शाळा उघडताना

डॉ. उमेश प्रधान
सोमवार, 6 डिसेंबर 2021

कव्हर स्टोरी

‘ओमायक्रॉन’ या कोरोना विषाणूच्या नव्या अवतारामुळे राज्याच्या काही भागात शाळा सुरू करण्याविषयी अजून साशंकता असली, तरी आता मात्र बऱ्याचशा मुलांना शाळा भरण्याच्या घंटेचे वेध लागले आहेत. मात्र गेल्या जवळजवळ एक ते दीड वर्षाच्या काळात मुलांनी काय कमावले आणि गमावले याचा शोध घेतला तरच शाळा उघडतानाची दिशा आपल्याला सापडू शकेल. एक दुःस्वप्न संपण्याच्या मार्गावर आहे, पण त्यातून आपण काही धडा घेतला नाही तर मात्र आपण होऊ घातलेल्या नुकसानीत भरच घालतो आहोत असे म्हणावे लागेल.

एक धावता आढावा घेऊया कोरोनाकाळातील अभूतपूर्व परिस्थितीचा विद्यार्थ्यांवर झालेल्या परिणामांचा. या परिणामांचा अभ्यास शिक्षकांना आपली अध्यापन दिशा ठरवताना होणार आहे. मुलांच्या शारीरिक विकासावरचा परिणाम तर दृश्यच आहे. घरी बसून राहिल्याने, शारीरिक हालचाल नसल्याने लहान वयातील अनेक मुले अंगाने सुटली, चापल्य हरवून बसली. धावणे, उड्या मारणे, खेळ यापासून दूर राहिल्याने हालचाली मंदावल्या. बालपण काहीसं हिरावून बसलेली ही पिढी. ऑनलाइनच्या माऱ्याने शरीराची बैठक बिघडली. खूप जणांच्या बाबतीत मानेच्या, कंबरेच्या, डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली. शाळेच्या दप्तराचे ओझे कमी झाले खरे, पण मनावरच्या ताणाचा परिणाम शरीरावर झाला. शिक्षकांसमोर प्रत्यक्षात जेव्हा ही मुले येतात तेव्हा त्यांच्यात झालेला बदल शिक्षकांनाही धक्काच देणारा असतो.

बौद्धिक प्रगतीतही मुले मागे पडली. इयत्ता पहिलीपासून होणारी अक्षरांची, शब्दांची ओळख व्हायचीच राहून गेली. लेखन कामात मुले मागे पडली, वाचनाची गतीही मंदावली. आकलनाचा अपेक्षित वेग ती धरू शकली नाहीत. विचार करायला लावणारी कौशल्ये थांबली. साध्या संकल्पना मुले विसरून गेली. आपण जो अभ्यास करतो आहोत, तो बरोबर की चूक हे न समजताच जे सांगतील ते करायचे एवढीच भूमिका घेत बसली. केवळ परीक्षा हे अध्ययनाचे एकच उद्दिष्ट राखल्याने अभ्याससुद्धा जेवढ्यास तेवढा. 

घरात राहून मुले काहीशी एकलकोंडीही झाली, मोबाइलच्या स्क्रिनमध्ये अडकून पडली. त्यात चारही बाजूंनी येणाऱ्या उलट सुलट बातम्या, भीतीमध्ये भर घालणाऱ्या. शिक्षणक्षेत्रातील निर्णय दिरंगाई मनात निराशा निर्माण करणारी. बराच काळ कुणाकडे जाणे येणे नाही, एकटेपणात वाढ झाली . ज्यांच्याकडे ऑनलाइनची पुरेशी सोय नाही त्यांना दडपण आले. ‘इतर मुले पुढे जाणार, मला काही समजत नाहीये, माझे कुणी ऐकत नाहीये’. त्यामुळे वाढला ताण अशी अवस्था. भावनिक दुरवस्था तर मुलांच्या दडपणात भर घालणारीच. ज्यांचे विरेचन शालेय जीवनात होत असते, त्यापासूनच मुले दूर गेली. रोज सामोरे जावे लागणाऱ्या भावनाकल्लोळात मुले हरवून गेली. त्यांच्या सुखात सहभागी होणारी, दुःखावर फुंकर घालणारी, आपुलकीची शाळा, ते वात्सल्य, जिव्हाळा याला मुले वंचित झाली. 

काही ठिकाणी शाळेत येऊ घातलेल्या मुलांचे निरीक्षण करताना त्यांची शिक्षणाची आवड, बैठक कदाचित मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे जाणवेल. काही विद्यार्थी तर परत एकदा परीक्षा रद्द होतील यासारख्या भ्रामक स्वप्नातच रमलेले दिसतात. आधीच शाळेत यायला तयार नसणाऱ्या मुलांना शाळेकडे परत वळवायचे आव्हान शिक्षण व्यवस्थेला स्वीकारावे लागेल. ‘स्कूल चले हम’चा नारा परत एकदा गाजवावा लागेल.

नुकत्याच  आत्मसात केलेल्या अध्ययनाच्या कृतीमधून शिकण्याच्या आवडीवर परिणाम झाला. अध्ययन करणे हे योग्य त्या सवयी लावण्यासारखे असते. परंतु या सवयीच बरेचसे विद्यार्थी घालवून बसले. शाळा ही केवळ माहिती देण्याचे काम करत नसते तर माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याची ती एक सतत चालणारी प्रयोगशाळा असते. तीच नेमकी बंद झाली. जे शाळेत साध्य केले जाते ते तंत्रज्ञानाने साध्य होत नाही. त्यामुळे झालेले नुकसान भरून येण्यासाठी वेळ लागणार.

सहकार्य, सहजीवन, ताण-तणाव व्यवस्थापन, संप्रेषण, आपत्ती व्यवस्थापन यासारख्या जीवन कौशल्य विकासापासून मुले दूर झाली. हे झालेले नुकसान कसे भरून काढायचे आणि शिक्षणाची गाडी पूर्वपदावर कशी आणायची हे आता शाळांसमोरील आव्हान खरे असणार आहे.

समस्यांचे अनुभव
कोरोनाच्या अवघड काळातले आणि त्यानंतरचेही मुलांचे अनुभव विचार करायला लावणारे तर आहेतच, पण ते शिक्षकांना त्यांची वर्गाध्यापनाची पुढची दिशा ठरवायला उपयुक्त ठरणारे आहेत. शिक्षकांनी त्यावर आधारित असे शैक्षणिक अनुभव मुलांसाठी बेतले पाहिजेत.

आप्तेष्ट हरवून बसलेली अनेक  मुले जीवनाचा एक वेगळाच अनुभव घेत होती. कुटुंबातील ढासळलेली अर्थव्यवस्था जवळून अनुभवत होती.  अनेक कुटुंबे  अजूनही त्यातून सावरत आहेत. रिकाम्यापोटी तत्त्वज्ञान काय कामाचे? 

‘कोरोना फोबिया’ नावाचा प्रकार नव्यानेच उदयाला आला. त्याच्या दहशतीखाली असणारा वावर हा विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीवर मोठा परिणाम करताना दिसतो. त्यातच परीक्षेच्या बागुलबुवाची सातत्याने भीती  घातली गेल्याने, त्या दडपणाखाली विद्यार्थी आला दिवस घालवताना दिसले. एवढे होऊनसुद्धा या सर्व समस्यांमधून दूर होण्यासाठी सुनिश्चित  अशा मार्गदर्शनाचा अभाव आढळतो आहे.

ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणाची झालेली दुरवस्था हा आणखी एक मुद्दा. या काळातच विद्यार्थी वर्गात (पर्यायाने समाजात) नव्याने ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांच्यातील दरी वाढती झाली. ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस उपलब्धत आहेत, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, असे ‘आहे रे’, ज्यांनी ऑनलाइन टीचिंगच अनुभव घेतला. अर्थातच तो सगळाच अनुभव काही चांगला नव्हता. पण गेले वर्ष -दीड वर्ष विद्यार्थी त्या शिक्षणाला खऱ्या अर्थी मुकलेलेच आढळतात.  

बदललेले विद्यार्थी
या दरम्यान विद्यार्थ्यांच्यात झालेले बदल अगदी लक्षणीय आहेत. शिक्षकाने ते विचारात न घेताच पारंपरिक पद्धतीने जर आता शिकवायला सुरुवात केली तर ते आणखीनच घातक ठरणार आहे. 

मोबाईल, संगणकासारख्या एरवी अत्यंत उपयुक्त वाटणाऱ्या या यंत्रणांमुळे झालेले दुष्परिणाम नाकारून चालणार नाही. गॅजेटच्या आहारी गेलेली एक पिढी निर्माण झाली. ज्यातून स्वनिर्मिती, सर्जनशीलता, कल्पनारम्यता या सर्वांचे असणारे शिक्षणातील मौल्यवान स्थान पुनः प्रस्थापित करणे आव्हानात्मकच राहणार आहे. सगळ्यांना शॉर्टकट्स हवेत. पण खरे यश संपादन करताना असे शॉर्टकट्स कामाचे नसतात. प्रत्यक्ष जीवनात ते असत नाहीत, हे वास्तव विद्यार्थ्यांना समजवावे लागेल.

आता शाळेत येऊ घातलेला विद्यार्थी कसा आहे, याचे निरिक्षण केले पाहिजे. विद्यार्थी शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यात मागे पडलेला आहे. कदाचित शिक्षणातील आनंद, रस हिरावून बसलेला आहे. अध्ययनाच्या सवयी घालवून बसलेला आहे. एकाच जागी बसून चिकाटीने, एका बैठकीने शिकण्यामध्ये बदल झालेला आहे. शिक्षणातील गांभीर्य हरवून बसलेली पिढी निर्माण झाली आहे की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. शिकणे म्हणजे केवळ परीक्षा उत्तीर्ण होणे असा अर्थ होऊन बसला आहे. त्यांच्या मूलभूत संकल्पनांच्या आकलानात पडलेली दरी लक्षणीय आहे. केवळ परीक्षार्थी बनून शिकवली जाणारी आणि शिकणारी मुले पाहून खरेच वाईट वाटते. शिकण्यातल्या आनंदाला विद्यार्थी पारखे झाले आहेत.

संभ्रमावस्थेतले पालक
पालकही नव्याने निर्माण झालेल्या ताण तणावातून  जात आहेत. तेदेखील एक प्रकारची  गोंधळलेली अवस्था  अनुभवत आहेत.  अचानकपणे आलेली एक नवीनच जबाबदारी  त्यांना झेलावी लागत आहे.  एरवी सर्व जबाबदारी शाळेवर टाकणारे पालक आता खऱ्या अर्थाने आपल्या पाल्याच्या शैक्षणिक जबाबदारीचे दायित्व घेताना आढळत आहेत. सर्व जबाबदारीचे शेवटचे घटक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. परंतु ते देखील निर्णय घेण्यास असमर्थ आहेत, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे  योग्य आणि वेळीच आवश्यक असणाऱ्या मार्गदर्शनाचा, सल्ल्याचा अभाव.  रोज येणाऱ्या उलट सुलट बातम्यांनी हैराण झालेले, मानसिक तणावाखाली असणारे पालक सामायिक निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांच्याही मनात मुलांच्या सुरक्षेबद्दल असंख्य शंका आहेत. पालकांची मानसिकता बदलणे, तिला  सकारात्मकतेची  जोड देणे, हे काम शाळांनाच करावे लागेल. 

गोंधळलेले शिक्षक
शिक्षक समुदायही  फार मोठ्या  संक्रमण आणि संभ्रम या अवस्थेतून जात आहे.  ते कोणताही  स्वयंनिर्णय घेण्यास अक्षम  आहेत. त्यांनाही आवश्यक असणाऱ्या मार्गदर्शनाचा अभाव निश्चितच जाणवतो.  त्यामुळेच केवळ योग्य आदेशाची वाट पाहणे एवढेच त्यांच्या हातात उरते. खरे तर ऑनलाइन अध्यापनाचे प्रशिक्षण नसताना, साधने उपलब्धता नसतानासुद्धा शिक्षकांनी स्वतःला तयार केले आणि शिकवण्याचे धाडस केले. संगणक महाजालात अडकून गेल्याने काय करावे आणि काय करू नये या संभ्रमात अनेक गोष्टी पटत नसतानासुद्धा त्या करत राहाव्या लागल्या. विद्यार्थी वरच्या वर्गात कसे जातील या चिंतेतून मग  त्यांचे अध्यापन काहीसे  परीक्षा केंद्रित  व्हायला लागले. एकूणच शिक्षक गोंधळलेला.

नेमक्या बदलाची गरज
अशा अवस्थेत मग विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी आणि शाळांनी नेमके काय करावे, याचे चिंतन करणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर उपलब्ध वेळेच्या गणिताच्या साहाय्याने लवकरात लवकर कृती कार्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. वेळ जातच आहे, परंतु त्यातून शहाणे होऊन  ठोस असा निर्णय  आणि अंमलबजावणी होताना मात्र दिसून येत नाही. त्यातील दिरंगाई महागात पडणारी ठरणार आहे. मुलांच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक विकासाच्या दृष्टीने, शिक्षक जे काही या परिस्थितीमध्ये संपादित करू शकलेले नाहीत ते त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने काही उपक्रम, प्रकल्प हाती घेणे आवश्यक आहे. ज्यात खेळ, स्पर्धा, गप्पा-गोष्टींसारखे कार्यक्रम योजायला हवेत. कल्पक बनून मुलांचा कृतियुक्त सहभाग वाढेल असे पाहायला हवे. पाठ्यपुस्तकीय शिक्षणाची घाई न करता मुले मोकळी कशी होतील, तणावरहित कशी होतील हे योजावे लागेल, त्यासाठीचे नियोजन करावे लागेल. 

पाठ्यपुस्तकातील किमान आशय जरी तोच ठेवला तरी  त्यात अनेक गोष्टींचा नव्याने समावेश करण्याची गरज आहे.  पाठयपुस्तकातून नव्या अध्ययन पद्धतीची गरज  लक्षात घेऊन त्या पद्धतीने नवे स्वाध्याय  विकसित करण्याची गरज आहे. थोडक्यात किमान संकल्पनांचा विचार करावा लागेल. पारंपरिक पद्धतीने शिकून आता भागणार नाही.  स्वअध्ययनासाठीची पॅकेजेस तातडीने विकसित करावे लागतील.  ज्यामधून विद्यार्थी स्वतःसाठीची प्रेरणा मिळवतील, स्वतःची उद्दिष्टे ठरवू शकतील, आवश्यक स्वाध्याय व सराव करतील, तसेच स्वतःचे मूल्यमापनदेखील करतील. या स्वरूपाचे साहित्य उपलब्ध झाल्यास विद्यार्थी जास्त सक्षमपणे शिकू शकतील. दुसऱ्या बाजूला ई-बुक विकसित करण्याची गरज  मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातील स्वाध्याय,  सराव साहित्य, वेबसाइट, ऑडिओ आणि व्हिडिओ साहित्य हे सर्व एकमेकांशी जोडलेले असेल. नव्याने अवगत केलेल्या तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर विद्यार्थी व शिक्षकांनी करणे आवश्यक आहे. ते तंत्रज्ञान एकदम सोडून चालणार नाही. शिक्षकांनी  आशयाच्या अध्यापनावर लक्ष केंद्रित न करता संकल्पनांच्या शिक्षणाला महत्त्व देणे आवश्यक आहे. तर आणि तरच अध्ययनाचे  ओझे आणि पाठ्यपुस्तकाचे ओझे कमी होण्यास मदत होईल. कमीत कमी वेळात मुले शिकू शकतील. मुलांना पाठ्यपुस्तकापलीकडे  घेऊन जाणे  हे शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे. ज्यातून पाठांतराचे महत्त्व कमी होईल व संकल्पनात्मक शिक्षणाचे नवे वारे वाहू लागेल.  तसेच अध्ययन प्रक्रियेला लक्षात घेऊन शिक्षकांनी आपल्या अध्यापन प्रक्रियेत बदल घडवून आणला पाहिजे.

संमिश्र (Blended) अध्यापन पध्दती 
एक म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक हे एका डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे एकत्रित येतात आणि मग दोघांच्यातील संवादातून विद्यार्थी शिकतात. यात परत दोन पद्धतींचा विचार होतो. पहिला प्रकार म्हणजे ऑनलाइनच प्रत्यक्ष शिकणे-शिकवणे (Synchronous). यात विद्यार्थी व शिक्षक एखाद्या वर्गातल्या प्रमाणेच एकमेकाशी जोडले जातात. विविध माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना दिसतात, ऐकू येतात व विद्यार्थी त्यांच्याशी संपर्कात राहू शकतात. दूरस्थ पद्धतीने संवाद होऊ शकतो, शंकांचे निरसन होऊ शकते. दुसरा प्रकार म्हणजे शिक्षक आपल्याला जे शिकवायचे आहे ते एखादे दृक-श्राव्य माध्यम वापरून ते प्रदर्शित करतात, अन् मुले त्यांच्या सोयीने केव्हाही, कुठेही ते पाहून, ऐकून शिकू शकतात, इथे मुले प्रत्यक्षात शिक्षकाच्या समोर नसतात (Asynchronous). अर्थात वर्गात शिकवल्याप्रमाणे अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही पहिली पद्धतीच निवडणार. अध्यापन-अध्यापनाचा हा प्रकार ऑनलाइन शिकविण्याच्या या काळात अपरिहार्य होऊन बसला.

संकरित पद्धती (Hybrid) 
या पद्धतीतही दोन प्रकारे विचार करावा लागेल. काही विद्यार्थी घरून डिजिटल माध्यमातून शिकतील, तर काही विद्यार्थी पारंपरिक पद्धतीने वर्गात प्रत्यक्ष धडे घेतील. आणि शिक्षक एकाच वेळेस दोन्ही विद्यार्थ्यांना संबोधित करतील. किंवा विद्यार्थ्यांचे दोन गट करून, त्यातल्या एका गटाला शिक्षक ठरावीक वेळेस डिजिटल पद्धतीने प्रत्यक्ष संबोधित करतील आणि दुसरा गट प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून शिकेल. दुसऱ्या दिवशी त्या गटांची अदलाबदल करून जे डिजिटल माध्यमातून शिकत होते त्यांना प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहाता येईल, तर ज्यांनी प्रत्यक्ष अध्यापन केले आहे ते घरी राहून डिजिटल पद्धतीने शिकतील. अशा दोन्ही पद्धतींचे केलेले संकरण येथे अपेक्षित आहे. 

मात्र या पद्धती अंगिकारताना अध्यापनाच्या प्रक्रियेला महत्त्व द्यायला हवे. मुले शिकतात कशी, हे लक्षात घेउन शिक्षकांनी शिकवणे गरजेचे आहे. ज्यात मुले श्रवण, भाषण-संभाषण, वाचन, लेखन, गणन यासारख्या कौशल्यांचा उपयोग करतील हे पहावे लागेल. याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर कसा आणि किती करायचा हेदेखील ठरवायला हवे. तंत्रज्ञानाच्या जास्त आहारी जाऊनही चालणार नाही. मुले आपले स्वतःचे अस्तित्व कसे टिकवतील, स्वविकसन कसे साधतील, हे ठरवून तसा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. त्यासाठी मुलांना स्वयंअध्ययनाच्या सवयी लावायला हव्यात. पर्यवेक्षित अध्ययनाचे महत्त्व समजून घ्यायला हवे. केवळ हे तुम्ही घरी करायचे आहे, असे सांगून अभ्यास मुलांवर सोडून चालणार नाही. त्यांना योग्य त्या मार्गदर्शनाची गरज आहे ते वेळोवेळी देणे आवश्यक आहे.  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मधील अपेक्षित अध्ययन अध्यापन पद्धतींचा लवकरात लवकर स्वीकार करायला हवा.  शिक्षकांनी स्वतःत बदल घडवून स्वतःला जास्त कार्यक्षम बनवायला हवे. अन्यथा आम्ही एक शिक्षक म्हणून या जागतिक धक्यापासून काहीच बोध घेतला नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. 

मूल्यमापनातील बदल
पारंपरिक मूल्यमापन पद्धतीमधील अंतिम लेखी परीक्षांचे अवास्तव महत्त्व दूर करून विद्यार्थी अध्ययन कसे करतील, याकडे जास्त लक्ष पुरवणे आवश्यक आहे. मूल्यमापनाच्या पद्धतीमध्येसुद्धा योग्य तो बदल विचारपूर्वक घडवून आणणे आवश्यक आहे. अंतर्गत मूल्यमापनाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यातील त्रुटी दूर कशा होतील, हेदेखील पाहावे लागेल. प्रकल्प, मौखिक परीक्षा यासारख्या मूल्यमापनाच्या पद्धतींचा समावेश करावाच लागेल. त्यासाठी आवश्यक असणारी विश्वासार्हता, व्यक्तिनिरपेक्षता आणि पारदर्शकता कशी निर्माण होईल, याचाही विचार व्हायला हवा. केवळ लेखी परीक्षेचे महत्त्व न वाढवता परीक्षणाच्या इतर पद्धतींचा वापरसुद्धा व्हायला हवा. त्यासाठी आवश्यक असणारी समाजाची मानसिकता घडवायला हवी. मूल्यमापनातील हे  बदलच शिक्षणाच्या सर्व स्तरावर योग्य ती सुधारणा घडवून आणण्यास कारणीभूत ठरतील.

ज्या वेगाने शिक्षणातील अधिकारी वर्गाने निर्णय घेणे, अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे ते घडताना दिसत नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते. धडक कार्यक्रम हाती घेणे, कृती कार्यक्रम देणे, समस्याहरण, शंकासमाधान होताना दिसत नाही. ही धीमी वाटचाल आपल्याला परवडण्याजोगती नाही. कोरोनाच्या काळ्या ढगाला रुपेरी कडा दिसत असताना, एक बदलाची लहर दौडताना दिसत नाही. ही चिंतेची बाब आहे. आपल्याला सामाजिक निर्णयक्षमतेच्या बाबतीत बऱ्याचदा अपयश येते याला कारण म्हणजे आपल्यामध्ये असणारी परंपरेची ओढ, नियोजनाचा अभाव, प्रत्येक गोष्ट गोपनीय राखण्याची आवड, कृतियोजनेची कमतरता आणि टॉप टू बॉटम ही वृत्ती. सगळे शक्य आहे, परंतु जी इच्छाशक्ती तयार व्हायला पाहिजे त्याची प्रतिक्षा आहे. 

(लेखक माजी प्राचार्य व राज्य शिक्षण मंडळाच्या इंग्रजी विषयासाठीच्या अभ्यास मंडळाचे माजी निमंत्रक आहेत.)

मुख्याध्यापक व शिक्षक व्हाॅट्सअॅप संवाद

  • सर्व शिक्षकांनी स्वतःचे अभ्यासाचे व्हिडिओ बनवून विद्यार्थ्यांच्या ग्रुप वर टाकावेत. 
  • पण सर आम्ही जे वर्गात शिकवत आहोत त्याने भागणार नाही का? 
  • आता जरा जुन्या सवयी बदला. मुलांच्या शिकण्याकडे लक्ष द्या. तुमच्या शिकवण्यापेक्षा त्यांचे शिकणे महत्त्वाचे.
  • शिवाय ते स्वयंअध्ययनाचे पॅकेज लवकर तयार करा. 
  • वर्कशीट्स पण तयार करा. तुमचे शिकवणे सोपे होईल.

घरात अडकून बसलेल्या मुलाचे आत्मवृत्त
काय बोअर झालंय, अगदी कहर. घरात बसायचं म्हणजे जुलूमच झालाय. आता शिकण्याची आमची जबाबदारी वाढलीय हे खरंच. आता म्हणे शाळा उघडणार आहेत. मित्रमंडळी नाही, गप्पा नाहीत, भांडणंही नाहीत. अभ्यासाचे म्हणाल तर एक बरंय, या काळात ना बरंच काही आम्ही स्वतःच करायला शिकलोय.

पालकाची निरीक्षण वही
अजूनही शाळेकडून कसल्याच सूचना नाहीत. काय चाललंय आणि काय होणार आहे हे समजतच नाही. पोरांच्या शिक्षणाचा एवढा विचार करायला लागेल असे वाटले नव्हते. एरवी त्यांना काय पाहिजे ते आणून द्यायला आम्ही तयार असायचो. पण आता नुसते पुरवठा करून भागत नाही. ते काय शिकत आहेत, मोबाईलवर काय पाहात आहेत? ते वरच्या वर्गात जाणार की नाही? एक ना दोन, अनेक प्रश्न रोज नव्याने भेडसावत आहेत.

अध्ययन व अध्यापन पध्दती
शिक्षणाची घडी परत नीट बसवणे, हे एक आव्हान आता निर्माण झालेले आहे.  त्यासाठी थोडा वेळ तर नक्की द्यावा लागेल. अभ्यास, नेहमीचे शालेय विषय विद्यार्थ्यांच्या मागे लावून न देता त्यांच्या मानसिकतेचा पूर्ण विचार करणे गरजेचे आहे. निदान सुरुवातीचा काही काळ हा पारंपरिक पद्धतीने शिकवण्यापेक्षा, मुलांना आनंद कशात मिळेल हे समजून घेणं आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर आणि पारंपरिक वर्गाध्यापन यामध्ये योग्य तो समतोल राखून अध्यापन अपेक्षित आहे.

संबंधित बातम्या