इतिहास, निसर्ग, देवस्थाने... 

डॉ. अमर अनंत फडके,  
बुधवार, 28 मार्च 2018

आपल्याच पावलांचा लयबद्ध आवाज... कधी भोवती पिंगा घालणाऱ्या वाऱ्याचे संगीत, कधी झोडपणाऱ्या पावसाचा ताल, कधी तापणाऱ्या उन्हात समोर धावणारे मृगजळ, भोवतीच्या झाडांच्या पानांची लयबद्ध सळसळ; तर कधी साऱ्या आसमंताची स्तब्ध शांतता, त्या शांततेचा भंग करणारे पक्ष्यांचे आवाज.

आपल्याच पावलांचा लयबद्ध आवाज... कधी भोवती पिंगा घालणाऱ्या वाऱ्याचे संगीत, कधी झोडपणाऱ्या पावसाचा ताल, कधी तापणाऱ्या उन्हात समोर धावणारे मृगजळ, भोवतीच्या झाडांच्या पानांची लयबद्ध सळसळ; तर कधी साऱ्या आसमंताची स्तब्ध शांतता, त्या शांततेचा भंग करणारे पक्ष्यांचे आवाज.

कधी उरावरती चढाई, कधी पाय ठरू न देणारी घसरण, कधी खोल दरी, कधी उत्तुंग कडा, कधी घनदाट जंगल तर कधी वैराण सडा, कधी पाऊलवाट तर कधी गवता-झुडुपात लुप्त होणारी रानवाट.. मग अज्ञातातले चालणे! आणि मग या साऱ्यात गवसतात कधी प्रेरणादायी गडकोट, कधी शतकानुशतकांची सांस्कृतिक परंपरा असणारी रहाळातली प्राचीन मंदिरे, वन्यजीवांच्या अस्तित्वाच्या खुणा, पावलोपावली जाणवणारी जातिवंत, जंगलं, कोसळणारे जलप्रपात, भूमिपुत्रांच्या अस्सल बाज असणाऱ्या वाड्या, त्यांची लोभसवाणी संस्कृती. 

पर्यटन म्हणजे तरी काय? 
आपल्या मातीचा, आपल्या पर्वतांचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या पाण्याचा, आपल्या अरण्यांचा, आपल्या स्थापत्यांचा अस्सल सुगंध आणि त्याचा जिवंत अनुभव. 

कोल्हापूर आणि कोकणच्या परिसरात हे सारे भरून उरलेय. म्हणूनच कुणालाही मोहवेल असा हा परिसर. गेली ३५ वर्षे या परिसरात मनाला येईल तसा भटकतोय. त्यातली काही स्थळे केवळ पाहावीत नव्हे, तर अनुभवावी अशीच आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातला गगनबावडा तालुका हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश. निसर्गाचे मुक्त वरदान या परिसराला लाभले आहे. 

या साऱ्या कोंदणात एक वेगळे पर्यटन स्थळ विराजमान आहे मोरजाईचे पठार आणि त्यावरचे मोरजाईचे मंदिर! कोल्हापूरपासून गगनबावड्यास जाताना सुमारे पन्नास कि.मी. अंतरावर डावीकडे किंवा कोकणातून करूळ घाटमार्गे कोल्हापूरला येताना गगनबावड्यापासून आठ कि.मी. अंतरावर उजवीकडे सांगशी फाटा लागतो. तिथे वळून जंगल-सड्याच्या घाटसदृश रस्त्याने बोरबेट या घाटावरील कोकणी वाडीत यावे. हा मोरजाई पठाराचा पायथा. येथून पठार पायथ्याला वळसा घालून पायऱ्यांच्या वाटेने चढाईला सुरवात करावी. सपाटी, पुन्हा पायऱ्या असे करून विस्तीर्ण सड्यावर पोचावे. धामणी खोऱ्यापासून ते गगनगडापर्यंत चहूबाजूंनी निसर्गाचा नितांत सुंदर आविष्कार पाहावयास मिळतो. सड्याच्या पश्‍चिम टोकाला प्राचीन असे मोरजाईचे एक पाषाणातील मंदिर आहे. 

ज्या सांगशी फाट्यावरून आपण वळतो, त्याच्या अलीकडे एका घनदाट देवराईत अप्रतिम प्राचीन शिल्पाकृतीचं ‘सांगसाई मंदिर’ आवर्जून पाहावे. ऐतिहासिक गगनगडावरील प्राचीन पाण्याची टाकी आणि त्यावरील शिल्पाकृती आवर्जून पाहावी. दोन सोंडा आणि तीन गज हे गजशिल्प आणि हनुमंत शिल्प, तसंच प्राचीन काळातला कोकणातून देशावर येणारा पायरीचा घाट ही पर्यटन वैशिष्ट्ये किमान दोन हजार वर्षांच्या इतिहासाची साक्षीदार आहेत. हा इतिहासाचा प्राचीन ठेवा पर्यटकांनी जरूर अनुभवावा. 

वैशिष्ट्यपूर्ण गडकोट
शिवचरित्र आणि स्वराज्य संघर्षातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार असणारे गडकोट हे

कोल्हापूर परिसराचे वैशिष्ट्य. 
समृद्ध इतिहासाचा वारसा सांगणारे निसर्गसुंदर असे १३ दुर्ग कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. ते म्हणजे १) किल्ले पन्हाळगड, २) किल्ले विशाळगड, ३) किल्ले पारगड, ४) किल्ले महिपालगड, ५) किल्ले गंधर्वगड, ६) किल्ले कालनिधीगड, ७) किल्ले सामानगड, ८) किल्ले भुदरगड, ९) किल्ले रांगणा, १०) किल्ले मुजागड, ११) किल्ले शिवगड, १२) किल्ले गगनगड, १३) किल्ले पावनगड.

पन्हाळा व विशाळगड
पन्हाळगड ते विशाळगड, पावनखिंड संग्राम असा इतिहासाने भारलेला प्रेरणादायी शौर्यमार्ग क्षमतेच्या आणि हिमतीच्या तरुणाईने जरूर अनुभवावा. आता या मार्गावर जागोजाग मार्गदर्शक स्तंभ, इतिहास सांगणारे शिलालेख आणि विस्तृत फलकही आहेत. त्यामुळे पन्हाळगड दर्शन आणि पन्हाळगड ते विशाळगड हे धाडसी पर्यटन जरूर अनुभवावे. पन्हाळगडाच्या शेजारी असणारा जोडकिल्ला पावनगड पर्यटनाच्या दृष्टीने तसा उपेक्षितच आहे. त्याची तटबंदी, तुपाची विहीर, बुरूज, प्राचीन मंदिर आदी स्थापत्य वैशिष्ट्ये पर्यटकांचे आकर्षण ठरू शकतात. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेला पूर्व, उत्तर आणि पश्‍चिम अशा तीनही बाजूंनी खोल दऱ्या आणि घनदाट जंगलांनी संरक्षित असा किल्ले विशाळगड त्याच्या रोमांचकारी इतिहासासाठी सर्वज्ञात आहेच; पण त्याचबरोबर सह्याद्रीच्या अजस्र डोंगररांगा, त्यातल्या खोल दऱ्या या रौर्द्रतेने चित्ताकर्षक आहेत. पाताळदरा या किल्ल्याच्या प्रकारातील खोल दरीत असणारी बाजीप्रभू आणि पुलाजी प्रभूंची समाधिस्थळे इतिहासाची जिवंत अनुभूती देतात. याखेरीज मलिक रेहान दर्गा अमृतेश्‍वर, भगवंतेश्‍वर आदी अनेक मंदिरे, छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी अहिल्यादेवी यांची समाधी आदी अनेक स्थळे इतिहासप्रेमी पर्यटकांनी आवर्जून पाहावीत. 

सामानगड
काही किल्ले थेट पूर्वीच्या काळात नेऊन पोचवतात. अशा किल्ल्यांपैकी एक म्हणजे, किल्ले सामानगड. जमिनीच्या पातळीखाली, भूमीच्या पोटातील अखंड शिला कोरून निर्माण केलेली स्थापत्ये हे या दुर्गाचे वैशिष्ट्य. किंबहुना किल्ले सामानगड म्हणजे प्राचीन भारतीय स्थापत्य कलेचा वैभवशाली ठेवा आहे. सामानगडावर जाण्यासाठी गडहिंग्लजपासून चंदगड रस्त्याने निघावे. पाच एक कि.मी.वर चन्नेकुपी फाटा लागतो. तेथून डावीकडे वळणाऱ्या रस्त्याने आपण थेट दहा-बारा कि.मी. प्रवास करून सामानगडावर पोचतो. 

भुदरगड
ऐतिहासिक भुदरगड - गारगोटी या तालुक्‍याच्या ठिकाणापासून रस्त्याने अवघ्या अर्धा-पाऊण तासात गाठता येतो. डावी-उजवीकडे थोड्याफार सुस्थितीत असलेल्या तटबंदीमधून थेट मोठी डांबरी सडकच किल्ल्यात प्रवेश करते. ते थेट भैरवनाथाच्या प्रसिद्ध मंदिरापाशी. मंदिराच्या मागील बाजूस राजप्रासाद व राजसदरेचे अवशेष आहेत. तसेच करवीरकर छत्रपतींनी बांधलेले शिवमंदिर आहे. किल्ल्यावरचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्ट बांधणीचा विस्तीर्ण जलाशय दूधसागर. तळातल्या शाडूयुक्त पांढरट मातीमुळे आकाशाचा निळा रंग पृष्ठभागावर आणि आत शुभ्रता म्हणून नाव ‘दूधसागर’. या जलाशयाच्या काठी प्राचीन गुहा मंदिरासह अनेक मंदिरे आहेत.

रांगणा
चहूबाजूंनी उत्तुंग कडे, खोल दऱ्या आणि घनदाट जंगलाने वेढलेला ऐतिहासिक किल्ला म्हणजे रांगणा. या किल्ल्यावर पोचण्यासाठी देशावरून चक्क उतरत जावे लागते, हे याचे वैशिष्ट्य.गारगोटी - कडगाव - पाटगाव - धरण ओलांडून अडे - तळी - भटवाडीपर्यंत हल्ली झालेल्या डांबरी रस्त्याने आणि पुढे रोमांचकारी जंगलवाटेने चिकेवाडी या जंगलातल्या वाडीपर्यंत आणि पुढे घनदाट जंगलातून रांगण्यापर्यंत पोचता येते. रांगणाईचे मंदिर हे किल्ल्याचे वैशिष्ट्य. 

कोकणाच्या बाजूने गोवा महामार्गावरील आकेरी फाट्यापासून पूर्वेला वळून टेंबे स्वामींचे माणगाव, दुकानवाड नारूर या मार्गाने घनदाट जंगलातील चढाईच्या मार्गाने किल्ल्यावर पोचता येते. स्वराज्याच्या पार दक्षिण टोकाला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचे आणि नयनरम्य निसर्गाचे देणे असलेले नितांत सुंदर किल्ला म्हणजे किल्ले पारगड. चंदगड - हेरे - रामघाट - इसापूर फाटा किंवा बेळगावच्या बाजूने पाटणेवाडी तिलारी फाटामार्गे हेरे फाटा किंवा आंबोली-चैकुळ-इसापूर मार्गे पारगड अशा सह्याद्री आणि अरण्यातील निसर्गरम्य वाटांनी पारगडी पोचता येते. गडपायथ्यापर्यंत किंबहुना गडावरील भवानी मंदिर आणि पुढेही आता रस्ता झाला आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून एक शिवकालीन पायऱ्यांची वाट आहे. अनेक तलाव, भक्कम तटबंदी, बुरूज ही किल्ल्याची स्थापत्य वैशिष्ट्ये. या गडाचे अत्यंत स्फूर्तिदायक वैशिष्ट्य म्हणजे नरवीर तानाजी मालुसरेंचे चिरंजीव रायबा, ज्यांना शिवरायांनी किल्लेदार म्हणून नेमले, तेव्हापासूनच्या अकरा पिढ्या याच गडावर नांदल्या. या किल्ल्यावर मालुसऱ्यांच्या घरात तानाजींची तलवार, त्यांच्या धारातीर्थी देहावर शिवरायांनी ठेवलेली त्यांच्या गळ्यातील समुद्र कवड्यांची माळ अलीकडेपर्यंत होती. आता हा स्फूर्तिदायक ऐवज बेळगावी असतो.

याखेरीज घनदाट जंगलातला मुडागड, दाजीपूर अभयारण्यातला शिवगड, चंदगड तालुक्‍यातला कालानंदी आणि महिपालगड तसेच गंधर्वगड असे अनेक ऐतिहासिक किल्ले कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. या गडकोटांबरोबरच कोल्हापूर आणि कोकणाच्या सीमेवर अनेक निसर्गसुंदर पर्यटन स्थळे आहेत की, ज्यांचे पर्यावरणपूरक पर्यटन विकसित केले तर राज्यच नव्हे तर देशभरातल्या पर्यटकांचे ते आकर्षण ठरू शकेल.

पडसाळी
पन्हाळा तालुक्‍याचे कोकणाकडील बाजूचे एक टोक म्हणजे पडसाळी परिसर. घनदाट जंगलांनी आणि वैशिष्ट्यपूर्ण टेकड्यांनी सजलेला हा परिसर. वळ ताई, म्हातारगडगीचा सडा, ससेटेंभी, कावनईचा डोंगर अशी वैशिष्ट्यपूर्ण नावे या डोंगरसड्यांना आहेत. तीनही ऋतूत हा परिसर निसर्गरम्य असतो. विशेषतः सरत्या पावसाळ्यात असंख्य रानफुलांच्या उधळणीत हा परिसर अनुपम सौंदर्याने नटलेला असतो. राजर्षी शाहू महाराजांनी हत्तींच्या संगोपन आणि संरक्षणासाठी या जंगलाची निवड करून त्यात अनेक हत्ती आणून सोडले होते. 

त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि खाली कोकणात उतरू नयेत यासाठी जवळजवळ चाळीस मैल लांबीचा चर खणून तो दगडांनी बांधून घेतला होता. त्याचे अवशेष आजही या जंगलात पाहावयास मिळतात. अशा प्रकारचे स्थापत्य वैशिष्ट्य महाराष्ट्रात एकमेव आहे.

पडसाळी परिसरात जाण्यासाठी कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याने कळे येथपर्यंत यावे. नंतर उजवीकडे अणुस्कुरा रस्त्याला वळून कळे - बाजार भोगाव - मग कुंभी नदी उजव्या हाताला ठेवून काळजवडे - कोलीक - मानवाड असे जावे लागते.

पळसंबे 
गगनबावड्याच्या अलीकडे १३-१४ कि.मी. अंतरावर पळसंबे गावापाशी एका जलप्रपाताच्या परिघात असणारी प्राचीन एकपाषाणीय मंदिरे म्हणजे स्थापत्याचे अद्‌भुत वैशिष्ट्य आहे. या मंदिरांमध्ये अनेक शिव पिंडी आहेत. 

किलचा 
राधानगरी आणि गगनबावडा तालुक्‍याच्या हद्दीवर असणारा एक लोभसवाणा डोंगर म्हणजे किलच्याचा डोंगर. सरत्या पावसाळ्यात रानफुलांनी सजणारा विस्तीर्ण सडा पाहात राहावा असा असतो. पण सड्याच्या पोटात असणाऱ्या आरपार गुहा हे याचे वैशिष्ट्य. उंचीमुळे आणि घनदाट झाडीमुळे ऐन उन्हाळ्यातही शीतलता देणारा हा परिसर धाडसी पर्यटकांनी आवर्जून पाहावा असाच आहे. 

कोल्हापूर - राधानगरी रस्त्याने जाताना अंदाजे २५ कि.मी. अंतरावर आमजाई व्हरवडे गावापाशी उजवीकडे धामोड फाट्याला किंवा तुळशी धरणाकडे वळावे. धरणाची भिंत डावीकडे ठेवून केळोशी बुद्रूक गावाकडे निघावे. या गावाच्या अलीकडेच हणबरवाडी या किलच्याच्या पायथ्याच्या वाडीकडे जाणारे दोन मार्ग फुटतात. त्यापैकी कोणत्याही मार्गाने हणबरवाडीपर्यंत पोचावे आणि मग घनदाट जंगलातील पायवाटेने अणदूर फाट्याला वळून धुंदवडे - जर्गीबावेली - म्हासुर्ली फाटा असेही पायथ्यापर्यंत जाता येते. 

मौनी महाराज मंदिर 
रांगणा किल्ल्यावर जाण्यासाठी गारगोटीहून कडगावमार्गे पाटगावास जावे लागते. खरे तर पूर्वी इथपर्यंतच रस्ता होता. पुढे जंगल वाटेनेच रांगण्यापर्यंत जावे लागायचे. याच पाटगावात इतिहासप्रसिद्ध श्री मौनी महाराजांचे समाधी मंदिर आणि मठ आहे.
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची महत्त्वाकांक्षी मोहीम आखली. त्यासाठी कर्नाटकात उतरताना महाराजांनी हणमंते घाटाचा वापर केला होता. पाटगाव हे हणमंते घाटाच्या तोंडावरचे मुख्य ठाणे. या पाटगावात श्री मौनी महाराज या सत्पुरुषांचे वास्तव्य होते. महाराजांनी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते. ती भेटीची जागा आणि मौनी महाराजांची समाधी पाटगावात आहे. त्या परिसरास मौनी महाराजांचा मठ म्हणतात. रांगण्यास जाताना श्री मौनी महाराजांचा मठ, समाधी आणि भेटीची जागा तसेच मठापासून काही अंतरावरचे भद्रकाली मंदिर आवर्जून पाहावे. 

धोपेश्‍वर 
कोल्हापुरातून आंबा घाटाकडे जाताना मलकापूर ओलांडल्यावर निळे गाव लागते. तेथून काही अंतरावर डावीकडे धोपेश्‍वर फाटा फुटतो. त्या फाट्याने चढाच्या जंगलाच्या रस्त्याने ६ ते ७ कि.मी. अंतर काटून धोपेश्‍वर या निसर्गरम्य स्थळी पोचता येते. नितांतसुंदर या स्थळी प्राचीन असे धोपेश्‍वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराला खेटूनच जवळजवळ बारमाही जलप्रपात आहे. सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गरम्य अशा या ठिकाणापासून सह्याद्रीच्या डोंगररांगांचे अपूर्व दृश्‍य दिसते. एक दिवसीय सफरीचे हे बारमाही स्थळ असून विशेषतः पावसाळ्यात फारच विलोभनीय असते. 

नेसरी 
स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर अवघ्या सहा साथीदारांनिशी बहलोलखानाच्या अफाट फौजेवर अत्यंत धाडसाने तुटून पडले आणि पराक्रमाची शर्थ करीत धारातीर्थी पडले. ते पुण्य क्षेत्र म्हणजे नेसरीची खिंड. या ठिकाणी आता एक उत्तम स्मृतिस्थळ बांधले आहे. हे धारातीर्थ आवर्जून पाहावे असे आहे. गडहिंग्लज ते चंदगड रस्त्यावर नेसरी गावानजीक हे पुण्यस्थळ आहे. कोल्हापूर हे कोकणाचे प्रवेशद्वार. त्यामुळे कोल्हापूरला कोकणापासून वेगळे काढता येणार नाही. तसे कोल्हापूर आणि कोकणचे पर्यटन हातात हात घालून चालते. 

इतिहास, निसर्ग, संस्कृती, देवस्थाने अशा सर्वांगीण चाकोरीबाहेरच्या पर्यटनासाठी कोल्हापूर परिसरात मुबलक संधी आहेत. वेळ आणि आवडीनुसार एक-दोन-तीन दिवसीय नियोजन करता येते. एक समुद्र किनारा सोडला तर पर्यटनासाठी सारे काही कोल्हापुरात आहे.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या