सर्दी प्रिय सखी! 

ब्रिटिश नंदी 
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

पाऊस विशेष 

कबिरा छींके बार बार, 
पोंछे अपनी नाक 
दुर्धर ब्याधी भई राक्षसी, 
मन मां पड्यो धाक 

सा मां पातु सरस्वती! वरील दोहा संत कबिराचा नसून आमचाच आहे. पण आमच्या नावाला हल्ली कोणी (नाक) पुसत नसल्याने कबीराच्या नावाखाली आम्ही दोहा ठोकून दिला आहे. चालायचेच. जे नाव चालते, तेच माणसाने चालवावे. ब्रांडनेमवाल्याचे मीठ शंभर रुपये किलोने विकले जाते आणि नाममहात्म्य नसलेल्याचे विमानदेखील उडत नाही, हे आपण नुकतेच पाहिले. परवाच आम्ही कोरोना नावाचा पान मसाला पाहिला. - पाहिला म्हंजे टेस्ट करून पाहिला! (वाईट नव्हता. लॉकडाऊनच्या काळात पान टपऱ्या बंद असताना माणसाला काय काय खावे लागेल, नेम उरला नाही! जाऊ द्या!) सारांश इतकाच, की हल्ली कोरोना म्हटले की सारे काही चालते. तदनुसार आमचे हे ईषत विवेचन वाचकांनी चालवून घ्यावे, ही विज्ञापना. 

सांप्रत आम्ही येथे सर्दी या दुर्धर व्याधीसंबंधी काही शास्त्रीय, उपशास्त्रीय, निमशास्त्रीय, छद्मशास्त्रीय एवं अशास्त्रीय विवेचन करणार आहो. कां की आम्ही या विषयी काहीएक संशोधन केले असून प्रत्यक्ष अनुभवाचीदेखील त्यास जोड दिली आहे. सर्दी या विकाराचे मूळ फार प्राचीन काळापासून आढळते, असे म्हणणे चूक ठरेल. वैदिक काळात सर्दी-पडसे नसावे, असे मानण्यास जागा आहे. कारण कुठल्याही उपनिषदात आणि पुराण्या ग्रंथात आम्हाला सर्दीचा उल्लेख आढळला नाही. नाही म्हणायला नाक मुठीत धरून शरण आलेल्या असुरांचे उल्लेख आढळतात. परंतु, ते सर्दीमुळे नसावेत! महाभारत काळात पर्जन्यास्त्र नावाचे एक जालीम अस्त्र होते. हवेत मंत्रशक्तीने भारीत असा बाण मारल्यावर पाऊस पडत असे. पाऊस पडल्यावर दोन दिवसांनी शत्रू सैन्य पडशाने हैराण होऊन शरण येत असणार, असा आमचा एक अंदाज आहे. पण याबद्दल आणखी थोडे संशोधन होणे गरजेचे आहे, असे आम्हाला वाटते. पावसाळ्यात पडसे येतेच, असा आमचा जो एक पूर्वापार अनुभव आहे, त्याआधारे आम्ही हा निष्कर्ष काढिला आहे. 

माणसाने जसजशी प्रगती केली, तस तसा सर्दी-पडशाचा प्रादुर्भाव वाढला, असे आकडेवारी सांगते. किंबहुना (या शब्दाचा प्रादुर्भावदेखील हल्ली सर्दीसारखाच वाढला आहे.) सर्दी-पडसे वाढत गेले, तसतशी माणसाने प्रगती केली, असेही म्हणता येईल. सर्दी ही माणसाची खरीखुरी सखी आहे, हेच खरे. 

गृहिणी हो, सचिव हो, सर्दी प्रिय सखी 
बिनाबुलायी आवत है, या जावत देखादेखी! 

...असे कुणीतरी (म्हंजे आम्हीच) म्हणून ठेवलेच आहे. उपरोक्त दोह्यातील वर्णन पत्नीचे आहे, हे सुज्ञांना कळल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा त्याबद्दल कमीतकमी विवेचन करणे इष्ट ठरेल. सदरील मजकूरदेखील आम्ही खोलीचे दार बंद करून लिहीत आहो! असो.

आयुर्वेदाच्या परिभाषेत बोलावयाचे झाल्यास पडसे हा एक कफदोष आहे. क्लेदक, अवलंबक, बोधक, तर्पक आणि श्लेषक असे कफाचे पांच प्रकार सांगितले आहेत. यापैकी सर्दी नावाची बाधा कुठल्या प्रकारात मोडते, हे आम्ही आयुर्वेदात नाक खुपसून पाहिले. पण कळले नाही! तथापि, ते काही तितकेसे महत्त्वाचेदेखील नाही. (उगीच काय, काहीतरी!) सर्दी अचानक उपटते, आणि जाते. त्यासाठी औषधोपचारांची विशेष गरज  नसते, म्हणजे आजवर नव्हती. परंतु, आता जमाना बदलला आहे. माणसाने जसजसा विकास केला, तसतशी सर्दी दुर्धर होत गेल्याचा अनुभव आपण सारे घेत आहोत. 

सांप्रतकाळी विश्वात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूचे मूळ हे सर्दी असल्याचाच साक्षात्कार आम्हाला झाला आहे. कोरोना हे सर्दीचेच दुर्धर असे रूप आहे यात शंका नाही. म्हणूनच आम्हाला हा विद्वत्तापूर्ण आणि सखोल संशोधनाने युक्त असा निबंध लिहावा लागत आहे. 

वाचकहो, जगात असा मनुष्य नसेल, ज्याला कधी सर्दी झाली नाही. एखाद्याच्या प्रकृतीचे वर्णन ‘नखात रोग नाही’ असे केले जाते. नखात रोग नसेल, पण नाकात असतोच असतो! आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी सर्दी होतेच. माणसाचे सोडा, मुंबईतील भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात एका वाघालादेखील आम्ही शिंकताना पाहिला आहे. इतकेच नव्हे तर पेंग्विनलादेखील सर्दी होते, असे (अलीकडेच) आमच्या निदर्शनास आले आहे. सतत पाण्यात राहिल्यावर काय होणार? तेव्हा प्राणीमात्रांना सर्दी होते हे सत्य आहे. 

सर्दीमुळे माणूस प्राण्यात नेमके काय बदल होतात, हे आपण आता थोडक्यात पाहू. 

एरवी पडसे झाले तर आपण फारसे मनावर घेत नाही. चार दिवस नाक गळते. शिंकांचा सपाटा सुरू होतो. चेहऱ्यावर अजागळ भाव येतात. सर्दी झालेला माणूस कितीही बुद्धिमान असला तरी काही दिवस का होईना, ‘लई खुळा’ वाटायला लागतो. त्याला स्वतःलाच आपण शंभर नंबरी येडचाप आहोत, असे वाटू लागते. सकाळच्या वेळी आपण आमलेट खात आहोत की तांदळाची उकड हेच कळेनासे होते. समोर कांदेपोह्याचा ढीग दिसत असतो, परंतु, मुखात जाता जाता त्याची चव साधारणतः देवदार  लाकडाच्या भुशासारखी होत जाते. आम्ही बुटाची जीभ कधी खाऊन बघितली नाही. परंतु, सर्दी झालेल्या अवस्थेत ज्वारीची भाकरी तशीच लागत असणार, असा आम्हाला विश्वास आहे. 

सर्दी आली की आधी शिंकेने तिची वर्दी मिळते. घशात खवखवते. अचानक आवाज घोगरा होतो, मुखातील ताळूस खाज येते. डोळे लाल होतात, आणि अचादक दाक बद्द होते...बद्द भडजे एकदबच बद्द!! एकदा दाक बद्द झाले की बाडूस काबातदं गेला, असे सबजावे! दाक बद्द झालेल्या बाडसाला आता काय करायचे, हे कळेदासे होते. डॉक़्टरकडे जावे की काढा प्यावा, हा दिर्डय घेडे कठीड होते. सबोरच्या बाडसाशी साधे सभ्भाषड अवघड होते. 

‘काय म्हणतेय तब्येत?’ या भप्पक सवालाचे उत्तर दुसती बाद डोलावूद द्यावे लागते. जिज्ञासूंनी सर्दी झालेल्या अवस्थेत ‘सांग तू, माझा होशील का?’ हे जुने गीत उदाहरणादाखल गुडगुडून बघावे! एके हंगल हे नावसुद्धा आम्ही सर्दीच्या काळात उच्चारत नाही, यात सारे काही आले! असो. 

डागतरांचे औषध घेतल्यास सात दिवसात, आणि न घेतल्यास आठवडाभरात सर्दी-पडसे आपोआप बरे होते, असे म्हणतात. अतिशय दुर्धर व्याधींवर लीलया उपचार करून रुग्णास मृत्यूच्या दाढेतून ओढून आणणारे मी मी म्हणणारे धन्वंतरी सर्दीपुढे मात्र सपशेल नाक घासतात, हे खरे आहे. सर्दीवर त्यांची काही मात्रा चालत नाही. 

विविध उपचार पद्धती सर्दीसाठी विविध औषधे सुचवतात. त्यातले एकही लागू पडत नाही, हा भाग अलाहिदा! सर्दी ही आपोआपच बरी होते. 

अलोपाथीत तर सर्दीवर औषधच नसल्याने आधुनिक वैद्यकाने ‘कॉमन कोल्ड’ असे दुर्लक्ष करण्याजोगे नाव देऊन स्वतःची सुटका करून घेतली आहे. याला उपचार नव्हे, मखलाशी म्हणतात. हल्ली तर काढा प्या, आणि वाफारा घ्या, हे उपाय अलोपाथीचे डॉक़्टर सुचवू लागले आहेत. जमाना किती बदलला आहे पाहा! 

होमेपाथीवाले सर्दीवर काही साबुदाण्याच्या गोळ्या देतात. हे औषध खाऊन बाहेर पब्लिकमध्ये जाणे जोखमीचे होते, हा वैधानिक इशारा आम्ही येथे देऊन ठेवतो. त्याचे असे आहे... 

होमेपाथीच्या गोळ्या खाल्ल्यास सकाळीच ‘घेतल्या’चा वास दर्वळतो. त्यातील अल्कोहोलमुळे भलताच परिणाम होतो. आधीच पडशामुळे डोळे तांबारलेले. चेहरा सुजरट! त्यात ‘दाक बद्द’ अवस्थेमुळे उच्चार सदोष... या परिस्थितीत येणारा अल्कोहोलचा गंध! पब्लिकचा गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. आमच्यावर एकदा असाच अनवस्था प्रसंग ओढवला होता. पण...जाऊ दे. 

आयुर्वेदात चिकित्सा अधिक, औषध कमी! सर्दीने हैराण झाल्यामुळे आम्ही एकदा वैद्यचुडामणि नाना अळुवडीकर (कडेठाण) यांच्याकडे उपचारासाठी गेलो होतो. वैद्य नानांचा हातगुण चांगला आहे, असे आम्हाला शेजारच्या फफ्या रेवदंडकराने सांगितले होते. हे सांगताना फफ्या तबल्याच्या कापडी रिंगांवर बसला होता. मागे एकदा त्याला असाच मूळव्याधीचा त्रास झाला होता. (खुलासा ः ‘मागे एकदा’ याचा अर्थ ‘कोणे एके काळी’ असा घ्यावा!) वैद्यनानांच्या पुड्यांनी त्याला बरे वाटले म्हणे. असो. वैद्यनानांनी आमची नाडी बघितली. चेहरा गंभीर केला. म्हणाले ः ‘पित्त बळावले आहे!’ 

‘पित्त? कफ झालाय बरणाचा!’ आम्ही बंद नाकानिशी ओरडलो. 
‘पित्तामुळे कफ उसळला! वात प्रकृती असली की असं होतं,’ त्यांनी उलगडून सांगितले. च्यायभले! आधीच वात असलेल्याचे पित्त उसळले की त्याला कफ होतो, हे ऐकून आम्हाला अक्षरशः वात आला, मग खरोखर पित्त उसळले. सर्वांत शेवटी कफ आला... 
‘औषध द्या हो काहीतरी! शिं...शिं...शिं...!!’ आम्ही कसेबसे वाक्य शिंकलो. 
‘उपाय आहे, पण वेळ लागेल!’ ते म्हणाले. पुड्या बांधण्यात पुढला दीड तास गेला. सकाळी अनेशापोटी एक, मग न्याहारीनंतर एक, जेवणापूर्वी एक, जेवताना एक, जेवल्यानंतर एक, दुपारच्या चहापूर्वी एक, चहानंतर एक, रात्री जेवण्यापूर्वी एक, जेवल्यानंतर एक आणि रात्री झोपण्यापूर्वी एक...अशा पुड्या त्यांनी हातात ठेवल्या. 
‘झोपेत घ्यायची पुडी आहे का?’ असे आम्ही चिडून म्हणालो. त्यावर त्यांनी शांतपणे ‘देतो’ असे सांगत आणखी तीन पुड्या हातात ठेवल्या. वर प्रकृतीस उतार पडायला सहाएक महिने लागतील, पण उतार पडला तरी औषध चालू ठेवावे लागेल, असेही बजावले.

हे घडले त्याला काही महिने झाले. त्यानंतर एक दिवस कोरोना आला! आला तो सारे काही बंद पाडून मुक्कामाला राहिला. वाहतूक, कचेऱ्या, दुकाने सारे काही ठप्प झाले. आमच्या फ्यामिली डॉक्टरांनी त्यांचा दवाखाना बंद केला. एरवी आमचे फ्यामिली डॉक्टर मुळे हे अतिशय सज्जन गृहस्थ. इंजेक्शन देतानाही दबकत  दबकत विचारतात ः ‘कमरेवर घेताय की दंडावर? कमरेवरच घ्या!’ 
कळवळत आलेला पेशंट बघून ते आधी उठून उभे राहतात. इमर्जन्सी नेमकी कुणाला आहे? पेशंटला की डॉक्टर मुळे यांना, हेच काहीकाळ कुणाला कळत नाही. पेशंटलाच समजावणीच्या सुरात सांगावे लागते, ‘डॉक़्टर, घाबरू नका, पोट बिघडलंय इतकंच. होईल कमी थोड्या वेळात. तुम्ही औषध द्या!’ 

अशा या डॉ. मुळे यांनी अचानक ऑनलाइन दवाखाना सुरू केला. ऑनलाईन दवाखान्याचे एक असते - सगळे सुरक्षित अंतरावर असतात! परवा असेच झाले... 

आम्ही डॉ. मुळे यांना व्हिडिओ कॉल लावला. 
‘नमस्कार डॉक़्टर...तुमचा दवाखाना बंद आहे, म्हणून फोन केला!’ आम्ही खुलासा केला. 
‘काय ह...ह...ह...होतंययययय!’ व्हिडिओ कॉलमध्ये डिस्टर्बन्स असतो कधीकधी. 
‘काही विशेष नाही...पडसं झालंय!’ आम्ही नाक पुसत म्हणालो. 
‘बाप रे! पडसं?’ ते किंचाळलेच. जणू काही पडसं म्हंजे काही भयंकर व्याधी असून आमचे दिवस भरले आहेत. 
‘नाक गळतंय हो! शिंका येतायत! काय घेऊ?’ आम्ही विचारले. 
‘अहो, पडसं म्हंजे भयंकरच! ताबडतोब आयसोलेट व्हा!’ त्यांनी फर्मान सोडले. आता पडशाला कोणी आयसोलेट होतं का? पण डॉ. मुळे हे मुळात घाबरट. 
‘एवढ्याशासाठी कशाला आयसोलेट होताय? औषध द्या!’ आम्ही. 
‘क्वारंटाइन व्हा!’ ते पुन्हा ओरडले. आम्ही चक्रावलो. मोठे डोळे करत म्हणाले, ‘सर्दी हे कोरोनाचं लक्षण आहे! बरं झालं, माझा दवाखाना बंद आहे!’ 
..एवढं पुटपुटून डॉ. मुळे यांनी व्हिडिओ कॉल बंद केला. डॉक़्टर तुम्हीसुद्धा? असे विषादाने उच्चारायची संधीही त्यांनी आम्हाला दिली नाही. आठवडाभरात आमची सर्दी आपोआप बरी झाली. 
कुणीतरी म्हटलेच आहे... 
सर्दी हो या जुकाम हो, 
क्यों मिलना बैद हकीम 
चार दिन का सखी आराधन, 
प्रीत ये पाओ असीम! 

(टिप ः कोरोनाच्या निमित्ताने नियतीने माणसाच्या आयुष्यात जो मृत्यूचा भयंकर चेहरा दाखवला आहे, त्याला तोड नाही. सर्वत्र अनिश्चितता, भय आणि रोगाचे वातावरण दिसते. अति झाले आणि हसू आले, अशीच स्थिती. अशावेळी हसावे की रडावे? असा प्रश्न पडतो. असा प्रश्न पडला की थोडेसे हसावे, हेच उत्तम.)

संबंधित बातम्या