतूमध्ये गुंफले आहे. वैशाख महिन्यात ग्रीष्माची चाहूल लागते, उन्हाची दाहकता वाढत जाते. ‘ग्रीष्माची चाहूल’ कवितेत ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज लिहितात,
अग्नीचा घट खांद्यावरती
घेऊनी, अग्नि पेरीत भवति
निघाला येण्या जगती
चाहूल तयाची लागत असे, 
हे काय अनामिक आर्त पिसे 

पुढे येणाऱ्या तीव्र, रूक्ष दिवसाची जणू अनामिक हुरहूर सगळ्यांच्याच मनात दाटून जाते, कारण सूर्याची प्रखरता, त्याचे तेज आपल्याला क्षीण करते. पण सूर्यतेजाने सृष्टी पल्लवित झालेली दिसते. अनेक वृक्ष हिरव्या नवेपणाचा साज लेऊन झुलू लागतात. अजूनही गळलेली पाने उदासपणे झाडाच्या बुंध्याजवळ पडून असतात. 

पिंपळ, कडुलिंबाची कोवळी ताम्रवर्णी पाने आता हिरवी झालेली दिसतात. पिवळ्या लिंबोण्या लटकलेल्या दिसतात. या लिंबोण्या कधी खाऊन बघितल्या आहेत का तुम्ही? छान लागतात. पक्ष्यांना खूप आवडतात. शिरिषाच्या झाडाची नाजूक परागांची सुवासिक फुले सुकून त्याची शेवाळी मखमल झाडाखाली विसावलेली दिसते. त्याच्या गर्द हिरव्या पानांमधून दोन चार फुले आणि पोपटांना आवडणाऱ्या शेंगा डोकावताना दिसतात. एरवी अस्तित्वही आपल्याला जाणवणार नाही असा बहावा म्हणजे ग्रीष्मसखा. हा आपल्या नसानसात सुवर्णकण साठवतो, ग्रीष्मात सगळी सुवर्णखाण आपल्यासाठी उधळतो. अमलताश, कर्णीकार नावाने परिचित असलेला बहावा फुललेला पाहिला की माणूस थबकतोच. लांबच लांब पिवळ्या फुलांचे सुंदर घोस वाऱ्यावर हलकेच डोलताना बघणे याचा आनंद काही औरच. वनकन्या कर्णीकराचे झुबे कानात घालत असत, असे अनेक उल्लेख संस्कृत साहित्यात आढळतात. खरेच या सोन फुलांचा मोह न पडला तरच नवल. याचे फुलांचे घोस वरपासून खाली उमलत जातात, वसंतात फुलायला लागलेला बहावा ग्रीष्मअखेरपर्यंत फुलत राहतो. ताम्हण हा देखण्या फुलांचा वृक्षही नाजूक पाकळ्यांची जांभळी फुले लेऊन सजून बसलेला असतो. एकीकडे डोळ्यांना थंडावा देणारे बहावा, ताम्हण तर एकीकडे गर्द फुलांचा अंगार अंगावर मिरवणारा पळस आणि पांगारा दिसतो. या पांगाऱ्याबद्दल ज्येष्ठ कवियत्री इंदिरा संत लिहितात,
सूर्यपासक पांगाऱ्यावर
प्रसार फुलतो अंगाराचा
तोच जाणतो माझ्या मनीचा
सुवास दाहक अग्नी फुलांचा

अंगाखांद्यावर अंगार मिरवणारे खूप काही वृक्ष आहेत. जसा गुलमोहोर, ग्रीष्म येताच गर्द लाली अंगावर मिरवतो. अतिशय आकर्षक दिसणारा हा वृक्ष ग्रीष्म ऋतूची गुढी उभारतो. लहानपणी याच्या आंबट-गोड पाकळ्या खाल्लेल्या आजही आठवतात. गर्द पिवळा बहावा, जांभळे ताम्हण, रक्तवर्णी गुलमोहोर या रंगांच्या मधे आपल्या राजस फुलांचा संभार ल्यायलेला गुलाबी रंगछटांचा कॅशिया लोकांचे लक्ष वेधून घेत राहतो. विशाल विस्तार, गर्द पर्णसंभार अन् फुलांच्या भारानी लवलेल्या फांद्या, म्हणजे अनुपम सौंदर्याचा निसर्गाविष्कार. सायंकाळच्या वाऱ्याच्या मंद झुळुकेसरशी पाच पाकळ्यांची नाजूक फुले अलगद खाली उतरतात, रस्त्यावर गालिचा घालतात. याच्या जोडीला पेल्ल्तोफोरमचा सोनमोहर असाच गर्द हिरवाईवर उठून दिसतो, त्याचे काही वृक्ष ताम्रपर्णी शेंगांनी लगडून गेलेले दिसतात. शुष्क वाटणाऱ्या फांद्यांवर पांढरी, गुलाबी, लिंबोणी, राणी रंगाची मंद सुगंधाची फुले लेऊन स्तब्ध उभा असणारा देवचाफा, त्याला विसरून कसे चालेल. हे सगळे ग्रीष्म सौंदर्य डोळ्यात साठवत जात असताना एखाद्या वळणावर भेटेल शांत सावली देणारे, हिरवाईचे सुगंधी लेणे, बकुळीचे झाड. छोटेसे, सुबक, कर्णभूषण म्हणून घालावे असा मोह व्हावा असे बकुळ फुल म्हणजे अक्षय सुगंध कुपी. जमिनीवर पडलेली फुले वेचून त्याचा एकसर करायचा आणि घराचा एखादा कोपरा सुगंधी करायचा. करून बघाच एकदा. मैत्रीण जानकीताई कुंटे या बकुळ फुलांचा ‘बकुळ कंद’ करते. आपण गुलकंद करतो तसाच. क्वचित कधी खोकला झाला तर बकुळ कंदाची मात्रा तयार. मला मात्र उन्हाळ्यातला बकुळ फुलांचा सडा आठवतो तो गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन मधला. बकुळ वृक्षांच्या भोवतीचे ते विस्तीर्ण पार, त्यावरचा नाजूक फुलांचा सडा. चार भिंतींत शिक्षण न देता या बकुळ वृक्षांच्या खाली  ज्ञानार्जन होत असे, ही कल्पनाच किती सुंदर आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या निसर्गप्रेमाची साक्ष ते वृक्ष देत होते, तेथील दोन बकुळ फुले उचलून मी आजही गीतांजलीमध्ये ठेवली आहेत, उन्हाळ्यातली एक गंधित आठवण म्हणून.

एकीकडे दिसतो फुलांची उधळण करणारा ग्रीष्म, तर एकीकडे दिसतो झाडांच्या अंगाखांद्यावर बाळे खेळवणारा ग्रीष्म.

कवयत्री इंदिराबाई संत म्हणतात,
कुटुंबवत्सल इथे फणस हा
कटी खांद्यावर घेऊनी बाळे
तिथे त्याला कुशल मुलांचे
गंगाजळीचे बेत आगळे 

लेकुरवाळा फणस मोठा गोंडस दिसतो, पण खरा तोरा कुणाचा तर आम्रवृक्षाचा. याच्या अंगाखांद्यावर कैऱ्या झुलत राहतात, पाड लागलेले पिवळे आंबे बघून पोपटांचे थवे झेपावत राहतात. लहान मुलांचे नेमबाजीचे प्रयोगही सुरू होतात. वाचलेले आंबे आढीत विराजमान होतात, आपल्या रसना तृप्तीसाठी.

या सगळ्याला कारण सूर्य. सृष्टीला संजीवक ठरणाऱ्या सूर्याचे पुरुषोत्तम बुवा दारव्हेकर यांनी फार सुंदर वर्णन केले आहे. ते लिहितात,
ज्योतिर्मय मूर्ती तुझी तुझी गृह मंडल दिव्या सभा
दाहक परी संजीवक तरुण किरणप्रभा
होवो जीवन विकास वसुधेची राख लाज
हे दिनमणी व्योमराज...

तेजोनिधी लोह गोलाचे संजीवक तेज पिऊन सृष्टी नवनिर्मिती करते, पण सगळीकडे हा असाच चैतन्यमयी निसर्ग असतो का? नाही. रानोमाळी तो फारच रखरखीत असतो. कारण हा सूर्यच. या सूर्याचे अजूनही एक नाव आहे अंबुचोर, कारण हा हळूहळू पाणी चोरत जातो. जमीन शुष्क होते, तळी आटून जातात, उरतो तो फक्त अंगार; तो कधी तरी अनुभवायलाच हवा.

वर्षा ऋतूत आपण आवर्जून सहलीला जातो. ग्रीष्माचा दाह अंगावर घेत करपून जात, रानोमाळ भटकंती करण्यातही एक वेगळी नशा असते. एका उन्हाळ्यात निघोजचे रांजणखळगे बघायला गेलो. कुकडी नदीवरचे कातळशिल्प, नदीच्या प्रवाहामुळे तयार झालेले मोठाले रांजण बघायला जाताना, गाडी रस्त्याकडेला लावून कातळावरून चालत जावे लागते, पुढे कुकडीचा नाजूक प्रवाह व दोन्ही बाजूला पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेली देखणी त्रिमितीय शिल्पे डोळे भरून पाहिली. परतताना मात्र सूर्य चांगलाच डोक्यावर आला होता. तापलेल्या कातळावर आमची पावले पडत होती, नजर सावली शोधत होती, दूरवर एक बाभूळ दिसली. काळीभोर कांती आणि अंगावर पिवळ्या गोंड्याचे वस्त्र घालून डौलात एखाद्या रानकन्येसारखी उभी होती. देखणी दिसत होती. सूर्य वर आल्यामुळे तिच्या डौलदार छत्रीची छान सावली पडली होती. आम्ही तिथे विसावलो. जेवण केले. बाभळीची सावली एवढी शीतल असते हे पहिल्यांदाच कळले.

ग्रीष्मातली ही मध्यान्हीची वेळ कधीतरी कवी मंगेश पाडगावकर यांनी अनुभवली असणार. म्हणूनच ते लिहितात,
ग्रीष्मामधल्या भर माध्यान्ही जेव्हा
निपचित मूर्च्छित पडून असते माती
शिरी तप्त का झेलीत डोंगर बसती
शून्यपणाने, खिन्नपणाने झाडे 
पहात बसती मृगजळ झुळझुळणारे

या मध्यान्हीच्या वेळा, तनामनाची तलखी करतात. या तलखीचा अनुभव गेल्या वर्षी नगर जिल्ह्यात घेतला. काळे कभिन्न कातळ, वर निर्जीव दिसणारे गवतांचे पुंजके, आजूबाजूला खुरटलेले ऐन वृक्ष. सारे निस्तेज उदास वाटत होते. ठिकठिकाणी दिसणारे गवतांचे पुंजके निर्जीव वाटले तरी तग धरून होते. गवत हुशार असते. जगायच्या गरजा कमी करून उपलब्ध पाण्यावर तगून राहायचे, वाळून जायचे पण जगायचे आणि एका पावसाचे पाणी पिऊन तरारून यायचे हे यांचे जीवन तत्त्व. त्यामुळे सुकलेली सोनसळी माळराने शुष्क वाटली तरी हरणे, चिंकारा, माळढोक, तृणमोर, सरडे, सर्प अशा अनेक जीवांचे अधिवास असतात. या माळरानाला धोका असतो वणव्याचा. कधी नकळत तर कधी जाणीवपूर्वक पडलेल्या ठिणगीचा. वणव्यात जळणारा निसर्ग पाहणे फारच क्लेशकारक.

ग्रीष्मातला दिवस दाहक असला, तरी संध्याकाळी मात्र श्याम सिंदुरी असतात, पश्चिमेकडे सिंदूर रंग उधळतात. मंद वारा वाहतो. पिंपळवृक्ष सळसळतो. दिवसा पानांची ही सळसळ चैतन्यमयी वाटते तर रात्री गूढ. त्यातच कधी एखादी टिटवी टिवटिव करत साथीदाराला साद घालते, तर कधी पिंगळ्याची धुसफूस ऐकू येते. एव्हाना सूर्य पूर्ण बुडतो आणि सुरू होते चंद्राचे राज्य.

ग्रीष्मातल्या रात्री चंद्ररसात न्हाऊन येतात. चांदण्याची पखरण करतात. अशा चांदण्यारात्री वाऱ्याची मंद झुळूक तनामनाला उभारी देते. उन्हाळ्यातील दिवसभराचा थकवा घालवायचा तर रात्रीचा थंडावा अंगावर घेत गच्चीवर चांदण्या बघत झोपायचे. गच्चीवरच्या झोपण्याच्या बालपणीच्या आठवणी, भुताच्या गोष्टी, पत्त्यांचे डाव, रात्री अचानक आलेल्या वाऱ्याने उडालेली तारांबळ... सगळेच न विसरता येण्यासारखे. वैशाखी पौर्णिमेला तर सारा आसमंत जणू चंद्रामृताचे तळेच होतो. गीतकार गुलजार यांना या चांदण्यारात्री सापडतात काही फुरसतीचे क्षण, ते लिहितात
या गरमियों की रात जो पुरवाईयाँ चलें ठंडी सफ़ेद चादरों पे जागें देर तक तारों को देखते रहें छत पर पड़े हुए दिल ढूँढता है, फिर वही फ़ुरसत के रात दिन

पूर्वेकडून येणारा शीतल वारा आणि प्रिय सख्यांची चांदण साथ, हे अनुपम सौख्य ग्रीष्मातच मिळणार. या रात्रीचे किती काव्यात्म वर्णन आहे नाही का? त्यात दूर कोठून तरी बासरीचे स्वर कानावर आले तर फारच बहार!

उन्हाळ्यातले दिवस आणि उन्हाळ्यातल्या रात्री, दोन्ही सुंदर. आपापले वेगळे रूप घेऊन येतात. विविधतेने नटलेला हा ग्रीष्म ऋतू नटरंगी आहे. जेमतेम दोन महिन्यांत अनेक रंग दाखवतो. एखादा दिवस, सारी सृष्टी जणू निश्चल होते, वारे पडते, सगळीकडे कुंद उष्मा दाटतो, झाडाचे पानही हलत नाही. एखाद्या दिवशी अचानक कधीतरी वावटळ येते, धुरळा उडतो, झाडाखालचा उदास पाचोळा भिरभिर वर उडतो. दूर पश्चिमेकडे हत्तीसारखे काळे ढग जमतात. काळ्याकुट्ट ढगांच्या मागून विजेचा लपंडाव सुरू होतो. एखाद-दोन दिवस असेच नाट्य सुरू राहते आणि एक दिवस काळेकुट्ट ढग बरसतात. वळिवाचा हा पाऊस तृषार्त, भेगाळलेल्या जमिनीला, ग्रीष्माच्या दाहाने पोळलेल्या तनामनाला चिंब भिजवतो. पर्जन्यधारांनी सृष्टीला तजेला येतो, अचानक कुठेतरी मृगाचे मखमली, लालबुंद किडेही दिसतात. एक-दोन दिवसांत हे पर्जन्यनाट्य संपते अन ग्रीष्माचा दाहक अंक पुढे सुरूच राहतो... वर्षा ऋतू येईपर्यंत!

संबंधित बातम्या