पकोडे, कटलेट आणि कबाब

आरती पागे
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

पावसाळ्यात नुसते ढग जरी जमा झाले, तरी खमंग चमचमीत खायची इच्छा होते... आणि मग धुवांधार पाऊस बरसायला लागला की ही इच्छा पूर्ण व्हायलाच पाहिजे, असं आपलं मन सांगू लागतं. त्यासाठीच आहेत या चविष्ट पकोडे, कबाब आणि कटलेटच्या रेसिपीज...

व्हेज नूडल्स पकोडा 
साहित्य - दोनशे ग्रॅम व्हेज हक्का नूडल्स, १ गाजर, १ हिरवी ढोबळी मिरची, अर्धी वाटी कोबी, १ हिरवी मिरची, १ कांदा (सर्व बारीक चिरलेले), अर्धी वाटी बेसन, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती - एका भांड्यात २ वाट्या पाणी गरम करावे आणि त्यात नूडल्स उकडून बाजूला ठेवाव्यात. (टेस्ट मेकर मसाला घालू नये.) एका भांड्यात सर्व भाज्या एकत्र करून त्यात बेसन, चवीनुसार मीठ आणि टेस्ट मेकर मसाला घालून एकत्र करावे. आता त्यात उकडलेले नूडल्स घालून घट्ट मळून घ्यावे (पाणी घालू नये). मिश्रणाचे छोटे गोळे करून गरम तेलात डीप फ्राय करावेत. गरमागरम व्हेज नूडल्स पकोडे सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करावेत.

दलिया पकोडा 
साहित्य - एक वाटी दलिया/गव्हाचा भरडा, अर्धा छोटा चमचा तेल, पाव वाटी बेसन, १ कांदा, १ हिरवी मिरची (दोन्ही बारीक चिरलेले), पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा जिरे, अर्धा छोटा चमचा ओवा, अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा किंवा फ्रुट सॉल्ट (इनो), चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी, तळण्यासाठी तेल.
कृती - प्रथम दलिया/गव्हाचा भरडा धुऊन घ्यावा. कुकरमध्ये दलिया, २ वाट्या पाणी, चवीनुसार मीठ आणि  अर्धा छोटा चमचा तेल घालून ४ ते ५ शिट्ट्या कराव्यात. कुकर थंड झाल्यावर उघडून दलिया उकडला का ते पाहावे. पाणी शिल्लक असल्यास कुकर मध्यम गॅसवर ठेवून पाणी आटवून घ्यावे. दलिया थंड झाल्यावर त्यात सर्व भाज्या, बेसन, तेल, मीठ, सोडा, हळद, जिरे आणि ओवा घालून एकत्र करावे. गरजेनुसार पाणी मिसळून घट्ट मळून घ्यावे. आप्पे पात्राला तेल लावावे आणि मध्यम गॅसवर गरम करून घ्यावे. त्यात बॅटर घालून दोन दोन मिनिटे दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे (पकोडा आतून नीट शिजेपर्यंत आणि बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावा). आप्पे पात्र नसल्यास कढईत गरम तेलात डीप फ्राय करावे. सॉसबरोबर सर्व्ह करावे.

मखाना भजी 
साहित्य - शंभर ग्रॅम मखाना (कमळाच्या बिया) तुपात भाजून, अर्धी वाटी बेसन, १ कांदा, १ हिरवी मिरची (दोन्ही बारीक चिरलेले), १ छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा तिखट, पाव वाटी चिरलेली कोथिंबीर, ७-८ बारीक चिरलेली कढीपत्ता पाने, चवीनुसार मीठ, चवीनुसार चाट मसाला, गरजेनुसार पाणी.
कृती - सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र करावे. गरजेनुसार पाणी घालून त्याचे घट्ट बॅटर तयार करावे. आप्पे पात्राला तेल लावावे आणि मध्यम गॅसवर गरम करून घ्यावे. त्यात बॅटर घालून दोन दोन मिनिटे दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे (पकोडा आतून नीट शिजेपर्यंत आणि बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत भाजावे). गरमागरम पकोडे डिशमध्ये काढून त्यावर चाट मसाला भुरभुरावा आणि सर्व्ह करावे.

काबुली चना पकोडा
साहित्य - एक वाटी छोले/काबुली चणे (८ तास भिजवलेले), १ कांदा, १ मोठा चमचा हिरवी मिरची, १ मोठा चमचा लसूण, १ मोठा चमचा कोथिंबीर, १ मोठा चमचा पुदिना (सर्व बारीक चिरलेले), १ छोटा चमचा तिखट, पाव छोटा चमचा बडीशेप, चवीनुसार मीठ.
कृती - प्रथम भिजवलेले चणे मिक्सरमधून जाडसर दळून घ्यावेत. मग त्यात बाकीचे साहित्य छान एकत्र करून घ्यावे. आप्पे पात्राला तेल लावावे आणि मध्यम गॅसवर गरम करून घ्यावे. त्यात मिश्रण घालून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे (पकोडा आतून नीट शिजेपर्यंत आणि बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत भाजावे). गरमागरम सर्व्ह करावे.

तंदुरी आलू टिक्का 
साहित्य - तिनशे ग्रॅम छोटे बटाटे (उकडून, साले काढून), पाव वाटी चक्का, २ मोठे चमचे बेसन, १ इंच आले, ४ पाकळ्या लसूण (दोन्ही बारीक चिरलेले), १ मोठा चमचा कसुरी मेथी, अर्धा छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा चाट मसाला, १ छोटा चमचा गरम मसाला, पाव वाटी बारीक चिरलेला पुदिना, १ मोठा चमचा तूप, चवीनुसार मीठ, कोळसा. 
कृती -  बटाटे सोडून इतर सर्व साहित्य एकत्र करावे. मिश्रणात बटाटे घालून ३० मिनिटे मॅरिनेट करावेत. एक मोठा चमचा तूप गरम करावे आणि मिश्रण त्यात घालावे. बटाटे सोनेरी होईपर्यंत परतावेत. कोळशाचा तुकडा गॅसवर गरम करून घ्यावा. बटाट्यांच्या मध्यभागी एक वाटी ठेवावी आणि त्यात गरम कोळसा ठेवावा. त्यावर थोडे तूप घालावे आणि भांड्यावर झाकण ठेवावे. ३० सेकंदांनी झाकण काढावे. बटाट्यांना छान धुरकट वास येईल. गरम गरम सर्व्ह करावे.  

दही कबाब
साहित्य - साडेचारशे ग्रॅम चक्का, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा छोटा चमचा काळे मीठ, १ छोटा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, १ चिमूट केसर, १ मोठा चमचा बेसन, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी  ब्रेड क्रंब्स.
कृती - एका भांड्यात चक्का घेऊन त्यात मिरची, जिरे, मीठ, काळे मीठ, केसर, बेसन आणि कोथिंबीर घालून एकत्र करावे. ब्रेड क्रंब्स एका प्लेटमध्ये काढून घ्यावेत. एक मोठा चमचाभरून मिश्रण ब्रेड क्रंब्समध्ये घालावे. त्यावर ब्रेड क्रंब्स भुरभुरावेत. मग मिश्रणाचा गोळा करून हलकेच दाबून चपटा करावा व कबाबचा आकार द्यावा. गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत डीप फ्राय करून घ्यावे. कोथिंबीर पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत.   

मशरूम पोहा कटलेट
साहित्य - दोन वाट्या बटण मशरूम, १ बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी भिजवलेले पोहे, ६ चिरलेल्या फरसबी, १ किसलेले गाजर, १ छोटा चमचा किसलेले आले, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा छोटा चमचा तिखट, पाव छोटा चमचा गरम मसाला, अर्धा छोटा चमचा चाट मसाला, पाव छोटा चमचा आमचूर पावडर, आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल, ब्रेड क्रंब्स. 
कृती - पोहे १५-२० मिनिटे भिजवून घ्यावेत. एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करावे. त्यात कांदा परतून घ्यावा. कांदा गुलाबी झाला की त्यात गाजर, फरसबी, आले, हिरवी मिरची घालून गाजर आणि फरसबी शिजेपर्यंत परतावे. गॅस बंद करावा. त्यात चिरलेला मशरूम, तिखट, गरम मसाला, चाट मसाला, आमचूर पावडर आणि भिजवलेले पोहे घालावेत. मॅशरने मिश्रण कुस्करून घ्यावे. मिश्रणाचे छोटे गोळे करून हलकेच दाबावे आणि कटलेटचा आकार द्यावा. एका पॅनमध्ये शॅलो फ्राय करण्यासाठी तेल गरम करावे. कटलेट ब्रेड क्रंब्समध्ये घोळवून सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करावेत. सॉसबरोबर सर्व्ह करावेत.

मंगलोरी पद्धतीचे कायी वडे
साहित्य - दोन वाट्या तांदळाचे पीठ, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १०-१२ बारीक चिरलेली कढीपत्ता पाने, चवीनुसार मीठ, १ वाटी खोवलेला नारळ, २ सुक्या लाल मिरच्या, २ छोटे चमचे धणे, पाव छोटा चमचा ओवा किंवा जिरे, तळण्यासाठी तेल.
कृती - धणे, जिरे/ओवा, सुक्या लाल मिरच्या मिक्सरमध्ये वाटून पावडर करून घ्यावी. नंतर खोवलेला नारळ मिक्सरमधून वाटून घ्यावा. नारळ आणि पूड केलेला मसाला एकत्र करावा. त्यात बाकीचे साहित्य घालून कणकेप्रमाणे मळून गोळा करावा. गोळा १० मिनिटे तसाच ठेवावा. एका कढईमध्ये पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करावे. दोन्ही हाताला तेल लावून घ्यावे. मळलेल्या गोळ्याचे छोटे गोळे करावेत. त्यांना हाताने पुरीसारखा चपटा आकार द्यावा. तेलात दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळावे. गरम गरम वडे सर्व्ह करावेत.  

मूग डाळ टिक्की
साहित्य - एक वाटी मूग डाळ, ६  हिरव्या मिरच्या, १ इंच किसलेले आले, ४ मोठे चमचे बारीक चिरलेले कोथिंबीर, १ बारीक चिरलेला कांदा, ३ मोठे चमचे उकडून कुस्करलेले मटार, ३ मोठे चमचे बारीक चिरलेली हिरवी ढोबळी मिरची, पाव वाटी किसलेले पनीर, दीड मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, अर्धा मोठा चमचा जिरे, अर्धा मोठा चमचा आमचूर पावडर, अर्धा मोठा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, २ मोठे चमचे तेल.
कृती - मूग डाळ २ तास भिजत ठेवावी. एका भांड्यात पाणी उकळून घ्यावे. पाच मिनिटे त्यात डाळ उकडून घ्यावी. नंतर डाळ थंड पाण्याने धुवावी, जेणेकरून डाळ पुढे शिजणार नाही. मिक्सरमध्ये डाळ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि आले जाडसर वाटून घ्यावे. हे मिश्रण एका भांड्यात घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, किसलेले पनीर, कुस्करलेले मटार घालून एकत्र करावे. त्यात कॉर्नफ्लोअर, जिरे, चाट मसाला, आमचूर पावडर आणि मीठ घालून एकत्र करावे. मग मिश्रणाच्या टिक्की करून घ्याव्यात. एका पॅनमध्ये शॅलो फ्राय करण्यासाठी तेल गरम करावे. टिक्कीला सोनेरी रंग येईपर्यंत तळावे.

संबंधित बातम्या