कोविड १९ लशीचा प्रवास

डॉ. शरद आगरखेडकर
मंगळवार, 5 जानेवारी 2021

कोविड-१९ विषाणूविरुद्ध जगभरात सध्या तब्बल १६४ लशींवर संशोधन चालू आहे, म्हणजे या लशी तपासणीपूर्व पातळीवर आहेत. जागतिक आरोग्य संघटनने दिलेल्या माहितीनुसार या १६४ पैकी ४८ लशींच्या चाचण्या प्रत्यक्षात सुरू आहेत.

वर्षभरापूर्वी चीनमधील वुहान प्रांतातून उद्‌भवलेली आणि नंतरच्या काहीच महिन्यांच्या अवधीत संपूर्ण जगाला वेठीला धरणारी कोरोनाची साथ आटोक्यात येत आहे, असे वाटत असतानाच थंड हवामानाच्या प्रदेशांमध्ये कोरोना साथीची दुसरी लाट आली. या नव्या लाटेला तोंड देण्यासाठी जग सज्ज होत होते, तेवढ्यात कोविडच्या विषाणूने आपले रूपच बदलले. जगभरात थैमान घालणाऱ्या या विषाणूने आपली जनुकीय संरचनाच बदलली -तो म्यूटेट झाला -ही तशी वैद्यकीय क्षेत्रासाठी किंवा संशोधकांसाठी ‘बातमी’ नव्हती, कारण कोविडचा विषाणू आतापर्यंत सतरा वेळा बदलला आहे. पण ब्रिटनमध्ये या विषाणूचे जे रूप समोर आले आहे, त्यामुळे सर्व जगावर पुन्हा एकदा काळजीचे मळभ दाटलेले आहे. 

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, कोरोनाला रोखणारी लस शोधण्यासाठी आतापर्यंत जे संशोधन झाले, त्या सगळ्याविषयीही पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली. विषाणूच्या या नव्या अवतारावर आता येणारी लस किती प्रभावी ठरेल, या शंकेला किनार आहे ती रशिया, ब्रिटन आणि अमेरिकेसह युरोपातल्या आणि लॅटीन अमेरिकेत झालेल्या लसीकरणाबाबत आणि लस घेतलेल्या काही लोकांना झालेल्या त्रासाबद्दलच्या बातम्यांची. मात्र सध्या सगळ्या जगाला वाटणारी काळजी दूर करण्यासाठी लस हाच उपाय आहे आणि सारे जग कोरोनला रोखणाऱ्या लशीची आतुरतेने वाट पाहत आहे. 

भारतातही आता लसीकरणाची रंगीत तालीम सुरू झाली आहे. अलीकडेच वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या पाहता येत्या काही दिवसांत भारतात तयार होणाऱ्या लशीलाही परवानगी मिळेल, अशी आशा आहे.

कोणत्याही रोगावरच्या लशीचा एक नेमका प्रवास असतो. लस निर्माण करताना पहिला टप्पा असतो प्राण्यांवर होणारे प्रयोग (Preclinical). त्यानंतर लशीवर आणखी चार टप्यांमध्ये काम करावे लागते. प्राण्यांवर लशीचे घातक परिणाम होत नाहीत, हे सिद्ध करूनच मग टप्पा एक सुरू करावा लागतो. ह्या टप्प्यात प्रकर्षाने लशीच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित केलेले असते. हा टप्पा ओलांडल्यावर मग दुसऱ्या टप्प्यात निरोगी पुरुषांवर लशीचा प्रयोग केला जातो. ह्या टप्प्यात लशीच्या दुष्परिणामांबरोबरच, या लशीमुळे किती प्रतिकारशक्ती निर्माण होते आहे हेदेखील पहिले जाते. तिसऱ्या टप्प्यात आणखी जास्त संख्येने निरोगी स्त्री-पुरुषांना लस दिली जाते. लशीचे दुष्परिणाम काटेकोरपणे तपासले जातात व प्रतिकारशक्तीची मानके ओलांडली जातात किंवा कसे हे पाहिले जाते. 

प्रत्येक देशात या प्रक्रियेवर लक्ष ठेवणाऱ्या स्वतंत्र यंत्रणा आहेत. भारतात ह्या चाचण्यांचे अहवाल भारत सरकारच्या औषध नियंत्रण विभागाच्या समितीसमोर ठेवले जातात. ह्या समितीतील तज्ज्ञ अभ्यास करून विशिष्ट लस वापरण्यात परवानगी देण्याबाबत निर्णय घेतात. त्यानंतर लस बाजारात येते. लस बाजारात आल्यानंतर दोन वर्षांनी या प्रक्रियेचा चौथा टप्पा सुरू होतो. या टप्प्यातही लशीच्या चाचण्या घ्याव्या लागतात.

कोविड-१९ विषाणूविरूद्ध जगभरात सध्या तब्बल १६४ लशींवर संशोधन चालू आहे, म्हणजे या लशी तपासणीपूर्व पातळीवर आहेत. जागतिक आरोग्य संघटनने दिलेल्या माहितीनुसार या १६४ पैकी ४८ लशींच्या चाचण्या प्रत्यक्षात सुरू आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कोविड १९ला प्रतिबंध करू शकणाऱ्या लशी नऊ प्रकारच्या आहेत. डीएनए, आरएनए, विषाणू वाहकासोबत, विषाणूचा पोटभाग, संस्कारित जिवंत विषाणूयुक्त, निकामी केलेल्या विषाणूपासून बनविलेली, व्हीपीएल, विषाणूचे तुकडे करून त्यापासून बनविलेली आणि आरएमपी. यातल्या काही लशींचा एकच डोस आहे, मात्र अन्य काही लशींचे दोन डोस घ्यावे लागतील. चौदा, एकवीस किंवा अठ्ठावीस दिवसाच्या अंतराने हे डोस घ्यावे लागतील.

जगातल्या अनेक संस्थाच्या बरोबरीनेच भारतातील सिरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक, झायडस कॅडिला, डॉ. रेड्डीज वगैरे औषध निर्माण कंपन्याही लस निर्मितीच्या ह्या प्रक्रियेत आघाडीवर आहेत.

प्रत्येक लशीचे लक्ष्य आणि कृती वेगळी वेगळी असली तरी लस घेणाऱ्यांच्या शरीरात प्रतिपिंडे (अॅन्टीबॉडीज) बनविणे, ‘बी’ व ‘टी’ प्रकारच्या पांढऱ्या पेशींच्या माध्यमातून प्रतिकारशक्ती स्मृती (immunological memory) निर्माण करणे हा लशीचा उद्देश असतो. प्रतिपिंडे काही दिवसांनी कमी होतात, मात्र स्मृती कायम राहते. कोविड विषाणूची लस दिल्यानंतर आठ दिवसात प्रतिपिंडे निर्माण होण्यास सुरुवात होते. त्यास प्राथमिक प्रतिसाद असे म्हणता येईल हा प्रतिसाद मंद व कमी तीव्रतेचा असतो. दुसरा डोस दिल्यानंतर प्रतिपिंडाचा प्रतिसाद वेगाने वाढतो व प्रतिकारशक्तीची स्मृतीही नोंदवली जाते. हा प्रतिसाद पुढे कायमस्वरूपी टिकतो. लसीच्या उपयुक्ततेत पेशींची स्मृती हाच कळीचा मुद्दा आहे.

अशा साथरोगांच्या पार्श्वभूमीवर जगभरातले शास्त्रज्ञ लशींवर संशोधन करण्यात गढलेले असतात. या साऱ्या प्रयत्नांतून अखेरीस काहीच प्रयत्न यशस्वी होत असतात. अमेरिकेने गेल्या महिन्यात सर्वप्रथम लसीकरणाला सुरुवात केली. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांना लस देतानाचे प्रत्यक्ष प्रसारण तेथील दूरचित्रवाणीवरून करण्यात आले होते. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, पोलिस यांना लस दिली जाईल. त्यानंतर वृद्धाश्रमात राहणारे ज्येष्ठ तसेच दमा, हृदयविकार, कर्करोग, मधुमेह व मूत्रपिंडाचे आजार असणाऱ्या ६५ वर्षांखालील व्यक्तींना लस दिली जाईल. अशा पद्धतीने नियोजन करून तुमच्या आमच्यापर्यंत लस पोचवण्यासाठी भारत सरकारही राज्य सरकारांच्या मदतीने युद्ध पातळीवर काम करत आहे.

जगातील अनेक देशांनी ह्या लशींची आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे. भारताचा त्यात नववा क्रमांक लागतो. युरोपातले देश, अमेरिका, जपान, ब्रिटन व कॅनडा हे मागणी नोंदविणाऱ्या पहिल्या पाचात आहेत. 

इनोव्हायो कंपनीची डीएनए व मॉडर्ना फायझरची आरएमए या लशी पेशींची प्रतिकारशक्ती वाढवतात. ह्यात निर्माण मूल्य कमी, वेगाने डोस बनविता येतात, व ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा रुग्णांनाही देता येतात. छप्पन्न दिवसानांनंतर प्रतिपिंडे कमी होतात. मग काय? असा प्रश्न या संदर्भात विचारला जाऊ शकतो. परंतु प्रतिकारशक्तीची स्मृती (मेमरी) असते व ती कायमच असते, असे एक उत्तर याबाबतीत संभवते.

कोरोनावर परिणामकारक लस बनवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत, लशींच्या चाचण्याही सुरू आहेत. त्या चाचण्यांच्या परिणामांवर जगभरातले तज्ज्ञ बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या संदर्भातला अभ्यास जसा पूर्ण होईल तसा लशीचा वापर अधिकाधिक परिणामकारक होत जाईल, असे अभ्यासकांना वाटते.

 

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून यापूर्वी विविध लशींच्या जागतिक पातळीवर झालेल्या पहिल्या ते चौथ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे.)

सध्याच्या परिस्थितीत जगातल्या विविध भागांतल्या नागरिकांच्या समूह प्रतिकारशक्तीबाबत जे काही अहवाल उपलब्ध झाले आहेत; त्यानुसार साधारणत: ८० ते ९० टक्के लोकांमध्ये प्रतिपिंडे निर्माण झाली असावीत व समूहाची प्रतिकारशक्ती वाढली असल्यानेच साथ आटोक्यात आली असावी, असे मानण्यास जागा आहे.

संबंधित बातम्या