मौसम मौसम लव्हली मौसम

अंजोर पंचवाडकर 
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

पाऊस विशेष

पावसात अशी काहीतरी जादू आहे जी आपला मूडच बदलून टाकते. बरसणाऱ्या धारा मन प्रफुल्लित करतात. म्हणून पावसाला चित्रपट गीतात जे महत्त्व आहे तसे उन्हाला किंवा थंडीला नाही. उन्हाचे एकवेळ जाऊदे, पण एवढं काश्मीर, हिमाचल अशा नयनरम्य ठिकाणी शूटिंग करतात, हिमालय, बर्फ-बिर्फ़ छानपैकी दाखवतात, मग थंडीचं वर्णन करणारी गाणीसुद्धा भरपूर हवी होती की नाही? एखादा गुलजार ‘जाडोंकी नर्म धूप और आंगन में लेट कर’ किंवा ‘या गर्मियों की रात जो पुरवईया चले..

ठंडी सफ़ेद चादरों पे जागे देर तक, तारो को देखते रहे छत पर पड़े हुए...’ असं काही तरी बहारदार अंतर्मुख करणारं लिहून जातो. बाकी मग, ‘सरकायलो खटिया जाड़ा लगे’ किंवा ‘मुझको ठंड लग रही है मुझसे दूर तू न जा’ अशी अति-स्पष्ट श्रृंगारिकताच अधिक. असतीलही अजून चांगली गाणी, पण बरखा ऋतु बरोबर गाण्यांची जी रंगत येते ती काही निराळीच. 

पाऊस म्हणजे चित्रपट गीतातला हक्काचा आणि हमखास यश देणारा साथीदार. मागं एकदा आपण अशा बऱ्याच पाऊसगाण्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. चित्रपटगीतांत पावसाचं बहारदार चित्रण झालेल्या गाण्यांमध्ये माझं सगळ्यात आवडतं, ‘रिमझिम गिरे सावन’ (लताचं) मौशुमी कसली गोड दिसली आहे या गाण्यात! पूर्ण गाणंभर पॉलिएस्टरची साडी नेसून अखंड पावसात भिजणारी मौशुमी आणि तिला हाताला धरून तरातरा चालणारा, पूर्ण सुटाबुटातला tall, dark, handsome अमिताभ. गाणं सुरू असताना मागं कुलाबा, गेट वे, मरीन ड्राईव्ह, ओव्हल मैदान, राजाबाई टॉवर, हुतात्मा चौक, कॉर्पोरेशन असा सगळा मुंबईचा फोर्ट परिसर.  मरीन ड्राईव्ह वर बांधाच्या बाहेर उसळणाऱ्या लाटा. फ्रेममधे हे दोघं सोडून बाकी सगळी मुंबई छत्री, रेनकोट घेऊन पावसाला सामोरी जातेय. हे दोघं मात्र आपल्यातच रमलेले, प्रेमाच्या अनुभूतीनंतरचा पाऊस एंजॉय करणारे. ‘पहले भी यूँ तो बरसे थे बादल, पहले भी यूँ तो भीगा था आंचल..’ पण या वेळचा पाऊस काही वेगळाच आहे कारण बरोबर तो/ती आहे. महानगरीत रोज धावपळ करत नोकरी करणाऱ्या कित्येक तरुण तरुणींचं मनोगत. आपापले कॉलेज/ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी मरीन ड्राईव्हवर भेटायचं, रोजची संध्याकाळ नवी आणि त्यात अशी पावसाची साथ! ‘इस बार सावन दहका हुआ है, इस बार मौसम बहका हुआ है..’ 

हा पाऊस काही भिजलेली मादक नायिका दाखवता यावी म्हणूनच केवळ गाण्यात पाहुणा म्हणून बोलावला जातो असं नाही. ‘परख’मध्ये साधना (साधना-कट पूर्वीची साधी सोज्ज्वळ साधना) घराच्या व्हरांड्यात उभी राहून गातेय. सगळा परिसर, अंगण पावसात नाहून निघतंय पण साधना भिजत नाहिये, एकदा फक्त ओंजळीत पाऊस भरून घेते. बाकी तर लता भिजवते आपल्याला स्वरातून! ‘तो’ आपल्यासारख्या अनपढ़ गवार मुलीऐवजी गावात नव्यानं आलेल्या अंग्रेजी बोलणाऱ्या स्टायलिश मुलीच्या मोहात आहे असा संशय दूर होऊन नुकतीच त्याचंही आपल्यावर प्रेम असल्याची तिला जाणीव झालेली आहे. अशावेळी मनमोराला पावसाचीच साथ हवी... 
ऐसी रिमझिम में ओ सजन 
प्यासे प्यासे मेरे नयन 
तेरे ही, ख्वाब में, खो गए.... 
‘ओ सजना..’ हे कसलं अफलातून गाणं आहे! अर्थात त्यात नवल ते काय म्हणा; लता-शैलेंद्र-सलिलदा असा संच आणि साथीला पाऊस! 

‘श्री 420’मधलं ‘प्यार हुआ इकरार हुआ है, प्यारसे फिर क्यूं डरता है दिल’, हे असंच ‘एका छत्रीत राहून प्रेमात भिजायचे’ दोघांचे गाणे. पाऊस हा फार महत्त्वाचा घटक आहे या गाण्यातला; प्रेमाला पूरक असा कॅटलिस्ट. गाण्यात पावसाचा साधा उल्लेखही नाही आणि तरी विचार करा, पाऊस नसता तर हे गाणं इतकं विलोभनीय झालं असतं? 

अजून एक खास आवडतं गाणं आहे माझं. मागं पुन्हा मुंबईच, पण या वेळी रात्रीची. पावसात गुरफटलेले स्ट्रीट-लाइट्स, मरीनड्राईव्ह, फ्लोरा फाऊंटन, सुनसान रस्ते, त्यातून पळणारी टॅक्सी, रात्रीच्या मुंबईला साजेशी जॅझ संगीताची पार्श्वभूमी आणि गडगड़णारे ढग... ‘तुम जो मिल गए हो...’ प्रिया राजवंश, एक वेश्या; नविन निश्चल, तिला ने-आण करणारा टॅक्सी ड्रायव्हर (जो श्रीमंत बापाचे घर सोडून आलेला आहे). अशाच एका फेरीत प्रेमाचा इजहार करणारं हे गाणं - 
‘तुम भी थे खोए खोए मैं भी बुझा-बुझा 
था अजनबी ज़माना अपना कोई न था 
दिल को जो मिल गया है तेरा सहारा 
इक नई ज़िंदगी का निशां मिल गया’ 
या गाण्यातसुद्धा तसं बघितलं तर कुठंही पावसाचा उल्लेख नाही, पण पूर्ण गाणंभर पाऊस आहे. टॅक्सीचे वायपर, पाणी आत यायला लागल्यावर भरभरा वर केलेल्या काचा, सिगारेट, समोरच्या काचेतून दिसणारा कोसळता पाऊस, ढगांचा गडगडाट आणि प्रेमाची कबुली देणारा रफीचा जादुई आवाज या सगळ्या वातावरण निर्मितीमुळं या गाण्याचं पावसाशी घट्ट नातं आहे. 

उगाच नाही, गुलजार पावसाळ्याला ‘लव्हली मौसम’ म्हणत! जणू प्रेमभावनेची खुशखबरी घेऊन येणारा ऋतू - 

हवा के झोंकों मे तेरी खुश्बू सी है 
 
बेवजह लगता है कोई खुशखबरी है 
मौसम मौसम लव्हली मौसम 
कसक अंजानी है मद्धम मद्धम 
चलो घुल जाएँ मौसम में हम...

संबंधित बातम्या