यंदा कोरोनाची आरास

डॉ. अविनाश भोंडवे 
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

गणपती विशेष

भारतीय संस्कृतीत श्री गणेशाचे स्मरण करून कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात केली जाते. गणपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. घरोघरी बसणारे गणपती, त्याबरोबर येणाऱ्या गौरी आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे लोकमान्यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव ही अखिल मराठी बांधवांच्या आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, भावनिक आणि राजकीय चळवळींचा ऐतिहासिक आलेख आहे. गणेशोत्सवाचे दहा दिवस, तसेच विसर्जनाची मिरवणूक या दोन्हीच्या जल्लोषामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती या न त्या कारणाने सहभागी होत असते. पुण्या-मुंबईसारखी मोठी शहरे असोत, जिल्ह्याची मध्यम शहरे असोत, नाही तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील छोटी गावे असोत, गणेशोत्सवातील सहभाग हा त्या दहा-बारा दिवसात त्या तमाम नागरिकांच्या सार्वजनिक आयुष्यात एक कमालीची धूमधाम असते. 

सार्वजनिक गणेशोत्सवातला लाखो लोकांचा एकत्रित सहभाग आणि ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणपतीरायाच्या दर्शनासाठी होणारी प्रचंड गर्दी हाच या वर्षीच्या गणेशोत्सवात कळीचा मुद्दा होऊन बसला आहे.  

अखिल महाराष्ट्रात यंदा या उत्सवावर कोरोनाचे गंभीर सावट आहे. कोरोनाच्या जागतिक साथीमुळे गणेशोत्सवावरही आता काही निर्बंध आले आहेत. याकाळात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना तो महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच करावा लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंग हा कोरोना प्रतिबंधाचा मूलभूत नियम कोरोना विषाणूच्या साथीच्या सध्याच्या काळात पाळायचा असल्याने सगळ्यांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करणे यंदा अशक्य आहे. 

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी केलेले नियम 

 • परवानगी - सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका किंवा तत्सम स्थानिक प्रशासन, पोलीस अधिकारी यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक ठरेल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी गणेशोत्सवाकरिता त्या त्या गावातील अथवा शहरातील परिस्थितीनुसार केलेल्या नियमांचे या मंडळांना पालन करणे बंधनकारक राहणार आहे. 
 • मंडप आणि सजावट - गणेशोत्सवाचा मंडप, तेथील सजावट आणि इतर बाबतीत न्यायालय आणि स्थानिक प्रशासनाने त्याबाबत जे धोरण ठरवले असेल, त्याला सुसंगत अशा मर्यादित आकारांचे मंडप उभारावेत. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साध्या स्वरूपात साजरा होईल, याची काळजी मंडळांना घेणे सक्तीचे राहील. 
 • दर्शनाच्या सोयी - गणपतीच्या मांडवामध्ये निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रीनिंग या सुविधा असणे आवश्यक ठरविण्यात आल्या आहेत. श्री गणेशाचे प्रत्यक्ष दर्शन घेणाऱ्यांची रांग ६ फूट अंतर राखून करावी, प्रत्येकाने मास्क घातलेला असावा आणि त्या रांगेतून आत शिरताना तसेच बाहेर पडताना सॅनिटायझरची सोय असणे आवश्यक आहे. 
 • गणेशमूर्ती - सार्वजनिक गणेशोत्सवात मूर्तीची उंची जास्तीत जास्त ४ फूट असावी असा निबंध सरकारने घातला आहे. ही गोष्ट अनेकांना पटलेली नाही. गणपतीच्या मूर्तीची उंची आणि साथीच्या प्रतिबंधक नियमांचा काय संबंध असा प्रश्न अनेकांनी विचारला. मात्र यामागचे कारण पहिले तर ते संयुक्तिक वाटावे. मुंबईसारख्या शहरात गणेशमूर्ती कितीही मोठी किंवा उंच असली त्याच मूर्तीचे पूर्ण विसर्जन केले जाते. विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या विसर्जित मूर्तीं पर्यावरणाबाबत समस्या निर्माण करतात असा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. मूर्ती छोट्या असल्यास हा प्रश्न खूप कमी प्रमाणात निर्माण होईल असा सरकारचा कयास असावा. 
 • इतर शहरात आणि गावात मोठ्या मूर्तींचे विसर्जन जरी केले जात नसले, तरी विसर्जनाच्या मिरवणुकीत त्या मूर्ती असतात. यामुळे विसर्जनाच्या मिरवणुकीचा आकर्षकपणा वाढत असला, तरी मिरवणूक संपण्यास कमालीचा विलंब होतो. पुण्यासारख्या शहरात अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी दुपार टळून गेली तरी मिरवणुकी संपत नाहीत. छोट्या मूर्तींमुळे विसर्जनाला वेळ लागणार नाही असा सरकारचा कयास असावा. 
 • उत्सव वर्गणी - यंदा उत्सवाकरिता देणगी किंवा वर्गणी स्वेच्छेने दिली तरच त्याचा स्वीकार करावा असा नियम केला आहे. या नियमामुळे अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना दिलासा मिळेल. खरे तर हा नियम यापूर्वीच अमलात आणायला हवा होता. कारण गणपतीची वर्गणी मागायला आठ दहा जणांचा गट करून जाणे, त्यावरून भांडणे तंटे करणे ही नित्याचीच बाब आहे. आता या नियमामुळे सार्वजनिक शिस्त लागेल. शिवाय सर्वच समाज प्रचंड आर्थिक विवंचनेने त्रस्त आहे. त्यामुळे हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह ठरावा. 
 • जाहिराती आणि देखावे - गणेशोत्सवात चौकाचौकांत प्रदर्शित होणाऱ्या जाहिराती आणि देखाव्यांद्वारे गर्दी आकर्षित होणार नाही हे पाहावे. यामध्ये आरोग्यविषयक, सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी. गणेशोत्सव ही कोरोना आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आजारांविषयी समाजाची जनजागृती करण्याची एक चांगली संधी आहे. 
 • कोरोनाच्या प्रसारापासून प्रतिबंध करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, हात धुणे, परिसर आणि घराची स्वच्छता ठेवणे या गोष्टी ऐकून सगळ्यांना माहिती आहेतच. 
 • सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय? आणि ते का पाळायचे? ते पाळले नाही तर तुम्हालाच नव्हे तर तुमच्या प्रियजनांनादेखील कसा धोका निर्माण होतो? याची समाजातील अनेकांना अजूनही कल्पना नाही.  

मास्कबाबत म्हणाल तर मास्क कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात? कोणता प्रकार कुणी वापरायचा? कसे बांधायचे? कसे हाताळायचे? कसे स्वच्छ करायचे? याबाबत आजही सुशिक्षित वर्गातसुद्धा अज्ञान दिसून येते. 

हात कसे धुवायचे? किती वेळ धुवायचे आणि किती वेळा धुवायचे? केव्हा धुवायचे? याची शास्त्रीय पद्धत काय आहे? हात धुण्यासाठी सॅनिटायझर आणि साबण केव्हा वापरायचे? याबाबत लोकांमध्ये अजूनही संदिग्धता आहे, ती दूर करणे आवश्यक आहे.

कोरोना हस्तस्पर्शातून कसा पसरतो? रोजच्या वापरातल्या गोष्टी कशा धुवायच्या? 
कोरोना प्रसाराबाबत, त्याबद्दलच्या नियमांबाबत, अनेक अफवा आणि गैरसमजांबाबत, प्रतिकारशक्ती आणि इतर तथाकथित अशास्त्रीय उपायांबाबत जनतेला माहिती देऊन लोकांच्या शास्त्रीय कल्पनांना एक भरीव आकार देणे गणेशोत्सवाच्या माध्यमांतून शक्य होऊ शकेल. 

इतर सूचना

 • सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम म्हणजेच रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. तसेच कोरोना, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांसाठी असलेल्या प्रतिबंधात्मक उपायांना प्रसिद्धी द्यावी. 
 • आरती, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. याची काळजी घ्यावी. अशा कार्यक्रमांच्या वेळी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे आणि तरतुदींचे पालन करावे. 
 • गणपती दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक अशा ऑनलाइन सोयींद्वारे लोकांना उपलब्ध करून द्यावी.
 • गणपती मंडपाचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे. तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी. प्रत्यक्ष दर्शन घ्यायला येणाऱ्यांसाठी सोशल डिस्टन्सिंगचे, स्वच्छतेचे नियम पाळण्याची अट घालावी. 
 • विसर्जनाची मिरवणूक न काढता आणि विसर्जनस्थळी कोणतीही आरती न घेता कमीत-कमी वेळात निघावे. विसर्जन स्थळ लवकरात लवकर रिकामी करावे. 

घरगुती गणपतींसाठी केलेले नियम 

 • घरगुती गणपतीची उंची २ फुटांपर्यंत असावी.
 • स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावातच गणपतीचे विसर्जन केले जावे.
 • यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तींऐवजी घरातील धातू किंवा संगमरवरी मूर्तीचेच पूजन करावे. असे शक्य नसेल आणि शाडूची, पर्यावरणपूरक मूर्ती असेल तर तिचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे. घरी विसर्जन होणे शक्य नसेल तर कृत्रिम तलावातच विसर्जन करण्यात यावे. 
 • सरकारी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही नमूद केले आहे, की शक्य असल्यास गणेशमूर्तींचे विसर्जन पुढच्या वर्षी २०२१ मध्ये करावे. ही सूचना शास्त्रीय, वैद्यकीय किंवा धार्मिक कोणत्याही दृष्टीने पटणारी नाही. गणेशमूर्ती एक वर्ष सांभाळून ठेवणे हा एक वेगळा धार्मिक विषय आहे, मात्र ‘कोरोनासह जीवन जगू’ या संदेशाच्या आणि अनलॉकदरम्यान खुल्या होणाऱ्या निर्बंधांच्या दृष्टीनेदेखील ते विपरीत ठरेल. 
 • विसर्जनाची मिरवणूक न काढता आणि विसर्जनस्थळी कोणतीही आरती न घेता कमीत-कमी वेळात घरी पोचावे. 

परगावी गणपतीला जाण्याबाबत  

 • आपल्या गावी विशेषतः कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना रोखले जाऊ नये, यावरून अनेक उलट सुलट चर्चा, राजकीय आणि सामाजिक व्यक्तींची मते यांना प्रसिद्ध होत होती. मात्र परिवहन खात्याच्या मंत्र्यांनी जाहीर निवेदन दिले, की कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठी काय नियमावली पाळली जावी याची माहिती आम्ही केंद्र सरकार आणि आय.सी.एम.आर. यांच्याकडून मागवली आहे. परंतु कोकणात गणपतीसाठी एसटीने जाता येईल. यासाठी अटी, नियमांचे पालन करावे लागेल. एसटीने प्रवास करता येईल. 
 • मुंबईचे नियम - कोरोनाच्या महासाथीचा सर्वांत जास्त तडाखा मुंबईला बसला. मुंबईचा गणेशोत्सवही परंपरेने आणि नागरिकांच्या प्रचंड उत्साहाने भव्य स्वरूपात साजरा होत असतो. याबाबत मुंबईच्या महापौरांनी मुंबईसंबंधीच्या नियमावलीमध्ये गणपती आणताना आणि विसर्जन करताना फक्त ५ लोक असावेत. शाडूच्या मातीच्या मूर्तीचे घरी विसर्जन करावे आणि शक्य नसल्यास कृत्रिम तलावाच्या ठिकाणी जावे, घराजवळ समुद्र असेल तरच विसर्जनासाठी तिथे जा, असे सांगताना समुद्रावर गर्दी करू नये. घरगुती गणपतीच्या विसर्जनवेळी चाळीतील किंवा सोसायटीतील लोकांनी एकत्र येऊ नये, तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जन स्थळी जाऊ नये असे जाहीर केले आहे. 

लोकमान्यांनी सुरू केलेला महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव गेल्या शंभराहून अधिक वर्षांत अनेक रूपे पाळत गेला. सुरुवातीच्या स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तीचा संदेश देणारा, मेळे, पोवाडे भजने यांनी दुमदुमणारा, संगीताच्या कार्यक्रमांनी, भाषणांनी गाजणाऱ्या या उत्सवात नंतर मोठमोठे देखावे दाखवू जाऊ लागले, विद्युत रोषणाई आली. हिंदी आणि पाश्चात्त्य संगीत आले, अनेक ठिकाणी राष्ट्रभक्तीपर किंवा सामाजिक देखावे आणि त्या जोडीला धीरगंभीर वाजतील ध्वनिमुद्रित वर्णने ऐकवली जाऊ लागली. दर पाच-दहा वर्षांनी बदलत गेलेल्या या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक सोहळ्यात कोरोनाच्या या संसर्गामुळे एक सकारात्मक बदल करणे हीच आजची सामाजिक गरज आहे असे वाटते.

संबंधित बातम्या